गुरुजी , त्यांचे आई व वडील आणि
माईच्या कडेवर राजूदादा , गुरुजींचा
भाऊ मधुकाका आणि बहीण आशा , नंदुरबार येथील
फोटो स्टुडिओमध्ये काढलेला एक दुर्मिळ फोटो.  | | राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज |
गुरुजींच्या आईने १९३६-३७ ला खामगावला संत पाचलेगावकर महाराज यांच्याकडे गुरुजींना दिले. संचारेश्वर पाचलेगावकर महाराज याना सर्पसिद्धी होती. अनेक प्रकारचे सर्प त्यांच्या आश्रमात मुक्तपणे वावरत असत. पाचलेगावकर महाराज स्वतः गळ्यात सर्प घालून फिरत असत. शिक्षणाबरोबरच मुक्तेश्वर मठातील सर्प पेटारे साफ करणे गुरुजी करत. भोजन प्रसंगी पत्रावळी वाढणे आणि आश्रमातील इतर कामेही ते करत.
वडील दशग्रंथी ब्राम्हण , त्यामुळे मुलाने भिक्षुकी करावी असे वडिलांचे मत, तर मुलाने शिकून नोकरी करावी असे आईचे मत. मग इंटर पर्यंत शिकून गुरुजींनी पोलीस खात्यात नोकरी चालू केली आणि सोबत भिक्षुकीही केली व आई आणि वडिलांची इच्छा पूर्ण केली. प्राथमिक शिक्षण खामगावला केले. संस्कृत विषय घेऊन मॅट्रिक त्यांनी एरंडोलच्या हायस्कूलमधून केले. अमळनेरला इंटर करून ते पोलीस खात्यात नोकरीला लागले. नोकरी सांभाळून ते भिक्षुकी करत.
 | पूजा सांगताना तल्लीन झालेले गुरुजी |
गुरुजींचे लग्न त्यांच्याच गावातील सधन कुटुंबातील श्री. सदाशिव दीक्षित यांची सुकन्या प्रतिभा यांच्याशी १८ डिसेंबर १९५० ला झाले. या विषयी मी सविस्तर माई वरील लेखामध्ये लिहिले आहे. गुरुजींच्या वडिलांचे गुरु निजामपूरचे नित्यानंद सरस्वती महाराज होते. गुरुजींच्या वडिलांनी गुरूंना वचन दिले होते की तुमची नात मी सून करून घेईन. त्याप्रमाणे गुरुजींनी पितृआज्ञा पाळून सखाराम दीक्षितांची मुलगी प्रतिभा हिच्याशी लग्न केले. १९५७ ला त्यांची मुंबईला बदली झाली आणि अत्यंत गरिबीतून त्यांनी संसार चालवला. या दरम्यान त्यांना राजूदादा, संजय, अजय हे तीन मुलगे आणि जया हि मुलगी अशी ४ अपत्ये झाली. गुरुजींची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे त्यांच्या मुलांनाही नातेवाईकांची, इतरांची बोलणी खावी लागायची. मान अपमानचे प्रसंग येतच होते. आणि गुरुजी म्हणून जे आपल्याला लाभले ते त्यांना वडील म्हणून कमीच लाभले. कोणत्याही मोठ्या माणसाच्या यशामागे त्यांच्या कुटुंबियांचे मोठे योगदान असते हे मात्र खरे.  | | पाठकगुरुजी , माई ,तीन मुले आणि तिन्ही सूना |
१९५७ ला गुरुजींची बदली जळगाव वरून मुंबईला झाली. मुंबई मध्ये राहायला जागा नव्हती, मग ते नोकरी करून रात्री मुंबई सेंट्रल पोलीस स्टेशन समोरच्या फूटपाथवर झोपून रात्र काढत. नंतर त्यांना मुंबईमध्ये अभ्युदय नगरला बिल्डिंग क्रमांक १९, खोली क्रमांक १३७६ हि सरकारी जागा मिळाली. त्यानंतर बांद्रा शासकीय वसाहतीत बी/४३/२ क्रमांकाची खोली मिळाली. मग त्यांनी माहीम मुक्तिधाम मध्ये पाचव्या मजल्याला ९६ क्रमांकाची खोली कशीबशी विकत घेतली.
पोलीस खात्यात नोकरी करत असताना आणि सोबत भिक्षुकी करत असताना त्यांनी अत्यंत सचोटीने आणि स्वच्छ चारित्र्याचे आयुष्य व्यतीत केले. १९७८ला ते गिरनार यात्रेला गेले असता त्यांनी सुरुवातीला पायातले बूट काढले आणि तसेच दहा हजार पायऱ्या चढून दर्शन घेऊन ते उतरले. आणि तसेच अनवाणी मुंबईला आले. त्यानंतर मात्र त्यांनी पायात कधीच काहीच घातले नाही. पतीबरोबर पत्नीनेही अनवाणी फिरण्याचे ठरवले. पोलीस खात्यात अनवाणी नोकरी करणे अशक्यच. त्यांच्या साहेबांनी सांगितले की हा शिस्त भंग आहे आणि तुम्हाला नोकरीतून काढण्यात येईल. नोकरी धोक्यात असताना देखील त्यांनी दत्त महाराजांवर विश्वास ठेवला. मग कार्यालयाने त्यांना ऑफिस काम देऊन त्यांची सोय केली. पोलीस खात्यात अनवाणी ३९ वर्षे सेवा करून ते १ डिसेंबर १९८६ ला शासकीय सेवेतून निवृत्त झाले. २४ लक्ष गायत्री जप असे एक पुनश्चरण होते. गुरुजींनी २ पुनश्चरण पूर्ण केली. तिसरे चालू आहे. गाणगापूर
आश्रमाचा पाण्याचा कायम स्वरूपी प्रश्न सुटावा म्हणून जमिनीत बोर मारण्याचे
ठरवले. त्यासाठी त्यांनी दत्त महाराजांना १०८ श्री गुरुचरित्र पारायण
सेवा देण्याचे कबुल केले. तेवढे पारायणे झाल्यावर बोर मारली. आणि आज त्या
बोरवेलला अखंड पाणी आहे.  | | आश्रमातील बोरवेल ला कायमस्वरूपी पाणी यावे यासाठी गुरुजींनी केलेला १०८ पारायण संकल्प |
महाराजांकडे काही
मागायचे असेल तर सेवा करावीच लागते, फुकट काही मागायचे
नाही अशी त्यांची विचारसरणी होती. त्यांची आर्थिक
परिस्थिती खूप चांगली नसली तरीपण त्यांना जेवढी गरज असायची ती पूर्ण व्हायची. माई
अन्नपूर्णा आहे त्यामुळे माझ्याकडे काहीच कमी नाही असे ते सांगायचे. आणि हे खरेच
होते. त्यांच्याकडे कितीही माणसे आली तरी प्रत्येकाला काही ना काही तरी खायला
मिळायचेच. अगदी त्यांच्याकडे कचरा घ्यायला जी बाई यायची तिलापण
माई काहीतरी खायला रोज दयायची. त्यांच्याकडे कोणीही उपाशीपोटी परतत नसे. स्वतःच्या उपासनेबद्दल ते कधीच काहीच
सांगत नसत. पण त्यांनी दोन गायत्री पुनश्चरण पूर्ण केले होते. तिसरे चालू आहे. एक पुनश्चरण
म्हणजे सर्व बंधनात राहून २७
कोटी गायत्री मंत्राचा जप. त्यातील दुसरे पुनश्चरण त्यांनी उरण जवळच्या समुद्रात
त्यांचे सदगुरु दंडवते
बाबा बरोबर केले. त्याविषयी त्यांनी थोडी माहिती सांगितली ती नमूद करतो. सतत
४० दिवस सूर्योदय ते सूर्यास्त पर्यंत ते समुद्रात छातीभर पाण्यात उभे राहून
गायत्री मंत्राचा जप
करायचे. मग सूर्यास्तानंतर ते समुद्राच्या बाहेर यायचे. भरती ओहोटी प्रमाणे ते
पुढे मागे सरकून पाणी सतत छाती पर्यंत असेल याची काळजी घ्यायचे. पाण्यात स्वतःचा
तोल सांभाळणे किती कठीण असेल? उन्हाचा किती त्रास झाला असेल? याचा आपण विचारपण करू
शकत नाही. त्या दरम्यान त्यांच्या पायाला माशांनी अनेकदा चावा घेतला
होता मग पायांची काय अवस्था झाली असेल? याचा आपण विचारदेखील करू शकत नाही. स्वतःच्या
उपासनेबद्दल ते काहीच बोलत नसत. "जगन्मित्र" पुस्तकाच्या वेळी यातील काही गोष्टी
बाहेर आल्या. आपली उपासना गुप्त असावी व त्याचा अहंकार नसावा या मताचे ते होते.
शिवाय उपासना करताना बरेच अनुभव येतात, त्यात वाहून न जाता दुर्लक्ष करावे व
उपासनेवर लक्ष केंद्रित करावे असे ते सांगत.  | | उरण येथील समुद्रात गायत्री पुनश्चरण वेळी दंडवते बाबांबरोबर पाठकगुरुजी |
दंडवतेबाबा, गाणगापूर हे त्यांचे
गुरु होते. बाबांबरोबर १९८४ साली ते गाणगापूर, बद्रीनाथ यात्रेला
गेले. तिथे बद्रीनाथ ला त्यांना दंडवते बाबानी गुरुमंत्र दिला  | | दंडवते बाबांबरोबर पाठकगुरुजी |
आणि त्यानंतर बागुलकाकानी तिथेच
गुरुजींकडून गुरुमंत्र घेतला , म्हणजे बागुलकाका हे
गुरुजींचे पहिले शिष्य होते.
 | | बागुलकाकांबरोबर पाठकगुरुजी |
माई खूप आजारी पडली होती, तेव्हा त्यांनी दत्त महाराजांकडे माईसाठी आयुष्य मागून घेतले होते आणि परत मागणार नाही असे काबुल केले
होते. हि आठवण ते आम्हाला सांगत. शेवटी माई जेव्हा आजारी झाली आणि हॉस्पिटलमध्ये
होती. तेव्हा त्यांना माहित होते की आत्ता काही करता येणार नाही. आम्ही
विचारले की माई कधी बरी होईल तेव्हा ते म्हणाले कि "जितनी चाबी भरी राम ने, उतना चाले खिलोना".
कधीतरी हे होणारच हे त्यांनी सहजच स्वीकारले होते.
गुरुजींना कोणी
सांगितले की तुम्हाला भेटायला येतो तर ते लगेच म्हणायचे कि महाराजांना भेटायला
या , मला नको. गुरुजी आशीर्वाद दया तर म्हणायचे कि महाराजांचे आशीर्वाद देतो.
कोणाचे काही प्रॉब्लेम असेल तर ते महाराजांकडे प्रार्थना करायचे की तुमचा भक्त आला
आहे त्याला निराश करू नका. जे काही होते आहे ते दत्त महाराजांच्याच इच्छेने होत आहे
यावर ते ठाम असायचे. मज आवडो न आवडो I तू जे इच्छिसी ते ची
घडो I हे मागण्या न अवघड I जीभ माझी II असे ते नेहमीच
प्रार्थना करायचे. आपले प्रारब्ध भोगुनच संपवायचे असतात व त्यातून कोणालाच सुटका
नाही , अशी त्यांची ठाम विचारसरणी होती. पण दत्त महाराजांची सेवा/ उपासना करून
प्रारब्धभोग सुसहय करता येतो हे ते नेहमी सांगायचे. "महाराज प्रारब्ध भोगतो
पण सुसहय ठेवा" असे ते महाराजांना सांगायचे. कोणता उत्सव/ कार्यक्रम असला आणि ते थोडेही आजारी पडले तर मात्र ते दत्त महाराजांना विनंती
करायचे की महाराज हा प्रारब्ध भोगतो पण हा कार्यक्रम होऊन जाऊदे आणि आश्चर्यकारकरित्या ते आजारपण postpone किंवा prepone करायचे हे आम्ही
सर्वानीच अनेकदा पाहिले/ अनुभवले आहे. गुरुजींकडे मान अपमान
काहीच नव्हता. जे काही होतेय ते दत्त महाराजांच्या इच्छेनेच होत आहे असे ते
मानायचे. जो माणूस त्यांच्याकडे आला, जे काही बोलला. किंवा
त्याच्या ज्या समस्येसाठी तो गुरुजींकडे आला, ते दत्त महाराजांनीच पाठवले आहे असे ते मानायचे. काहीही झाले तरी ते म्हणायचे प्रभू इच्छा. एकदा एका
जवळच्या नातेवाईकांनी गुरुजींचा अपमान केला. गुरुजी शांतच होते. काहीही बोलले नाहीत. त्यांची सून रंजना मात्र खूप वैतागली. ती बोलली की मी
त्यांना विचारते की असे का बोललात म्हणून. गुरुजी म्हणाले काहीही बोलू नकोस. हि
प्रभू इच्छा आहे असे समज. त्यांच्या जवळचा एक व्यक्ती देखील त्यांचा सतत अपमान करत असे. मी
त्यांना म्हणालो कि याला माझ्या पद्धतीने देव दर्शन देऊ का? गुरुजी मला म्हणाले कि अजिबात
काही बोलायचे नाही. हि प्रभू इच्छा आहे असे समजायचे. माझ्या प्रारब्धात जे आहे ते
मला भोगलेच पाहिजे. मी गुरुजींना त्यांचाच डायलॉग मारला. तुम्ही प्रारब्ध भोगा, मी फक्त सुसह्य करतो. त्यांनी हसून नकार दिला. म्हटले तुम्ही भोस.....चे सुधारणार कधी? महाराज त्याला
त्याच्या कर्माचे फळ देतील, तू काळजी करू नकोस. एवढे छोटे छोटे मॅटर महाराजांकडे कशाला न्यायचे असा मी विचार केला. नंतर गुरुजींचे वाक्य आठवले की धु म्हटले की धुवायचे... एकदा असाच कसोटीचा क्षण आला. त्यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीबद्दल खूपच तक्रारी आल्या. आम्ही त्या गुरुजींना सांगितल्या. मला वाटले की गुरुजी त्या व्यक्तीचीच बाजू घेतील. गुरुजींनी तक्रार करणाऱ्या सर्व जणांना बोलावून घेतले. त्यांची बाजू ऐकली.नंतर त्या व्यक्तीला पण बोलावून घेतले. त्याचीपण बाजू ऐकली. गुरुजींनी लगेचच स्पष्टपणे सांगितले की चुक म्हणजे चुकच आहे. आणि त्यांनी त्या दिवसापासून त्या वक्तीला गुरुजींनी कायमचे लांब केले. या सर्व घटंनांचा मी साक्षीदार आहे. या कसोटीच्या क्षणी भावानेच्या आहारी न जाता गुरुजी अत्यंत निरपेक्षपणे वागले. मी जर त्यांच्या जागी असतो तर मला तसेच वागणे जमले नसते. पण पाठकगुरुजी म्हणजे एक वेगळेच व्यक्तिमत्व. त्यांच्याकडे जवळचा किंवा लांबचा असा काही भेदभाव नव्हता. जो कोणी आहे तो दत्त महाराजांनी पाठवलेला आहे असा त्यांचा ठाम विश्वास होता गुरुजी प्रत्येक गोष्टीत involve असायचेपण आणि नसायचेपण, म्हणजेच ते अलिप्त असायचे. "कर्ता कराविता दत्त, आपण निमित्त मात्र" हि त्यांची विचारसरणी
त्यांनी जीवनातील प्रत्येक क्षणात उतरवली होती. कार्य महाराजांचे आहे , आपण फक्त त्यांचे
शिपाई आहोत अशी त्यांची भावना होती. गुरुजींची ओळख म्हणजे ते कायम "जय
गुरुदेव" बोलायचे, कपाळावर U आकाराचे गंध लावायचे.
व्यवस्थित भांग पाडलेला. गळ्यात एक रुद्राक्षाची माळ, ज्याच्यावर ते अनेकदा
जप करायचे. आज श्री उन्मेषदादा पाटील हे आश्रमात राहून हे कार्य पुढे चालवत आहेत व इतर सहकारी विश्वस्त त्यांना मदत करतात. २०१४ मध्ये आश्रमाच्या व्यवस्था आमच्याकडे सोपवून ते पुढे निघून गेले. हे सर्व लिहायला मी काही अधिकारी व्यक्ती नाही परंतु साक्षीदार नक्कीच आहे. १९९६ ते २०१४ पर्यंत त्यांचा दीर्घ सहवास मला लाभला. पाठकगुरुजी म्हणजे कोणीतरी चमत्कारिक किंवा जादू करणारा बाबा नाही. त्यांच्याकडे आलेल्या माणसाने आपली उपासना करून कर्म शुद्ध करावे या विचारसरणीने ते चालले. काहींचे प्रश्न आश्चर्यकारकरित्या
सुटायचे, पण गुरुजींच्या लेखी त्याला विशेष महत्त्व नव्हते. जे नियमित आणि मनापासून उपासना करायचे ते आपसूकच गुरुजींच्या जवळचे होते हे मी पाहिले होते. मध्यंतरी कोणाच्या तरी ओळखीने माझे फोन वरून बंगलोर मधील एका अध्यात्मिक व्यक्तीशी बोलणे झाले. त्याच्या आधी आणि नंतर मी त्यांना कधीच भेटलो अथवा बोललो नाही. त्यांनी मला सांगितले कि तुमचे या जन्मीचे गुरु मागील एका जन्मात भगवान परशुरामाचे शिष्य होते आणि त्यांनी त्याजन्मी हिमालयात आश्रम बांधला. ते प्रत्येक जन्मात देवाच्या आदेशांनुसार एक आश्रम बांधतात आणि तुम्ही पण त्यांच्या प्रत्येक जन्मात त्यांचा शिष्य असता. त्यांचे सर्व शिष्य त्यांनी प्रत्येक जन्मात continue केलेत. यावेळी देखील त्यांनी कुठे तरी आश्रम बांधला असणारच. यांचे कार्य गुपचूप असते ते कधीच प्रसिद्धीच्या मागे लागत नाहीत. वास्तविक त्यांना गुरुजींबद्दल किंवा माझ्याबद्दल काहीच माहिती नव्हती. मी उडालोच. लगेच त्यांना गुरुजींचा फोटो whatsapp वर पाठवला. त्या व्यक्तीने ओळखले हि हेच ते आहेत. यावर विश्वास ठेवायची की नाही हे महत्वाचे नाही. परंतु या वेळी तरी आम्ही होतो हे मात्र नक्कीच. मागचा जन्म, पुढचा जन्म यात मी जास्त इन्व्हॉल्व्ह होत नाही. जे डोळ्याने दिसते ते सत्य असते असे मी मानतो आणि I Live in this moment . परंतु गुरुजींचे वर्णन मात्र तंतोतंत लागू झाले हे मात्र खरे. गुरुजी आज असते तर मी त्यांना नक्की विचारले असते कि अहो दरवेळेला तुम्ही आश्रम बांधता आणि आम्हाला पण इन्व्हॉल्व्ह करता. पुढच्या वेळी नवीन काहीतरी करा. गुरुजींचा काही खूप मोठा भक्तपरिवार
नव्हता. परंतु जे होते ते प्रेमाने जोडलेले होते. काही बुवाबाजी, अंधश्रद्धा नाही, पैश्याचा व्यवहार नाही
आणि पैश्याची मागणीही नाही. दर गुरुवारी संध्याकाळी त्यांच्याकडे भक्तमंडळी
दर्शनाला यायची. रात्री ११/१२ पर्यंत लोक येत असायची. एरवी पण
गुरुजी सर्वाना भेटायचे. ते सर्वाना accessible आणि available असायचे. मी पण
तुमच्यातलाच एक सामान्य माणूस आहे असे ते सर्वाना भासवयाचे. काही खाज़गी बोलायचे
असेल तर गुरुजी वेळ दयायचे त्यावेळेला लोक यायची. त्यांच्या बसण्याच्या जागी मागे
महालक्ष्मी कॅलेंडर असायचे त्यात ते त्यांच्या appointment / जप संख्या लिहून
ठेवायचे. या भेटीसाठी त्यांची
काहीच फी नव्हती. कोणी काही दिले तर ठीक नाहीतरी ठीक. जो दे उसका भला जो ना दे उसका भी
भला. अनेक जण त्यांच्याकडे समस्या घेऊन येत. मग ते त्यांना
उपासना सांगत आणि महाराजांना विनंती करत कि हा भक्त ८४ पायऱ्या (८४ लक्ष योनी पार करून) चढून तुमच्याकडे आलेला आहे, त्याच्यावर कृपा करा (त्यांचे घर ५ मजल्यावर
होते आणि त्यांच्याकडे जायला ८४ पायऱ्या चढून जायला लागायचे). तुम्ही उपासना करा आणि
फळ काय दयायचे ते महाराजांवर सोडून द्या असे ते म्हणत. तसेच मी भगवंत दयायला
बसलोय आणि तो मागायला कोणीच येत नाही, अशी खंत ते व्यक्त
करत. गुरुजींनी माहीमच्या
घरी ९ पायऱ्यांचा स्टीलचा देव्हारा बनवून घेतला होता. त्यात श्री दत्त मूर्ती आणि
इतरही देव होते व ते व्यवस्थित रचून ठेवले होते. फुल त्यांना खूप आवडत.
केळकरांचे हिना अत्तर तर खूप प्रिय. गळ्यातील रुद्राक्ष माळेला ते
नियमित अत्तर लावत. त्यांच्या बोटात एक नवग्रहांची जुनी अंगठी होती बाकी stones वर त्यांचा विश्वास
नव्हता. फुले आणण्यासाठी ते दादरला माहिमवरून टॅक्सी ने जात. दादर फुलबाजारात
फुले घेत आणि मग परत येत. विशेषतः गुरुवारी त्यांना खूप फुले लागायची.
चाफा त्यांना अत्यंत प्रिय. नंतर आम्ही दोघे वेळ ठरवायचो आणि ते मला म्हणायचे कि
तू तुझे घोडं (मोटरसायकल) अमुक वाजता घेऊन ये. मग आम्ही
दोघे बाईक वरून दादर फुलबाजारातून फुल घेऊन यायचो. त्यांचा वेळ पण वाचायचा आणि मला
मज्जा यायची. घरी आलो कि मग ते खूप वेळ मनासारखा देव्हारा फुलांनी सजवत बसत. माई
म्हणायची आत्ता माळीबुवा तासभर देवांना सजावतील. नामस्मरण, जप त्यांना खूप प्रिय, कधीही कुठेही नामस्मरण
करावे असे ते सर्वाना सांगत. भजन ऐकायला त्यांना आवडत आणि शास्त्रीय संगीत पण आवडत
असे. कृते जनार्दन देवे I त्रेताया रघुनंदन II द्वापारे
रामकृष्णस्य I कलौ श्रीपाद श्रीवल्लभ II कलियुगाची देवता दत्त
आहे त्यामुळे दत्ताची उपासना करा असे ते सांगत. या व्यतिरिक्त देवीचा जप, नवनाथाचा जप ते करत आणि करायला
सांगत. गुरुजी मेडिटेशन नाही करायचे पण एका बैठकीत खूप जप करायचे. जप करताना आणि
श्रीगुरुचरित्र वाचन करताना ते ट्रान्स मध्ये जायचे. अध्यात्मात भगवंत
प्राप्तीसाठी अनेक मार्ग आहेत, त्यापैकी खडतर
कष्टप्रद जीवन व कडक उपासना या मार्गावर ते चालले. दत्त हे दैवत सर्वाना available आणि accessible करण्याचा त्यांनी
जीवनभर प्रयत्न केला. आजच्या बाजारू अध्यात्मिक दुनियेत सहज उपासना कशी करता
येते हा मार्ग त्यांनी दाखवला. दत्तमहाराज भक्ताभिमानी आणि भक्तवत्सल आहेत व
त्यांच्या भक्तांचे ते संरक्षण करतात असा ठाम विश्वास त्यांनी आपण सर्वाना दिला
किंवा आपल्याला त्यांनी अशा आशेवर ठेवले कि तुम्ही टेन्शन घेऊ नका महाराज येतील. गुरुजींच्या डोळ्यातून
आपण दत्तमहाराज पाहिले, दत्तमहाराजांकडे आपली गाऱ्हाणी आपण
गुरुजी मार्फत पोहोचवली व दत्त महाराज आपल्याशी गुरुजींच्या मुखातून बोलले हे
मात्र खरे. कारण देव हा आपल्यातच असतो. आपण आणि तुम्ही सर्व जण जे हे वाचतायत
ते खरंच भाग्यवान कि अश्या एका सत्पुरुषाबरोबर आपण सहजच वावरलो, किंवा त्यांची माहिती
आपल्याला मिळाली. खरे म्हणजे गुरुजींसारख्या २२ तास काम करणाऱ्या , उपासना , व्यवहार , चारित्र्य , भक्ती ,श्रद्धा याबाबत एकमेवाद्वितीय असलेल्या व्यक्तीबद्दल कितीही सांगितले तरी कमीच आहे. जय गुरुदेव विशाल फुलपगार जय गुरुदेव.
|