चकवा हा शब्दप्रयोग गावी जास्त वापरला जातो. प्रवास करताना विशेषता रात्री , कधी कधी दिवसापण आपण अचानक रास्ता चुकतो व त्याच ठिकाणी फिरत राहतो. त्यातून बाहेर कसे पडायचे हे कळतच नाही. त्यात कधी कधी २-३ तास तर कधी कधी रात्रभर माणसे रस्ता ना सापडल्यामुळे त्याच ठिकाणी फिरत राहतात. याला चकवा म्हणतात. असाच एक अनुभव मला मुंबई मध्ये आला तो थोडक्यात सांगतो.
१९९२-९३ ची गोष्ट असेल. त्यावेळी आम्हा मित्रांचा मोठा ग्रुप होता. काहीही झाले तरीपण एकमेकांच्या सुख दुःखाला , मदतीला धावून जायचे हा अलिखित नियम , मग दिवस असो व रात्र असो. आमच्या मित्रांपैकी २ जणांकडे मोटरसायकल व दोघांकडे स्कुटर होती. ५० रुपयाचे पेट्रोल भरले कि आम्ही गडगंज श्रीमंत असल्यासारखे त्यावर डबल सीट फिरायचो. सगळे जण खार / बांद्रा मध्येच राहायचे. तेव्हा मोबाइल फोन नव्हते पण दोघं तिघांच्या घरी फोन होता , किंवा शेजारी फोन असायचा. एका कॉलोनीच्या गेटवर आम्ही जमायचो , हा आमचा अड्डा. तिथे धम्माल , मस्ती , प्लॅनिंग , गप्पा गोष्टी , सगळीकडच्या खबरी यांची देवाण घेवाण व्हायची. खूप छान दिवस होते ते. खिशात जास्त पैसे नसायचे , मग काँट्रीब्युशन काढून आम्ही वडापाव विकत घ्यायचो आणि ते वाटून खायचो. खूप सुखी आणि आनंदी जीवन होते. रोज संध्याकाळी भेटायच आणि मग रात्री ९ वाजता सभा बरखास्त करून आपापल्या घरी जेवायला जायचे असा रोजचा कार्यक्रम.
आमच्या एका जवळच्या मित्राचा मोठा भाऊ एकदा खूप सिरीयस झाल्यामुळे त्याला जे जे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले आणि संध्याकाळी आम्ही परतलो. रात्री ११ वाजता मला एकाने फोन करून सांगितले कि तो ऑफ झाला. मग मी सुभाष ला फोन केला. तो म्हटलं कि मी लगेच स्कुटर घेऊन येतो आपण हॉस्पिटल ला जाऊया. त्याप्रमाणे आम्ही अंदाजे रात्री १२. ३० ला खार वरून जे जे हॉस्पिटलला स्कुटरवर पोहोचलो. बाकीचे कोण कुठे आहेत काहीच पत्ता लागत नव्हता. रात्री जे जे हॉस्पिटल ला जाणे हा एक भयानक अनुभव. एकतर अंधार आणि आपत्कालीन वॉर्ड सोडला तर इतर ठिकाणी खूप शांतता. हा परिसर खूपच मोठा आहे. त्याला जिथे ऍडमिट केले होते त्या वॉर्ड मध्ये आम्ही पोहोचलो. तिथल्या सिस्टर ने सांगितले कि थोड्यावेळापूर्वी त्याचे शरीर पोस्ट मॉर्टेम सेंटर ला नेले आहे. मग मी आणि सुभाष स्कुटरवरून पोस्ट मॉर्टेम सेंटर शोधत शोधत तिथे पोहोचलो व तिथेच आमचे मित्र असतील असा अंदाज होता.
पोस्ट मॉर्टेम सेंटरच्या बाहेर स्कुटर पार्क केली आणि तिथे कोणीच नव्हते , पूर्ण शांतता होती आणि बाहेर एक डिम लाइट जळत होती. मग काय करावे ते कळेना . सुभाष बोलला कि आपण इथे कोणाला तरी विचारू. मी म्हटले अरे यार नको , रात्री कशाला तिथे जायचे. पण तो म्हटला कि इथपर्यंत आलोच आहोत तर विचारूया आणि मग जाऊया. बाहेर एकटे थांबण्यापेक्षा मी सुभाषबरोबर तिथल्या काउंटर वर गेलो तिथे कोणीच नव्हते. ५ मिनिटे थांबलो तर एक कर्मचारी आतून बाहेर आला, तो पण फुल्ल टाईट. त्याला नाव सांगितले तर त्याने लगेचच रजिस्टर चेक केले आणि सांगितले कि त्यांची बॉडी शवगृहामध्ये असेल नाही . तिथून आम्ही निघणार इतक्यात एक पूर्ण जळालेला मृतदेह घेवून हॉस्पिटल चे कर्मचारी आणि एक पोलीस आला. ते बघून आम्ही खूप घाबरलो. मी पहिल्यांदाच एक जळालेला मृतदेह पहिला होता. आम्ही दोघेही घाबरून पटकन स्कुटरकडे आलो. आणि स्कुटर ला किक मारून पण स्कुटर चालू होईना , मग अजूनच घाबरलो. मग स्कुटर एका बाजूला झुकवली आणि मग किक मारली , मग मात्र स्कुटर कशीबशी चालू झाली. भूत आहे कि नाही हे माहित नाही पण भुताची भीती मात्र नक्कीच आहे. आणि भुताने नाही तर, एवढ्या उशिरा तिथे गेलो म्हणून आमच्या घरातल्यानी आम्हाला धोपटून काढला असता हे निश्चितच.
जे जे हॉस्पिटलचा कॅम्पस खूप मोठा आहे. आम्ही लेफ्ट राईट करत फटाफट निघालो आणि बाहेर जाण्याऐवजी पुन्हा त्याच ठिकाणी परत आलो. मग परत निघालो आणि असे एकूण तीनदा झाले. घामाघूम झालो होतो. सुभाष म्हटला कि आपण बहुधा चकव्यात अडकलो , आत्ता इथून बाहेर पडणे मुश्किल आहे. विचारायला तिथे कोणीच नव्हते. कित्ती घाबरलो असू काही विचारूच नका. रात्रीचा अंधार , शांतता एकदम भीतीदायक. मग आम्ही धीर करून उलट्या दिशेने निघालो आणि नशिबाने आम्हाला तिथे मेडिकल च्या मुलांचे होस्टल लागले. तिथे कोणालातरी विचारले आणि त्याने मग रस्ता सांगितला आणि आम्ही मग पटकन बाहेर पडलो. रात्री २-३ वाजण्याच्या सुमाराला घरी पोहोचलो. आज अचानक हा प्रसंग आठवला म्हणून तुम्हाला सांगितला. त्यावेळी खूप भीती वाटली होती हे मात्र खरे.