Thursday, May 14, 2020

सुर्यास्त


सूर्यास्त 
दत्तलीन जगन्नाथ चिंतामण पाठक (गुरुजी )
(३ नोव्हेंबर १९२८- २० ऑगस्ट २०१४)
माझे सर्व हित I जाणी जगन्नाथ I
तेणे मी निश्चिन्त I  सर्व काळ I

आतापर्यंतच्या पुस्तकातील वाचनातून पाठक गुरुजींविषयी बहुतेक माहिती आपल्या सर्वांच्या लक्षात आली असेलच, परंतु पुढील प्रवासाला जाण्याआधीचे  थोडे महिने , या विषयी विशेष माहिती कोणाकडेच नाही. खरे म्हणजे  तो घटनाक्रम माझ्याही विस्मरणात चालला आहे. केवळ माझ्या लक्षात रहावे म्हणून मी लेखन करीत आहे . माझ्या दृष्टीने जे मी बघितले ,जे मला जाणवले , मला जे आठवत आहे किंवा मला गुरुजी जे काही बोलले याच्या आधारावर मी निरपेक्षपणे लिहून काढण्याचा प्रयत्न करत आहे. गुरुजींच्या भक्तपरिवारापैकी कोणाचा उल्लेख राहिला असेल तर क्षमस्व. तसेच या आठवणींकडे भाषा, व्याकरण, अहंकार, मीपणा वगैरेंच्या नजरेतून न बघता गुरुजींवर लक्ष केंद्रित करून बघावे. या मागील भावना व हेतू निश्चितच शुद्ध आहे. 


सौ. प्रतिभा जगन्नाथ पाठक (माई) यांचे २००७ साली निधन झाल्यावर साहजिकच गुरुजी थोडेसे एकटे पडले आणि मला वाटते येथूनच मानसिकदृष्ट्या त्यांनी त्यांच्या अंतिम प्रवासाला सुरुवात केली असावी. तत्कालीन परिस्थितीनुसार त्यांनी माहिमचे त्यांचे राहते घर सोडले व त्यांचा मुलगा श्री. संजय पाठक यांच्याकडे ते डोंबिवलीला राहायला गेले. (गुरुजींना राजू - नाशिक,  संजय- डोंबिवली, अजय - ठाणे  हे मुलगे आणि जयश्री हि मुलगी.) वास्तविक संजयकडे ते राहतील किंवा त्यांच्याकडे ते comfortable असतील असे मला अजिबात वाटले नाही. पण जसे आपल्याला वाटते किंवा दिसते, तसे कधीच नसते. सौ. रंजना व श्री. संजय यांनी त्यांच्या वडिलांची म्हणजे गुरुजींची उत्तम काळजी घेतली व त्यांना काहीही कमी पडू दिले नाही. आपले वडील आपल्याबरोबर राहतात हि liability नसून जबाबदारी आणि सन्मान आहे अशी त्यांची भावना होती.  कदाचित  गुरुजी म्हणून आपल्याला अनेक वर्षे लाभले पण वडील म्हणून त्यांच्या मुलांना म्हणावे तसे कधीच लाभले नव्हते त्याची कसर/ खंत भरून काढली असावी.  शिवाय गुरुजींना पेन्शन होती त्यामुळे त्यांचा आर्थिक भार नव्हताच.

नियती नेहमीच योग्यप्रकारे आपले काम करते, गुरुजींचा एकटेपणा दूर झाला, संजय - रंजनाला वडिल लाभले आणि चैत्रालीला आजोबा लाभले. गुरुजी डोंबिवली येथे राहण्याचे दुसरे कारण म्हणजे त्यांची मुलगी जयश्री भट हि देखील डोंबिवलीला राहते. गुरुजींच्या दोन मानसकन्या त्यापैकी सौ. छाया सरदेशपांडे या डोंबिवलीला राहतात. दुसरी मानसकन्या सौ. विदया फडणीस या मुंबई मध्ये विलेपार्ले येथे राहतात. छाया व विजय सरदेशपांडे यांच्या प्रेमविवाहात पाठक गुरुजींनीच नोव्हेंबर १९७९ ला कन्यादान केले होते.तेव्हापासून गुरुजींचे  सरदेशपांडे  कुटुंबाशी नात्यापेक्षा अधिक जवळचे संबंध आणि पाठक व सरदेशपांडे कुटुंबियांचे एकमेकांकडे येणे जाणे असायचे. त्यामुळे घराव्यतिरिक्त गुरुजी डोंबिवलीला सरदेशपांडे यांच्या घरी, अंधेरी येथे फडणीसकाकांच्या घरी मोकळेपणाने राहायचे. त्याव्यतिरिक्त जुहू येथे एका भक्ताच्या घरी एखादा दिवस राहत. मी देखील गुरुजींना भेटायला त्यादिवसात डोंबिवलीला जात असे. मी देखील गुरुजींना भेटायला त्या दिवसात डोंबिवलीला आठवड्यातून  एकदा जात असे. सौ. रंजना आणि गुरुजींबरोबर गप्पा मारायचो. चहापाणी झाला कि मग आम्ही दोघे बाहेर निघायचो.
ते राहत असलेल्या श्रीखंडेवाडीच्या कोपऱ्यावर एक नारळ पाणीवाला होता. तिथे आम्ही एक एक नारळ पाणी प्यायचो. मग गुरुजी मला जवळच्या एका उडपी हॉटेल मध्ये घेऊन जायचे. तिथे मी एक प्लेट इडली खायचो आणि मग आम्ही दोघे चहा प्यायचो. गप्पा मारायचो. हॉटेल चे पैसे गुरुजीच दयायचे. मग मला ते रिक्षा ने डोंबिवली स्टेशन ला सोडायचे आणि मग त्याच रिक्षा ने घरी यायचे. असा आमचा कार्यक्रम असायचा

साधारणपणे जानेवारी २०१२ मध्ये गुरुजींनी डोंबिवलीमधील ओम हॉस्पिटलमध्ये प्रोस्टेट ग्लॅन्डचे ऑपरेशन करायचे ठरवले. मी त्यांना भेटायला गेलो आणि विचारले कि तुम्ही संक्रांतीला का ऑपरेशन करताय? कारण तुम्हीच सर्वाना सांगताय कि संक्रांतीला काही जोखिमीचे कार्य करू नये.  त्यावर ते काही बोलले नाहीत. तारीख नक्की झाली आहे एवढेच ते मला बोलले. सरदेशपांडे कुटुंबाचे त्यादरम्यान गाणगापूरचे तिकीट होते ते त्यांनी रद्द  करायला सांगितले. 

ऑपरेशन ठीक झाले. हॉस्पिटलमध्ये थांबायची वेळ पाठक व सरदेशपांडे कुटुंबाने वाटून घेतली होती. विशेष काळजी करण्याचे कारण नव्हते परंतु अचानक दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना खूपच अस्वस्थ वाटू लागले. थोड्या उशिराने त्यांचा ECG काढल्यावर कळले कि त्यांना अगोदरच हृदयविकाराचा सौम्य धक्का येऊन गेला होता. त्यांना ताबडतोब ओम हॉस्पिटलच्या ICU मध्ये हलवले. 

ओम हॉस्पिटल तसे साधेच होते व तसे तिथे cardiac सुविधा नव्हती. त्यामुळे गुरुजींना तातडीने चांगल्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट  करणे गरजेचे होते. त्यावेळी संजय देखील सकाळी ऑफिसला निघाला होता. त्याच्याशी संपर्क झाल्यावर तो पुढच्या स्टेशनला उतरला व त्वरित परत आला. विजय आणि छाया सरदेशपांडे हॉस्पिटलमध्ये हजर होते. तोपर्यंत धावपळ सौ. रंजनाने केली. 

मी मुंबई मध्ये खारला राहायला, म्हणजे डोंबिवली पासून बराच लांब होतो. मला निरोप मिळताच मी लगेच निघालो व सकाळी ९ च्या सुमारास ओम हॉस्पिटलला पोहोचलो. विजय सरदेशपांडे म्हणाले की येथे जवळच आयकॉन नावाचे  चांगले cardiac हॉस्पिटल आहे. व तिथे त्यांच्या ओळखीची एक सिस्टर आहे. मग मी आणि विजय सरदेशपांडे आम्ही दोघे जाऊन हॉस्पिटल व त्यातील ICU बघून आलो. संजय, रंजना, छाया गुरुजींजवळ होते. एरवी संजय स्वतःला खूप डेरिंगबाज दाखवतो पण वडिलांची  अशी परिस्थिती पाहून तो घाबरला व तिथून हललाच नाही. त्याने सांगितले कि पैशाची चिंता नको पण आपण अण्णाना चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेऊया. गुरुजी तेव्हा ग्लानीमध्येच होते. आम्हीपण थोडे घाबरलो होतो. 

आम्ही सगळ्यांनी त्यांना cardiac ऍम्ब्युलन्स मधून आयकॉन हॉस्पिटलमध्ये नेऊन ICU मध्ये ऍडमिट केले. वातानुकूलित cardiac ऍम्ब्युलन्समध्ये  एक डॉक्टर होता व तो गुरुजींचे मॉनिटरिंग करत होता. १० मिनिटांचा प्रवास आम्हाला खूपच लांबचा वाटला. आयकॉन हॉस्पिटलमध्ये त्यांना खूपच चांगली ट्रीटमेंट मिळाली व थोड्याच दिवसांनी ते बरे होऊन घरी आले. राजू व कुटुंब नियमित नाशिकवरून येऊन गुरुजींना भेटून जात , कन्या जयश्री व जावई डोंबिवलीत असल्याकारणाने नियमित येत.

त्यादरम्यान त्यांना भेटायला अनेक माणसे यायची . मी रोजच जायचो. यानंतर मात्र पाठक गुरुजींचा स्टॅमिना थोडा कमी झाला व त्यांना दम लागायला लागला. हॉस्पिटलमध्ये सुद्धा लोक येऊन त्यांचे प्रश्न गुरुजींना सांगत व दत्त महाराजांना प्रार्थना करा अशी विनवणी करत. हा फारच विचित्र प्रकार होता. म्हणून गुरुजींना भेटायला येणाऱ्याजाणाऱ्यांची संख्या जाणीवपूर्वक कमी केली. अर्थात त्यात गुरुजींना आराम पडावा हाच हेतू होता. मला मात्र अजून पर्यंत तरी गुरुजींना कधीही भेटण्याची परवानगी होती.

यानंतर मात्र  गुरुजी विविध कारणाने एकदोनदा हॉस्पिटलवारी करून आले. ते बरे होऊन यायचे पण अशक्तपणा वाढतच होता आणि हे काही चांगले लक्षण नव्हते. सायंकाळ आली होती. सूर्यास्ताला अजून अवकाश होता पण सूर्यास्त उंबरठ्यापर्यंत आला होता.

२०१४ मध्ये त्यांनी एका शिष्याकडे जुहूला जायचे ठरवले म्हणजे त्या शिष्यानेच आग्रह केला. वास्तविक गुरुजी वर्षातून एकदा त्याच्याकडे राहायला जायचे, त्यामुळे त्यात काही विशेष नव्हते. परंतु तत्कालीन त्यांची तब्येत बघता संजय , रंजना, छाया, विजय यांनी जाऊ नका असे सांगितले. गुरुजींनी ते काही ऐकले नाही व ते जुहूला गेले. एरवी ते ऐकायचे, परंतु कदाचित ते घरी कंटाळले असतील किंवा त्यांना त्यांचा जीवनप्रवास माहित असेल, किंवा whatever.....

दुसऱ्या दिवशी पहाटे ते तिथे घरीच पडले. त्यांना चालता येईना व नाकाला दुखापत झाली होती. गुरुजींनी ताबडतोब सांगितले की मला डोंबिवलीला संजयकडे सोडा. संजयने घराजवळ असलेल्या पद्मश्री हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना सांगून खोली बुक केली. व आल्या आल्या त्यांना ऍडमिट केले. ज्यावेळी त्यांना आणले तेव्हा त्यांची अवस्था बिकट होती. X ray काढल्यावर डॉक्टर म्हणाले की मांडीच्या हाडातील बॉल क्रॅक झाला असून नवीन बसवावा लागेल नाहीतर त्यांना पुढील आयुष्यभर बेडवरच काढावे लागेल. तसेच त्यांची किडनी खूपच कमी म्हणजे २०-३०% काम करीत होती, त्यामुळे ऑपरेशन करताना किडनी वर लोड आला तर ऑपरेशन टेबलवरच हृदयविकाराचा झटका येऊन वाचण्याची शक्यता कमी. या सर्व घटनांचा मी साक्षीदार आहे. गुरुजींना मात्र याची कल्पना नव्हती.

आत्ता मुद्दा असा होता की काय करायचे व गुरुजींना कोण व काय सांगणार. सर्वजण प्रचंड तणावात असले तरी गुरुजी मात्र अत्यंत शांत व रिलॅक्स होते. अज्ञानात सुख असते किंवा त्यांना त्यांचा जीवनपट माहित असावा. संजय, रंजना तर रडायचेच बाकी होते. सरदेशपांडे दाम्पत्याचीही परिस्थिती काही वेगळी नव्हती. यातून लवकर निर्णय घेणे/ मार्ग काढणे जरुरीचे होते. सर्वांमध्ये विजय सरदेशपांडे जास्त घाबरले नव्हते. खरे म्हणजे अडचणीच्या वेळी आम्ही नेहमीच गुरुजींना विचारायचो आणि त्याप्रमाणे संजय, रंजना, विजय, छाया आणि मी त्यांच्या रूम मध्ये गेलो व त्यांना सत्य परिस्थिती सांगितली. सांगितले की दोन्हीही बाबतीत तुमच्या जीवाला धोका आहे.

सौ. रंजना तर धाय मोकलून रडेल की काय असे आम्हाला वाटले. कारण तिला अण्णा हवे होते व आम्हाला गुरुजी हवे होते. डोंबिवलीला राहायला आल्यापासून तिचे आयुष्य गुरुजींच्या वेळेशी जुळले होते. अगदी लहान मुलासारखी संजय व रंजना दोघेही अण्णांची काळजी घायचे. त्यादरम्यान त्यांची स्वतःची मुलगी चैत्राली पुणे येथे ऍडमिट होती, म्हणजे धावपळ काही विचारूच नका. संजय पुणे आणि डोंबिवलीकडे कायम येऊन जाऊन असायचा. 

गुरुजींचे जेवण , त्यांची औषधे , त्यांना डॉक्टर कडे घेऊन जाणे, रिपोर्ट आणणे , followup करणे यात सौ. रंजना खूपच बिझी असायची व सर्वेकाही प्रेमाने करायची. अर्थात सरदेशपांडे कुटुंब नेहमीच मदतीला असायचेच. ओम हॉस्पिटल मध्ये ऑपरेशनच्या आधी डॉक्टर ने सांगितले की रक्त लागू शकते तेव्हा ती पटकन स्कुटी वर जाऊन ब्लड बँक मधून दोन बाटल्या रक्त घेऊन आली होती , कोणासाठीच थांबली नाही. 

असो, तर गुरुजींना सांगायला त्यांच्या हॉस्पिटल रूम मध्ये रंजना , संजय , विजय , छाया व मी असे आम्ही ५ जण गेलो व अत्यंत गंभीरपणे त्यांना सांगितले आणि त्यांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने डोळे बंद करून सर्वकाही ऐकले व लगेच बोलले की आपण ऑपरेशन करायचे आणि सौ रंजना ला सांगितले कि मला काही होणार नाही माझी काळजी करू नकोस आणि मी हॉस्पिटलमधून बरा होऊन तुझ्या घरी येईन. गुरुजींनी म्हटल्यावर ताबडतोब दुसऱ्या दिवशी ऑपरेशन करायचा निर्णय घेतला. गुरुजींची निर्णयक्षमता नेहमीच फास्ट होती. गुरुजीचे  ऑपरेशन यशस्वी होईल का याबद्दल मी तरी साशंक होतो. पण त्यांनी त्यांच्या सुनेला दिलेल्या शब्दाला ते जागतील असा दृढ विश्वास होता. 

सकाळी आम्हा व्यतिरिक्त त्यांची मुलगी ,जावई , फडणीसकाका व इतर मोजकी भक्तमंडळी याना गुरुजी भेटले आणि रीलॅक्समध्ये OT मध्ये गेले. आम्ही मात्र बाहेर वाट बघत थांबलो अगदी चित्रपटाप्रमाणे. हा वेळ खूपच हळू जात होता. ऑपरेशन यशस्वी झाले व कालांतराने गुरुजी हॉस्पिटलमधून discharge होऊन पुन्हा संजयच्या घरी आले. त्यांना चालायला walker होता. अशक्तपणा होता पण गुरुजी घरातच चालत फिरत . येथपर्यंत मी गुरुजींच्या प्रत्यक्ष संपर्कात होतो. अशक्तपणामुळे  गुरुजींना बाहेरच्या लोकांना भेटायला मनाई करण्यात आली. फक्त सरदेशपांडे परिवार व त्याच्या जावयाचा परिवार म्हणजे भट परिवार त्यांना भेटायला जात असे.

हळूहळू गुरुजींनी फोन घेणे बंद केले. तोपर्यंत मी त्यांना रोज सकाळी १० वाजता फोन करीत असे. सकाळी दहा वाजता फोन वाजला कि सगळे जण सांगत कि विशालचा फोन आला. हि वेळ सर्वत्र प्रसिद्ध होती. खरे म्हणजे मी या परिस्थितीमध्ये काही विशेष करू शकत नव्हतो आणि संजय, रंजना, छाया व विजय हे सर्वजण उत्तम प्रकारे सेवा करीत आहेत हे माहिती होते त्यामुळे मी निर्धास्त होतो. विजय सरदेशपांडेंकडून मला गुरुजींच्या तब्येतीची नियमित माहिती मिळत होती. गुरुजी यातून नक्की बरे होतील अशी आम्हाला आशा होती. पण सूर्योदयानंतर सूर्यास्त हा  होणारच व तो कोणालाही चुकला नाही. आसमंतात अनेक ग्रह तारे आहेत पण ते आपल्या लक्षात राहत नाहीत, आमच्या आयुष्याला ऊर्जा देणारा हा एकच सूर्य.

गुरुजी घरातच चालत असत , बोलत असत , स्वतःची कामे ते स्वतःच करीत. पण त्यांना अशक्तपणा प्रचंड होता. त्यांना गाणगापूरला जायचे होते असे ते नेहमी बोलून दाखवत. विजय सरदेशपांडे गुरुजींना म्हणाले की आपण स्पेशल गाडी करून गाणगापूरला जाऊन येऊ. तेव्हा गुरुजींनी स्पष्ट सांगितले कि आत्ता मला शक्य नाही.ते रहात जरी डोंबिवलीला असले तरी त्यांचे चित्त गाणगापूरला होते. त्यांच्या हयातीतच त्यांनी गाणगापूर आश्रमाची नीट व्यवस्था केली होती. सर्व विश्वस्तांच्या नेमणूक केल्या होत्या , श्री. उन्मेष पाटील हे गाणगापूरला राहून आश्रमाची व्यवस्था बघायचे, फडणिसकाका आश्रमाची इतर कामे बघायचे , मुलगा आणि सून हे त्यांची व्यवस्थित काळजी घेत होते. त्यामुळे ते समाधानी होते.

२० ऑगस्ट २०१४ ला रात्री जेवण करून ते उठले आणि जागीच हार्ट अटॅक येऊन कोसळले. सूर्यास्त झाला होता. अनेकांच्या आयुष्यात दत्तभक्ती, सचोटी, विश्वास, आदर, commitment, सकारात्मक बदल घडवणारा हा सूर्य निसर्गाच्या नियमाप्रमाणे लय पावला. शेवटपर्यंत ते बोलत होते. सर्वावर दुःखाचा डोंगर कोसळला. मृत्यू हे अटळ सत्य असले तरी आपण ते कधीच स्वीकारत नाही. अत्यंत शांतपणे ते पुढच्या प्रवासाला निघून गेले.

माझे गुरु, माझे मित्र, माझा पाठीराखा, माझे हितचिंतक, माझे मार्गदर्शक, माझा आधार, माझा आदर्श, माझा संरक्षक, My buddy, मला आणि आपल्याला सोडून गेला. जाताना भरपूर प्रेम, आठवणी,  भक्तिभाव व माझ्यासारख्या अनेकांना दत्तसंप्रदायात सामील करून गेले. अर्थात सूर्य मावळला तरी त्याला सूर्यच बोलतात.

दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा डोंबिवली मध्येच अंत्यविधी केला. त्यावेळी त्यांचा भक्तपरिवार, सर्व मुले, नातेवाईक वगैरे मोठ्या संख्येने उपस्थित होते. तेव्हाही एक विशेष घटना घडली. मी तर त्या गर्दीत कुठेतरी मागे होतो. अचानक कोणीतरी सांगितले की स्मशानातील ऑफिस मध्ये जाऊन लाकडांची रिसिट घ्या. आणि त्यात नावात चुका नको, कारण मग डेथ सर्टिफिकेट तसेच बनते आणि मग त्रास होतो. योगायोगाने मी त्या ऑफिसच्या जवळ होतो. मी तिथे गेलो आणि काळजीपूर्वक ती पावती बनवून घेतली. गुरुजी आणि माई या दोघांचीही शेवटची पावती योगायोगाने माझ्या हातून बनली याची जाणीव मला तेव्हा झाली नाही पण नंतर झाली.  

थोड्या दिवसांनी संजय पाठकचा फोन आला व त्याने सांगितले की एक अस्थी कलश तुम्ही गाणगापूरला विसर्जित करा. मी ताबडतोब विजय पाटील ला कराडहून बोलावून घेतले कारण मला मुंबईमधून एकट्याने गाडी चालवणे शक्य नव्हते. मग मी, विजय पाटील आणि अभिषेक विजय सरदेशपांडे असे आम्ही गाडीने गाणगापूरला अस्थी कलश घेऊन गेलो.


सकाळीच श्री. संजय पाठक यांच्या घरी डोंबिवली ला जाऊन अस्थी घेतल्या आणि मग गाणगापूर ला गेलो 


मी व विजय पाटीलने आलटून पालटून गाडी चालवली. श्री. उन्मेष पाटीलने आश्रमामध्ये दर्शन व्यवस्था केली होती. फडणीसकाका आधीच ट्रेन ने पोहोचले होते. गाणगापूरच्या ब्राम्हणांनी व इतरांनी अस्थी कलशाचे दर्शन घेतले व गुरुजींना श्रद्धांजली वाहिली. शुभांगीबुवा , शुभराय मठ सोलापूर या प्रसंगी उपस्थित होत्या. त्यांच्या  साक्षीने अस्थींचे गाणगापूर येथील तीर्थावर विसर्जन केले. गुरुजींनी स्थापन केलेल्या, बांधलेल्या "जय गुरुदेव" आश्रमाच्या वास्तूमध्ये शेवटी ते अस्थिरुपाने आले.

गाणगापूर आश्रमात अस्थिकलश दर्शन 

गाणगापूर आश्रमात शुभांगीबुवा व उन्मेषदादा सोबत 




नंतर प्रथेप्रमाणे पाठक गुरुजींचे १३ दिवसाचे कार्य डोंबिवली येथे त्यांच्या निवडक नातेवाईक आणि भक्तपरिवाराच्या उपस्थितीत झाले. अर्थात मी पण तिथे हजर होतोच. सर्व पूजा विधी झाल्यावर एका ताटात जेवण ठेवले. पण कावळा जेवण खायला तयारच नव्हता. सर्वजणांनी प्रार्थना केली, माफी मागितली पण काहीच नाही. बराच वेळ झाला. सगळे ताटकळत होते. कोणालाच काही कळेना. मग विजय सरदेशपांडे यांनी पाठकगुरुजींच्या सुनेला म्हणजे सौ. रंजना संजय पाठकला सांगितले कि तू गुरुजींना प्रार्थना कर कि तू कायम "जय गुरुदेव परिवाराचे " स्वागत करशील. 

आश्चर्य म्हणजे तिने मनोमन प्रार्थना केल्या केल्या अचानक अनेक कावळे जमले आणि त्यांनी ते अन्न खाल्ले. काय झाले, कसे झाले ते माहित नाही.  पण हे घडले हे मात्र खरे आणि  गुरुजींच्या जीवनातील या घटनेचाही मी साक्षीदार झालो. 

एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या, वैयक्तिक व सामाजिक आयुष्यात सचोटीने, निष्कलंक व साधेपणाने जगणाऱ्या, असंख्य गुरुचरित्र पारायणे व जप केलेल्या एका महान योगी सत्पुरुषाचा अशा प्रकारे जीवन प्रवास संपन्न झाला. अलिप्तपणे  सर्व काही कसे सोडून जावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे पाठक गुरुजी.  कायम दत्त भक्तमंडळींच्या सहवासात रहाणाऱ्या पाठक गुरुजींनी आयुष्याच्या शेवटी जवळपास एकांतवासात दिवस काढले. पेन्शन अकाउंट व्यतिरिक्त त्यांचे कोणतेही बँक अकॉउंट त्यांनी ठेवले नाही. मुलांना आणि आश्रमाला त्यांनी सर्वकाही ते असतानाच वाटून टाकले. शेवटी शेवटी त्यांच्याकडे स्वतःच्या गरजेपुरतेच सामान होते.   

गुरुजींबरोबर अनेक वर्षे राहिल्यामुळे त्यांची कायम आठवण येत असतेच परंतु  या विषयावर लिहावे या विचाराने खूपच बेचैन झालो होतो. शिवाय हा गुरुजींचा शेवटचा प्रवास मला तरी माझ्या म्हातारपणी वाचायला मिळावा म्हणून मीच माझ्यासाठी तटस्थपणे लिहून काढला. कदाचित काही त्रुटी असतील, कुठे काही उल्लेख राहिला असेल/ असू शकतो पण  दुर्लक्ष करावे हि विनंती. फक्त सूर्याच्या प्रवासावर लक्ष द्या कारण त्याच्याच प्रकाशात आपण उजळून निघालो आहोत.

माझ्या आई वडिलांची पुण्याई की मला अशा सत्पुरुषाचा सहवास लाभला. मला माहित आहे की इथे सूर्यास्त झाला म्हणजे नक्कीच या सूर्याचा कुठे तरी उदय झाला असणार व याने तिथेपण श्री गुरुचरित्र पारायण आणि जप करणाऱ्यांची टीम नक्कीच बनवली असणार यात काहीच शंका नाही. आमचा सूर्य नवीन जोमाने पलीकडे प्रकाश देत असणारच कारण तेच त्याचे जीवन ध्येय आहे. 

जय गुरुदेव 

विशाल फुलपगार 
१३ मे २०२०

दत्तलीन श्री. पाठक गुरुजी यांच्या जीवनावरील "जगन्मित्र" या पुस्तकाचे विमोचन स्वातंत्रवीर सावरकर स्मारक , दादर , मुंबई येथे २५ डिसेंबर २०१२ ला मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तो कार्यक्रम पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा. 

https://www.youtube.com/watch?v=V32T5DWEor8&list=PLsAsEAuSOBwdOoqO44f_ZFkqLrO7aPsva&index=2&t=7904s