Sunday, July 5, 2020

आठवणीतले पाठकगुरुजी

५ जुलै २०२० 
आठवणीतले पाठकगुरुजी 


५ जुलै २०२० च्या गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने पाठकगुरुजींच्या काही आठवणी सांगाव्यात असे वाटले. अजुनपर्यंतच्या माझ्या विविध ब्लॉग्स मधून , मी गुरुजींची केलेली मस्करी किव्हा आमचे थट्टा विनोद यातून कदाचित तुम्हाला वाटेल कि हे खूपच टाइम पास रिलेशन आहे. पण असे काही नाही. हा आमच्यातील संबंधाचा ५% भाग आहे. बाकी सर्व गोष्टी आमच्या दोघातच आहेत आणि आमच्या दोघातच राहतील हे मात्र निश्चित. हा ब्लॉग थोडा विशेष आहे. कारण नेहमी मी सलग लिहितो. हा तीन टप्प्यात लिहिला आहे. काही विशेष फोटो मिळाले आणि हा ब्लॉग वाढत गेला. 

मागे एकदा मी तुम्हाला सांगितले होते कि गुरुजी प्रत्येक गोष्टीत involve असायचे पण आणि नसायचे पण , म्हणजेच ते अलिप्त असायचे. "कर्ता करवीता दत्त , आपण निमित्त मात्र" हि विचारसरणी त्यांनी जीवनातील प्रत्येक क्षणात उतरवली होती. कार्य महाराजांचे आहे , आपण फक्त त्यांचे शिपाई आहोत अशी त्यांची भावना होती. 

गुरुजींची ओळख म्हणजे ते कायम "जय गुरुदेव " बोलायचे, पायात चप्पल / बूट घालणे त्यांनी १९७८ साली गिरनार पर्वतावर गेले तेव्हाच सोडले होते व त्यानंतर त्यांच्या पत्नीनेही सोडले होते. त्यामुळे दोघेही शेवटपर्यंत अनवाणीच फिरायचे. कपाळावर U आकाराचे गंध लावायचे. व्यवस्थित भांग पाडलेला. गळ्यात एक रुद्राक्षाची माळ , ज्याच्यावर ते अनेकदा जप करायचे.  

वडील दशग्रंथी ब्राम्हण , त्यामुळे मुलाने भिक्षुकी करावी असे वडिलांचे मत, तर मुलाने शिकून नोकरी करावी असे आईचे मत. मग इंटर पर्यंत शिकून गुरुजींनी पोलीस खात्यात नोकरी चालू केली आणि सोबत भिक्षुकीही केली व आई आणि वडिलांची इच्छा पूर्ण केली.
गुरुजी , त्यांचे आई व वडील आणि माईच्या कडेवर राजूदादा , गुरुजींचा भाऊ मधुकाका आणि बहीण आशा , नंदुरबार येथील फोटो स्टुडिओमध्ये काढलेला  एक दुर्मिळ फोटो.  
गाणगापूर येथे आश्रम बांधायचा असे त्यांनी ठरवले व मंदिराजवळ ४ गुंठे जागाही मिळाली. ती कशी मिळाली याबद्दल नंतर कधीतरी लिहू. तेव्हा गुरुजी रिटायर्ड झाले होते. मग ते full time  सत्यनारायण , सत्यदत्त , वास्तुशांती , ग्रहशांती , नवनाथ वगैरे पूजा सांगायचे आणि त्यातून मिळालेली दक्षिणा ते ट्रस्ट च्या बँक अकाउंट मध्ये जमा करायचे.
गुरुजींच्या बाजूला लक्ष्मण गुरुजी , यांनी गाणगापूर मध्ये प्लॉट घेण्यासाठी गुरुजींचे नाव सुचवले


पूजा सांगताना तल्लीन झालेले गुरुजी 
पुजेआधी रांगोळी काढताना गुरुजी 

मनोहर मामाच्या घरी पूजा मांडताना गुरुजी 
सत्यनारायण पूजा सांगताना गुरुजी मनोहर मामांच्या घरी. सोबत महेश 

बालमित्रांसोबत गुरुजी आणि माई 

मनोहर मामा आणि गुरुजी कुटुंबासोबत 

हस्तलिखित गुरुचरित्र लिहिणारे श्री महेश पाटील यांच्यासोबत गुरुजी आणि माई . महेशना २०११ ला पारायण गौरव पुरस्कार मिळाला 

आश्रमात गुरुजी या जागेवर बसायचे 
तेव्हा पूजेचे २०० /५०० किंवा १००० रुपये मिळत. गुरुजी जी मिळेल ती दक्षिणा घ्यायचे , कधी काही मागायचे नाही. मी त्यांना म्हटले कि अहो असे ५०० / १००० रुपये जमा करून एवढा मोठा आश्रम कधी व केव्हा बांधणार ? तुमची पद्धत चुकीची आहे. आपल्याला मोठे डोनर शोधावे लागतील. त्यांनी सांगितले कि गाणगापूरला गुरुचरित्र पारायणे करण्यासाठी हा आश्रम बांधवा अशी दत्त महाराजांची योजना आहे. खिशात एक रुपया नसताना आपल्याला आश्रमासाठी ४ गुंठे चा प्लॉट महाराजांनीच दिलाय. आपण त्याचे पेमेंट पण नंतर केले. त्यामुळे आश्रम बांधण्याचे काम पण महाराजच योग्य वेळी पूर्ण करतील आणि पैश्याची व्यवस्था पण तेच करतील. आपण त्यात डोके घालायचे नाही. धु म्हटले कि धुवायचे.......  मला काही ते पटले नाही. मी मनातच म्हटले कि असे काही होणार नाही. गुरुजींना कसे समजावून सांगायचे ? पण गम्मत म्हणजे काही वर्षांनी गुरुजींना पूजा सांगण्यासाठी दोन तीन वेळा अमेरिका , दुबई येथून बोलावणे आले. तिथे अनेकांनी स्वतःच्या घरी अनेक पूजा गुरुजींकडून केल्या व डॉलर्स मध्ये दक्षिण दिल्या. ती सर्व रक्कम त्यांनी तशीच्या तशी बँकेत जमा केली. व असा बराच निधी जमा झाला. त्यांच्या इतर भक्तांनीही न मागता देणग्या दिल्या.  

गुरुजी व माई दुबई मध्ये

गुरुजी व माई दुबई मध्ये
गुरुजी व माई दुबई मध्ये
अमेरिकेत पूजा झाल्यावर प्रसाद देताना गुरुजी 

गुरुजी अमेरिकेत पूजा सांगताना 

न्यू जर्सी , अमेरिकेत जेसूभाइ गोसालियांच्या घरी आराम करताना गुरुजी 

अमेरिकेतील रिसीट , गुरुजींच्या आठवणीसाठी त्यांना दिली होती. 
आश्रमाचे बांधकाम सुरु झाले तसे ते पूर्ण होईपर्यंत अनेकांनी भारतातूनही डोनेशन दिले. आश्रम बांधून पूर्ण झाल्यावर मात्र गुरुजींचे परदेश दौरे थांबले पण तो पर्यंत काम पूर्ण झाले होते. नंतरमात्र पैश्याचा ओघ कमी झाला आणि त्याची आवश्यकता पण नव्हती. गुरुजींनी पण जिद्दीने भिक्षुकी करूनच हा आश्रम बांधला हे आश्चर्यच. ते म्हटले ते खरेच , दत्त महाराजांचे काम दत्त महाराजांनी गुरुजींकडून करवून घेतले. नाहीतर गुरुजींसारख्या आर्थिक परिस्थिती बेताचीच असणाऱ्या माणसाकडून पर राज्यात जिथे भाषा पण आपली नाही अशा ठिकाणी एवढे काम करायची डेरिंग / बुद्धीच झाली नसती. शिवाय रिटायर्ड झाल्यावर एवढे उपदव्याप करण्याची त्यांना काही गरजच नव्हती. एकंदरीत त्यांचा महाराजांवरील दृढ विश्वास आपल्याला यातून दिसून येतो. किव्हा त्या दोघांचे आधीच डिस्कशन झाले असेल. मी मात्र यातून गुरुजींनी धु म्हटले कि धुवायचे ..... त्यांना प्रश्न विचारायचे नाही हे शिकलो


आश्रमात गुरुजी 

गाणगापूर आश्रमात दत्तयाग 

आश्रमात गुरुजींची धान्य तुला 

आश्रमात गुरुजी 
आश्रमातील बेसिन धुताना गुरुजींचा गुपचूप काढलेला फोटो 

आश्रमात हवन / पूजा , सोबत रिसबुड काका 

आश्रमात पेपर वाचताना एका निवांत क्षणी 

विजय आणि अभिषेक सर देशपांडे या सोबत पूजा करताना गुरुजी 
आश्रमाच्या आवारात निवांत क्षणी गप्पा मारताना गुरुजी 
गुरुजींना कोणी सांगितले कि तुम्हाला भेटायला येतो तर ते लगेच म्हणायचे कि महाराजांना भेटायला या , मला नको. गुरुजी आशीर्वाद द्या तर म्हणायचे कि महाराजांचे आशीर्वाद देतो. 

मज आवडो न आवडो I  तू जे इच्छिसी ते ची घडो I हे मागण्या न अवघडो I जीभ माझी II  

असे ते नेहमीच प्रार्थना करायचे. आपले प्रारब्ध भोगुनच संपवायचे असतात व त्यातून कोणालाच सुटका नाही , अशी त्यांची ठाम विचारसरणी होती. पण दत्त महाराजांची सेवा / उपासना करून प्रारब्धभोग सुसह्य करता येतो हे ते नेहमी सांगायचे.  "महाराज प्रारब्ध भोगतो पण सुसह्य ठेवा " असे ते महाराजांना सांगायचे. कोणता उत्सव / कार्यक्रम असला आणि ते थोडेही आजारी पडले तर मात्र ते दत्त महाराजांना विनंती करायचे कि महाराज हा प्रारब्ध भोगतो पण हा कार्यक्रम होऊन जाऊदे आणि आश्चर्यकारक रित्या ते आजारपण postpone किंवा prepone करायचे हे आम्ही सर्वानीच अनेकदा पाहिले / अनुभवले आहे.

गुरुजींकडे मान अपमान काहीच नव्हता. जे काही होतेय ते दत्त महाराजांच्या इच्छेनेच होत आहे असे ते मानायचे. जो माणूस त्यांच्याकडे आला , जे काही बोलला. किंवा त्याच्या ज्या समस्येसाठी तो गुरुजींकडे आला , ते दत्त महाराजांनी पाठवले असे ते मानायचे. काहीही झाले तरी ते म्हणायचे प्रभू इच्छा. एकदा एका जवळच्या नातेवाईकांनी गुरुजींचा अपमान केला. गुरुजी शांतच होते. काहीही बोलले नाहीत. त्यांची सून रंजना मात्र खूप वैतागली. ती बोलली कि मी त्यांना विचारते कि असे का बोललात म्हणून. गुरुजी म्हटले काहीही बोलू नकोस. हि प्रभू इच्छा आहे असे समज. 

त्यांच्या जवळचा एक व्यक्ती देखील त्यांचा सतत अपमान करत असे. मी त्यांना म्हटले कि याला माझ्या पद्धतीने देव दर्शन देऊ का ? ते म्हटले कि अजिबात काही बोलायचे नाही. हि प्रभू इच्छा आहे असे समजायचे. माझ्या प्रारब्धात जे आहे ते मला भोगलेच पाहिजे. मी त्यांना त्यांचाच डायलॉग मारला. तुम्ही प्रारब्ध भोगा , मी फक्त सुसह्य करतो. त्यांनी हसून नकार दिला. म्हटले तुम्ही भोस....  सुधारणार कधी. त्याला त्याच्या कर्माचे फळ महाराज देतील , तू काळजी करू नकोस. एवढे छोटे छोटे मॅटर महाराजांकडे कशाला न्यायाचे असा मी विचार केला. पण नंतर आठवले कि धु म्हटले कि धुवायचे... 

१९५४ मध्ये त्यांचे मेहुणे अरुण दीक्षित आजारी पडले आणि डॉक्टरांनी २४ तासाची मुदत दिली. तेव्हा त्यांनी पहिल्यांदा श्री गुरुचरित्र ग्रंथाचे सलग पारायण केले. मला वाटते कि सलग १८ तास असावे. त्यातून मग अरुण दीक्षितांना आराम पडला. तेव्हापासून त्यांनी असंख्य पारायणे केली. त्यांना गुरुचरित्र पाठ होते असे म्हणायला हरकत नाही. गुरुजी म्हणजे चालते बोलते गुरुचरित्रच.  गाणगापूर आश्रमाचा पाण्याचा कायम स्वरूपी प्रश्न सुटावा म्हणून जमिनीत बोर मारण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी दत्त महाराजां काही पारायण सेवा देण्याचे काबुल केले. तेवढे पारायणे झाल्यावर बोर मारली. आणि आज त्या बोरवेल ला अखंड पाणी आहे. महाराजांकडे काही मागायचे असे तर सेवा करावीच लागते , फुकट काही मागायचे नाही अशी त्यांची विचारसरणी होती. 
बोर वेल ला पाणी मिळण्यासाठी गुरुजींनी 108 गुरुचरित्र पारायण सर्वांकडून करून घेतली


श्री गुरुचरित्र पारायण करताना गुरुजींचा एक दुर्मिळ फोटो 

  गुळवणी महाराज आश्रम, गाणगापूर बाहेर चहा पिताना एका निवांत क्षणी गुरुजी. आधी गुरुजी येथे राहायचे  

श्री. गुप्तेबाबा , डोंबिवली यांच्याबरोबर गुरुजी 
गुरुचरित्र पारायण , tembe  स्वामींच्या , दत्तावधूतांची पुस्तके / पोथ्या ते वाचायला सांगत. आणि हो गुरुजींना पुस्तकांची खूप आवड. कुठेही गेले तरी पुस्तके विकत घायचे आणि संग्रह करायचे. गाणगापूरला आश्रमात अशी अनेक पुस्तके ठेवली आहेत. त्यात अनेक साधू ,सत्पुरुषांची पुस्तके आहेत. एखादी ओळ , पॅराग्राफ आवडला कि ते त्याखाली पेन ने खूण करायाचे. शेवटपर्यंत ते चष्म्या शिवाय वाचन करायचे. लांबचे बघण्यासाठी मात्र त्यांना चष्मा लागत असे. त्यांना विचारले असते ते म्हणाले कि कि कायम गुरुचरित्र वाचनासाठी मी महाराजांकडे डोळे मागितले आहेत म्हणून मला चष्मा नाही. 

त्यांची आर्थिक परिस्थिती खूप चांगली नसली तरीपण त्यांना जेवढी गरज असायची ती पूर्ण व्हायची. माई अन्नपूर्णा आहे त्यामुळे माझ्याकडे काहीच कमी नाही असे ते सांगायचे. आणि हे खरेच होते. त्यांच्याकडे कितीही माणसे आली तरी प्रत्येकाला काही ना काही तरी खायला मिळायचेच. अगदी त्यांच्याकडे कचरा घ्यायला जी बाई यायची तिला पण माई काहीतरी खायला रोज द्यायची.  त्यांच्याकडे कोणीही उपाशीपोटी परतत नसे. 

स्वतःच्या उपासने बद्दल ते कधीच काहीच सांगत नसत. पण त्यांनी दोन गायत्री पुनश्चरण पूर्ण केले होते. एक पुनश्चरण म्हणजे सर्व बंधनात राहून २७ कोटी गायत्री मंत्राचा जप. त्यातील दुसरे पुनश्चरण त्यांनी उरण जवळच्या समुद्रात त्यांचे सदगुरु दंडवते बाबा बरोबर केले. त्याविषयी त्यांनी थोडी माहिती सांगितली ती नमूद करतो.  सतत ४० दिवस सूर्योदय ते सूर्यास्त पर्यंत ते समुद्रात छातीभर पाण्यात उभे राहून गायत्री मंत्राचा जप करायचे. मग सूर्यास्तानंतर ते समुद्राच्या बाहेर यायचे. भरती ओहोटी प्रमाणे ते पुढे मागे सरकून पाणी सतत छाती पर्यंत असेल याची काळजी घ्यायचे. पाण्यात स्वतःचा तोल सांभाळणे किती कठीण असेल , उन्हाचा किती त्रास झाला असेल याचा आपण विचारपण करू शकत नाही. त्या दरम्यान त्यांच्या पायाला माशांनी अनेकदा चावा घेतला होता मग पायांची काय अवस्था झाली असेल याचा आपण विचारदेखील करू शकत नाही. स्वतःच्या उपासनेबद्दल ते काहीच बोलत नसत. जगन्मित्र पुस्तकाच्या वेळी यातील काही गोष्टी बाहेर आल्या. आपली उपासना गुप्त असावी व त्याचा अहंकार नसावा या मताचे ते होते. शिवाय उपासना करताना बरेच अनुभव येतात , त्यात वाहून न जाता दुर्लक्ष  करावे व उपासनेवर लक्ष केंद्रित करावे असे ते सांगत.
गुरुजींनी दंडवते बाबांसोबत उरण समुद्रात 40 दिवस गायत्री मंत्र अनुष्ठान केले  त्या दरम्यानचा एक अत्यंत दुर्मिळ फोटो 


दंडवतेबाबा , गाणगापूर हे त्यांचे गुरु होते. बाबांबरोबर १९८४ साली ते गाणगापूर , बद्रीनाथ यात्रेला गेले. तिथे बद्रीनाथ ला त्यांना दंडवते बाबानी गुरुमंत्र दिला 
दंडवते बाबा बरोबर गुरुजी आणि माई 
आणि त्यानंतर बागुलकाकानी तिथेच गुरुजींकडून गुरुमंत्र घेतला , म्हणजे बागुलकाका हे गुरुजींचे पहिले शिष्य होते. 
बागुलकाका बरोबर 
पहिले गायत्री मंत्र पुनश्चरण सांगता समारंभ , समाज मंदिर हॉल , बांद्रा , गांधी नगर पट्ट शिष्य बागुलकाका बरोबर गुरुजी आणि माई .
१८८४ -१९८५ ला  २७ लक्ष गायत्री जप केला 

गुरुजींची एकसष्टी साजरी केली 

गुरुजींची एकसष्टी
गुरुजींची एकसष्टी

सून सौ. रंजना संजय पाठक  यांचा अठंगुळ संस्कार गुरुजींनी अहमदनगर ला केला होता. या संस्कारामुळे सोवळ्याचा स्वयंपाक करता येतो असे गुरुजी म्हणाले 

गुरुजी , माई व त्यांची तिन्ही मुले व सुना . एक खूप दुर्मिळ फोटो. राजूदादा व सुचेतावहिनी , संजय व रंजनावहिनी , अजय व पूजा वहिनी 
नाशिक राजू दादाच्या घरी गुरुजी व माई , ओमकार व गायत्री या लाडक्या नातवंडांबरोबर सोबत सून सुचेतावहिनी  
माई खूप आजारी पडली होती , तेव्हा त्यांनी माई साठी आयुष्य महाराजांकडे मागून घेतले होते आणि परत मागणार नाही असे कबुल केले होते. हि आठवण ते आम्हाला सांगत. शेवटी माई जेव्हा आजारी झाली आणि हॉस्पिटलमध्ये होती. तेव्हा त्यांना माहित होते कि आत्ता काही करता येणार नाही. आम्ही विचारले कि माई कधी बरी होईल तेव्हा ते म्हणाले कि " जितनी चाबी भरी राम ने , उताना चाले खिलोना ". कधीतरी हे होणारच हे त्यांनी सहजच स्वीकारले होते. 


गुरुजी आणि माई 
 माईच्या केसात गजरा मळताना एक दुर्मिळ फोटो 


अजून एक आठवण म्हणजे गुरुजी असेपर्यंत रोज संध्याकाळी ७ वाजता त्यांची एक प्रार्थना होती ते सर्वजण म्हणायचे. अगदी रस्त्यात असले तरी दोन मिनिटे मनातल्या मनात बाजूला उभे राहून म्हणायचो. हि सवयच होती. ज्यात स्वामींची प्रार्थना , आईची प्रार्थना वगैरे होते. हे त्यांनी व आम्ही कुठेही असले तरी चुकवले नाही. माई चे पार्थिव हॉस्पिटलमधून माहीमच्या घरी आणले आणि संध्याकाळचे ७ वाजले तेव्हापण गुरुजींनी सांगितले कि प्रार्थना चुकवायची नाही. आणि त्या दिवशीही संध्याकाळी ७ वाजता घरी माई चे पार्थिव असताना देखील सर्वानी प्रार्थना केली. 

संध्याकाळी ७ वाजता करायची आई ची प्रार्थना 

संध्याकाळी ७ वाजता करायची स्वामींची प्रार्थना  
गुरुजींचा काही खूप मोठा भक्तपरिवार नव्हता . परंतु जे होते ते प्रेमाने जोडलेले होते. काही बुवाबाजी , अंधश्रद्द्धा नाही, पैश्याचा व्यवहार नाही आणि पैश्याची मागणीही नाही. दर गुरुवारी संध्याकाळी त्यांच्याकडे भक्तमंडळी दर्शनाला यायची. रात्री ११ -१२ पर्यंत लोक येत असायची. एरवी पण गुरुजी सर्वाना भेटायचे. ते सर्वाना accesible आणि available असायचे. मी पण तुमच्यातलाच एक सामान्य माणूस आहे असे ते सर्वाना भासवयाचे. काही खाज़गी बोलायचे असेल तर गुरुजी वेळ द्यायचे त्यावेळेला लोक यायची. त्यांच्या बसण्याच्या जागे मागे महालक्ष्मी कॅलेंडर असायचे त्यात ते त्यांच्या appointment / जप संख्या लिहून ठेवायचे. 
माझा मुलगा आर्यन बरोबर गुरुजींचा फोटो . मागील कॅलेंडर वर ते appointment / जप संख्या लिहून ठेवायचे.  

या भेटीसाठी त्यांची काहीच फी नव्हती. कोणी काही दिले तर ठीक नाहीतरी ठीक. जो दे उसका भला जो ना दे उसका भी भला . कोणाचे काही प्रॉब्लेम असेल तर ते महाराजांकडे प्रार्थना करायचे कि तुमचा भक्त आला आहे त्याला निराश करू नका. जे काही होते आहे ते महाराजांच्याच इच्छेने होत आहे यावर ते ठाम असायचे. अनेक जण त्यांच्याकडे समस्या घेऊन येत. मग ते त्यांना उपासना सांगत आणि महाराजांना विनंती करत कि हा भक्त ८४ पायऱ्या( ८४ लक्ष योनी पार करून )  चढून तुमच्याकडे आलेला आहे त्याच्यावर कृपा करा (त्यांचे घर ५ मजल्यावर होते आणि त्यांच्याकडे जायला ८४ पायऱ्या चढून जायला लागायचे ). तुम्ही उपासना करा आणि फळ काय द्यायचे ते महाराजांवर सोडून द्या असे ते म्हणत. तसेच मी भगवंत द्यायला बसलोय आणि तो मागायला कोणीच येत नाही, अशी खंत ते व्यक्त करत.

गुरुजींनी माहीमच्या घरी ९ पायर्यांचा स्टील चा देव्हारा बनवून घेतला होता. त्यात श्री दत्त मूर्ती आणि इतरही देव होते व ते व्यवस्थित रचून ठेवले होते. 
गुरुजींच्या माहिमच्या घरातील स्टील चा ९ पायऱ्यांचा  देव्हारा 

फुल त्यांना खूप आवडत. केळकरांचे हिना अत्तर तर खूप प्रिय. गळ्यातील रुद्राक्ष माळेला ते नियमित अत्तर लावत. त्यांच्या बोटात  एक नवग्रहांची जुनी अंगठी होती बाकी stones वर त्यांचा विश्वास नव्हता. फुले आणण्यासाठी ते दादर ला माहिमवरून टॅक्सी ने जात. दादर फुलबाजारात फुले घेत आणि मग परत येत. विशेषतः गुरुवारी त्यांना खूप फुले लागायची. चाफा त्यांना अत्यंत प्रिय. नंतर आम्ही दोघे वेळ ठरवायचो आणि ते मला म्हणायचे कि तू तुझे घोडं (मोटरसायकल ) अमुक वाजता घेऊन ये. मग आम्ही दोघे बाईक वरून दादर फुलबाजारातून फुल घेऊन यायचो. त्यांचा वेळ पण वाचायचा आणि मला मज्जा यायची. घरी आलो कि मग ते खूप वेळ मनासारखा देव्हारा फुलांनी सजावट बसत. माई म्हणायची आत्ता माळीबुवा तासभर देवांना सजावतील. नामस्मरण , जप त्यांना खूप प्रिय, कधीही कुठेही नामस्मरण करावे असे ते सर्वाना सांगत. भजन ऐकायला त्यांना आवडत आणि शास्त्रीय संगीत पण आवडत असे.


                                    नामस्मरण करताना गुरुजींचा एक दुर्मिळ विडिओ

२३ फेब. २००३ माझ्या लग्नात गुरुजी (आमच्या दोघांच्या मध्ये उभे आहेत )
कन्या जया हिच्या लग्नात गुरुजी आणि माई ५ जुन १९८१
मुलगा अजय याच्या लग्नात गुरुजी , माई , सौ. सुचेता , राजूदादा , सौ. रंजना 
छाया व विजय सरदेशपांडे यांच्या लग्नात कन्यादान गुरुजींनी केले २९ नोव्हेंबर १९७९ 
श्री. विजय पाटील यांच्या कराड येथील लग्नात गुरुजींची हजेरी १४ मे २००२

  कृते जनार्दन देवे I  त्रेताया रघुनंदन II 
द्वापारे रामकृष्णस्य I कलौ श्रीपाद श्रीवल्लभ II 

कलयुगाची देवता दत्त आहे त्यामुळे दत्ताची उपासना करा असे ते सांगत. या व्यतिरिक्त देवीचा जप, नवनाथाचा जप ते करत आणि करायला सांगत. वर्षातून एकदा ते नवनाथाची पूजा सांगत. गुरुजी मेडिटेशन नाही करायचे पण एका बैठकीत खूप जप करायचे . जप करताना आणि श्री गुरुचरित्र वाचन करताना ते ट्रान्स मध्ये जायचे . आध्यात्मात भगवंत प्राप्तीसाठी अनेक मार्ग आहेत , त्यापैकी खडतर कष्टप्रद जीवन व कडक उपासना या मार्गावर ते चालले. दत्त हे दैवत सर्वाना available आणि accessible करण्याचा त्यांनी जीवनभर प्रयत्न केला. आणि आजच्या बाजारू अध्यात्मिक दुनियेत सहज उपासना कशी करता येते हा मार्ग त्यांनी दाखवला. दत्तमहाराज भक्ताभिमानी आणि भक्तवत्सल आहेत व त्यांच्या भक्तांचे ते संरक्षण करतात आसा ठाम विश्वास त्यांनी आपण सर्वाना दिला किंवा आपल्याला त्यांनाही अशा आशेवर ठेवले कि तुम्ही टेन्शन घेऊ नका महाराज येतील. 

गुरुजींच्या डोळ्यातून आपण दत्तमहाराज पहिले , दत्तमहाराजांकडे आपली गाऱ्हाणी आपण गुरुजी मार्फत पोहोचवली व दत्त महाराज आपल्याशी गुरुजींच्या मुखातून बोलले हे मात्र खरे. कारण देव हा आपल्यातच असतो. तुम्ही सर्व जण जे हे वाचतायत ते खरंच भाग्यवान कि अश्या एका सत्पुरुषाबरोबर आपण सहजच वावरलो, किव्हा त्यांची माहिती आपल्याला मिळाली. आज गुरुपौर्णिमा आहे, त्यानिमित्त पाठकगुरुजींची हि छोटीशी आठवण.

विशाल फुलपगार
५ जुलै २०२० , रविवार ,गुरु पौर्णिमा


आभार : महेश पाटील , स्वप्नाली फडणीस , रंजना पाठक , राजूदादा पाठक , अमेय भट , ओंकार पाठक यांनी खूप शोधाशोध करून फोटो दिलेत.


दत्तलीन श्री. पाठक गुरुजी यांच्या जीवनावरील "जगन्मित्र" या पुस्तकाचे विमोचन स्वातंत्रवीर सावरकर स्मारक , दादर , मुंबई येथे २५ डिसेंबर २०१२ ला मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तो कार्यक्रम पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा. 

https://www.youtube.com/watch?v=V32T5DWEor8&list=PLsAsEAuSOBwdOoqO44f_ZFkqLrO7aPsva&index=2&t=7904s