पाठकगुरुजींबद्दल लिहायचे किंवा बोलायचे म्हटले तर त्यांच्या पत्नी "माई" यांच्याबद्दल बोलावेच लागेल. मी अनेकदा गुरुजींना सांगायचो कि तुमची एवढी ईश्वरसेवा आहे, संसार आहे, जनसंपर्क आहे, त्याचे ९५% श्रेय हे तुमच्या पत्नीला आहे. कारण तुमचे बॅक ऑफिस हे माईंच्या रूपाने सक्षमपणे काम करत होते त्यामुळेच तुम्ही फ्रंट ऑफिस ला बसून यशस्वी होऊ शकलात.
गुरुजी आणि माईंच्या आर्थिक परिस्थितीत जमीन आसमानाचा फरक होता. गुरुजींचे वडील भिक्षुकी करून संसार चालवत , त्यामुळे परिस्थिती बेताचीच होती. माईच्या घरी मात्र सुबत्ता होती. मोठे घर, वडिलांना सरकारी नोकरी, घरी नोकर चाकर, गाई होत्या. लग्नाआधी त्यांनी कधीच जेवण बनवले नव्हते आणि चहा तर कधीच घेतला नव्हता. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ ते खात. अर्थात गुरुजींच्या वडिलांनी माईंच्या आजोबाना वचन दिले होते. पण स्वतःची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे गुरुजी लग्नाला तयार नव्हते. शेवटी माईना त्यांनी प्रत्यक्ष भेटून सर्व सांगितले कि माझ्यासारख्या गरीबाशी लग्न करायचे असेल तर मनाची तयारी करा. तरीही माई तयार झाल्या. त्याप्रमाणे १८ डिसेंबर १९५० ला जळगावला खांबटे व्यायामशाळेत हे लग्न पार पडले.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी नेटाने संसार चालवला. सुरुवातीला त्यांच्याकडे २ साड्या होत्या. त्याच आलटून पालटून घालायच्या. घरात छोट्या डब्यामध्ये, कागदाच्या पुडीमध्ये मीठ मसाला भरलेला असे. चेहेऱ्यावर हास्य आणि समाधान त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवले.
सुरुवातीला मुंबई मधील अभ्युदय नगर मधील शासकीय घर, मग बांद्रा शासकीय वसाहतीतील घर आणि मग स्वतःचे माहीम मुक्तिधाम सोसायटी मधील घर असा त्यांचा प्रवास होता. खरे म्हणजे आमची ओळख झालेल्या दिवसापासून माई ने आम्हावर पुत्रवत प्रेम केले, कदाचित त्यामुळे आम्ही दीर्घकाळ गुरुजींकडे टिकलो. गुरुजी जर आम्हाला कधी काही बोलले तर माई आमच्या बाजूने बोलायच्या. माझ्या मुलांना काही बोलायचे नाही असा दम दयायच्या. गुरुजीपण म्हणायचे जर माझ्याकडे निवडणूका झाल्या तर मला कोणीच मत देणार नाही. सगळी मत माईला आणि माझे पण मत माईला जाणार. सगळेच माईच्या बाजूने आहेत. माझे डिपॉसिट जप्त.
माझी जेव्हापासून यांच्याशी ओळख झाली तेव्हापासून मला या दोघांमधील प्रेम/bonding जाणवले. नवरा बायको एकमेकांच्या मनातले ओळखायचे. लव्हबर्ड होते असे म्हणायला हरकत नाही. मी अनेकदा विचारले कि तुमचा प्रेम विवाह झाला आहे का तर ते नाही म्हणायचे. कारण दोघांचीही घरे जवळ जवळ होती. दोघांनीही सांगितले कि आमचे arrange marriage आहे. गुरुजी दिसायला हॅंडसम , व्यायामाचे शरीर , उंची , उपासनेचे तेज. त्यांच्याकडे होते. अर्थात माई श्रीमंत घरातील, घरात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खात असत, घरी नोकर चाकर. असे असताना त्यांनी गुरुजींसारख्या एखादया गरीबाशी का लग्न करावे ? हा प्रश्न मला होताच. परंतु त्यांनी मला तो फिल्मी डायलॉग ऐकवला "उसके पिताजीने मेरे पिताजीको वचन दिया था..." अर्थात त्यावेळेचे साक्षीदार न मिळाल्यामुळे मी दोघांच्याही बोलण्यावर विश्वास ठेवला.
लग्नानंतर जेवण शिकून देखील माई अत्यंत उत्कृष्ट स्वयंपाक बनवायच्या. अत्यंत कृश वाटणाऱ्या माईला मी कधीच दमलेले पाहिले नाही. तिचा कामाचा उरक जबरदस्त होता. एकट्याने ती अनेकांचे जेवण बनवायची. अन्नपूर्णा आम्ही डोळ्याने पहिली हे मात्र खरे. आयत्यावेळी कोणीही आले तरी त्याला काहीतरी खायला मिळायचेच. उपाशीपोटी तिच्या घरून कोणीच कधीच गेला नाही. तिला तिच्या नवऱ्याचा अत्यंत अभिमान होता. एवढ्या वर्षात मी माईला कधीच रागावलेले पहिले नाही.
गुरुजींनी पादत्राणे घालणे सोडल्यावर माईने देखील अनवाणी राहण्याचा निर्णय घेतला आणि शेवटपर्यंत तो निभावला. असे दुसरे उदाहरण या वेळेत मिळणे कठीण आहे.
गुरुजींप्रमाणेच माईची compatibility चांगली होती. तिचे सर्व वयोगटातील लोकांशी जमायचे. कधी कधी दुपारी ती TV बघायची. गुरुजींना त्रास होईल म्हणून आवाज mute असायचा. काय कळायचे काय माहित. आमची थट्टा मस्करी माई बरोबर पण चालायची. खूप मज्जा यायची.
दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम होते. They were made for each other. They were destined to be married.. उत्तम संसार कसा करावा याचे ते आदर्श उदाहरण होते आणि आहेच.
त्यांना तीन मुले व एक मुलगी.
सर्वात मोठा मुलगा राजूदादा आणि सून सुचेतावहिनी , नाशिक
नंतर संजय आणि सून रंजना वहिनी , डोंबिवली
नंतर कन्या जया आणि जावई श्री भट
सर्वात धाकटा अजय आणि सून पूजा वहिनी , ठाणे
त्याव्यतिरिक्त अनेक नातेवाईक , भक्तपरिवार त्यांचेच होते. सर्वांची त्या नियमित चौकशी करत. नऊवारी साडी नेसायच्या. चेहेऱ्यावर अलौकिक तेज होते. गुरुजी देखील माईना दचकून असायचे. त्यांचे ऐकले नाही तर त्या मला "तडफड मेल्या" असे म्हणायच्या.
माईना हॉटेल मध्ये खायला आवडायचे नाही. एकदा आम्ही १०-१५ जण काही कार्यक्रमाला गेलो होतो. येताना माटुंग्याला शोभा हॉटेल मध्ये काहीतरी खायला गेलो. तसे गुरुजी खाण्यापेक्षा, खाऊ घालण्याचे शौकीन. हॉटेलमध्ये माईसाठी एक डोसा मागवला. त्यांनी एक घास खाल्ला आणि उरलेला मला दिला. सांगितले कि त्यांचे पोट गच्च भरले आहे. औषधे तर त्या गुपचूप फेकूनच देत असत. अश्या असंख्य आठवणी आहेत.
गुरुजी राजा खैनी तंबाखू खायचे. त्यांना सवय होती. एकदा माईने सांगितले कि तुम्ही उद्यापासून तंबाखू खायची नाही. गुरुजींची अनेक वर्षांची सवय त्यामुळे त्यांची पंचाईत झाली. गुरुजींनी माईला सांगितले कि सध्याचा स्टॉक संपला कि मग परत आणणार नाही.
मग त्यांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली कि तू मला गुपचूप राजा खैनी आणून दे. माईला कळता कामा नये. तसे म्हटले तर चोरून एखादी गोष्ट करण्याची आम्हा दोघांनाही सवय नाही. त्यामुळे आमचे कठीणच होते. एक दोनदा माई स्वयंपाक घरात गेली असताना मी लगेचच गुरुजींना तंबाखूचे पाकीट दिले. आणि त्यांनी ते लगेच लपवले. त्यात आम्ही यशस्वी ठरलो. माई नेहमी विचारायची कि तुमचा स्टॉक संपला का? मी परत आणून देत असल्यामुळे तो संपायचाच नाही.
असाच एके दुपारी मी राजा खैनी तंबाखू घेउन गेलो. मी, माई, गुरुजी, हॉल मधेच बसलो होतो. ती किचन मध्ये मला काहीतरी खायला आणायला गेली.. कदाचित तिला संशय आला असेल का काय माहित नाही. मी लगेचच पुड्या काढल्या आणि गुरुजींना दिल्या. इतक्यात माई आली. आणि त्या गडबडीत ५/७ पुड्या गुरुजींसमोरच पडल्या. गोंधळ झाला. मी देखील लगेच वरती फॅन कडे पाहत म्हटले कि अरे हे कुठून आले, महाराज काय कुठून देतील काही सांगू शकत नाही. गुरुजी तर कावरेबावरे झाले होते. माईला कळाले कि मीच त्यांना पुरवठा करतो. मग त्यांनी मला भले मोठे lecture दिले. मी गुपचूप ऐकून घेतले. नंतर मात्र गुरुजींना माई ने परवानगी दिली. पण तंबाखू कमी करायला सांगितली. ते मात्र गुरुजींनी ऐकले. सप्लाय त्यांना मीच करायचो.
गुरुजींनी गाणगापूरला आश्रम बांधला हे काय त्यांना विशेष पसंत नव्हते. त्यांच्या मनात होते कि नरसोबाच्या वाडीला आश्रम बांधावा. परंतु पती इच्छा सर्वोच्च आहे असे त्यांनी मानले. तसेच माहीमच्या घरी दत्ताची मूर्ती होती. त्याला ते त्यांचा दत्त मानत . माझा दत्त माहीमला आहे असे त्या म्हणायच्या.
एकदा त्या खूप आजारी पडल्या तेव्हा गुरुजींनी महाराजांकडे माईंचे ३० वर्षे आयुष्य मागितले. आणि त्याप्रमाणे माई बऱ्या झाल्या. त्यानंतर २००५ ला माई ला सौम्य अर्धांगवायूचा झटका आला. खूप त्रास झाला नाही. दत्त महाराजांनी सांभाळले. १३ सप्टेंबर २००७ रोजी त्या पुढील प्रवासासाठी निघून गेल्या.
मला अजूनही तो दिवस आठवतोय १३ सप्टेंबर २००७. माईना इस्पितळात भरती केल्यावर गुरुजी म्हणाले कि आत्ता काही खरे नाही. गुरुजी म्हणजे एक स्थितप्रज्ञ व्यक्तिमत्व. डॉक्टरांनी जाहीर केल्यावर गुरुजींनी पुढची तयारी करायची जबाबदारी प्रत्येकाला दिली. कोणाला ऍम्ब्युलन्सची व्यवस्था, कोणाला फुलांची व्यवस्था, कोणाकडे माहीमच्या घराची व्यवस्था याची जबाबदारी दिली. मला मात्र त्यांनी दादर स्मशानभूमीत पुढील व्यवस्था करण्यासाठी पाठवले. तिकडची पावती मी बनवली.
मी सांताक्रूझ च्या हॉस्पिटलमधून दादरला स्मशानभूमीत जाऊन तिथली व्यवस्था करून पुन्हा माहीमला आलो. खूप गर्दी होती. संध्याकाळचे ७ वाजले होते. ७ वाजता गुरुजी प्रार्थना म्हणायचे. त्यात आईची प्रार्थना पण असायची.
माईचे पार्थिव घरात असताना देखील गुरुजींनी नेम चुकवला नाही. जगी माउली सारखे कोण आहे. ..... असे म्हणत असताना सर्वानाच अश्रू अनावर झाले.
माऊली प्रार्थना
जगी माऊली सारखे कोण आहे । जिचे जन्मजन्मांतरी ऋण आहे।।
असे ऋण हे की जया व्याज नाही। ऋणाविन ज्या जीवना साज नाही ।।
जिने सोसल्या यातना कोटी कोटी । तुला जन्म लाभे तिच्या पुण्य पोटी।।
जिच्या यातनांचे जगी मोल नाही । तिच्या सारखा लाघवी बोल नाही।।
जिने लाविला लेकरांना लळा या। तिच्या दैवी लेखी उन्हाळी झळा या ।।
जिच्या पूजनाला जगी फूल नाही । अशा देवतेचे जगी नाव “आई”।।
आमच्या टीमची कॅप्टन आम्हाला सोडून गेली आणि तिथूनच मानसिक दृष्ट्या गुरुजींनी स्वतःचा शेवटचा प्रवास सुरु केला.
आमचे भाग्य कि आम्हाला या दाम्पत्याचा सहवास लाभला. माईनी स्वतःचा प्रवास थांबवला पण प्रत्येकाच्या हृदयात त्या अजूनही जिवंत आहेत आणि निश्चितच त्यांचे स्थान हे गुरुजींपेक्षा वरचेच आहे.
पतिसेवा हि ईश्वरसेवा हे व्रत त्यांनी आयुष्यभर पाळले. त्यांनी वेगळी अशी कोणतीच उपासना केली नाही. गुरुजी आणि माई बरोबर घालवलेला वेळ हा मला स्वप्नवत वाटतो.
माईना साष्टांग नमन.
जय गुरुदेव

