Wednesday, August 18, 2021

बुद्धम शरणं गच्छामि - १९८३ श्रीलंका मधील थरारक अनुभव

तालिबान्यानी अफगाणिस्तान देशाचा पूर्ण ताबा घेतला अश्या बातम्या टीव्हीवर पाहिल्या. विमानतळावर तसेच रनवे वर लोकांची गर्दी होती. देशात अराजकता माजली असताना काय होते याचा एक अनुभव मी १९८३ ला श्रीलंका कोलंबो येथे घेतला होता. तो जसाच्या तसा सांगतो. तेव्हा मी १० वर्षाचा होतो.  

पप्पा इंडियन एअरलाईन्स मध्ये नोकरीला होते. त्या पुण्याईवर मी अनेक ठिकाणी लहानपणापासूनच विमानाने फिरलो. साधारणपणे जुलै १९८३ ला मी , आई , पप्पा, बहीण सोनाली साधारणपणे ४-५ दिवस फिरण्यासाठी श्रीलंका कोलंबो येथे गेलो , तेव्हा कोलंबोला सिलोन म्हणायचे. सिलोनला वेलवत्ता या ठिकाणी आम्ही कोणाच्या तरी घरी पेयिंग गेस्ट म्हणून एका खोलीत राहिलो. तिथे इंडियन एअरलाईन्स चे स्टाफ राहायचे. स्वस्त होते. तो एक छानसा बंगला होता. समुद्रकिनाऱ्यापासून चालत २ मिनिटावर. स्वच्छ समुद्रकिनारा, स्वच्छ वाळू पहिल्यांदा पाहिली . समुद्राचे पाणी पारदर्शक असते हे पाहून धक्काच बसला. कारण तो पर्यंत आम्हाला दर रविवारी जुहूला समुद्रात काळ्या पाण्यात अंघोळ करायची सवय होती. 

लहान असल्यामुळे जात ,धर्म वगैरेचा काही संबंध नव्हता , तसेच टुरिस्ट असल्यामुळे फिरायचे , शॉपिंग करायचे हे एकच काम. तिथे लोक हिंदी मध्ये बोलायचे, त्यामुळे भाषेची अडचण नव्हती. मला नक्की आठवतंय त्या दिवशी वातावरणामध्ये तणाव होता. काहीतरी वाईट होणार आहे याची कुजबुज होती. आम्ही राहत असलेल्या ठिकाणापासून जवळच एक मोठे शॉपिंग सेन्टर होते. त्याचे नाव ड्युटी फ्री शॉपिंग सेन्टर. तिथे आम्ही काहीतरी घेण्यासाठी गेलो होतो. अचानक काहीतरी झाले , सगळे दुकानदार दुकाने उघडी टाकून तिथून पळून गेले. आम्ही पण घाई घाई ने उतरलो. आणि त्वरेने आमच्या रूम वर पोहोचलो. इतर दोन खोल्यांमधील  इंडियन एअरलाईन्स चा स्टाफ फॅमिली सकट तिथे होताच. 

त्या घराचे मालक एक सिंहली म्हणजे बुद्धिस्ट बाई होती. श्रीलंकेमध्ये सिंहली आणि तामिळ लोक होते. तिने सांगितले कि सिंहली / तामिळ दंगल सुरु झाली आहे. कोणीतरी जेल मध्ये जाऊन ३०-३५ कैद्यांना मारून टाकले आहे. त्यात कोणीतरी लीडर पण होता. खरे म्हणजे हे फक्त एक निमित्त होते. तणाव खूप दिवसांपासूनच होता. घर मालकांनी सांगितले कि आम्ही तुमची जबाबदारी घेऊ शकत नाही. आणि आम्ही पण घर खाली करून इथून जात आहोत. तुम्हीपण ताबडतोब निघा. 

पप्पा 

आत्ता या परिस्थितीमध्ये दुसऱ्या देशात कुठे जायचे , कुठे राहायचे काही कळेना. आम्ही ३ कुटुंब सामान घेऊन बाहेर आलो. रस्त्यावर लाठ्या काठ्या, तलवार घेतलेले आणि लोक दिसत होते. तुरळक जाळपोळ चालू होती. पोलिसाचा पत्ताच नव्हता. सध्या कोणत्यातरी हॉटेलमध्ये राहायचे आणि चौकशी करून उद्या भारतात जाण्यासाठी  विमानतळावर जायचे असे पप्पांनी ठरवले. त्यातच समोर असलेले रिकामे शॉपिंग कॉम्प्लेक्स बघून आमच्या सोंबत असलेल्या एका नवरा बायकोंने त्यांचा ८ वर्षाचा मुलगा आम्हाला दिला आणि म्हटले कि आम्ही काहीतरी घेऊन येतो. पप्पानी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांनी ऐकले नाही. मग आम्ही दोन कुटुंब आणि एक मुलगा हॉटेल शोधायला लागलो. कोणीही हॉटेलवाला आम्हाला खोली द्यायला तयार नव्हता कारण आमच्या बरोबरचे कुटुंब तामिळ होते आणि तसेच दिसायचे आणि वडील पण साधारण तामिळच दिसायचे. 

मी , बहीण ,आई आणि पप्पा 

आई आणि पप्पा 
मोठीच पंचाईत झाली . संध्याकाळ होऊ लागली होती. सर्व हॉटेल सिंहली / बुद्धिस्ट लोकांची होती. त्यांच्या मनात तामिळांबद्दल द्वेष होता कि नाही ते माहित नाही पण त्यांना तामिळना रूम द्यायची नव्हती. 

मग शेवटी एक हॉटेलवाला आमच्याशी बोलायला तरी तयार झाला. त्याला आमचा पासपोर्ट दाखवला आणि सांगितले कि आम्ही मुंबईमध्ये राहतो , आम्ही तामिळ नाही. पप्पानी सांगितले कि आम्ही बुद्धिस्ट आहोत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत आम्ही हिंदू धर्मातून बुद्ध धर्मात प्रवेश केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे नाव ऐकल्यावर तो जरा विचारात पडला. पण बोलला कि तुमच्यावर विश्वास कसा ठेवू. पप्पा बोलले कि आम्ही त्रिशरण पंचशील नियमित म्हणतो. आत्ता तुम्हाला म्हणून दाखवतो. पप्पानी आम्हाला इशाऱ्याने हात जोडायला सांगितले. आणि त्रिशरण पंचशील म्हटले. वास्तविक आमच्या घरी हे नियमित म्हटले जायचे त्यामुळे काहीच चुकले नाही. 

त्यांना पटले व त्यांनी आम्हला दोन खोल्या दिल्या. आम्ही सांगितले कि एकाची चुकामुक झालीय आणि या मुलाचे आई वडील पण येतील. त्यांना विनंती केली कि या मुलाचे आई वडील जर पोलीस स्टेशन ला गेले तर त्यांना इथला पत्ता कळेल असा निरोप पोलिसाना द्या. रात्री जेवणाची व्यवस्था केली होती. जगात काहीही झाले तरी पोटभर जेवायचे हा फुलपगार लोकांचा नियम आहे त्याप्रमाणे निदान मी तरी पोटभर जेवलो. रात्री त्या मुलाचे आई वडील कसेतरी आमच्या हॉटेलला पोहोचले. तो पर्यंत त्या मुलाचा जीव कासावीस झाला होता. अर्थात ते आले नसते तरीही आम्ही त्याला घेऊन मुंबईला परतणार होतोच. 

हॉटेलमध्ये पण दंगलीचा प्रतिकार करायची पूर्ण तयारी होती.  कोणी हल्ला केला तर ते पण पूर्णपणे तयार होतेच. याविषयी अधिक लिहीत नाही. हॉटेलमधल्या बऱ्याचश्या लाईट बंद केल्या होत्या जेणेकरून अंधार झाला होता. 

आम्ही त्यांना म्हटले कि इथे दंगेखोर आले तर ? ते म्हटले कि या भागात आमची मेजॉरिटी आहे त्यामुळे इथे तसा काही प्रॉब्लेम नाही. पण जर आलेच तर मात्र त्यांना आम्हाला पार करावे लागेल मगच ते तुमच्या पर्यंत पोहोचतील. तुम्ही आमचे गेस्ट आहात. तुमचे संरक्षण करणे आमचे कर्तव्य आहे. काळजी करू नका. तूर्तास शहरात कर्फ्यू आहे आणि हि दंगल इतक्यात काही थांबणार नाही. 

आत्ता कर्फ्यू मध्ये विमानतळावर जायचे म्हणजे पोलीस परवानगी पाहिजे , मग पप्पाना घेऊन हॉटेल मालक त्याच्या गाडीने पोलीस स्टेशनला रात्री गेले. तिथे पासपोर्ट दाखवले आणि त्यांना सांगितले कि उद्या विमानतळावर जाऊन भारतात परतायचे आहे तेव्हा तुम्ही परवानगी द्या. त्यांनी एक पत्र दिले आणि सांगितले कि हे शहर मिलिटरी च्या ताब्यात आहे. सर्वत्र दंगे चालू आहेत. आम्ही तुम्हाला पोलीस गाडी देतो. जागोजागी चेकिंग होईल तिथे तुम्ही हे पत्र दाखवा. पण आम्ही तुमची जबाबदारी घेत नाही.  बेस्ट ऑफ लक. ते पत्र घेऊन रात्री २-३ वाजता पप्पा हॉटेल ला परत आले. तो पर्यंत आम्ही खूप तणावात होते. तथागत गौतम बुद्धांच्या कृपेने आम्हाला राहायला जागा भेटली आणि आमच्याबरोबर इतर दोन कुटुंबातही भेटली. नाहीतर आम्ही काय केले असते काय माहित. 

सकाळी ८ वाजता पोलीस ची गाडी आली . थोडे खाऊन आम्ही निघालो. त्या हॉटेलवाल्याचे खूप आभार मानले. त्याने आम्हाला खूप मदत केली. नंतर आम्ही कधीच भेटणार नव्हतो. त्याने देखील आम्हाला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. 

पुढे पोलिस गाडी आणि मागे आमची मॅटॅडोर सारखी गाडी , त्यात आम्ही तीन कुटुंब निघालो. रस्त्यावर भयानक परिस्थिती होती. जागोजागी गाड्या जाळल्या होत्या, अनेक घरेदेखील जळत होती. रस्त्यावर खूप प्रेतं पडलेली होती. सर्वत्र मिलिटरी चे जवान बंदूक घेऊन उभे होते. प्रत्येक १००-२०० मीटर वर आमची चेकिंग व्हायची. सर्वांचे पासपोर्ट , चेहरे चेक व्हायचे. अनेकदा ते बंदूक आमच्याकडे ताणायचे. खूप घाबरलो होतो. आम्हाला लवकर विमानतळावर पोहोचायचे होते. 

पप्पा चांगले कपडे घालून ड्रायव्हरच्या बाजूला बसले होते.  विमानतळापर्यंतचा अर्ध्या तासाचा प्रवास आम्ही अडीच तीन तासात कसाबसा पार करून विमानतळावर अंदाजे ११ वाजता पोहोचलो. तिथे तर काहीच सुरक्षा नव्हती. बस डेपोमध्ये आपण कसे सहजच शिरतो तसे आम्ही त्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आत गेलो. आत मात्र खूप गर्दी होती. बरीचशी विमाने होती. अनेक देशांचे नागरिक परतत होते. 

पप्पा  इंडियन एअरलाईन्सच्या ऑफिसमध्ये गेले. तिथे त्यांना सांगितले कि तुमचे तिकीट कोलंबो- मद्रास- मुंबई आहे (चेन्नई ला तेव्हा मद्रास म्हणत असत). सध्या कोलंबो मद्रास अतिरिक्त विमाने चालू आहेत पण सगळी फुल आहेत. संध्याकाळी ६ वाजताच्या विमानात तुम्हाला पाठवतो. तोपर्यंत इथेच थांबा. इतक्यात इंडियन एअरलाईन्सचा ड्युटी मॅनेजर आला , तो म्हणाला कि कोलंबो - बंगलोर - चेन्नई विमान आहे ते आत्ता सुटेल त्याने मी तुम्हाला पाठवू शकतो. तुमचे तिकीट तसे नाही पण अपवादात्मक स्थितीत तुम्हाला मी परवानगी देऊ शकतो. कारण आत्ता वेळापत्रकाप्रमाणे काहीच चालत नाही. तसेच जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर भारतीयांना भारत आणण्याचे आम्हाला आदेश आहेत. त्यामुळे विमानसेवा या स्टेट ट्रान्सपोर्ट च्या बस सारख्या ये जा करत आहेत. आमच्या बरोबरचे लोक म्हटले कि आम्ही डायरेक्ट विमानाने मद्रास ला संध्याकाळी जाणार. 

पांढरे शूज घालून माझे पप्पा त्या दिवशी कोलंबो एअरपोर्ट ला , सोबत इंडियन एअरलाईन्स चा स्थानिक स्टाफ 

पप्पानी मात्र सांगितले कि पहिल्यांदा भारतात पोहोचूया मग काही प्रॉब्लेम नाही. आणि आम्ही विमानात प्रवेश केला. विमान पूर्ण भरलेले होते. विमान निघाले आणि लगेच थांबले. सगळे प्रवासी घाबरले. आम्हाला वाटले कि इथे पण दंगेखोर आले असावेत. पायलटने सांगितले कि अजून काही लोक येत आहेत त्यांच्यासाठी आपण थांबलोय. आम्हाला काहीच कळेना कारण विमानात बसायला जागाच नव्हती. ५-१० मिनिटामध्ये ४-५ माणसे आणि बायका गाठोड्यात काहीतरी बांधून ते पाठीवर ठेवून आले. परत दरवाजे खुलले आणि त्यांना आत घेतले. ते उभेच राहिले.  मग विमान कर्मचाऱ्यांनी त्यांना मार्गिकेमध्ये बसवले आणि त्यांना दोन्ही बाजूच्या सीट पकडून ठेवायला सांगितले. अंदाजे दिड दोन तासांचा प्रवास सुरु झाला.  सर्वाना विमानात खायला मिळाले. मी पण बाकीच्या चिंता बाजूला ठेवून ते खाल्ले. आणि हो जे खाली बसले होते ते सोन्याने लादलेले होते (बप्पी लाहिरी सारखे ) म्हणजे नक्कीच ते श्रीलंकेतील श्रीमंत लोक असतील पण परिस्थितीने त्यांना विमानात जमिनीवर बसून प्रवास करायला लावला. 

ठरल्या वेळेला आम्ही बंगलोर एअरपोर्ट ला पोहोचलो. अर्धे लोक बंगलोरला उतरली काही नवीन प्रवासी आले. आम्ही मात्र विमानातच बसून होते कारण आम्हाला पुढे त्याच विमानाने मद्रासला जायचे होते.  जमिनीवर बसलेल्याना सीट वर बसायला मिळाले. बंगलोरवरून त्या विमानाने मद्रास साठी उड्डाण केले. मद्रास एअरपोर्ट ला विमानातून उतरल्यावर सुखरूप पोहोचल्याचा आनंद काही औरच होता. 

मद्रास विमानतळावर देखील खूप घाई गडबड होती. विमान आले कि ते लगेचच कोलंबोला जायचे. इंडियन एरलाईन्स ने अप्रतिम काम केले. सरकारी मालकी असल्यामुळे ते शक्य झाले. खाजगीकरणानंतर आपण हे सर्व विसरायचे. आम्हाला ताबडतोब मद्रासवरून पुढच्या विमानाने मुंबई ला पाठवले. आणि आम्ही घरी व्यवस्थित पोहोचलो.  त्यावेळेला एवढे कळले नाही मात्र थोडे मोठे झाल्यावर मात्र याचे गांभीर्य कळले. नशिबाने दिलेली साथ पप्पांचे धाडस , त्यांचे योग्य वेळी योग्य निर्णय या मुळे आम्ही सुखरूप घरी परतलो. 

आज तालिबान्यांनी अफगाणिस्थानवर कब्जा केल्याने लोकांची देश सोडायची धावपळ आणि विमानतळावरची काही दृश्य पहिली. मला हा प्रसंग आठवला आणि तो तुम्हाला सांगितला. 
काबुल विमानतळ १५ ऑगस्ट २०२१

लोक एकमेकांना का मारतात ? दंगली का होतात ? त्यातून काय मिळते ? याचा मी बरीच वर्षे विचार करतोय पण उत्तर मात्र सापडले नाही... 

भारत सरकारने केलेली उत्तम व्यवस्था , इंडियन एरलाईन्सचे अथक परिश्रम ,त्यावेळेला मीडिया , व्हाट्सएप्प नसणे आणि महत्वाचे म्हणजे बुद्धम शरणं गच्छामि ने आम्हाला सुखरूप ठेवले हे खरेच. 



विशाल फुलपगार 
१८  ऑगस्ट २०२१

Friday, August 13, 2021

The Ganesh Naik saheb - मला समजलेले दादा

टीप : मी नवी मुंबई मध्ये रहात  नाही. नवी मुंबईतील मतदार नाही. हा लेख माझ्या वैयक्तिक अनुभवावर लिहिला आहे. कोणत्याही राजकीय दृष्टीने न वाचता व्यक्ती विशेष म्हणून वाचावे हि नम्र विनंती. 





खरे म्हणजे श्री गणेश नाईकसाहेब (दादा) याना राजकारणी म्हणणे चुकीचे आहे. ते सर्व विशेषणांच्या वरती आहेत. साधारणपणे २००० ते २०१३ या कालखंडात माझा दादांशी नोकरीच्या निमित्ताने जवळून संबंध आला. त्याद्वारे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू पाहावयाला मिळाले. त्यांच्या विषयीच्या काही आठवणी सांगतो. अर्थात दादांची स्तुती करून किव्हा त्यांच्या विषयी लिहून मला कोणताही फायदा / तोटा नाही. कोणाला घाबरायची किव्हा विचारायची आवश्यकता नाही. मी लिहून ते मोठे अथवा छोटे होणार नाहीत. या सर्वांच्या पलीकडे दादांचे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी ते स्वकष्टाने ,स्वकर्तुत्वाने मिळवले आहे, टिकवले आहे. 

त्यांच्या विषयी लोकांचे अनेक मतप्रवाह असू शकतात पण माझा ज्या राजकारण्यांशी जवळून संबंध आला त्यातील क्रमांक १ वर माननीय श्री शरद पवार साहेब , क्रमांक २ वर श्री गणेश नाईक साहेब नेहमीच राहतील त्यानंतर नितीन गडकरीजी , अजितदादा वगैरे असतील.  माझ्या आठवणींमध्ये मी राजकीय टिप्पणी टाळण्याचा प्रयत्न करीन , कारण राजकीयदृष्ट्या माझा त्यांच्याशी कधी संबंध आला नाही आणि मी काही राजकारणी नाही. तसेच व्हाट्सअप , मीडिया च्या माहितीवरून सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या व्यक्तींबद्दल मत बनवून टिप्पणी करण्याचा मूर्खपणा मी करत नाही. 

साधारण २००० साली मी नवी मुंबईमध्ये एका कंपनी मध्ये मॅनेजर म्हणून काम करायचो. तेव्हा आमचे वाशी ला भाड्याने ऑफिस होते. आमच्या कंपनी मध्ये २ पार्टनर होते व त्यांच्या खटके उडत होते. दुसरा पार्टनर माझ्या साहेबाना काम करू देत नव्हता त्यामुळे ऑफिसला येणे तणावपूर्ण होते. कोणाच्यातरी ओळखीने श्री गणेश नाईक याना भेटायला माझे बॉस गेले आणि मी मराठी बोलतो म्हणून मलापण घेऊन गेले. तोपर्यंत श्री गणेश नाईक म्हणजे शिवसेनेत असताना शिवसेनेला मोठ्या प्रमाणात ऍम्ब्युलन्स देणारे नवी मुंबईतील नेते म्हणून मला माहित होते. तेव्हा त्यांनी शिवसेना सोडली होती आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवून ते पराभूत झाले होते. 

त्यांना भेटायला लोकांची प्रचंड गर्दी होती. प्रत्येकाच्या समस्या ते समजावून घेत होते. अधिकाऱ्यांना फोन करून आदेश देत होते. मी मनात म्हटले कि अरे हे आमदार नाहीत तरीपण एवढी गर्दी ? कमाल आहे. माझ्या साहेबाना आणि आम्हाला त्यांनी दुसऱ्या खोलीत बसायला सांगितले आणि जवळपास २०-२५ मिनिटांनी ते आले. साधारण उंची , स्वछ पांढरे कपडे , चेहेऱ्यावर हास्य आणि मनमोकळेपणाने बोलणे हे त्यांचे वैशिष्ठ्य प्रकर्षाने जाणवले. त्यांनी खूप आदराने बॉस ची चौकशी केली. माझे बॉस M.TECH आहेत आणि कंपनी चालवण्याबरोबर संशोधनही करतात असे समजल्यावर ते खूप आनंदले. अजूनही ते माझ्या बॉसना सायंटिस्ट असेच म्हणतात. सध्याच्या कंपनीच्या भांडणांमुळे त्यांना व्यवस्थित काम करता येत नाही असे समजल्यावर ते थोडे गंभीर झाले. मी तुम्हाला मदत करतो असे ते म्हणाले. त्यांनी ताबडतोब त्यांचा सचिव अजय पंडितला सांगितले कि या दोनीही पार्टनरची दोन दिवसात माझ्याबरोबर मीटिंग लाव आणि रामशेठ विचारे (नगरसेवक) यांनादेखील बोलावून घे. 

ठरल्या दिवशी माझे बॉस आणि त्यांचे पार्टनर दादांना भेटायला पोहोचले. अर्थात मी पण होतो. श्री विचारेसाहेब देखील होते. मला वाटले कि दादा त्या पार्टनर ला दमबाजी करतील, पण उलटेच झाले. दादांनी त्याची पण चौकशी केली. तो देखील घाबरला होता पण ५ मिनिटांमध्येच त्याच्या चेहेऱ्यावरचा तणाव निवळला. दादांनी स्पष्टपणे सांगितले कि साथ रहकर झगडा क्यू करते हो ? अलग अलग कंपनी बनवो और अपना अपना काम करो. विचारेसाहेबाना दादांनी सांगितले की दोघांवर अन्याय होणार नाही अशा पद्धतीने तुम्ही या कंपनीचे / assets चे विभाजन करून द्या. बॉस ला सांगितले कि मुझे या किसीको पैसे देनेकी जरुरत नही. ये विशाल को कोऑर्डिनेट करने दो. और मुझे इस बारे मे वापस मिलानेकी जरुरत नाही. नवी मुंबई मे आपका ऑफिस है , अच्छा काम करो. गणेश नाईक अच्छा काम करनेवालों के साथ हमेशा राहता है. मेरा ध्यान राहेगा. 

माझे पहिलेच मत खूप छान झाले. एखादा जटील प्रश्न घरातील वडीलधाऱ्या माणसाने सहजच सोडवावा तसे झाले. मग विचारेसाहेबानी दोनीही पार्टनर ला वेगळे करून वेगवेगळ्या कंपनी स्थापन करून दिल्या. अर्थात हे कटकटीचे काम होते , कारण अनेकदा शुल्लक गोष्टीवरून दोनीही पार्टनर अडून राहायचे. एकमत व्हायचे नाही. त्यात विचारेसाहेब नगरसेवक आणि स्वतः बिल्डर व्यवसायात ,त्यांमुळे ते पण बिझी असायचे. पण त्यांनी शांतपणे आणि वेळप्रसंगी आवाज चढवून कंपन्या वेगळ्या करून दिल्या. विचारेसाहेबांचा यात बराच वेळ जायचा पण दादांनी दिलेली जबाबदारी त्यांनी ७-८ महिन्यात व्यवस्थित आणि कोणावरही अन्याय ना होऊ देता पार पडली. या दरम्यान विचारेसाहेबानी आमच्या ऑफिसमध्ये कधी चहा देखील पिला नाही. 

नवीन कंपनीमध्ये माझे बॉस चेअरमन आणि त्यांच्या पत्नी MD झाल्या. आमच्या आणि दादांच्या भेटीगाठी नियमित व्हायला लागल्या. बॉस पंजाबी होते त्यामुळे ते मला दादांकडे नेत असत, मग मी ट्रान्सलेटरचे पण काम करीत असे. कंपनी वेगळे झाल्यावर आमची झपाट्याने प्रगती होऊ लागली. वाशीच्या भाड्याच्या ऑफिसमधून आम्ही स्वतःचे बेलापूरला मोठे ऑफिस घेतले. बॉस नवी मुंबईमध्ये NRI कॉम्प्लेक्स मध्ये राहायला आले.  कर्मचारी वर्ग हळू हळू वाढायला लागला. महाराष्ट्रात आणि भारतभर आमची कामे चालू झाली. Sewage Treatment Plant , Common Effluent Treatment Plant , Zero Liquid Discharge Plant , Water Treatment Plant आम्ही बनवू लागलो. 

दादांबरोबर माझे वैयक्तिक संबंध आणि संभाषण वाढत होते. अनेकदा ते मला फोन करून बोलावून घ्यायचे.  तिथे नियमित जे १०-१५ जण यायचे त्यात मी असायचो. खूप गप्पा मारायचे. त्यांचे vision ,त्यांचे विचार, माणसाला मदत करण्याची त्यांची वृत्ती , सर्वाना सन्मान देण्याची त्यांची सवय तसेच एखादा विषय समजून घेण्याची त्यांची कला मला खूप आवडायची. एखादा जोक त्यांना आवडला कि ते मला तो SMS पाठवायचे आणि फोन करून सांगायचे कि माझा मेसेज वाच. त्यावेळेला ते विधानसभा निवडणुकीत पराभूत होते. पण त्यांच्याकडे लोकांची अफाट गर्दी असायची. त्याच्या १०% पण लोक विजयी आमदाराकडे नसायचे. यात काय जादू होती काय माहित. कोणाबद्दलही ते कधीही वाईट बोलायचे नाही. कटुता / द्वेष / असूया त्यांच्या मनात किव्हा डोळ्यात मला कधीही कोणाबद्दलही दिसली नाही. 

नवी मुंबई शहर हे कसे बनवायचे याचे vision त्यांच्या डोक्यात फिक्स होते. लोकांना चांगले पाणी , हवा , रस्ते मिळाले पाहिजेत. ज्या चुका मुंबई शहरामध्ये झाल्या त्या त्यांना नवी मुंबई च्या विकासात नको होत्या. महानगर पालिकेमध्ये त्यांचीच सत्ता होती त्यामुळे त्यांनी बहुतेक चुका टाळल्या. २००४-५ ला नवी मुंबई एवढे पसरेल , एवढे पॉश होईल याची मलादेखील कल्पना नव्हती. 

नवी मुंबईला भविष्यात पाण्याची स्वतंत्र व्यवस्था असावी म्हणून त्यांनी महाराष्ट्र शासनाकडून मोरबे भरणं महापालिकेला विकत घ्यायला लावले. तेव्हा संजीव नाईक महापौर होते. नाहीतर आज नवी मुंबई ला पाण्यासाठी MIDC किंवा इतर कोणावर तरी अवलंबून राहावे लागले असते. याचा दूरदृष्टीचा फायदा आज सर्व नवी मुंबईकर घेत आहेत. 

माझ्या लग्नाचे निमंत्रण मी दादांना दिले आणि म्हटले कि तुम्ही बिझी असता तसेच नवी मुंबईतून तुम्हाला मुंबईमध्ये खार ला माझ्या लग्नाला येऊन जायला ३-४ तास लागतील तेव्हा तुम्ही येणार नाहीत. दादा बोलले अरे असे कोणी निमंत्रण देते का ? सगळे तूच बोललास. मी नक्की येणार. अजय पंडितला त्यांनी डायरी मध्ये नोंद करायला सांगितली. आई वडिलांचा लोकसंग्रह आणि माझे आजोबा लक्ष्मण फुलपगार यांचे समाजकार्य यामुळे लग्नाला तुफान गर्दी होती. एका मैदानात रिसेप्शन होते. अचानक काहीतरी हालचाल झाली. लोकांच्या गर्दीत दादा आले. शांतपणे स्टेजवर मला भेटले आणि बोलले कि बघ मी बोललो येणार म्हणजे येणारच. मला थोडे लाजल्यासारखे झाले. खूप आनंदपण झाला . त्यांच्या बरोबर जगदीशमामा आणि अजय पंडित पण होते. फोटो काढून दादा लगेचच गेले. 

दादासोबत शशिकांत बिराजदारसाहेब आणि जगदीशमामा माझ्या लग्नात 


मी मनात म्हटले मी एका कंपनीमध्ये जॉब करणारा मॅनेजर . माझ्याकडून याना काहीच फायदा नाही पण तरीदेखील ते एवढे लांब प्रवास करून आले. दादांबद्दलचा आदर रोजच वाढत होता. त्यांचा सचिव अजय पंडीत बरोबर तर खूपच दोस्ती झाली. अजूनही आहे. सर्वाना शांतपणे अटेंड करणारा अजय एक विशेष माणूस आहे. 

नंतर त्यांच्याकडे शीतल नावाचा सचिव आला. तो पण एकदम सज्जन, त्याच्याशीही मैत्री झाली आणि अजूनही आहे. एकदा शीतलने फोन करून सांगितले कि दादांनी नवी मुंबई स्पोर्ट असोसिएशन ला सकाळी ११ वाजता बोलावले आहे. दादांनी बोलावले कि गुपचूप जायचे असा अलिखित नियम होता. ऑफिसमध्ये पण हे माहित होते. तसेच माझे दादांकडे कधीच काहीच वैयक्तिक अथवा कोणतेही काम नसायचे. जाऊन तासभर गप्पा मारणे हेच काम. आणि त्यांनी सांगितले कि निघायचे. कमीतकमी १ तास जायचा . दादांशी बोलणे त्यांचे ऐकणे म्हणजे एक विशेष पर्वणी. खूप मज्जा यायची. त्यांच्या बोलण्यात खूप मोकळेपणा आहे त्यामुळे कधी कधी त्यांना अडचण पण होत असेल. पण त्यांनी त्याची पर्वा केली नाहीय. मनात असेल ते बिनधास्त बोलून मोकळे व्हायचे.

वाशी वरून ते निघाले आणि आम्ही त्यांना सोडायला गाडीपर्यंत आलो. अचानक ते मला म्हटले कि गाडीत बस. कुठे जायचे असे विचारण्याची हिम्मत नव्हती आणि गरज देखील नव्हती. मी खारला लांब राहतो त्यामुळे माझ्या  प्रवासाची त्यांना कल्पना होती. 

आमची गाडी पाम बीच रोड ला लागली. त्यावेळेला आजूबाजूला सर्व काही मोकळे होते. आजच्या सारखे टॉवर नव्हते. सानपाडा सोडला कि नेरुळ पर्यंत काहीच नाही. नेरुळ ला सिडको ची दोन मजल्याची कॉलनी , see breeze टॉवर , सागरदर्शन असे मोजकेच टॉवर होते.  पाम बीच रोड म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवे सारखा मस्त रोड. मी सहजच म्हटले कि दादा (मला बोलताना कधी कधी लिमिट क्रॉस करायची सवय आहे.) एवढा चांगला रस्ता आहे पण आजूबाजूला काहीच नाही.संध्याकाळी तर इथे यायला पण भीती वाटते. दादा म्हणाले कि मी हा भाग तुमच्या मरीन ड्राइव्ह सारखा बनवणार आहे , थोडे वर्ष थांब. हा नवी मुंबई मधील बेस्ट एरिया असेल. तेव्हा मला काही पटले नाही. पण आज मात्र ते वास्तव आहे. 

ठाणे बेलापूर हा रोड खूपच वाईट अवस्थेमध्ये होता. एका सभेत त्यांनी जाहीरपणे सांगितले की हा रोड नवी मुंबई महानगरपालिका बनवणार आणि त्यात टोल लावणार नाही. आत्ता हा ३० किमी चा रस्ता बनवायचा म्हणजे मोठा खर्च होता.. त्यामुळे महानगर पालिकेवर खूप आर्थिक भर पडणार होता. त्याशिवाय तेव्हा रोड बनवायचा आणि त्यावर टोल लावायचा अशी संकल्पना होती. महापालिकेचे अंदाजपत्रक कोलमडून पडेल असे सर्वजण बोलत असताना तो  ६ लेन चा काँक्रीट रोड मस्तपैकी  बनवून झाला आणि तो पण टोल शिवाय. नवी मुंबई कडे येणारे रस्ते चांगले असतील तर लोक नवी मुंबईमध्ये नोकरीला येऊ शकतात , त्यात त्यांचा वेळ वाचेल. लोक ऑफिस घेतील,  त्यात लोकांना नोकऱ्या लागतील त्यावर अवलंबून असणारे जोडधंदे म्हणजे हॉटेल, रिक्षा, टॅक्सी ,वीज ,महापालिकेचा टॅक्स यात वाढ होऊन शेवट महानगरपालिकेचे उत्पन्न वाढेल एवढे त्यांचे सोपे म्हणणे होते. त्यामुळे अतिरिक्त कर्ज ना घेता हा एक मोठा रस्ता बनवून झाला आणि तो किती उत्तम प्रतीचा आहे हे आपण बघतोच. यामागे दादांचे व्हिजन आणि दूरदृष्टी आहे. अर्थात महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ज्या प्रकारे रोड आणि इतर व्यवस्था केलीय त्याला तोड नाही. दादांचे व्हिजन आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी तत्कालीन सिटी इंजिनिअर मोहन डगावकर साहेब यांच्या टीमचे काम हे सर्व जण अभिनंदनास पात्र आहेत. शहरातील स्वच्छ रस्ते , उत्कृष्ट ड्रेनेज सिस्टिम ,उत्तम प्रशासन यामुळे नवी मुंबई ला दरवर्षी केंद्र शासनाचा पुरस्कार मिळतो. हे केवळ दादांमुळेच. 

गणेश नाईकसाहेबांचा सत्कार करताना मी आणि मागे रिलायन्स चे ग्रुपप्रेसिडेंट चैनीसाहेब 

मध्यंतरी काही लोक उगाचच आमच्या ऑफिस ला येऊन दमदाटी करू लागले ,वर्गणी मागू लागले, अवास्तव मागण्या करू लागले. हि गोष्ट आम्ही  ताबडतोब दादांच्या कानावर घातली. ते म्हटले कि तुम्ही सांगा कि गणेश नाईक ची यात पार्टनरशिप आहे. मी म्हटले अहो असे बोलणे तुम्हालाच अडचणीचे होईल , तुमची बदनामी होईल. ते बोलले की तुम्ही काळजी करू नका तुम्ही सांगा तर. जोपर्यंत तुम्ही चांगले काम करीत आहेत तो पर्यंत मी तुमच्या पाठीशी आहे. मला नवी मुंबई मध्ये चांगल्या कंपनी , चांगली माणसे हवीत. त्यानंतर मात्र आम्हाला नवी मुंबई मध्ये काय अक्ख्या महाराष्ट्रामध्ये अवांतर त्रास झाला नाही. सर्वत्र बोंबाबोंब होती कि यात दादांची पार्टनरशिप आहे, पण या काही तथ्य नव्हते. एका रुपयाचाही कधी व्यवहार झाला नाही. 

पुढच्या विधानसभा निवडणुकीत दादा विक्रमी मताधिक्याने निवडून आले . आणि राज्य मंत्रिमंडळामध्ये मंत्री झाले.  तो विक्रम अजूनही अबाधित आहे. मला त्यात काहीच आश्चर्य वाटले नाही. कारण रोज त्यांच्याकडे एवढी लोक भेटायला यायची कि विचारू नका , मग फक्त किती मतांनी निवडून येणार हा एकाच प्रश्न मला असायचा.  

घनकचरा व्यवस्थापन हा नवी मुंबई मध्ये चिंतेचा विषय होता. कारण कितीही प्लांनिंग सिडको ने केले असले तरीही कचरा डम्पिंग ची जागा नवी मुंबई मध्ये नव्हती. मग शासन दरबारी पाठपुरावा करून तुर्भे ला बंद असलेली क्वारी ची जागा मिळवून दिली. सिटी इंजिनिअर डगावकरसाहेब याना सांगितले कि इथे जरी कचऱ्याचे लँडफिलीन्ग/ प्रोससिंग होणार असले तर इथे कोणताही वास येत काम नये आणि पिकनिक स्पॉट वाटलं पाहिजे असे विकसित करा. डगावकरसाहेब व उपअभियंता सुबोध मुळेसाहेब यांनी यांनी एवढा चांगला डंप यार्ड बनवला कि देशभरातून अनेक पालिका अधिकारी याचा अभ्यास कारण्यासाठी  इथे येतात. नवी मुंबई महानगर पालिकेला नवीन मोठे ऑफिस बनवण्यासाठी सिडकोकडून मोक्याचा प्लॉट घेऊन एक उत्कृष्ट मुख्यालय उभे केले. 

मुख्य अभियंता डगावकरसाहेब आणि मी 

नवी मुंबई महानगर पालिका मुख्यालय 

Jawaharlal Nehru Natinal Urban Renewal Mission (JNNURM) या केंद्र सरकाराच्या योजनेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेला कोट्यवधींचा फंड उपलब्ध होऊ शकत होता. हि प्रक्रिया थोडी किचकट असते. संजीव नाईकसाहेब त्यावेळी खासदार होते. महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि तत्कालिन कन्सल्टंट यांनी खूप मेहनत घेतले. बराच निधी महानगर पालिकेला उपलब्ध झाला.मोठयाप्रमाणावर infrastructure ची कामे झाली. अर्थात यासाठी बराच पाठपुरावा करावा लागला. 

आठवड्यातून दादांकडे जाणे व्हायचेच. काही विशेष काम नाही. हाय हॅलो म्हणायचे , गप्पा मारायच्या आणि परत यायचे. नवीन काही टेकनॉलॉजी आली असेल तर ते त्याविषयी मला माहिती विचारायचे. किंवा तू माहिती काढून मला नंतर सांग असे म्हणायचे. 

दादांवर जहरी टीका करणारी माणसेपण दादांना भेटायला यायची. दादा त्यांना सर्वतोपरी मदत करायचे. मनात क्लेश ठेवायचे नाही. तो माझा राजकीय विरोधक आहे त्यात वैयक्तिक काय. एवढे माझ्या विरोधात बोलूनदेखील तो माझ्याकडेच येतो ना असे ते म्हणायचे. त्या त्यांना अभिमान ,गर्व नसायचा. 

सर्वांशी त्यांचे चांगलेच संबंध. देशभरात हिंदू मुस्लिम दंगे झाले पण नवी मुंबई मध्ये कधीच नाही. जातीय सलोखा त्यांनी चांगलाच राखला. सर्वांशी ते नियमित संवाद करतात ,भेटतात ,त्याचे लक्ष असते. .पोलीस आणि प्रशासनावर त्यांचा वचक आहे. सर्वधर्मीय ,सर्वपक्षीय लोक त्यांच्याकडे येतात. स्वतः ते कोणताही जातीभेद करत नाहीत. माणसाला माणूस म्हणून ते बघतात. राजकीय जीवनात असूनदेखील त्यांनी कधीच मतांसाठी जातीय समीकरणे मांडली नाहीत. त्याचा विचारच केला नाही. नवी मुंबई हे देशातील सर्वोत्कृष्ट शहर बनावे हा त्यांचा ध्यास. आपल्या वागण्या बोलण्याने ते सर्वाना आपलेसे करतात. मनात असेल ते बोलायचे. आत्ताच्या काळात असा मोकळेपणा माझ्यामते केवळ नितीन गडकरीसाहेब आणि अजितदादा पवार यांच्याकडे दिसतो 



एकदा बेलापूरला दुपारी त्यांना भेटायला गेलो तेव्हा दादा म्हटले कि चल पटकन गेट वे ऑफ इंडिया ला जाऊन येऊ. मी मनात म्हटले कि या ट्राफिक मध्ये निघणार कधी पोहोचणार कधी आणि परत बेलापूर ला कधी येणार आणि मग बेलापूरवरून खार ला कधी जाणार ? कारण मी ट्रेन ने खार ला जायचो. त्यामुळे खार बेलापूर प्रवास हा पूर्णपणे हार्बर ट्रेन वर अवलंबून असायचा आणि एखादी ट्रेन चुकली कि माझे वेळापत्रक कोलमडायचे. 

पण आम्ही बेलापूरवरून स्पीड बोट ने गेट वे ऑफ इंडिया ला निघालो. खूप मज्जा आली. मला हा एक सुखद धक्का होता आणि जबरदस्त अनुभव. वाटेत काही स्थानिक मच्छिमाराच्या बोटी लागल्या. दादा त्यांना नावाने ओळखत होते. मग दादांनी समुद्रात त्यांची चौकशी केली. ५ मिनिटे बोलले आणि मग आम्ही निघालो. मी मनात म्हटले कि आपल्याकडे कोणी सोसायटीचा चेअरमन झाला तर एवढा आकडतो आणि याना तर कशाचीच तमा नाही. असो जवळपास २ तासात आम्ही गेट वे ऑफ इंडिया ला जाऊन पुन्हा बेलापूर ला आलो. अश्या अनेक आठवणी आहेत. 

कंपनीचे काम वाढत होते, त्यामुळे माझे पण भारत भर भ्रमण चालू होते. दादा देखील मंत्री मंडळ आणि इतर कामात व्यस्त झाले. त्यामुळे भेटीगाठी कमी होत गेल्या. अनेकदा मीच मुंबई बाहेर असायचो. फोनवर बोलणे खूप कमी झाले. दरम्यान मंत्री झाल्यावर दादांनी महिन्यातून एकदा जनता दरबार भरवणे चालू केले. वाशीच्या विष्णुदास भावे सभागृहात स्टेज वर दादा सर्व खात्याच्या अधिकाऱ्याबरोबर बसायचे. मग स्थानिक लोक त्याचे लिखित निवेदन घेवाण दादांना भेटायचे आणि तिथल्यातिथे अधिकाऱ्यांशी बोलून तो प्रश्न सुटायचा. ते बघायला मी पण कधी कधी जायचो. 

दरम्यान आमच्या कंपनीत नवीन इन्व्हेस्टर आले होते. त्यांच्या बरोबर मला काही जमले नाही. इतरही न सांगता येण्यासारख्या working difficulty होत्या. मी ती नोकरी २०१३ ला सोडली. दादांना मी फोन केला नाही. माझे काहीच काम नव्हते. त्यांनी देखील कधीच फोन केला नाही. 

कालांतराने शीतलच्या जागी त्यांनी नवीन सचिव ठेवला. मला दादांना भेटायची इच्छा झाली. मी त्याला फोन केला. मला याचा रिस्पॉन्स अजिबात आवडला नाही. शिवाय माझे दादांशी संबंध होते ,नवीन माणसाला कसे कळणार. आणि माझ्या आई वडिलांनी मला लहानपणापासून सांगितले होते कि तू आमचा राजपुत्र आहेस , त्यामुळे मी माझ्या राज्यात कायमच खुश होतो. उगाचच कोणाच्या मागे लागून भेटण्याची आवश्यकता नव्हती. 

माझे मामा ऍड. जयदेवराव गायकवाड विधानपरिषदेत आमदार झाले आणि मग मी त्यांच्याबरोबर विधानभवनात येऊ लागलो. तिथे आमदार संदीप नाईक नियमित भेटायचे. सन्मानाने आणि प्रेमाने बोलतात . त्यांच्याशी संभाषण व्हायचे. संदीप नाईकसाहेबांचे सचिव अमोल कोळीसुद्धा आदरपूर्वक बोलतात. त्यांच्याकडून दादांची खुशाली कळायची. तुम्ही काय बाबा दादांची माणसे, असे संदीपसाहेब गमतीने बोलायचे. 

विधानभवनात संदीप नाईक साहेबांबरोबर 
बरे वाटायचे. माझा देखील प्रोफेशनल प्रवास सुरु होता पण त्यात नवी मुंबई नव्हते आणि मी काय out of way जाऊन दादांना भेटणार नव्हतो हे निश्चितच. पण ती संधी अलगद लाभली. 

Mumbai Education Trust च्या सानपाडा येथील शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन गणेश नाईकसाहेबांच्या हस्ते ३० सप्टेंबर २०१७ ला करण्याचे ठरले. मला त्या भूमिपूजनाला संस्थेचे विश्वस्त घेऊन गेले. खूप गर्दी होती. संदीप नाईकसाहेबपण येऊन गेले 

भूमिपूजन कार्यक्रमाला संदीप नाईकसाहेब आणि पंकज भुजबळसाहेब 

एवढ्या गर्दीत इतक्या वर्षांनी दादा मला ओळखतील याची शक्यता कमी होती. एरव्ही कितीही गर्दी असली आणि त्यांची नजर माझ्यावर पडली कि ते लगेचच मला पुढे बोलावून घेत. दादा आले, गलका झाला. त्यांनी मला लांबून बघितले आणि बोलावले. अरे किती दिवसांनी भेटलास आहेस कुठे असे म्हणाले ,हात मिळवला आणि कार्यक्रमाला सुरुवात केली. 



त्यांच्या टीम मध्ये माझ्याओळखीचे जगदीशमामा ,शीतल ,बाबू कोणीच दिसले नाही. कार्यक्रम संपल्यावर त्यांना सोडायला गाडीजवळ आलो. एवढ्या गर्दीत त्यांनी मला हात दाखवला आणि ते गाडीत बसून गेले. 

अनेक मित्र म्हणतात कि तू त्यांच्याकडून काहीतरी मागून घ्यायचे होते. एखादे घर , दुकान , चांगली नोकरी, धंदा वगैरे. पण मी काहीच मागितले नाही म्हणून आजही ताठ मानेने त्यांच्याशी बोलू शकतो. काही माणसे हि शब्दांच्या पलीकडची असतात , त्यांच्या आठवणी मनाला आनंद देतात. एवढ्या मोठ्या नेत्यांबरोबर काम केल्यामुळे आत्ता कोणाचीही भीती वाटत नाही. 

नवी मुंबई च्या जडण घडणीत श्री. गणेश नाईकसाहेबांचे अमूल्य योगदान आहे. आजच्या लोकांना ते माहीतही नसेल. पण मी मात्र ठामपणे सांगू शकतो कि जर नाईकसाहेब नसते तर हे  शहर एवढे भव्यदिव्य झाले नसते. अहो, महापालिका सांडपाणी पुनर्प्रक्रिया करून ते स्वच्छ पाणी उद्योगांना विकते आणि त्यातून पण मनपाला पैसे मिळतात आणि सांडपाण्याचे रिसायकलिंग होते. म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण आणि त्यातून महानगरपालिकेला उत्पन्न. अश्या अनेक गोष्टी त्यांनी करून ठेवल्या आहेत. 

आजकालच्या घाणेरड्या राजकारणामध्ये श्री गणेश नाईकसाहेब आपले अस्तित्व कसे टिकवतात हे बघणे फारच इंटरेस्टिंग आहे. कारण त्यांचे राजकारण हे समाजकारणावर आधारित आहे. आणि धर्म ,जात ,पंथ ,वोट बँक, समर्थक ,विरोधक यांच्या पलीकडे आहे. 

कंपनी मालक आणि कामगार या दोघांनाही दादा आवडतात. सर्वांचा विकास व्हावा ,प्रगती व्हावी हे त्यांचे नेहमीच धोरण राहिले आहे. इशा अंबानींच्या लग्नात मुकेशभाईनि मुलीला स्टेजवर दादांच्या पाय पडायला लावले ह्यात सर्व सन्मान आला. 

https://www.youtube.com/watch?v=InS1EZwkbqo

एवढ्या वर्षात खाजगीत किंवा सार्वजनिकरित्या त्यांनी कोणावरच कधी वैयक्तिक टीका केल्याचे माझ्या पाहण्यात ऐकण्यात नाही.अश्या राजकारण्यांची हि शेवटची पिढी आहे. कोणत्याही निवडणुकीचा काहीही निकाल लागो. नाईकसाहेब कोणत्याही पक्षातर्फे निवडणूक लढो, लोक त्यांच्याकडे बघूनच मतदान करतात. शेवटी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेबांच्या तालमीत तयार झालेले नेते हे जबरदस्तच असतात. माझ्या त्यांना नेहमीच शुभेच्छा राहतील. 

जय गणेश.   


विशाल फुलपगार 

१५ ऑगस्ट २०२१, मुंबई 


Wednesday, August 11, 2021

एप्रिल २००४ ची काश्मीर मधील एक थरारक अनुभव

२३ फेब्रुवारी २००३ मध्ये माझे लग्न झाले. तेव्हा हनिमून ला सिमला ला फिरायला गेलो. दरवर्षी कुठे तरी जायचे असे आमचे ठरले. सौ. तेव्हा बॉम्बे हॉस्पिटल ला MD करत होती व तिथेच हॉस्टेलमध्ये राहायची. त्यामुळे आमच्या भेटीगाठी पण फार कमी व्हायच्या. तेव्हा तिला स्टायपेंड ७-८ हजार असेल त्यात तिचा जेवणाचा व इतर खर्च भागायचा आणि माझा पगार अंदाजे २०००० रुपये होता. त्यात मोटर सायकल च्या लोन चा हप्ता जायचा. त्यामुळे आम्ही पैसे अत्यंत जपून वापरायचो. पुढच्या वर्षी फिरायला जाण्यासाठी या वर्षापासूनच दर महिने पैसे साठवायचो. आत्ता गम्मत वाटते. फिरायला जायचे म्हणजे ऑफ सिझन / सिझन सुरु होण्याच्या आधी आम्ही जायचो. या वेळेत किमती ४०% किंवा त्याहून कमी असतात. खूप पैसे वाचतात , तसेच पर्यटक जास्त नसल्यामुळे आपल्याला चांगले अटेन्शन मिळते आणि निवांत फिरता येते. 

२००४ साली काश्मीर ला जाण्यासाठी आम्ही सिमल्यावरून आल्या आल्या पैसे साठवायला सुरुवात केली.  आर्यन चा जन्म होईपर्यंत आम्ही साध्याच हॉटेलमध्ये राहायचो . काटकसर करायचो. जेमतेम budget ट्रिप असायची. दिवसाचे खर्च करण्याचे लिमिट ठरलेले असायचे. शॉपिंग फारच कमी. अर्थात ती त्या वेळेची गरज होती. आत्ता खूपच पॉश ठिकाणी राहतो पण ती मज्जा नाही. 

JKTDC (Jammu Kashmir Tourism Development Corporation) च्या मुंबई च्या एका अधिकाऱ्याच्या बायकोची डिलिव्हरी सौ. ने केली होती. त्याने सांगितले कि आप काश्मीर घुमने आओ , मै आपको सब प्लॅन करके देता हू. 

त्या प्रमाणे एप्रिल २००४ ला आम्ही दोघे मुंबई - दिल्ली - श्रीनगर अश्या इंडियन एअर लाईन्स च्या विमानाने श्रीनगर ला पोहोचलो. अगदी वेगळेच वातावरण , अत्यंत सुंदर आणि स्वच्छ प्रदेश , स्वच्छ हवा , सर्वत्र निसर्गाची उधळण , अत्यंत देखणे काश्मिरी पुरुष आणि बायका बघायला मिळाल्या. कडेकोट मिलिटरी बंदोबस्त आम्हाला विमानतळापासूनच बघायला मिळाला. तिथे सुरु असलेल्या अतिरेकी कारवायांमुळे हे शापित सौन्दर्य आहे हे ठळकपणे जाणवले. आपण मुंबई मध्ये मोकळेपणाने फिरतो , राहतो , आपण २४ तास सुरक्षित असतो याचे भाग्य काय असते हे तिथे जाऊन प्रकर्षाने जाणवले. 


JKTDC च्या एका हॉटेल मध्ये ज्याला Tourist Reception Centre (TRC) म्हणतात त्या ठिकाणी आम्हाला एक खोली बुक करून दिली होती. लाकडी हॉटेल आणि खूप थंडी असल्यामुळे त्यात हिटर ची व्यवस्था असायची त्यामुळे रूम गरम राहायचा. हा आमचा पहिलाच अनुभव , नाहीतर आपण हॉटेलमध्ये गेलो कि पहिल्यांदा AC लावतो. 



लालचौक , पहलगाम , हजरतबल दर्गा , गुलमर्ग , सोनमर्ग, चश्मेशाही गार्डन , ट्युलिप गार्डन , शंकराचार्य मंदिर वगैरे सर्व ठिकाणी आम्ही बघितली.


स्थानिक पोशाख 

गोंडोला केबल कार , गुलमर्ग 

फोटो काढताना नेहमीप्रमाणे वरचा भाग कट झाला 

बर्फामध्ये 


जवाहर टनेल (रस्त्याच्या दुतर्फा झाडे , त्यामुळे त्याचे नाव टनेल )

दल लेक मध्ये शिकारामध्ये राहिलो नाही, पण बोटीतून एक राउंड मारला , मज्जा आली. प्रचंड थंडी असायची. तिथून क्रिकेटबॅट , शाल, saffron घेतली. इतर काही मोजकीच खरेदी केली.  TRC च्या जवळ एक वैष्णव ढाबा होता , तिथे शाकाहारी जेवण गरम गरम मिळायचे आणि स्वस्त आणि उत्तम quality. शिवाय ढाब्यावरचे जेवण खाण्याचा आनंद काही औरच असतो. 

रोज फिरण्यासाठी एक अम्बॅसॅडर गाडी बुक केली होती. तोच ड्राइवर आम्हाला रोज फिरवून आणायचा. अंधार पडण्याआधी आम्ही TRC ला परत यायचो. कारण संध्याकाळ नंतर थोडी भीती वाटायची. जागोजागी पोलिस , आर्मी चे बंदूकधारी जवान दिसायचे. कडेकोट बंदोबस्त सर्वत्र होता. ते दिवस चांगले होते. मोबाईल होता पण व्हाट्सएप वगैरे प्रकार नव्हते. वायफाय नव्हताच. त्यामुळे रात्री रूम वर येऊन बातम्या बघितल्या कि काश्मीर मध्ये कुठे हल्ले झाले ते कळायचे. शिवाय  बारामुल्ला, अनंतनाग जिथे खूप दहशतवादी हल्ले होतात हे आपण ऐकतो ते भारत पाकिस्तान बॉर्डर ला आहे हे तिथे जाऊनच कळले. त्यामानाने श्रीनगर जी राज्याची राजधानी आहे ती तुलनात्मक दृष्ट्या सुरक्षित वाटायची. अर्थात तिथे देखील तुरळक हल्ले होतातच, पण आम्हाला तसा काही अनुभव आला नाही. जो थरारक अनुभव आला तो पुढे सांगतो. 

लाल चौक हा श्रीनगर मधील मुख्य भाग. १९४८ मध्ये जवाहरलाल नेहरू यांनी तिथे राष्ट्रध्वज फडकावला होता. नंतर १९९० मध्ये अतिरेक्यांनी तिथे तिरंगा फडकावण्यास मनाई केली आणि तसे केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. मग National Security Guards च्या संरक्षणात झेंडा वंदन झाले. त्यानंतर मात्र दरवर्षी झेंडा वंदन आणि अतिरेक्यांच्या झेंडावंदनाला धमक्या चालूच असायच्या . त्यामुळे या भागाला महत्व आहे. 

लाल चौक परिसरात ३ layer security पाहिली. एक म्हणजे रस्त्यावर गस्त घालणारे बंदूकधारी पोलीस/ सैनिक. त्यानंतर आजूबाजूच्या बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरी मधून रस्त्यावर बंदूक रोखणारे सैनिक / पोलीस आणि इमारतीच्या गच्चीवरून रस्त्यावर निगराणी ठेवणारे सशस्त्र सैनिक / पोलीस. एवढा कडेकोट बंदोबस्त असायचा. 

मिलिटरी चा कॉन्व्हॉय जेव्हा सैनिकांना घेऊन जायचा तेव्हा मुख्य रस्ता सर्वसामान्यसाठी पूर्णपणे बंद करायचे. त्यातून सैनिक जायचे. अत्यंत शिस्तबद्ध रीतीने त्या सैनिकी गाड्या एका मागोमाग एक जायच्या. मुख्य रस्त्यावरून आपल्याला बाजूच्या रस्त्यावर गाडी थांबवायला लागायची मग कमीतकमी २ तास तिथे थांबून राहायचे. गाडीतुन उतरायचे नाही. त्यावेळेला रोड वर पूर्ण बंदोबस्त असायचा. आम्ही आमच्या अम्बॅसॅडर मधूनच त्या वीर जवानांना सलाम करायचो. हि मुव्हमेंट कधी व्हायची ती वेळ कोणालाच माहीत नसायची .  

रस्त्यात गाडी अडवली तरी विचारल्याशिवाय बोलायचे नाही. सांगितल्याशिवाय गाडीतून उतरायचे नाही व आपले दोनीही हात पुढच्या सीट च्या वर ठेवायचे जेणेकरून लांबून येणाऱ्या जवानाला आपले हात दिसतील अश्या अवस्थेमध्ये बसायचे. हा नियम आमच्या ड्राइवर ने आम्हाला पहिल्या दिवशीच सांगितला होता आणि रोज तो सांगायचा. हे सैनिक सिव्हिलिअन लोकांना अजिबात त्रास देत नाहीत असे त्याने सांगितले. त्या ड्राइवर चे नाव मी विसरलो. 

स्थानिक लोक पर्यटकांना खूप मान देतात , कारण त्यांचा उदार निर्वाह हा पर्यटनामुळे चालतो. त्यावेळेच्या आतंकवादी परिस्थितीला कंटाळले होते. कारण पर्यटन बरेच प्रमाणात कमी झाले होते.  

तो आमचा श्रीनगरमधील शेवटचा दिवस. त्या दिवशी आम्ही पहलगाम पाहायला गेलो. दिवसभर फिरलो खूप मज्जा आली. निसर्गाचा आनंद उपभोगला. 
पहलगाम ला नदी किनारी फोटोग्राफी 

तिथून दुपारी ३ वाजताच जेवून निघालो कारण संध्याकाळच्या आत मुक्कामी श्रीनगर ला पोहोचायचे होते. रात्री भीती वाटायची म्हणजे सुरक्षित वाटायचे नाही. खूप थंडी होती. वाटेत एक नदी लागली , मग पुन्हा गाडीतून उतरलो आणि थोडा वेळ तिथे रमलो. 

ड्राइवर च्या मदतीने आमचे फोटो काढले जात होते. तेव्हा कॅमेराने फोटो काढायचे. त्यात ३६ फिल्म चा कोडॅक कंपनी चा रोल टाकायचा आणि मग तो फोटो लॅब मध्ये डेव्हलोप करायचा. त्यामुळे मोजकेच फोटो काढायचो. सेल्फी वगैरे प्रकारचं नव्हते. मोबाइलला कॅमेरा नव्हता असला तरी खूपच कमी पॉवर चा. 

आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. संध्याकाळी ६ पर्यंत श्रीनगर ला रूम वर पोहोचायचे मग फ्रेश होऊन वैष्णव ढाब्यावर जेवायला जायचे आणि संध्याकाळी ८ वाजता परत रुम वर येऊन टीव्ही  बघणे आणि मग झोपणे हा कार्यक्रम. संध्याकाळनंतर तर तुफान थंडी असायची , दिवसापण खूप थंड असायचे. अम्बॅसॅडर गाडीत लेग स्पेस चांगली होतो त्यामुळे माझे पाय आरामात मावत होते. गाडीत हिटर चालू होता पण तरीपण मी थंडी वाजते असे म्हणून बायकोला चिकटून बसलो होतो. रस्ता मोकळाच होता , त्यामुळे गाडी सुसाट चालली होती. कुठे थांबायचा प्रश्नच नव्हता. 

अचानक मागून खूप वेगाने आर्मी च्या २ जिप्सी गाड्या सायरन वाजवत आल्या. मी लगेच ड्राइवर ला म्हटले कि गाडी बाजूला घे त्यांना जाऊदे.  तो बोलला कि साहेब अभि हमारी चेकिंग होगी. इस हालत मे क्या करना है मैने आपको बताया है, वैसे करो. घबरानेकी जरुरत नाही. आर्मी वाले सिव्हिलिअन्स को तक्लीफ नही देते.  मी बोललो अरे हमने क्या किया है. त्याने गाडी बाजूला लावली . आम्ही काचा खाली केल्या व पुढल्या सीट वर हात वरती ठेवले जेणेकरून त्या जवानांना दिसतील. आत्ता मनात विचार आला कि समजा जवानांच्या वेशात हे अतिरेकी असतील तर ? तर काय करायचे ? म्हणजे काय action घ्यायची. या विचाराने घाबरलो. मी काय करणार , जे काय करायचे ते तेच करतील. 

अश्या संमिश्र विचारात आणि statue सारखे आम्ही बसून राहिलो. एका गाडीतून ३ जवान तीनही बाजूने बंदूक रोकुन आले. त्यांनी माझ्या आणि ड्राइवर च्या मानेला बंदुकीची नळी लावली आणि आम्ही आर्मी चे आहोत असे जोरात सांगितले. आणि गाडीतून उतरण्याचा आदेश दिला. बायकोला त्यांनी सांगितले की मॅडम आप गाडीमे बैठो , मगर हिलने का नाही. चेकिंग हो राहा है और हम इंडियन आर्मी से है. च्यायला बायकोला नीट सांगितले आणि आम्हाला ते ओरडले. 

मी अतिशयोक्ती करत नाही पण बंदुकीची नळी एवढी थंड असते कि भीतीने माझ्या पायातील त्राण गेले , म्हणजे शरीराला वजनच नाही असे वाटले. घशातील आवाज तोंडापर्यंत येताच नव्हता. ते कोऑर्डिनेशन कधीच गेले होते. नवीन लग्न झालेली बायको सोबत होती. इथले निर्जन ठिकाण. आजूबाजूला कोणीच ओळखीचे नाही, घरी काय कळवायचे ? 
यांनी माझा खोटा एन्काऊंटर केला तर ?
गोळी लागल्यावर खूप दुखेल का ?
मानेत गोळी न मारता पायात गोळी मारली तर चालेल असे याना सांगू का ?
मला सोडा अशी विनंती करू का ?
मी काय केले असे विचारू का ?
मेल्यावर स्वर्ग दिसेल का ? 
म्हणजे मला अल्प आयुष्य होते तर. 
हे पुढे काय करणार ?
आमच्याकडे तर याना द्यायला पैसे पण नव्हते . असे अनेक प्रश्न त्या एका मिनिटामध्ये मनात आले. आत्ता हसायला येते. 

त्यांनी त्याच अवस्थेमध्ये मला व ड्राइवर ला गाडीच्या मागे डिक्की कडे नेले. चित्रपटाप्रमाणे आमचे दोन्ही हात डोक्यावर होते आणि मानेला बंदुकीची नळी जोरात दाबलेली. तो जवान काहीतरी बोलला पण माझे लक्षच नव्हते. पण ड्राइवर पोटावर गाडीच्या डिकीवर हात वरती करून टेकला,  मग मी पण तसेच केले. ५ मिनिटांपूर्वी आम्ही  मज्जेत होतो. अचानक सर्वकाही बदलले. 

त्यांनी झडती घ्यायला सुरुवात केली. एवढ्या जोराने तो मला तपासत होता कि काही विचारू नका. त्यात ती गाडी म्हणजे बर्फासारखी थंड होती. 

बायको गाडीत निवांत बसली होती. मागे काय चालले आहे तिला अजिबात कल्पना नव्हती. मी जस्ट माझ्या समोर पोजिशान मध्ये असलेल्या जवानाकडे पहिले आणि मला देव सापडला. त्याच्या छातीवर त्याचे नाव लिहिले होते "पाटील ". मी जवळपास जोरातच ओरडलो , अहो पाटीलसाहेब मी मुंबई चा आहे. या ठिकाणी कोणी मराठीत बोलेल याची त्यांना सुद्धा कल्पना नव्हती. पाटील पण लगेचच माझ्याकडे बघून ओरडले , अरे उनको छोड दो , वो मेरा गाव वाला है. पाटीलसाहेब माझ्या जवळ आले. माझ्यापण जीवात जीव आला. थोड्यावेळापूर्वीची परिस्थिती लगेचच बदलली. आम्ही सर्वजण नॉर्मल उभे होतो. थंड झालेले रक्त आणि शरीर पुन्हा गरम व्हायला लागले.

पाटील म्हणजे २२ वर्षाचा साताऱ्याचा तरुण मुलगा . तो बोलला , अहो राव आधी  सांगायचे नाही का .मी काय या प्रश्नाला उत्तर देऊ ?  ज्याच्या मानेला बंदूक असते तो सर्व प्रकारचे ..णे विसरतो.  आमच्या गाडीचे पेपर तपासून झाले. त्यांचा मुख्य अधिकारी पण आला. २५ एक वर्षाचा NDA पास आऊट सेकंड लेफ्टनंट होता. ६ फूट उंची , मस्त बॉडी, गोरा, लाल लाल गाल आणि हँडसम. खरी परिस्थिती समजल्यावर तो आम्हाला सॉरी बोलला. मी म्हटले कि तुम्ही विचारायला तर पाहिजे ना. तो बोलला कि हि आमची तपासणी करायची पद्धत आहे. इथे चालत फिरता सामान्य दिसणारा माणूस अचानक बंदूक , हातबॉम्ब वापरतो, त्यामुळे आम्हाला कायम सतर्क राहावे लागते. त्याने आम्ही कुठे राहतो त्याचा पत्ता आणि फोन नंबर घेतला आणि  वायरलेस वर काहीतरी कळवले.  हे सर्वकाही साधारण १० मिनिटामध्ये झाले. 

याने सांगितले कि जवळच तेथील लोकसभा उमेदवार मेहबूबा मुफ्तीच्या सभेत आत्ताच ग्रेनेड हल्ला झालाय आणि अनेक जण जखमी झालेत. ते अतिरेकी पांढऱ्या अँबेसेडर गाडीने याच रस्त्यावरून गेलेत त्यामुळे तुमचा आम्ही पाठलाग केला. 

पाटीलशी बोललो . त्याची हि पहिलीच पोस्टिंग होती. हा मराठी पट्ठ्या अजिबात घाबरत नाही असे बोलला. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत , कोणाच्या बापालाही घाबरत नाही. छाती अभिमानाने फुलली , अंगावर काटा आला. त्या ऑफिसर ने आम्हाला सांगितले कि लवकर हॉटेल वर  पोहोचा  कारण पूर्ण काश्मीरमध्ये परिस्थिती तणावपूर्ण आहे. आणि आज रूम वरच जेवा , बाहेर जाऊ नका. पाटीलसाहेबाना प्रेमाने मिठी मारली. माझ्या गाडीचा दरवाजा बंद होईपर्यंत तो थांबला. आम्ही दोघांनी एकमेकांच्या डोळ्यात बघितले. माझ्या डोळ्यात कृतन्यता आणि अभिमान होता तर त्यांच्या डोळ्यात एका मराठी बांधवाला मदत केल्याचा आनंद. या सर्वाना दीर्घायुष्य लाभो अशी मी मनातली मनात प्रार्थना केली आणि निघालो. 

खरे सांगतो , छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर , महात्मा ज्योतिबा फुले , शाहू महाराज यांच्या पुण्यभूमी महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो ,आपले भाग्यच आहे. 

गाडीत बसल्यावर मागे काय काय झाले ते बायकोला सांगितले . तिचा विश्वासच बसला नाही. ती बोलली मला कोणी काहीच त्रास दिला नाही. तुला घरी खूप लाडावून ठेवले आहे. जरा काय झाले कि तू कौतुक करत बसतोस. असो... मी आपला निमूटपणे गाडीत बसलो. श्रीनगर मध्ये खूपच शांतता होती. तणाव स्पष्टपणे जाणवत होता. त्या रात्री आम्ही रूम वरच जेवलो. रात्री बातम्या लावल्यावर त्या हल्ल्यानंतरची दृश्य पहिली आणि खूप भीती वाटली. 
 
दुसऱ्या दिवशी आम्ही जम्मूला विमानाने निघालो. श्रीनगर - जम्मू - दिल्ली - मुंबई असा इंडियन एरलाईन्स प्रवास होता. जम्मू ला वैष्णोदेवीला जाऊन मग मुंबई ला जाणार होतो. श्रीनगर एअरपोर्ट ला लाकडाच्या ४-५ शवपेट्या पहिल्या. भागातील शहिद सैनिकांचे शव विमानाने त्यांच्या गावी पाठवत होते.  त्या एअरपोर्ट ला हे नित्याचेच होते. त्या पेटीवर त्यास सैनिकाचे नाव , रेजिमेंटचे नाव आणि आणखीन काही माहितीचा बोर्ड लावला असायचा. 

पूर्ण काश्मीर फिरून आल्याचा आनंद निवळला. अश्या अनेक सैनिकांच्या हौतात्म्यामुळे आपण सुरक्षित आहोत. या बदल्यात याना काहीच मिळत नाही. आपण आपले मुंबई मध्ये बसून ओरडतो कि पाकिस्तान बरोबर युद्ध करा पण देशासाठी जीव देणाऱ्याचा आणि आपला काहीच संबंध नसतो. 

चेक इन केल्यावर आम्ही बोर्डिंग गेट जवळ थांबलो. तिथे दिल्लीला जाणाऱ्या विमानाच्या गेट वर एक जवान होता. त्याला सॅल्यूट केले आणि विचारले कि घरी चाललात काय ? तो म्हणाला कि मेरे साथी को लेके जा राहा हू. मी म्हटले क्या हुवा ?  तो शांतपणे म्हटलं कि हम दोनो ३ साल से एकसाथ सेंट्री कि ड्युटी कर रहे है. कल रात को ड्युटी पर थे. मेरे बाजूमे खडे साथी को किसीने दुरसे गोली मारी और वो भाग गया.अभी उसको लेकर  उसके घरवालो को सौपने जा राहा हू. उसका सामान और कुछ यादे घरवालोंको बताऊंगा और फिर वापस यहा ड्युटी आऊंगा.  २६ वर्षाचा बिहारमधील जवान मृत्युमुखी पडला होता . इधर ऐसा हि है. कभी किसका नंबर आयेगा मालूम नाही. आप सिव्हिलिअन्स को ये नाही समझेगा. हे बोलताना त्याच्या चेहेऱ्यावर काहीच हावभाव नव्हते. मी देखील निरुत्तर स्तब्ध झालो.  आणि आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. 

 
 खरंच ......    युद्ध नको बुद्ध हवा. 

विशाल फुलपगार 
११ ऑगस्ट २०२१