Wednesday, May 27, 2020

G A Kulkarni primary & preprimary शाळेची आठवण


दोन रुपये बक्षिस 

माझे शालेय शिक्षण खार येथील , मुंबई सबअर्बन एजुकेशन सोसायटी च्या  G A Kulkarni primary & preprimary  शाळा (मॉंटेसरी ते ४थी ) व बी पी एम हायस्कूल माध्यमिक शाळेत (५वी  ते १०वी ) मराठी माध्यमातून  SSC बॊर्डातून झाले. हि एक त्यावेळेची नावाजलेली शाळा होती. एकाच कंपाऊंड मध्ये  G A Kulkarni primary & preprimary शाळा हि दोन मजली छोटी इमारत मध्यभागी मोठे मैदान व समोरच U शेप मध्ये बी पी एम हायस्कूल हि दोन मजली मोठी इमारत आहे. दोन्ही शाळेला प्रवेश करण्याचे गेट वेगळे होते. G A Kulkarni १७वा रास्ता वरून व बी पी एम हायस्कूल  १६ वा रास्ता वरून प्रवेश होता. माझ्या घरापासून ५ मिनिटे अंतरावर शाळा असल्यामुळे मी चालताच जायचो. इतर सर्वे मुलेदेखील चालतच यायची. आज आपण G A Kulkarni primary & preprimary  शाळेबद्दल बोलूया. 


शाळा सुटायच्या ५ मिनिटे आधी आम्ही शाळेच्या मुख्य दरवाजावर रांग लावायचो. या रांगेला खूप महत्व, सर्व मुले रांग लावून , पाठीमागे दप्तर अडकवून , हात मागे अशी रांग लावायचो. सर्व जण शाळेत रांग लावूनच प्रवेश करायचा आणि शाळा सुटताना देखील रांग लावून प्रत्येक वर्गातील मुले बाहेर येत असत. दुपारी साधारण १२. ३० ते ५. ३० पर्यंत शाळा असायची. खूप मज्जा यायची. परुळेकरबाई , करमरकर बाई , चाचड बाई , कारखानीसबाई , निरगुडकरबाई , वाडियाबाई अश्या अनेक प्रेमळ व उत्कृष्ट शिक्षक आम्हाला होते. त्यात शिक्षिकांचे प्रमाण जास्त होते. जेव्हा शिक्षण शाळेमध्ये मिळायचे ,शिकवणी मध्ये नाही असा तो काळ होता. तेव्हाचे वर्ग खूप मोठे वाटायचे. एका वर्गाला दोन तुकड्या होत्या व प्रत्येक तुकडीत जवळपास ४०-४५ विद्यार्थी. मी १९८२ ला ४थी पास झालो 

समोरची बी पी एम शाळा बघून छाती दडपायची ,कारण ती उंच व मोठी शाळा होती व मुले पण खूप मोठी वाटायची. त्यांचा युनिफॉर्म पण वेगळा होता. अर्थात तेव्हा बी पी एम मध्ये जाण्याचा कधीच संबंध आला नाही. G A Kulkarni  मध्ये आमचे जीवन खुपच सुरक्षित होते. सर्व स्टाफ नावानिशी ओळखत असे. वास्तू ओळखीची होती. ५वीला मात्र आम्ही त्याच कंपाउंड मधील बी पी एम  जाणार होतो. 

मला अजून आठवते कि मी ४थी ब मध्ये होतो.  दरवर्षीप्रमाणे हे वर्षही खूप आनंदात गेले. अभ्यासात हुशार असल्यामुळे परीक्षा व निकालाचे कधीच टेन्शन नव्हते. आयुष्य फार स्टिरीओ टाईप होते. रांगेत शाळेत जाणे , वर्गात जाऊन बसने , सुरुवातीला  सरस्वती वंदना "या कुंदेन्दू तुषार हार धवला " ,मग हजेरी , मग वर्ग सुरु होत असे, बसण्याची जागा फिक्स होती, व शक्यतो उंचीप्रमाणे बसण्याची जागा ठरत असे. मी उंच असल्यामुळे शेवटच्या बाकावर बसण्याचा मान मला नेहमीच मिळत असे. सुटताना "वंदे मातरम" होत. प्रत्येक वर्गात एक स्पीकर होता. यातून सर्व ऐकायला येत असे. रविवारी सुट्टी , तसेच सणाच्या फिक्स सुट्ट्या असत. दिवाळीच्या सुट्टीचा अभ्यास मिळत असे व तो बहुधा सुट्टी संपायच्या दोन तीन दिवस आधी सुरु करून पूर्ण केला जाई .  

शिक्षक सर्वांच्या पालकांना नावानिशी ओळखायचे व शिक्षक ओरडले तर पालकच मुलांना धोपटून काढायचे. एखाद्या विद्यार्थ्याची तक्रार झाली आणि जर त्याच्या पालकाना शाळेत बोलावले तर ती एक खूप मोठी घटना असायची आणि पालकांसाठी शरमेची बाब. शाळेच्या मुख्याध्यापकांचा राऊंड होणे म्हणजे शाळेत खूप शांतता असायची आणि आम्ही घाबरायचो. 

वर्ष सुरु होताना नवीन पुस्तके घेणे , त्याला कव्हर लावणे, नावाची लेबल लावणे , नवीन वह्या ,पुस्तकांचा वास , काही जोडलेली पाने वेगळी करणे , हा कार्यक्रम असायचा आणि मला तो खूप आवडायचा. आणि मला तो अजुनपण मला स्पष्टपणे आठवतो. 

४थी ब मध्ये मला करमरकर बाई वर्गशिक्षिका होत्या, त्यांचा मी लाडका विद्यार्थी होतो. चौथी पास होऊन मी माध्यमिक शाळेत जाणार हे निश्चितच होते. खरे म्हणजे मला हि शाळा सोडायची नव्हती. कारण इथे मी चांगला रुळलो होतो. , शिवाय सर्वजण ओळखीचे होते , बी पी एम हि एक मोठी शाळा होती. व त्यात मोठी मुले होती. 
करमरकर बाई सोबत २री किंवा ३री मध्ये असतानाच फोटो १९८० किंवा १९८१
४-ब आमचा वर्ग करमरकर बाई सोबत १९८२ अमूल्य आठवण 

स्नेहसंमेलनामध्ये मी नाटकात एक भूमिका केली होती 

करमरकर बाई

२०१० मध्ये करमरकर बाईंचा सत्कार करण्याचा मान मला मिळाला 

उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही नाशिकला मावशीकडे राहायला जायचो. चौथी चा निकाल लागला त्यादिवशी सकाळी नाशिकला मावशींकडून निघालो व नेमकी ट्रेन लेट असल्यामुळे एक तास उशिरा शाळेत पोहोचलो. तो पर्यंत सर्व वर्गमित्र निकाल घेऊन गेले होते. व शाळेत शिक्षकांचे प्रशासकीय काम चालू होते. मी लगबगीने करमरकर बाईना भेटायला गेलो. त्यांनी विचारले कि उशिरा का आलास. मग त्यांनी मला प्रगतीपुस्तक दिले. मी त्यांच्या पाया पडलो. चांगले मार्क मिळालेत असे त्या म्हणाल्या. आत्ता तू बी पी एम मध्ये जाणार ,तिथे जास्त अभ्यास करावा लागेल असे त्या म्हणाल्या. कधीतरी भेटायला तुम्ही मुले मुली येत जा असे त्या म्हणाल्या. खरे म्हणजे बी पी एम शाळा समोरच होती पण आम्ही कधी बाईंना भेटायला पुन्हा G A Kulkarni  मध्ये गेलो नाही. 

अजून मी प्रगती पुस्तक बघितले नव्हते . माझा क्रमांक पहिला नव्हता हे मला माहित होते , पण मी टॉप मुलांमध्ये असणार हे निश्चित. मी निघालो, वडील पण सोबत आले होते. अचानक बाईनी मला थांबवले व स्वतःच्या पर्स मधून काढून मला २ रुपयाची नोट बक्षिस दिली व मला नजरेनेच निरोप दिला. मला अजूनपर्यंत तरी एवढी मोठी नोट मिळाली नाही. त्यावेळेला पहिला क्रमांक आला असता त्यापेक्षा हा आनंद मोठा होता. मी लगेच ती नोट आणि प्रगती पुस्तक वडिलांकडे दिले व आनंदात घरी आलो. मोठ्या शाळेत जायची स्वप्ने व दडपण मनात होतेच. 

१९८२ साली २ रुपये म्हणजे मोठी रक्कम होती. १५ पैसे ला चटणी पाव आणि २५ पैसे ला वडा पाव मिळायचा व तो मी क्वचितच खाल्ला असेल. वडापाव खाताना , चटणी पाव खाताना  खूप श्रीमंत असल्याचे फिलिंग यायचे. बंधे पैसे देऊन सुट्टे पैसे हिशोबाने घेणे तिथे शिकायला मिळायचे. आज पंचतारांकित हॉटेलमध्ये राहून / जेवून , परदेशात फिरून देखील हा आनंद मिळत नाही. खरेच आयुष्यातले आनंदाचे क्षण नेहमीच छोटया  छोटया प्रसंगात असतात हे मात्र खरे. 

आत्ता विचार करतो कि काय हे मॉंटेसरी , प्राथमिक शिक्षकांचे आयुष्य आहे ? खरे म्हणजे हेच शिक्षक आपल्याला घडवतात. शाळेत बसण्याची ,अभ्यास करायची , ग्रुप ऍक्टिव्हिटी करायची , शिस्त लावायची अशी महत्वपूर्ण कामे ते करतात. शिक्षणाची पायवाट ते तयार करतात आणि त्या पायवाटेवर आपल्याला सक्षमपणे चालायला शिकवतात.  या वाटेवरूनच आपल्या शिक्षणाचा , वागणुकीचा , संस्काराचा पाय घडतो. व त्यावरच आपल्या आयुष्याची पुढील जडणघडण होते. प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे कार्य आपण नेहमीच विसरतो.  त्या शिक्षकांना देखील खूप भाग्य लाभते. निर्मल, निरागस , निष्पाप "मुले देवघराची फुले " अश्या लहान मुलाबरोबर वावरण्याची , त्यांना घडवण्याची संधी त्या शिक्षकांना मिळते. अर्थात हीच मुले मोठी झाली कि जरा डांब्रट बनतात हा भाग वेगळा 

आज उदाहरण म्हटले तर करमरकर बाईनी व त्यांच्या सारख्या शिक्षकांनी कितीतरी मुले घडवली , शिकविली असतील याची त्यांना देखील मोजदाद नाही. कदाचित बरेचसे विद्यार्थी त्यांना विसरले देखील असतील. अनेक उच्चशिक्षित असतील, परदेशात असतील किंवा कुठेही असतील. पण आपल्या प्राथमिक शाळेतील शिक्षिका अजून तिथे असतील. ते अशीच मुले शिकवण्याचे कार्य अखंड करत असतील , त्यांना त्याचे क्रेडिट मिळावे अशी अपेक्षासुद्धा नसेल आणि नसतेच. हीच मुले पुढे डॉक्टर , इंजिनीयर , उच्च अधिकारी असतील. काही जण खूप शिकले नसतील , कदाचित अजून गरिबीतच असतील , पण एक उत्तम पती/ पत्नी , आई / बाबा , एक उत्तम नागरिक नक्कीच असतील. 

शेवटी काय, यशाचे मोल आपण पैशात करतो ,इथेच सगळी गफलत होते आणि भेदभाव सुरु होतो. आज आमचे शिक्षक कुठेतरी पेन्शन वर जगत असतील. , कदाचित त्यांना कोणी भेटायला जात नसेलही. किव्हा त्यांनी ऐकलेलं तो मुलांचा स्वर्गीय किलबिलाट ते कोणापुढे व्यक्त करू शकत नसतील. पण निश्चितच भारताची एक चांगली पिढी त्यांनी घडवली याचाच निश्चितच अभिमान त्यांना असेल. अजूनही आम्ही त्यांना भेटलो तर ते प्रेमाने , ताठ मानेने आणि अभिमानाने आम्हाला भेटतात व आमची नजर आपोआप त्यांच्या प्रेमाच्या ओझ्याने / आठवणीने त्यांच्या समोर नेहमीच झुकलेली असते. 

आज कालानुरूप शाळेत खूप बदल झालेत . मराठी माध्यमाची शाळा तर बंद झाली आहे. आत्ता फक्त इंग्रजी माध्यम शाळा चालतात. पण नक्कीच त्या भिंती , ते वर्ग , ते क्रीडांगण जिथे आम्ही बागडलो ,त्या निर्जीव वास्तूलापण आमची आठवण येत असणारच व त्यांची नजर आम्हाला शोधत असणारच यात काही वादच नाही.

अनेकदा मी करमरकर बाईना ला २रुपयाचा प्रसंग आठवतो का विचारले , त्यांना काहीच आठवले नाही. 

आज माझ्या मुलाला त्याच्या एकातरी शिक्षकाने किमान १०/२० रुपयाची नोट त्याच्या निकालानंतर द्यावी कि मी समजेन कि माझा मुलगा आत्ता खूप श्रीमंत झाला आहे.  आजच्या पॅरेण्ट टीचर मीटिंग , ओपन हाऊस मीटिंग यात शिक्षण कुठेतरी हरवले आहे.  हा प्रसंग खूप जुना असला तरीदेखील माझ्या चांगलाच लक्षात आहे आणि दरवेळेला तो क्षण आठवला कि मला त्यामागील नवीन अर्थ , भावना समजतात. 

अर्थात मला शिकवलेल्या सर्व शिक्षकांचा मी कायम ऋणी राहीन व हे ऋण मला निश्चितच प्रेरणादायक व अभिमानास्पद असेल. याचे जास्तीत जास्त व्याज वाढो हि मी प्रार्थना करतो. आज  G A Kulkarni primary & preprimary  शाळा (मॉंटेसरी ते ४थी ) व बी पी एम हायस्कूल माध्यमिक शाळा (५वी  ते १०वी ) या शाळेचे व या संस्थेचे मी खूप आभार व्यक्त करतो. बी पी एम हायस्कूल शिक्षकांबद्दल देखील याच भावना  आहेत ते नंतर कधीतरी व्यक्त करू.





अर्थात सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी , मॉंटेसोरी चे शिक्षक याना एकत्र बोलावून "आनंद सोहोळा " हा खूप मोठा स्नेह संमेलन व सत्कार सोहोळा आम्ही २०१० साली आयोजित केला होता त्याबद्दलही कधीतरी लिहीन. मी ठामपणे सांगतो कि "आनंद सोहोळा " यासारखा कार्यक्रम कधीच कोणीही केला नसेल. 

असो, २ रुपयाची नोट मी वडिलांकडे दिली व काही काळ ती सांभाळून देखील ठेवली. नंतर मात्र ती सापडली नाही. परंतु तिचा विचार/ आठवण /  त्यामागची भावना अजून माझ्या मनात स्वच्छ कोरल्या गेल्या आहेत. 

करमरकर बाई आज अंधेरी पूर्वेला राहतात. त्या २००० मध्ये मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या.त्यांना कदाचित आठवत नसेलही कि अशी कितीतरी विद्यार्थी त्यानी व त्या शाळेने घडवले असतील. अनेकांना त्यांनी काहीतरी प्रोत्साहनपर दिले असेल पण मी ते प्रातिनिधिक स्वरूपात लिहून काढले. आयुष्यात काही जण पॉसिटीव्ह बदल घडवून आणतात ,त्यापैकी हि एक घटना. 


विशाल फुलपगार - 98215 32033
२७ मे २०२० 

Sunday, May 24, 2020

मी पहिल्यांदा गाणगापूर ला गेलो



साधारणपणे १९९६ साली दत्त जयंतीला मी, पंकज, सुभाष, संजय पहिल्यांदा पाठक गुरुजींकडे माहिमच्या घरी गेलो. खरे म्हणजे कोणत्या वर्षी गेलो हे आठवतच नाही. १९९६ च्या आधी असेल, पण दत्तजयंती होती हे मात्र नक्की. त्यानंतर गुरुजींकडून गाणगापूरबद्दल खूपच माहिती/ उल्लेख, त्याचे महत्व ऐकावयास मिळायचे. गुरुजींनी गाणगापूरमध्ये आश्रमासाठी जागा घेतली आहे व तिथे आश्रम बांधणार आहेत वगैरे वगैरे.  याशिवाय गाणगापूर हे एक जागृत दत्तस्थान आहे , कोणाला भूत लागले तर गाणगापूरला नेतात, तेथील मंदिरात आरती चालू झाली की  अंगातील भूत नाचायला लागते, अश्या अनेक कथा मी ऐकल्या होत्या. त्यामुळे गाणगापूर हे माझ्यासाठी तरी एक गूढ स्थान होते. 

गाणगापूरला पहाटे २. ३०/ २.४० ला मंदिरात आरती होते व त्यावेळेला गुरुजी कुठेही असले तरी उठून बसतात हे आम्हाला माहित होतेच. गुरुजी गाणगापूरचे इतके कौतुक करायचे कि गाणगापूर हे एक रम्य स्थळ असावे असा माझातरी समज होता. आम्ही गुरुजींना सांगितले कि पुढच्या वेळेला आम्ही तुमच्याबरोबर येऊ. त्याप्रमाणे साधारणपणे एप्रिल महिन्यात गुरुजी गाणगापूरला जाणार होते व महिनाभर राहणार होते. त्यामुळे त्यांच्या बरोबर जायचे, एक रात्र राहायचे, सकाळी काकड आरती करून मग अक्कलकोटला जाऊन सोलापूरहुन सिद्धेश्वर ट्रेन पकडून मुंबईला यायचे असा कार्यक्रम आम्ही आखला आणि त्याप्रमाणे तिकीटे काढली.   

गुरुजींना सांगितले की मी, संजय, सुभाष, पंकज व तुम्ही असे ५ जण आहोत. आम्हाला दोन आणि तुम्हाला एक असे ३ रूम हॉटेलमध्ये बुक करा. गुरुजी म्हणाले तिथे हॉटेल वगैरे काही नाही, मी नेहमी गुळवणी महाराज आश्रमात/ धर्मशाळेत राहतो तिथे आपण एक मोठी खोली घेऊ, काहीच प्रॉब्लेम नाही. म्हटले ठीक आहे. त्यांना सांगितले की गाणगापूर स्टेशनवरून धर्मशाळेत जाण्यासाठी एक गाडी तरी बुक करा म्हणजे आपण आरामात जाऊ. अरे तिथे स्टेशनवर खूप रिक्षा असतात व त्या ट्रेनच्या वेळेप्रमाणे असतात आपण शेअर ने जाऊ. आपल्याला मोठा आश्रम बांधायचा आहे, पैसे जपून वापरायला शिका. गाणगापूर स्टेशनवरून साधारण तासाभरात आपण गुळवणी महाराज आश्रमात पोहोचू. मी फोन करून खोली बुक करतो. 

ठरल्या वेळेला आम्ही सगळे जण गुरुजींकडे माहीमला जमलो. घरूनच जेवून आलो होतो. स्व. माईने आम्हा सर्वाना सांगितले कि सुखाने या. रात्री गुरुजींच्या बाजूला झोपू नका, नंतर मला सांगू नका कि मी सांगितले नाही. याची गंमत तुम्हाला मी नंतर सांगतो. 

माहिमवरून पंकजभाऊच्या गाडीने दादर स्टेशनला आम्ही आलो. साधारणपणे रात्री ११/ ११.३० च्या दरम्यान ती मद्रास मेल का चेन्नई मेल सुटली. दुसऱ्या दिवशी सकाळी साधारणपणे १०.३० ला गाणगापूर स्टेशन येईल असे गुरुजींनी सांगितले होते. या ट्रेन नेहमीच उशिराने धावतात असे पण सांगितले. रात्री ट्रेन मध्ये गप्पा मारल्या, नामस्मरण केले आणि झोपी गेलो. सकाळी साधारण ५ वाजता उठलो. तसेपण स्लीपर कोच असल्यामुळे प्रत्येक स्थानकावर जाग यायचीच.गुरुजी जागेच होते. मग पुन्हा गप्पा सोबत आणलेला सुका नाश्ता  खात खात प्रवास चालू होता. मधेच कुठेतरी चहा घेतला. ट्रेनमध्ये चहा एवढा बेचव का विकतात आणि आपण तो का विकत घेतो या प्रश्नाचे उत्तर मला अजूनही सापडले नाही.    

ट्रेनचा प्रवास मला खूप आवडतो. अनेकांशी गप्पा मारता येतात, ओळखी होतात. प्रत्येक स्टेशन ला चढणारी, उतरणारी माणसे, त्यांना निरोप दयायला किंवा घ्यायला आलेली माणसे, प्रत्येक स्टेशनवर फेरीवाले, खाऊवाले, पाण्याच्या बाटल्या, कोल्ड ड्रिंक विकणारी आणि कर्कश आवाजात ओरडणारे विक्रेते. जाणारे स्टेशन आणि आपले स्टेशन यामधील अंतराचे आपण मनातल्या मनात हिशोब करणे.  आजूबाजूला धावणारी व  मागे जाणारी झाडे, निसर्ग, शेतात काम करणारी माणसे, नदी, त्यावरील ब्रिज, लहान मुले ट्रेनला टाटा करतात. काही माणसे उगीचच जाणाऱ्या ट्रेन कडे बघत बसतात,असे असंख्य अनुभव देणारा हा प्रवास असतो. 

सकाळी सकाळी पाठक गुरुजींनी नामस्मरण घेतले. नंतर गप्पा चालू . एकंदरीत गुरुजींबरोबर गप्पा मारणे हा एक विलक्षण अनुभव. त्यांच्याशी बोलतच राहावे असे वाटत असे. वेळ कुठे जायचा ते कळायचेच नाही. त्यात सुभाष आणि संजय म्हणजे नॉन स्टॉप विनोद चालू असायचे, त्यात प्रत्येक विनोदाला हसण्याची जबाबदारी घेतलेले पंकजभाऊ व आमच्या वयाशी ऍडजस्ट होऊन गप्पा मारणारे आणि दिलखुलास हसणारे पाठक गुरुजी असा आमचा प्रवास छान चालला होता. गुरुजींच्या बोलण्या वागण्यातून त्यांची दत्त महाराजांविषयी अपार श्रद्धा क्षणोक्षणी जाणवत असे. तसेच ते दत्तचरणी किती लीन झाले आहेत ते कळत असे. स्वतःच्या उपासनेबद्दल ते कधीच काही सांगत नसत. वाल्याचा वाल्मिकी बनलेला त्यांचा पट्टशिष्य स्व. बागुलकाका आणि त्यांचा ऑफिसमधील पट्टेवाला आणि श्रेष्ठ भक्त मनोहरमामा याविषयी ते नेहमीच बोलत.
मनोहरमामा                पाठकगुरुजी               बागुलकाका 

जसे जसे गाणगापूर जवळ येऊ लागले तसे तसे गुरुजी खिडकीत बघत बोलले कि एक मोबाईल टॉवर आपल्याला गाडीच्या डाव्या बाजूला दिसेल, तो गेला कि ५ मिनिटामध्ये गाणगापूर स्टेशन येईल. गाडी दोनच मिनिटे थांबते त्यामुळे लवकर उतरून घ्या. त्याप्रमाणे आम्ही तयार होतोच. मोबाइल टॉवर गेला आणि गुरुजी म्हणाले चला आता स्टेशन येईल. आपण महाराजांना प्रार्थना करू कि ट्रेन प्लॅटफॉर्म वर लागू दे. आम्ही गोंधळलो, गुरुजींना विचारले  कि ट्रेन प्लॅटफॉर्मवरच येणार ना? ते म्हणाले कि हे एक खेडेगावातील एक छोटे स्टेशन आहे, कधी कधी दुसरी गाडी आधी आली तर ती प्लॅटफॉर्म वर लावतात. आम्ही म्हणालो मग काय करायचे ? काही नाही. आपण रेल्वे ट्रक वर उड्या टाकायच्या आणि समोरच्या प्लॅटफॉर्मवर चढायचे आणि मग चालत रिक्षा स्टॅण्डवर जायचे. अरे म्हटले हे काय? निदान त्या दिवशीतरी ट्रेन प्लॅटफॉर्म वरच आली व आम्ही रेल्वे ट्रक वर उतरायचा अनुभव तेव्हा घेऊ शकलो नाही.  (अर्थात नंतर कधीतरी २-३ वेळा मी हा आनंद उपभोगला हि गोष्ट वेगळी.)

पहिल्यांदा देवल गाणगापूर स्टेशनला सकाळी ११. ३० ला उतरलो . अत्यंत छोटे खेडेगाव टाइप स्टेशन, रखरखीत उन्हाने आमचे स्वागत केले.





आम्ही आपले चालत चालत रिक्षा स्टॅन्ड ला पोहोचलो. ५ का १० रुपये प्रति सीट याप्रमाणे ते रिक्षा मध्ये दुप्पट तिप्पट लोक कोंबत होते. बराच आरडाओरडा चालू होता. बाजूला एक ST बस लागली होती पण आम्ही पोहोचायच्या आधीच ती तुडुंब भरलेली होती , त्यामुळे ते धाडस आम्ही केले नाही. संजय पाटील ने जास्त पैसे देऊन रिक्षा च्या मागच्या ४ सीट घेतल्या व त्यात आम्ही ५ जण comparatively  ऐसपैस बसलो. मधल्या सीटवर खूप माणसे होती. ड्रायव्हरच्या बाजूला पण खूप लोक होती. वाटेत गर्दीमुळे रिक्षा पालटू नये म्हणून सतत देवाचा धावा चालू होता.

मी खरे सांगतो , गाणगापूर स्टेशन ते गाणगापूर मंदिर रस्त्यावर वर इतके खड्डे होते कि विचारू नका. त्यामुळे अंगाची सगळी हाडे खिळखिळी झाली. महाराजांचे नाव घेत/ ठेवत आम्ही जेव्हा चौडापूर पार केले तेव्हा रस्ता जरा बरा झाला.

चौडापूर कमान 
                                             
तोपर्यंत शरीरातील सर्व हाडांनी आपले अस्तित्व दाखवले होते, पाठ मोडकळीस आली होती. शेवटचे पाच मिनिटे प्रवास चांगला झाला. सांकेतिक भाषेत सांगायचे म्हटले तर महाराजांची सुरुवातीची सेवा कठीण आहे. परंतु नंतर मात्र त्रास होत नाही असे मला उगाचच वाटले. गुरुजींच्या चेहेऱ्यावर आनंद आणि आमच्या चेहेऱ्यावर खूप घाम आणि प्रवासाचा त्रास स्पष्टपणे दिसत होता.

ठरल्याप्रमाणे आम्ही गुळवणी महाराज आश्रम/ धर्मशाळेच्या बाहेर उतरलो. (आपल्या आश्रमाजवळ आहे.) येथे गुरुजींचे नियमित येणे जाणे असल्यामुळे त्यांनी लगेचच चावी दिली. खाली आणि वरती रूम होत्या व तळघरात ध्यानघर होते.  आमची खोली पहिल्या मजल्यावर होती व पूर्णपणे स्वच्छ आणि रिकामी होती. आम्हा ५ जणांसाठी चटई , गादी व अंघोळीला बादल्या दिल्या होत्या. फॅन होता, पण बटन चालू केल्यावर देखील चालू झाला नाही. गुरुजी म्हणाले लाइट गेली आहे, कधी येईल माहित नाही. तो पर्यंत तुम्ही अंघोळ करून घ्या, मग आम्ही धर्मशाळेतल्या सामुदायिक बाथरूममध्ये खांदयावर टॉवेल आणि एका हातात बादली अशी लाइन लावून अंघोळी उरकल्या. त्यावेळी कोणाकडे कॅमेरा नव्हता नाहीतर हा खूपच संस्मरणीय फोटो झाला असता. सामुदायिक असूनदेखील बाथरूम स्वच्छ होते. माझा धर्मशाळेत राहण्याचा हा पहिलाच अनुभव असल्यामुळे मला असे वाटले असेल ,पण इथे चांगली स्वच्छता होती. आणि इतक्या स्वस्तात ते भाविकांची राहण्याची सोय करतात हे कौतुकास्पद.

गुळवणी महाराज धर्मशाळेबाहेर चहा पिताना एका निवांत क्षणी पाठक गुरुजी 

असो, अंघोळ करून आम्ही एका ब्राह्मणाकडे जेवायला गेलो, जेवण स्थानिक पद्धतीचे तिखट होते. मला काही आवडले नाही,पण काही पर्याय नव्हता आणि फायदापण नव्हता,कारण रात्री परत इथेच जेवायचे होते. गुरुजींना सांगायची हिम्मत नव्हती. नंतर आम्ही पुन्हा खोलीत आलो, भयानक उकाडा होता, त्यात लाइट नव्हती. संध्याकाळी निर्गुण पादुका मठात गेलो. मठात जाताना गुरुजींनी आपला प्लॉट दाखवला. त्यात विशेष काही आवडण्यासारखे नव्हते. प्लॉट मंदिराजवळ होता आणि रस्त्यालगत होता. मंदिरात दर्शन झाले, विशेष गर्दी नव्हती. इतर सर्व धर्मस्थळांप्रमाणे इथे देखील अस्वच्छता होती. गुरुजींना पुजारी ओळखत होते. व "जय गुरुदेव" म्हटले कि मंदिरातील पुजारी मागे लागत नाहीत, त्यांना कळते कि हि पाठक गुरुजींची माणसे आहेत. गुरुजींनी आम्हाला मंदिराला २१ प्रदक्षिणा करायला सांगितल्या, त्या आम्ही केल्या.



तिथून आम्ही रिक्षाने संगमावर गेलो. हा रस्ता देखील खूप खराब होता. तिथे गर्दी नव्हती. संगमावर अनेक जणांसाठी श्री गुरुचरित्र पारायणाची सोय होती. आम्ही तिथे दर्शन घेतले व तिथल्या औदुंबराला प्रदक्षिणा घातल्या. तिथले सर्व पुजारी गुरुजींना ओळखत होते. मला विचारल्याशिवाय कोणालाही दक्षिण दयायची नाही असे गुरुजींनी आधीच सांगितले होते. गाणगापूर हे कर्नाटकात असले तरी येथे सर्वजण उत्तम मराठी बोलतात त्यामुळे भाषेची काहीच अडचण नाही.


संगम 

तिथून आम्ही भस्माच्या डोंगरावर गेलो. डोंगर नव्हताच लोकांनी पोती पोती भरून तिथले भस्म नेले होते. तरीदेखील आम्ही तिथे गेलो. हजारो वर्षांपूर्वी या जागी खूप हवन, याग झाले होते असे म्हणतात व त्यावेळेपासूनचे भस्म इथे आहे.





तिथून आम्ही कल्लेश्वर मंदिरात गेलो व दर्शन घेतले. निर्गुण पादुका मठ, संगम आणि कल्लेश्वर येथील दर्शन झाले कि आपली गाणगापूर यात्रा पूर्ण होते असे म्हणतात.



तिथून आम्ही पुन्हा धर्मशाळेत आलो. त्यादरम्यान संजयने उदया आम्हाला सोलापूरला सोडायला एक कार ठरवली. म्हणजे उदयाचा प्रवास तरी नीट होईल.

रात्री पुन्हा शेज आरतीसाठी मठात गेलो. खूप गर्दी होती. महाराजांची पालखी निघाली व आमच्या अंगावरून ब्राम्हणांनी व्यवस्थित नेली. आम्ही मंदिराच्या आवारात त्यावेळेला झोपलो. खरे म्हणजे एवढ्या गर्दीत कोणीतरी आमच्या अंगावर पाय टाकेल असे वाटले होते त्यामुळे डोळे गच्च बंद केले होते, पण तसे काही झाले नाही. गुरुजी खूप आनंदले ते म्हणाले कि आता महाराजांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील


गाणगापूर निर्गुण पादुका मठात रात्री शेज  आरती 
रात्री पुन्हा आम्ही त्याच ब्राह्मणाकडे जेवायला गेलो. जेवण  प्रेमाने वाढले पण दुपारप्रमाणेच तिखट होते. नंतर गुळवणी महाराज आश्रमात आलो. आता लाईट आली होती, त्यामुळे फॅन चालू झाला आणि तो फॅन देखील आवाज करत करत आमच्या गप्पामध्ये सामील झाला. गुरुजींबरोबर बोलणे म्हणजे एक खूप आनंद होता. ते बऱ्याच गोष्टी सांगायचे, खूप जुन्या आठवणी सांगायचे, नोकरी करतानाचे अनुभव सांगायचे आणि कायम मित्राप्रमाणेच वागायचे. त्यामुळे कधीच कंटाळा यायचा नाही. गप्पा मारता मारता रात्रीचे १२ वाजून गेले.  गुरुजीच बोलले कि तुम्ही थोडा वेळ झोपा, आपल्याला पहाटे इथून २:२० ला निघायचे व २:३० ला मठात काकड आरतीला पोहोचायचे आहे  या आरतीला भूत नाचतात, ते तुम्हाला बघायला मिळेल तसेच या आरतीचे विशेष महत्व आहे.

त्याप्रमाणे आम्ही पाठ टेकली. माईंनी सांगितले होते की गुरुजी जवळ झोपू नका पण मी झोपलो. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर गुरुजींना भेटायला महाराज येतात आणि ते मला पण बघतील आणि आशीर्वाद देतील (चित्रपटाप्रमाणे) असे मला वाटले. प्रत्यक्षात असे काहीच झाले नाही. नुकतीच मला झोप लागली आणि अर्ध्या तासातच माझ्या पाठीवर लाथ पडली व मी बोंबलत उठलो. गुरुजी बाजूला शांत झोपले होते. माईंनी किती महत्वाचा आणि सावधानतेचा इशारा मला दिला होता ते मला तेव्हा कळाले.

पहाटे २: १५ ला गुरुजींनी आम्हाला उठवले व २:२० ला आम्ही तिथून अर्धवट झोपेतच चालत निघालो. तेव्हा एवढी स्ट्रीट लाइट नव्हती, म्हणजे गडद अंधार होता आणि त्यात गुरुजींकडे एक पेन्सिल टॉर्च, तिचा प्रकाश जमिनीपर्यंत पोहोचायचं कि नाही हे फक्त गुरुजींनाच माहित. अर्थात गुरुजींना रस्ता तोंडपाठ असल्यामुळे ते झपझप जलदगतीने चालत होते आणि आम्ही त्यांच्या मागे चालत होतो. मंदिराजवळ मात्र झगमगाट होता. मंदिरात गर्दी होती.

कोणी पुजारी वेळेत संगमावरून कवाडीतून पाणी घेऊन आला आणि मग महाराजांची आरती चालू झाली. काही जणांच्या अंगात आले. ते दत्त्यो दत्त्यो असे ओरडत होते. महिलांच्या अंगात जास्त येत होते. काहीजण बेभानपणे नाचत होते, काही बायका तर मंदिराच्या आवारातील खांबावर झपझप माकडासारख्या चढल्या व त्यावर उभ्या राहिल्या. हे बघितल्यावर डोळयात झोपेच्या ऐवजी भीती आली. डोळे आमचे सताड उघडे. भीती वाटत होती. आरती झाल्यावर आम्ही निघालो त्या अंधारात चालता चालता गुरुजींना म्हटले कि भीती वाटतेय, ते म्हणाले कि नामस्मरण करा काहीच होणार नाही. एरवी मी तर एकटाच इथे येतो.  इथे सर्वत्र महाराजांचा वावर आहे.

गाणगापूर निर्गुण पादुका मठात काकड आरती 

भूत आहे कि नाही हा वादाचा विषय असला तरी भुताची भीती मात्र नक्कीच आहे आणि रात्री अश्या वेळी ती खूप जाणवते. एक विचार माझ्या मनात आला, खरे म्हणजे आत्ता आपल्याला हसू येईल पण त्यावेळी जे वाटले ते सांगणे महत्वाचे आहे, त्यात काय लाजायचे.

मी म्हटले नामस्मरण, महाराज, सर्व काही ठीक आहे. पण भूत आले आणि आपण म्हटले की महाराज मला वाचवा आणि महाराजांना यायला थोडा उशीर झाला , ते बिझी असतील किंव्हा इतर कोणत्याही कारणाने, तर तो पर्यंत भूत आपला गेम करेल. च्यायला हा विचार एकदम भयानक होता आणि देवाची कोणाला तक्रार करायची की तो उशिरा आला. शिवाय घरी आईने विचारले कि एवढ्या रात्री तू बाहेर काय करत होतास? म्हणजे घरी पण ओरडा पडणार. असो कसेबसे आम्ही मठापासून ते खोलीपर्यंतचा १० मिनिटांचा दीर्घ प्रवास चालत करून खोलीवर आलो आणि दाराला आतून घट्ट कडी लावून घेतली, मग थोडे हायसे वाटले. सकाळी उठण्याबद्दल गुरुजी काही बोलले नव्हते . त्या रात्री निदान मी तरी जागाच होतो. मी मनोमन ठरवले कि गाणगापूरला पुन्हा येणे मला काही जमणार नाही. त्यामुळे हि माझी पहिली आणि शेवटचीच भेट. अर्थात नियतीच्या मनात काय होते हा भाग वेगळा.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच जाग आली गुरुजी स्नान करून मस्तपैकी गंध लावून माळेवर जप करीत बसले होते. आम्हीदेखील सकाळीच रांग लावून अंघोळी उरकल्या. मठात जाऊन निर्गुण पादुकांचे दर्शन घेतले ,नाश्ता  केला, परत गप्पा गोष्टी, त्या आश्रमातील तळघरात असलेले ध्यानघर पहिले, नामस्मरण, जप केला. उन्हाळा जाणवत होता. पुन्हा त्या ब्राह्मणाकडे दुपारी जेवलो. आमची गाडी वेळेत आम्हाला घ्यायला आली. आम्ही गाणगापूरला आलो याचा पाठक गुरुजींना खूप आनंद झाला होता. त्यांच्या पाया पडलो तेव्हा ते म्हणाले की  गाणगापूरला महाराजांची सेवा करणे खूप कठीण आहे आणि आपण घाबरून सेवा सोडायची नाही. मी मनात म्हटले की इथे विचार करायची पण चोरी आहे.

निघताना गुरुजी म्हणाले कि सोलापूरला प्रभाकर महाराजांचा मठ आहे तिथे जा व त्या मठाधिपतीना माझी खुशाली कळवा. पूर्वी ट्रेन गाणगापूरला थांबायची नाही तेव्हा मी सोलापूरला तिथे उतरत असे व तिथून ST ने गाणगापूरला येत असे. सध्या डायरेक्ट गाणगापूरला येतो त्यामुळे प्रभाकरमहाराज मठात जाणे होत नाही.

गाणगापूर ते अक्कलकोट रस्ता खूप वाईट होता पण कार असल्यामुळे जास्त त्रास झाला नाही. अक्कलकोटला दर्शन घेतले तिथे थोडा वेळ थांबलो व सोलापूरच्या दिशेने निघालो. अक्कलकोट ते सोलापूर रस्ता खूप छान होता.



अक्कलकोट स्वामी समर्थ मठ 

सोलापूरला प्रभाकर महाराज मठ शोधला व तिथे अंदाजे संध्याकाळी ५ वाजता पोहोचलो. सोलापूरमध्ये प्रभाकर महाराज म्हणून एक खूप मोठे संत होऊन गेलेत त्यांचा हा मठ. आमचे मुंबईच्या पद्धतीचे कपडे आणि तरुण वय, यात आम्ही तेथील एका सेवकाला सांगितले की  आम्हाला मठाधिपतीना भेटायचे आहे. त्याने आमच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघितले व म्हटले कि महाराज आराम करत आहेत, त्यांची तब्येत बरी नाही त्यामुळे ते कदाचित तुम्हाला भेटणार नाहीत. आम्ही म्हणालो कि त्यांना निरोप दया की पाठकगुरुजी कडून भेटायला आलो आहोत. आमच्यासमोर तो सेवेकरी पहिल्या मजल्यावर एका खोलीत गेला. ज्या गतीने गेला त्यापेक्षा दुप्पट गतीने खाली आला व म्हणाला कि तुम्हाला ताबडतोब भेटायला बोलावले आहे.

आम्ही देखील लगबगीने गेलो. एक वृद्ध संन्यासी एका कॉटवर पहुडला होते व नक्कीच ते आजारी असावेत. त्यांच्याबरोबर अजून ३/४ जण होते. आम्हाला बघून त्यांचा भ्रमनिरास झाला असावा, कारण आम्ही साधक दिसत नव्हतोच. त्यांनी आमची आस्थेने चौकशी केली व आम्ही पाठक गुरुजींना कसे ओळखतो ते विचारले. आम्ही पाठक गुरुजींबरोबर गाणगापूरला गेलो होतो व तिथूनच येत आहे हे ऐकल्यावर त्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी सांगितले कि पाठक गुरुजी माझ्यापेक्षा वयाने लहान, पण कर्तृत्वाने, उपासनेने ते खूपच उच्च आहेत. मग त्यांनी गुरुजींविषयी  माहिती सांगितली, भरभरून बोलले, म्हटले कि अजून त्यांनी पाठकगुरुजी सारखा कडक उपासना करणारा, साधी राहणीमान, स्वच्छ चारित्र्याचा व्यक्ती पाहिला नाही. गुरुजींबरोबर तुम्ही गाणगापूरला सहजपणे गेलात म्हणजे तुमचे भाग्य किती मोठे आहे याची तुम्हाला कल्पना नाही.  कारण गुरुजींना स्वतः गाणगापूरला जाण्यासाठी अनेक वर्षे थांबावे लागले होते. अर्थात गुरुजींची स्तुती झाल्यामुळे आम्ही आनंदी झालो.  चहापाणी घेऊन त्यांचा निरोप घेतला. त्यांनी जेव्हा आम्हाला निरोप दिला तेव्हा त्यांचे डोळे डबडबले होते व त्यात गुरुजींविषयी त्यांच्या मनातील प्रेम, आदरभाव आम्ही टिपला. पाठकगुरुजी म्हणजे एक वेगळेच व्यक्तिमत्व आहे हे प्रकर्षाने जाणवले. 


प्रभाकर महाराज मठ सोलापूर 

रात्री सोलापूर स्टेशनजवळ हॉटेलमध्ये जेवलो व सिद्धेश्वर ट्रेन पकडून मुंबईला आलो. रात्री ट्रेनमध्ये खूप गप्पा मारल्या ,खूप चर्चा केली. सर्वकाही नजरेसमोरून जात होते.  गाणगापूर मला वैयक्तिकरित्या आवडले नाही आणि मी पुन्हा इथे येणार नाही असे मी ठरवले होते. पण गुरुजींविषयाची श्रद्धा, जवळीक व मैत्री ज्या वेगाने वाढत होती ते बघता माझ्या मताला काहीच किंमत उरणार नव्हती याची मला तेव्हा जाणीव नव्हती. शिवाय ज्याचे जिथे अकाउंट आहे तिथे तो जातोच हा नियतीचा नियम आहेच.

जवळपास १ महिन्यांनी गुरुजींची नाशिकला भेट झाली तेव्हा माईने  विचारले की गुरुजी जवळ  कोण झोपले होते.  मी म्हटले कि मी झोपलो होतो. माईनी हसून विचारले कि मग प्रसाद मिळाला का? आणि आम्ही हसलो.

एकंदरीत पहिली गाणगापुर वारी खूप निराशाजनक, त्रास देणारी परंतु नवीन अनुभव देणारी होती. इथे पोहोचणे कठीण, सोयी सुविधांचा अभाव, रस्ते खराब, जेवण यतातथाच,खूप गरमी, त्यामुळे श्री गुरुचरित्रात महाराजांनी सांगितले आहे की गाणगापूरला आमची सेवा कठीण आहे हे मात्र पटले. तसेच हि तपोभूमी आहे. उपासनेसाठी उत्त्तम स्थान आहे हे मात्र खरे.

आज अनेक भाविक सुखात जय गुरुदेव आश्रमात गाणगापूरला, राहतात. त्यासाठी पाठकगुरुजींनी किती कष्ट केलेत हे सर्वाना कळणे गरजेचे आहे. 

विशाल फुलपगार - २४ मे २०२०

टीप : हि माझी वैयक्तिक मते आहेत व यात कोणाचा अपमान करण्याचा हेतू नाही. त्या त्या वेळेला जे मनात आले ते प्रामाणिकपणे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. आता गाणगापूर हे एक प्रगत ठिकाण झाले असून सर्वसुविधांनी युक्त आहे.


दत्तलीन श्री. पाठक गुरुजी यांच्या जीवनावरील "जगन्मित्र" या पुस्तकाचे विमोचन स्वातंत्रवीर सावरकर स्मारक , दादर , मुंबई येथे २५ डिसेंबर २०१२ ला मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तो कार्यक्रम पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा. 

https://www.youtube.com/watch?v=V32T5DWEor8&list=PLsAsEAuSOBwdOoqO44f_ZFkqLrO7aPsva&index=2&t=7904s




   

Thursday, May 21, 2020

माउली

साधारणपणे जुलै २००३ सालचा  हा अनुभव आहे. आयुष्यात काही अनुभव / प्रसंग ठळकपणे लक्षात राहतात त्यातलाच हा एक. 

माझे ऑफिस तेव्हा बेलापूर , नवी मुंबई येथे होते. मी राहायला खार (प) , मुंबई. ऑफिसच्या कामानिमित्त कायम फिरतीवर असायचो. आठवड्यातून एक दोनदा विमान प्रवास व्हायचा सकाळी उठलो कि सर्वप्रथम डोळे उघडून बघायचे , म्हणजे पंखा फिरताना दिसला म्हणजे घरी आहे आणि पंखा नाही पण AC चालू असेल म्हणजे हॉटेलच्या खोलीत झोपलो आहे असे मी समजायचो. अनेकदा पहाटे उठून मी एअर पोर्ट वर जायच्या तयारीला लागत असे तेव्हा बायको म्हणायची अरे आज तुला कुठेच जायचे नाही, गप्प झोप आत्ता. मग नि पुन्हा झोपायचो. यात अतिशयोक्ती नाही.पहाटे ६चे विमान पकडायचे म्हणजे सकाळी ४.३० ला घरून निघावे लागायचे व सर्व काम करून रात्री उशिरा परत यायचो. सकाळी सकाळी रस्त्यावर फक्त दूधवाले , पेपरस्टॉल , रखवालदार अशी लोक दिसायची. त्यांना वाटत असेल काय मज्जा आहे माझी. आधी आधी मलापण मज्जा वाटायची पण नंतर मात्र मी कंटाळलो होतो. एवढेच काय तर एअरपोर्ट वर मॉर्निंग शिफ्ट चे एअरलाईन्स चा स्टाफ ,सीक्युरिटी स्टाफ सगळे चेहेर्याने ओळखीचे झाले होते.  याव्यतिरिक्त रोज घरून ऑफिस ला जायचे म्हणजे दीड तास पोहोचायला लागायचे.  

साधारणपणे जुलै २०१३ मध्ये ऑफिस ची एक मीटिंग मोरगाव जवळ एका फॅक्टरीमालकाबरोबर ठरली होती. कधी नव्हे ते कंपनी डायरेक्टर मला म्हणाली कि मी पण येते. तिचे वय ६५ असले तरी उत्साह दांडगा होता. ठरल्याप्रमाणे आम्ही सकाळी ७ वाजता बेलापूरवरून निघालो , म्हणजे ११ वाजता ठरल्या वेळेला मोरगाव जवळ पोहोचता येईल व तासाभरात मीटिंग आटोपून संध्याकाळी परत असा नेहेमीप्रमाणे टाईट कार्यक्रम होता. मी , सिंगमॅडम , आमचा पवार ड्राइवर व स्कोडा गाडी असे आम्ही निघालो. पवार हा वारकरी/ माळकरी त्यामुळे निर्व्यसनी तसेच गाडी छान व सेफ चालवायचा त्यामुळे मला तो आवडायचा. 

त्याने मला विचारले किया आपण कसे जायचे. मी म्हटले कि बघ आपण पहिल्यांदा धनकवडी , पुणे येथील शंकर महाराज मठात जाऊन दर्शन घेऊ तेव्हा मॅडम झोपलेल्या असतील त्यांना सांगू कि हे on the way आहे. तिथून सासवड , जेजुरी मार्गे मोरगावला पोहोचू. वारकरी असल्यामुळे त्याने सांगितले कि आज माऊलीची पालखी सासवडहून जेजुरीला मार्गस्थ होईल व जेजुरी मुक्कामी असेल त्यामुळे आपल्याला कदाचित माउली पालखी दर्शन होईल.  

पंढरपूर विठ्ठल हे उभ्या महाराष्ट्राचे दैवत. लाखो वारकरी चालत जाऊन आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहोचतात हे टीव्हीवर  ऐकले / पहिले होते. कधीतरी थोडे अंतर का होईना यांच्याबरोबर चालावे , तो अनुभव घ्यावा हि सुप्त इच्छा होतीच. अशी कोणती शक्ती आहे , काय  ओढ आहे , काय प्रेम आहे कि घरदार टाकून तहान भूक विसरत हि लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून चालत पंढरपूरला येतात आणि बरोबर आषाढी एकादशीला पोहोचतात असे अनेक प्रश्न मनात होतेच. 

सकाळी वेळेत निघालो , मुंबई पुणे एक्सप्रेस वे संपल्यावर एक ब्रेक घेतला आणि निघालो. मी आणि पवार पुढे आणि मॅडम मागे बसल्या होत्या. तिथून आम्ही डायरेक्ट शंकर महाराज मठ, धनकवडी ला आलो. मॅडम ला सांगितले कि एक चांगले मंदिर आहे आपण दर्शन घेऊ आणि निघू. गर्दी नसल्यामुळे ५ मिनिटात दर्शन झाले. तिथे प्रसाद म्हणून मुगाच्या डाळीची खिचडी मिळते आणि विशेष म्हणजे लहानपणापासून मुगाच्या डाळीची खिचडी माझी फेविरेट. पण ती मिळणार १२ नंतर त्यामुळे मी मनोमन नमस्कार करून मनात म्हटले कि आज घाईत आहे , मुगाची खिचडी नेक्स्ट टाइम. असे म्हणून लगेच निघालो. खर म्हणजे धनकवडी on the way नाही पण.... 

सासवड - जेजुरी - मोरगाव आसा आमचा प्रवास म्हणजे अजून जास्तीतजास्त दीड तास म्हणजे आम्ही ठरल्या वेळेपेक्षा १५ मिनिटे आधीच पोहोचणार. सासवड वरून जेजुरीला जायला घाटरस्ता आहे. तो ओलांडला कि जेजुरी. व तिथून २०-२५ किमी वर मोरगाव. हा घाट ओलांडायला दोन रस्ते एक दिवेघाट मार्गे जो प्रशस्त आणि रहदारीचा रास्ता आहे व दुसरा बोपदेव घाट मार्गे जो अरुंद आणि कमी रहदारीचा आहे. दिवेघाटातून जायचे आमचे आधीच ठरले होते. दिवेघाटाच्या सुरुवातीलाच आम्हाला काही जणांनी सांगितले कि सकाळीच माऊलीची पालखी येथून मार्गस्थ झाली असून अजून ती घाटातच आहे त्यामुळे तुम्हाला वारकरी , पालखीमुळे येथून उशीर होईल. मॅडम बोलल्या कि आपण जाऊ , गाडी जाण्यासाठी ते आपल्याला साईड ने रास्ता देतील , तसेच त्यांना सांगू कि आमची एक तातडीची मीटिंग आहे. पवार ने सांगितले कि मॅडम असे काही होणार नाही. पालखी चालत असेल तर आपल्याला थांबावेच लागेल. मॅडम ने काही ऐकले नाही. व आम्ही निघालो.

पवार मात्र गालातल्या गालात हसत होता. तो मला म्हटलं साहेब पालखी मार्गस्थ असेल तर वारकरी आपल्याला पालखीपुढे जाऊ देणार नाहीत आणि एवढी गर्दी असेल कि आपण सांगायचे कोणाला ? तोपर्यंत आम्हाला पालखी बरोबर चालणारे वारकरी किती असतात याचया अजिबात अंदाज नव्हता. थोडे अंतर गेल्यानंतर तुरळक वारकरी लागले आणि पुढे जात जात ती संख्या प्रचंड वाढली. मुंग्यासारखी माणसे होती. चालायला पण जागा नव्हती. पोलीस आले त्यांनी गाड्या थांबवल्या होत्या , त्यामागे आमची गाडी पण थांबली. पोलिसानी सांगितले कि आम्ही मार्ग काढतो , तुम्ही येथेच थांबा , हॉर्न वाजवू नका. , शांतपणे बसा. मॅडम अस्वस्थ झाल्या , पण पर्याय नव्हता . आम्ही टेलिफोन करून सांगितले कि आम्हाला उशीर होईल. हिरवागार निसर्ग, पावसाळी वातावरण व त्यात पांढरे कपडे घातलेले लाखो वारकरी माउली नामाचा जयघोष करत चालत होते / नाचत होते. 


आमच्या गाडीच्या दोन्ही बाजूने वारकरी चालत पुढे जात होते. शेवटी मी म्हटले कि मी थोडा वारीबरोबर चालतो गाडीत बसून काय करणार ? एक तर पाय लांब त्यामुळे असेपण बसायची अडचण होतीच. पवार देखील गाडीबाहेर उभा राहिला , मॅडम गाडीतच बसून होत्या. आम्ही घाटाच्या जवळपास टॉप वर होतो, त्यामुळे उतरण आणि चढण असे दोन्ही स्पष्टपणे दिसत होते. खरे म्हणजे रस्ते दिसलेच नाही दिसली फक्त पांढरे कपडे घालून बेभानपणे परंतु शिस्तीने चालणारी , नाचणारी , माउली नामाचा जयघोष करणॆ माणसे. दूरदूरचे माणसे म्हणजे केवळ पांढरे ठिपकेच , या असंख्य ठिपक्यांमधील मी पण एक ठिपकाच. आपले पृथ्वीवरचे अस्तित्वदेखील असेच आहे.

अनेक दिंड्या मिळून एक वारी बनते. प्रत्येक दिंडीत ५० -१०० वारकरी असतात व प्रत्येक दिंडी ला एक क्रमांक असतो. त्या त्या दिंडीचा एक टेम्पो असतो. त्यात जेवण बनवायची सामुग्री असते. हा टेम्पो मुक्कामाच्या किंवा विश्रांतीच्या ठिकाणी आधीच जाऊन थांबतो व त्या त्या क्रमांकामधील वारकरी त्या त्या टेम्पोजवळ येतात आणि विश्रांती घेतात / जेवतात. त्याव्यतिरिक्त गाव वाले देखील खाण्याची व्यवस्था करतात.


एवढी गर्दी असून देखील अत्यंत शिस्तबद्ध रीतीने हे लाखो वारकरी चालत येत होते. ऊन पाऊस याची पर्वा नाही ध्येय फक्त पंढरपूर.  आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व वारकरी आत्ममग्न असतात. कोणी छोटा  - मोठा असा भेदभाव नाही. कोण कोणाकडे बघतही नाही. सर्वे जण एकमेकांना माउली या नावानेच बोलावतात म्हणजे कोणाला नाव नाही. आपण माउली बोललो कि समोरचा देखील आपल्याला हसून माउली बोलतो. जात पात , धर्म , गरीब श्रीमंत वगैरे कसलाही भेदभाव नाही. संपूर्ण समानतेचा अनुभव येथे आला. 

काही शहरी भागातील दिंड्या दिसल्या , काही परदेशी सुद्धा दिसले , सर्व जण एकमेकांशी एकरूप त्यामुळे काहीच फरक नाही. सर्व जण अत्यंत शिस्तीत चालत होते. लाखो लोकांबरोबर आपण चालतोय , अंगावर तुरळक तुषार पडतायत , सर्वत्र पावसाळी वातावरण , निसर्गाने वारकऱ्यांच्या स्वागतासाठी अंथरलेली हिरवी चादर , थंड वाऱ्याची सतत येणारी झुळूक, वातावरण अत्यंत भक्तिमय , पांडुरंगमय. 


मी विचार केला कि याच रस्त्याने गेले अनेक शतके वारकरी याच सुमाराला नित्यनेमाने चालत जात असतील आणि त्यांची पाऊले उमटलेली असतील. पुढच्या वेळी नवी पाऊले उमटतील आणि असे चालूच राहणार. यावेळी मला ते भाग्य मिळाले. 

कोणती श्रद्धा , काय विश्वास , याना पंढरपूर वारी करून काय मिळते? ,  हे एवढे का व कशाला चालतात ? , यांच्या जेवण अंघोळीची काय व्यवस्था ? , हे तहानभूक आजारपण विसरून कसे चालतात ?, यांच्या घरी कोण असेल ?, अनेकांकडे मोबाईल नाहीत त्यामुळे ते संपर्कात कसे असतील ?. यात काय पुण्य आहे ? एवढा शिस्तबद्ध प्रवास कसा करतात ?, नियोजन कोण करते ?, याना खरंच देव पावत असेल का ? देव आहे का ?, असे अनेक प्रश्न मनात येत होते. 

विशेष म्हणजे वारकरी हा नेहमीच काटक असतो. जाड , पोट पुढे आलेला , बेढब किंवा overweight वारकरी निदान मी तरी इथे पहिला नाही. स्त्री पुरुष , लहान मुले , तरुण , म्हातारे असे सर्वच चालत होते , कुठलाही भेदभाव नाही. कोणाचीही ओळख नाही. ओळख फक्त माउली. साधारण दीड तास चालून मी पुन्हा माझ्या गाडीकडे आलो व गाडीत बसलो. मला वाटले कि उशीर झाला म्हणून मॅडम वैतागतील पण त्यापण कौतुकाने हे सर्व बघत होत्या. मला खूप भूक लागली होती. पण काय करणार खिशात पैसे होते पण उपयोग नाही. शांतपणे गाडीत बसलो होतो , काचा खाली केल्या होत्या. 

अचानक एक माणूस आला आणि माउली हे घ्या म्हणून आम्हा तिघांना ३ फूड पॅकेट देऊन हसून गेला. पुढे पण काही जणांना त्याने दिले. मला खूप भूक लागल्यामुळे मी लगेचच त्याचे मनोमन आभार मानून पाकीट खोलले तर त्यात मुगाच्या डाळीची खिचडी आणि ती पण पोटभर. साधारणपणे १ वाजले असावेत नक्की आठवत नाही. सकाळी शंकर महाराज मठात मुगाच्या डाळीची खिचडी खाता आली नाही पण वारीमध्ये मात्र अगदी सेम तो सेम खिचडी मिळाली. याला चमत्कार म्हणावे कि योगायोग हे मात्र कळत नव्हते. इथे जेवणाआधी हात धुणे हा प्रकार नव्हता . खूप भूक लागल्यावर जेव्हा अनपेक्षितपणे चविष्ट व आवडणारे जेवण मिळते त्याचा आनंद स्वर्गीय असतो आणि तो मला अनुभवयास मिळाला.  जेवणाचा प्रश्न सुटला आणि डोळ्यातले अश्रू पावसात एकरूप झाले. . 

थोड्या वेळाने माउली पालखी विश्रांतीसाठी थांबली व त्याचबरोबर वारकरी देखील त्यांच्या दिंडीच्या ठिकाणी थांबले. घाटात गर्दी होतीच. आमच्या पुढे व मागे गाड्याची रांग होती. पोलिसानी आम्हाला एका बाजूने सोडले व म्हटले कि हळू हळू जा , हॉर्न वाजवू नका , प्रेमाने माउली म्हणा म्हणजे वारकरी रास्ता देतील. त्याप्रमाणे आम्ही निघालो.  वाटेत माऊलीची पालखी विश्रांतीसाठी थांबलेली दिसली त्यापुढे नकळत नतमस्तक झालो. या वारकऱ्यांची शिस्त व श्रद्धा पाहून कळले कि देव देव्हाऱ्यात नाही , माणसातच आहे.

अशा प्रकारे आम्ही दोन  तास उशिरा मीटिंग ला पोहोचलो.  तासाभरात मीटिंग आटोपून निघालो तेव्हा माउली जेजुरी मुक्कामी होती. येताना मात्र दिवेघाटात गर्दी नव्हती. भक्तिमार्गातला दिवेघाट ओलांडताना मी नतमस्तक झालो. वारकर्यांविषयी आदर शतपटीने वाढला होता. एकंदरीत वारी हि संकल्पना सामाजिक समानतेचे उत्तम उदाहरण आहे. मॅडम आमच्या कंपनी मध्ये डायरेक्टर होत्या तसेच पंजाबी होत्या पण त्यांनी देखील या वारीचे खूप कौतुक केले. 

या रम्य व अलौकिक आठवणींच्या हिंदोळ्यावर परतीचं प्रवास झाला. आजही हि आठवण आली कि मन गहिवरून येते. दीर्घकाळ स्मरणात राहिलेली हि आठवण मी आज लिहून काढली. लिहिताना देखील , वारीत दिवेघाटात चालल्याचा अनुभव आला. श्रद्धा आणि भक्तिभावाने पुनश्च वारकरी संप्रदायाला नमन केले. 

माउली नामाचा जयघोष अजूनही कानात ऐकू येतो.  

विशाल फुलपगार - २१ मे २०२०









Friday, May 15, 2020

माझे आजोबा ल. पां. फुलपगार गुरुजी ( १० जुलै १९१७ - ८ ऑक्टोबर १९९४ )


आजही ज्या व्यक्तीमुळे मला किंवा आमच्या घराला समाजात मान मिळतो अश्या माझ्या आजोबांबद्दल मी लिहिणार आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात एक रोल मॉडेल असतो किंवा आदर्श असतो तसे माझे आजोबा हे माझे रोल मॉडेल आहेत.

जगात खूप चांगली माणसे असतात. ते स्वतःसाठी / समाजासाठी / नातलग मंडळींसाठी खूप काही चांगली कामे करतात. काही जण प्रसिद्ध होतात तर काही जण होत नाहीत. समस्त फुलपगार परिवारामध्ये एक अत्यंत  तेजस्वी आणि जबरदस्त व्यक्ती होऊन गेली ते म्हणजे माझे आजोबा लक्ष्मण पांडुरंग फुलपगार गुरुजी ( १० जुलै १९१७ - ८ ऑक्टोबर १९९४ ). जे फुलपगार गुरुजीना ओळखतात त्यांना हे पटेल परंतु महत्वाचे म्हणजे मी आशा करतो कि माझा मुलगा आर्यन जेव्हा मोठा होऊन हे वाचेल तेव्हा त्याच्या स्मरणात हि गोष्ट नेहमीच अभिमानास्पद राहील.

जग सतत बदलत असते. काळ , वेळ, माणसे , परिस्थिती कायम बदलत असते. लोकांची स्मरणशक्ती नेहमीच कमी असते , केलेली मदत ते लगेचच विसरतात व पुढे जातात. आपण सुद्धा जास्त गुंतून न राहता पुढे जायचे. असो , मी शक्यतो तटस्थपणे आठवणी लिहिण्याचा प्रयत्न करतो.

जन्मतः महार जातीत जन्मलेल्या पांडुरंग येसुजी फुलपगार यांच्या ६ मुले  व २ मुली  यातील एकाचे नाव लक्ष्मण. जनावरांच्या चामड्याचा  व्यापार करणे हा आमचा पिढीजात धंधा. जन्म - जुन्नर गावी म्हणजे शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी. अजूनही आमचे गावी खालचा माळीवाडा येथे एक घर आहे. विशेष म्हणजे मराठा वस्तीमध्ये एकट्या आमचेच महारांचे घर.  असे लिहिण्यास कारण कि त्यावेळी जाती प्रमाणे वस्त्या असत. पण फुलपगार त्याला अपवाद असावेत. शिक्षण ७वी पास व मुंबई  महानगर पालिकेच्या धारावी येथील शाळेतून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत सर्वानी बौद्ध धर्मात प्रवेश केला. 

श्री. विठ्ठल उपशाम हे आजोबांचे सखें मामात्यांनी या सर्व भावंडाना मुंबई आणले आणि मग ते मुंबई मधेच शिकले. त्याकाळी पांडुरंग फुलपगारची सर्व मुले दादर नायगाव येथे एका चाळीत राहायची. 

साधारणपणे १९५२ ला डॉ. आंबेडकर साहेबानी समाजासाठी मुंबई जिल्हाधिकारी यांच्याकडून खार या मुंबई उपनगरात एक खूप मोठी जागा घेतली. व त्यात आजोबानी साधारण २८०० sq ft चा bunglow प्लॉट विकत घेतला. एका तर डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे vision  बघा कि त्यांनी समाज बांधवांसाठी खार सारख्या भागात जागा मिळवली. म्हणजे आज खार इतका प्रसिद्ध आणि महागडा भाग आहे कि आपण येथे भाड्याने राहण्याचे स्वप्न सुद्धा बघू शकत नाही. त्याशिवाय आजोबांचे डेरिंग बघा कि काहीही आर्थिक पाठबळ नसताना त्यांनी कशी पैशाची जमवाजमव केली असेल याचा मी विचार देखील करू शकत नाही. only daring. जमीन घेऊन त्यांनी त्यावर ४ BHK चा टुमदार बंगला बांधला.  त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ "पांडुरंग भुवन " असे नाव दिले आणि १९५६ मध्ये ते इथे राहायला आले. त्यावेळी ते साधारण ४० वर्षाचे असतील. आजोबाना अशोक, सुरेश , दिलीप अशी ३ मुले व सुमन हि मुलगी अशी ४ अपत्य. ते आजोबाना दादा म्हणत.

आमचे आजोबा म्हणजे पक्के आंबेडकरवादी. सर्वानी शिकले पाहिजे , समाजात मोठे झाले पाहिजे एकमेकांना मदत केली पाहिजे अशी त्यांची कायम वृत्ती असे.

व्यवसाय : कुटुंब मोठे तसेच येणारे जाणारे माणसे खूप. घरी जेवायला सतत पाहुणे , गाववाले असायचे, चहापाणी कायम चालू आणि हि चिंतेची नाही तर अभिमानाची बाब होती. माझी आजी देखील महानगर पालिका शाळेतून मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाली त्यामुळे घरात शिक्षणाचे महत्व होते. अर्थात इतर भावंडानी याचे महत्व पण ओळखले नाही आणि याचा लाभदेखील घेतला नाही. यावर अधिक विवेचन नको. 

आजोबानी आमच्या गच्चीवर त्यांच्या निवृत्ती नंतर Vishal & Company या माझ्या नावाने बफीन्ग ब्रश ची कंपनी चालू केली. त्यात जवळपास १०-१२ कामगाराना प्रत्यक्ष व २०-२५ जणांना अप्रत्यक्ष रोजगार होता. हि फॅक्टरी चांगली चालत होती. कामाच्या व्याप वाढल्यावर आजोबानी santacruz , दौलतनगर येथे शासनाच्या जमिनीवर अंदाजे २००० ते ३००० sqft फॅक्टरी चालू केली. या उत्पन्नातून घराचे चांगले चालले होते. 

सदर काम शासनाने दोनदा तोडले आम्ही पुनः उभे केले. नंतर मात्र शासनाने त्यावर कंपाऊंड घातले. व मग हि फॅक्टरी बंद करावी लागली. परंतु याचा फोटोपास त्यांनी काढला नाही, का काढला नाही हे माहित नाही. विशेष म्हणजे या ठिकाणी जी अनेक बांधकामे होती त्यात मराठी माणसाचे असे फक्त आमचेच बांधकाम  होते. यातला नफा नुकसानीचा भाग सोडला तरीदेखील उद्योग उभे करावेत , त्यातून रोजगार निर्मिती , स्वावलंबन व महत्वाचे म्हणजे प्रचंड डेरिंग दिसून येते. म्हणजे निवृत्त झाल्यावर देखील ते स्वस्थ बसले नाहीत.

याशिवाय चिंचोटी, वसई येथे त्यांनी १५-२० गुंठे रोड ला लागून जागा विकत घेतली. व तिथे L P Soap नावाची अजून एक कंपनी चालू केली. यात liquid सोप व कपडे धुवायचा साबण बनायचा. आमचे नातेवाईक श्री कडलाक हे एका साबणाच्या कारखान्यात कामाला  होते मग त्यांचे expertise व आमचे भांडवल अशा प्रकारे कि कंपनी चालायची. तिला बऱ्यापैकी ऑर्डर मिळायच्या व हि कंपनी सुद्धा बऱ्यापैकी नफ्यामध्ये होती. 

या जागेला देखील बरकत होती. यातून एक १२ महिने पाणी असलेला ओढा वाहायचा. व एक कायम तुडुंब भरलेली मोठी विहीर होती. गावातली लोक यातून पाणी घ्यायला यायचे.  आजोबांची मुले म्हणजे माझे वडील , काका हे कामकाज बघायचे. थोड्या वर्षाने माझे दिलीपकाका आजारी झाले त्यांना हृदयाचा त्रास सुरु झाला. त्या दरम्यान याकडे दुर्लक्ष होत गेले. व आजोबानी त्यांच्या हयातीत हि जागा विकून पैशाची वाटणी मुलांमध्ये करून टाकली. या जागेत आम्ही खूप राहायचो. खूप मज्जा यायची. असो. 

जीवनकाल : आजोबानी खूप लोकसंग्रह केला. त्यांचे भाऊबंद , नातेवाईक , गावातले लोक , मुंबईतील ओळखी पालखीचे हे कायम घरी आजोबाना भेटायला येत असत. त्यामुळे घर अनेकदा overcrowded होत असे. याशिवाय आमच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटीला स्वतःचे ऑफिस नव्हते ते पण आमच्या घरात होते. त्यामुळे सोसायटी चे कामकाज आमच्या घरातून चालायचे. यात आजोबा अनेक वर्षे chairman होते. त्याची गर्दी ती वेगळीच. कॉलोनीतील अनेकांचे इलेक्ट्रिक मीटर आमच्या कंपाऊंड मध्ये अनेक वर्षे होते. ते कालांतराने प्रत्येकाच्या कंपाऊंड मध्ये शिफ्ट केले. 

जुन्नर या आमच्या गावी देखील आजोबाना खूप मान होता , त्याची अनेक कारणे असावीत. एक तर ते शिक्षक होते , त्यावेळी शिक्षकांना खूप मान असायचा. त्यांचे सर्व भाऊ हे सामाजिक भान असलेले आणि महत्वाकांक्षी होते , त्याशिवाय सर्वामध्ये खूप एकी होती. गावी त्यांचा भाऊ मारुतीअप्पा राहायचे त्यांनी खूप मान कमावला आणि राखला होता. त्याशिवाय रामचंद्र अप्पा, त्यांचे भाऊ देखील व्यवसायिक व सामाजिक वृत्तीचे होते. त्याशिवाय दुसरे भाऊ विठ्ठलनाना , बळवंतअप्पा हे देखील स्थिरस्थावर होते.  मुंबई ला येऊन आजोबानी घर ना घेता बंगला बांधला व त्यात सर्वाना मुक्त प्रवेश होता , तसेच आजोबा सर्वाना सर्व प्रकारे मदत करायचे त्यामुळे त्यांच्या शब्दाला खूप मान होता. आजोबा व त्यांचे भाऊ यात उत्तम संवाद होता. यांच्यामध्ये कधी वाद विवाद अथवा वितुष्ट झाल्याचे मला आठवत नाही. खरे म्हणजे सर्व भाऊ उद्योगी होते. त्याबद्दल मी जास्त काही लिहीत नाही. कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला गेलो कि आजोबाना VIP वागणूक मिळत असे. लग्नात किव्हा जेवणाला आम्ही कधी रांगेत उभे राहिल्याचे मला आठवत नाही.

महत्वाचे म्हणजे आजोबा समाजातील लग्न जुळवण्याची काम विनामूल्य करत असत. कोणाची मुले लग्नाची आहेत आणि ती कोणत्या घरात योग्य राहतील असे ते नेहमीच हेरून ठेवत. तसेच स्थळ आणले कि ते त्याची जबाबदारी घेत. लग्नानंतर काही कुरबुर झाली तर दोन्ही बाजूची मंडळी आमच्या घरी येत आणि मग आजोबा त्यांच्यात समेट घडवून आणत. बाहेर भांडणारे पती पत्नी आजोबांसमोर गप्पा असत आणि त्यांचे म्हणणे ऐकत. 

अनेक ना जुळणारे लग्न त्यांनी जमवले. अनेकदा मुलगी किव्हा मुलगा बघायचा कार्यक्रम आमच्या घरीच होत असे. तसेच अनेकांचे साखरपुडे (engangement ) आमच्या घरी गच्चीवर झालेत. लग्नासाठी त्यांनी अनेक मुलं मुलींना convince करून लग्न जुळवले होते. यामुळे आजोबांचा मान अधिकच वाढत असे. आजोबांची राहणी अत्यंत साधी होती. धोतर , वरती हाल्फ सदरा व टोपी घालत. त्यांच्या उभ्या आयुष्यात त्यांनी कोणाकडे उसने पैसे घेतले असतील असे मला वाटत नाही. तसेच आमच्या दारावर कधीच कोणी उधारी परत मागायला आला नाही. त्यांनी किती जणांना मदत केली तो भाग वेगळा.

जवळचे मित्र : आजोबांचे जवळचे मित्र मला आठवत नाहीत परंतु , माळवेगुरुजी व शिशुपाल गुरुजी हे त्यांचे जवळचे मित्र आणि नातेवाईकदेखील. माळवेगुरुजी च्या मुलीबरोबर त्यांच्या धाकट्या मुलाने म्हणजे दिलीप काकानी लग्न केले त्यामुळे मैत्री चे रूपांतर नात्यात झाले. तर शिशुपाल गुरुजी हे त्यांचे मेहुणे.  माळवेगुरुजी व शिशुपाल गुरुजी हे देखील समाजात मान असलेले व लग्न जुळवणारे होते त्यामुळे त्यांचे एकमेकात चांगलेच पटायचे. एकंदरीत इतके लोक आजोबाना भेटायला यायचे कि त्यात आणखी कोणी मित्र होते का ते मला सांगणे कठीण आहे.

आहार व व्यायाम : जेवण आणि जेवणाची वेळ याबाबत ते खूप particular होते. veg /नॉन veg दोन्ही प्रकारचे जेवण ते जेवत. आणि ते मनापासून जेवत. खरं म्हणजे जेवण हा पूर्ण फुलपगार फॅमिली चा ट्रेडमार्क आहे. आम्हा सगळ्यांना खूप भूक लागते आणि चटक मटक आवडते. असे म्हणतात कि फुलपगार लोक जिथे पण जातात तिथे आधी जेवणाची काय सोय आहे ते बघतात ,नसेल ते शोधून काढतात किंवा व्यवस्था करतात. अजून एक गोष्ट मला चांगलीच आठवते कि ते चपाती/ भाकरी डाळ किव्हा कालवणात चुरून (काला ) करून खायचे ती पद्धत मला खूप आवडायची. मी देखील माझे ताट त्यांच्याकडे नेत असत मग ते मला काला करून द्यायचे. प्रसंग कोणताही असो ते जेवणाची वेळ सहसा चुकवत नसत. तसेच रात्री जेवल्यानंतर ते खार स्टेशन पर्यंत चालत जायचे मग बनारसी पान खाऊन यायचे. ते एरवी देखील खूप चालायचे, त्यामुळे ते उंच असले तरी त्यांची प्रकृती काटक होती. सकाळी ते शीर्षासन करायचे. ते अत्यंत जलद गतीने चालत असत. ते नेहमी तांब्यातून पाणी पीत , ग्लास मधून कधी पाणी पीत नसत. कदाचित हा सवयीचा भाग असावा. रात्री जेवल्यानंतर ते एकटेच एक पत्त्याचा डाव खेळात आणि मगच झोपत.

नातवांबरोबर संबंध : मला जेव्हा पासून आठवतंय तेव्हापासून मी कायम लोक आजोबांशी आदराने बोलताना पाहिलेत. त्यांचा सल्ला घ्यायला अनेक जण यायचे. व त्यांचा शब्द अंतिम असे. आजोबांशी कोणी argument करत नसत. सर्वजण त्याच्याशी हळू आवाजात बोलत . अर्थात समाज प्रथेप्रमाणे त्याचा दुश्वास देखील काही लोक करायचे पण त्यांना काही किंमत नव्हती. He earned respect , he commanded respect and he got respect through his deeds. 

नातवांपैकी मी , राजेश , निलेश आम्ही मोठे होतो , त्यामुळे आम्ही आजोबांशी बोलायचे. ते आम्हाला छोटी मोठी कामे सांगत आणि आम्ही ते धावत करायचो. सोनाली , योगिता , सुजित , हर्षद , प्रियांका हे लहान होते. आजोबा खूप व्यस्त असायचे पण ते आमचे लाड करायचे. आमच्या घराच्या आवारात राजापुरी हापूस आंब्याचे झाड आहे. आत्ता कमी आंबे येतात पण पूर्वी अंदाजे १२०० आंबे यायचे , ते मे महिन्यात आम्ही मुले काढायचो , पुसून पोटमाळ्यावर गवतामध्ये ठेवायचो . हा एक दिवसभराचा कार्यक्रम असायचा मग ते आंबे रोज तपासायचे , पिकलेले आंबे काढणे , वाटणे , खाणे , आमरस करणे असा खूप मोठा कार्यक्रम असायचा. आंबे लावून झाले कि मग आजोबा आम्हाला खार स्टेशन जवळ "बनारसी " या हॉटेल मध्ये न्यायाचे , व तिथे आम्ही सामोसा प्लेट व लस्सी घ्यायचो. त्यावेळेला वर्षातून एकदाच हॉटेल मध्ये जायचो. कारण म्हणजे हॉटेलमध्ये जेवणे अशी पद्धत नव्हती व मनोवृत्ती देखील नव्हती. अक्षरशः आम्ही नातवंड मे महिन्याची वर्षभर वाट बघायचो. त्यावेळी हॉटेलमध्ये खाताना खूप श्रीमंत असल्यासारखे वाटायचे. माझ्यावर त्यांचा खूप विश्वास होता आणि अपेक्षा देखील होती. मी engineer च्या last year ला त्यांचे निधन झाले नाहीतर त्यांना या गोष्टीचा खूप अभिमान वाटलं असता.  घरातील सर्व सुना, त्यांची मुलगी / जावई याना घरात खूप मान ते द्यायचे. महिलांना respect करावा हे आम्ही घरातूनच शिकलो. 

लक्ष्मणरावांचा परिवार
बु. वत्सलाबाई लक्ष्मणराव फुलपगार (निवृत्त मुख्याध्यापिका , पार्ले महानगर पालिका शाळा )
१) अशोक लक्ष्मण फुलपगार - रिटायर्ड उप प्रबंधक - इंडियन एरलाईन्स
   अर्चना अशोक फुलपगार (सुन ) - रिटायर्ड मुख्य लिपिक - मुंबई महानगरपालिका
२) सुरेश लक्ष्मण फुलपगार - रिटायर्ड सहायक प्रबंधक- एअर इंडिया
   शिल्पा सुरेश फुलपगार (सून ) - गृहिणी
३) बु. दिलीप लक्ष्मण फुलपगार - मुंबई महानगर पालिका
    दीपा दिलीप फुलपगार - मुंबई महानगर पालिका
४) सुमन जयवंत वाव्हळ - गृहिणी
   जयवंत चिमाजी वाव्हळ (जावई ) - रिटायर्ड क्लास १ अधिकारी सचिवालय
यावरून असे दिसते कि त्यांच्या हयातीत त्यांची सर्व मुले चांगली settle होती. हे देखील उल्लेखनीय आहे




त्यांचा कनिष्ठ मुलगा दिलीप याना तरुण वयातच हृदयाचा त्रास चालू झाला त्याचा औषध उपचार यामध्ये सगळ्यांचे लक्ष गेले. कालांतराने शर्थीचे प्रयत्न करून त्यांचे १७ नोव्हेंबर १९८७ ला निधन झाले. त्यानंतर उद्योग धंद्यावर सर्वांचेच दुर्लक्ष झाले हळूहळू दोन्ही कंपनी बंद झाल्या. याशिवाय या उद्योगावर आजोबानी वैयक्तिक लक्ष दिले नाही कारण ते इतर कामात व्यस्त असत. त्यांची मुले नोकरी सांभाळून यात लक्ष घालायचे. मला असे वाटते कि आजोबानी यात एक्स्पर्ट माणसांना नेमायला हवे होते. असे झाले असते तर हा धंधा चांगलाच वाढला असता. परंतु तत्कालीन परिस्थिती वर आत्ता comment करणे योग्य नाही.

तरीही उद्योगधंदे उभे करावे , त्यातून रोजगार निर्मिती करावी , भांडवल निर्मिती करावी , नफा कमवावा या गोष्टी amazing आहेत. विशेषकरून मागासवर्गीय समाजातून येऊनसुद्धा कोणतेही पाठबळ नसताना स्वतःच्या हिमकतीवर एवढे सगळे करणे म्हणजे impossible. आजोबानी कधी देवावर विश्वास ठेवला असे मला आठवत नाही. परंतु त्यांचा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास होता. ते कधीही कोणत्याही प्रसंगाला घाबरले नाहीत. भीती हा शब्द त्यांना माहीतच नव्हता. प्रचंड प्रमाणात कष्ट करायचे. आजोबा दमलेत किंवा आजोबा दमून आलेत असे मला आठवत नाही.

त्यांना तीन मुले , व एक मुलगी. मुलगी दहिसर ला राहते. मुलांची लग्न झाली व जागा कमी पडायला लागली. तसेच नंतर वितुष्ट नको म्हणून त्यांनी बंगला पडून तिथे ground +२ मजल्याची इमारत स्वतः बांधायचा निर्णय घेतला. कोणत्या मुलाने किती contribution द्यायचे हे त्यांनी ठरवले व त्याप्रमाणे साधारण पाने १९८६ मध्ये हि इमारत बांधून तयार झाली व प्रत्येकाला एक मजला व त्यावर २ BHK फ्लॅट मिळाला. खरे पाहता एखाद्या बिल्डर ला joint venture मध्ये इमारत बांधता आली असती पण मालकी हक्क गेला असता आणि प्रत्येकाला कमी जागा मिळाली असती. परंतु बाबासाहेबानी स्थापित केलेल्या सोसायटी मधील जागा न गमावता मुलं नातवंडांना खार मध्ये हक्काची व एकाच ठिकाणी जागा मिळावी हा त्यांचा हेतू. या प्रमाणे त्यांचा प्रत्येक मुलगा हा आज २ BHK चा मालक आहे. किती हि दूरदृष्टी. तसेच इमारत contractor लावून बांधणे तसेच त्या स्पीड ने पैसे उपलब्ध करणे हे खूपच डेरिंग चे काम आहे. पण त्यांनी हे केले व आमची सोय केली. नाहीतर बाजारभावाप्रमाणे आम्हाला खार मध्ये भाड्याने राहणे सुद्धा परवडले नसते.  याबद्दल मी त्यांचा ऋणी राहीन. त्यांच्या हयातीतच त्यांनी सर्व मुलांना वाटणी करून दिली.

एवढा प्रचंड मान असून देखील आजोबांचे पाय कायम जमिनीवर होते. ते कोणाशी उद्धटपणे  बोलल्याचे मला आठवत नाही, किंवा  मी प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे ऐकलं नाही. साहजिकच जे आजोबाना विरोध करायचे किव्हा आजोबांविषयी वाईट बोलायचे , अशा लोकांच्या सवई , त्यांच्या घरातील वातावरण , त्यांची समाजातील प्रतिमा आणि त्यांची प्रगती बघून मला तेव्हादेखील किव यायची आणि आत्ता  देखील वाईट वाटते. अशा अनेक विरोधकांना आजोबानी अनेकदा मदत केली होती व त्याची कधीच वाच्यता केली नाही. मला वाटते कि मोठ्या माणसाचे ते एक विशेष लक्षण असावे.

अश्या माझ्या आजोबांचे १० ऑक्टोबर १९९४ ला निधन झाले. यांच्या प्रेतयात्रेला प्रचंड जनसमुदाय जमला  होता. यावरून त्यांची प्रसिद्धी दिसते.

त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात त्यांनी पॉसिटीव्ह बदल घडवला किव्हा तसा  प्रयत्न केला. त्यांच्यापासून निश्चितच अनेकांना प्रेरणा मिळाली असेल. एक गरीब मागासवर्गीय समाजातून येऊन देखील त्यांनी सर्वामध्ये एक अत्यंत मानाचे  स्थान स्वकर्तुत्वाने व स्व हिमतीने मिळवले. हि त्यांचा जीवन प्रवास मला निश्चितच आदर्श वाटतो. अर्थातच आपण सर्वजण short memory मध्ये जगतो. 

ल. पा फुलपगार गुरुजी यांची आठवण मी माझ्या पद्धतीने किव्हा मला जाणवले / आठवले त्याप्रमाणे थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न केला. अनेक बाबी लिहायच्या राहिल्या आहेत, काही त्रुटी असतील परंतु सर्व फुलपगार परिवारात माझे आजोबा greatest होते याबद्दल कोणाचे दुमत नसणार. त्यांच्या हयातीत मी सज्ञान होतो त्यामुळे मला बऱ्यापैकी आठवण आहे. अर्थात त्यांच्या ग्रेटनेस किंवा सांसारिक यशामध्ये त्यांची पत्नी  बु. वत्सलाबाई लक्ष्मणराव फुलपगार (निवृत्त मुख्याध्यापिका , पार्ले महानगर पालिका शाळा ) यांचा मोठा वाटा आहे. त्याबद्दल नंतर लिहू.

सध्या corona virus संकटामुळे lockdown आहे त्यामुळे अनेक वर्षाची ईच्छा आज थोडक्यात पूर्ण झाली.


विशाल अशोक फुलपगार  (२६ एप्रिल २०२०)