Sunday, August 16, 2020

चकवा



चकवा हा शब्दप्रयोग गावी जास्त वापरला जातो. प्रवास करताना विशेषता रात्री , कधी कधी दिवसापण आपण अचानक रास्ता चुकतो व त्याच ठिकाणी फिरत राहतो. त्यातून बाहेर कसे पडायचे हे कळतच नाही. त्यात कधी कधी २-३ तास तर कधी कधी रात्रभर माणसे रस्ता ना सापडल्यामुळे त्याच ठिकाणी फिरत राहतात. याला चकवा म्हणतात. असाच एक अनुभव मला मुंबई मध्ये आला तो थोडक्यात सांगतो. 

१९९२-९३ ची गोष्ट असेल. त्यावेळी आम्हा मित्रांचा मोठा ग्रुप होता. काहीही झाले तरीपण एकमेकांच्या सुख दुःखाला , मदतीला धावून जायचे हा अलिखित नियम , मग दिवस असो व रात्र असो. आमच्या मित्रांपैकी २ जणांकडे मोटरसायकल व दोघांकडे स्कुटर होती. ५० रुपयाचे पेट्रोल भरले कि आम्ही गडगंज श्रीमंत असल्यासारखे त्यावर  डबल सीट फिरायचो. सगळे जण खार / बांद्रा मध्येच राहायचे. तेव्हा मोबाइल फोन नव्हते पण दोघं तिघांच्या घरी फोन होता , किंवा शेजारी फोन असायचा. एका कॉलोनीच्या गेटवर आम्ही जमायचो , हा आमचा अड्डा. तिथे धम्माल , मस्ती , प्लॅनिंग , गप्पा गोष्टी , सगळीकडच्या खबरी यांची देवाण घेवाण व्हायची. खूप छान दिवस होते ते. खिशात जास्त पैसे नसायचे , मग काँट्रीब्युशन काढून आम्ही वडापाव विकत घ्यायचो आणि ते वाटून खायचो. खूप सुखी आणि आनंदी जीवन होते. रोज संध्याकाळी भेटायच आणि मग रात्री ९ वाजता सभा बरखास्त करून आपापल्या घरी जेवायला जायचे असा रोजचा कार्यक्रम.

आमच्या एका जवळच्या मित्राचा मोठा भाऊ एकदा खूप सिरीयस झाल्यामुळे त्याला जे जे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले आणि संध्याकाळी आम्ही परतलो. रात्री ११ वाजता मला एकाने फोन करून सांगितले कि तो ऑफ झाला. मग मी सुभाष ला फोन केला. तो म्हटलं कि मी लगेच स्कुटर घेऊन येतो आपण हॉस्पिटल ला जाऊया. त्याप्रमाणे आम्ही अंदाजे रात्री १२. ३० ला खार वरून जे जे हॉस्पिटलला  स्कुटरवर पोहोचलो. बाकीचे कोण कुठे आहेत काहीच पत्ता लागत नव्हता. रात्री जे जे हॉस्पिटल ला जाणे हा एक भयानक अनुभव. एकतर अंधार आणि आपत्कालीन वॉर्ड सोडला तर इतर ठिकाणी खूप शांतता. हा परिसर खूपच मोठा आहे. त्याला जिथे ऍडमिट केले होते त्या वॉर्ड मध्ये आम्ही पोहोचलो. तिथल्या सिस्टर ने सांगितले कि थोड्यावेळापूर्वी त्याचे शरीर पोस्ट मॉर्टेम सेंटर ला नेले आहे. मग मी आणि सुभाष स्कुटरवरून पोस्ट मॉर्टेम सेंटर शोधत शोधत तिथे पोहोचलो व तिथेच आमचे मित्र असतील असा अंदाज होता. 

पोस्ट मॉर्टेम सेंटरच्या बाहेर स्कुटर पार्क केली आणि तिथे कोणीच नव्हते , पूर्ण शांतता होती आणि बाहेर एक डिम लाइट जळत होती. मग काय करावे ते कळेना . सुभाष बोलला कि आपण इथे कोणाला तरी विचारू. मी म्हटले अरे यार नको , रात्री कशाला तिथे जायचे. पण तो म्हटला कि इथपर्यंत आलोच आहोत तर विचारूया आणि मग जाऊया. बाहेर एकटे थांबण्यापेक्षा मी सुभाषबरोबर तिथल्या काउंटर वर गेलो तिथे कोणीच नव्हते. ५ मिनिटे थांबलो तर एक कर्मचारी आतून बाहेर आला, तो पण फुल्ल टाईट. त्याला नाव सांगितले तर त्याने लगेचच रजिस्टर चेक केले आणि सांगितले कि त्यांची बॉडी शवगृहामध्ये असेल नाही . तिथून आम्ही निघणार इतक्यात एक पूर्ण जळालेला मृतदेह घेवून हॉस्पिटल चे कर्मचारी आणि एक पोलीस आला. ते बघून आम्ही खूप घाबरलो. मी पहिल्यांदाच एक जळालेला मृतदेह पहिला होता. आम्ही दोघेही घाबरून पटकन स्कुटरकडे आलो. आणि स्कुटर ला किक मारून पण स्कुटर चालू होईना , मग अजूनच घाबरलो. मग स्कुटर एका बाजूला झुकवली आणि मग किक मारली , मग मात्र स्कुटर कशीबशी चालू झाली. भूत आहे कि नाही हे माहित नाही पण भुताची भीती मात्र नक्कीच आहे. आणि भुताने नाही तर, एवढ्या उशिरा तिथे गेलो म्हणून आमच्या घरातल्यानी आम्हाला धोपटून काढला असता हे निश्चितच. 

जे जे हॉस्पिटलचा कॅम्पस खूप मोठा आहे. आम्ही लेफ्ट राईट करत फटाफट निघालो आणि बाहेर जाण्याऐवजी पुन्हा त्याच ठिकाणी परत आलो. मग परत निघालो आणि असे एकूण तीनदा झाले. घामाघूम झालो होतो. सुभाष म्हटला कि आपण बहुधा चकव्यात अडकलो , आत्ता इथून बाहेर पडणे मुश्किल आहे. विचारायला तिथे कोणीच नव्हते. कित्ती घाबरलो असू काही विचारूच नका. रात्रीचा अंधार , शांतता एकदम  भीतीदायक. मग आम्ही धीर करून उलट्या दिशेने निघालो आणि नशिबाने आम्हाला तिथे मेडिकल च्या मुलांचे होस्टल लागले. तिथे कोणालातरी विचारले आणि त्याने मग रस्ता सांगितला आणि आम्ही मग पटकन बाहेर पडलो. रात्री २-३ वाजण्याच्या सुमाराला घरी पोहोचलो. आज अचानक हा प्रसंग आठवला म्हणून तुम्हाला सांगितला. त्यावेळी खूप भीती वाटली होती हे मात्र खरे. 

Tuesday, July 7, 2020

माझी पाठकगुरुजींशी ओळख कशी झाली

७ जुलै २०२० 

पाठकगुरुजींशी माझी ओळख कशी झाली हे "जगन्मित्र " पुस्तकात लिहिलेच आहे. आत्त्ता जरा सविस्तरपणे लिहितो. यातून गुरुजींच्या स्वभावाबद्दल अजुन काही माहिती मिळावी हा उद्देश आहे. 

तर, सौ साल पुरानी  बात है जब मे २३ साल का था...... 
गुरुजी व माई 
मी तसा देवावर अजिबात विश्वास नसणारा व्यक्ती, अजूनही खूप विश्वास आहे अशातला भाग नाही. संजय हा माझा शालेय वर्गमित्र म्हणजे brother  फ्रॉम another  पेरेंट्स. माझ्या आणि पाठकगुरुजींच्या भेट होण्याला आणि पुढे मैत्री होण्यासाठी हा मुख्य आरोपी म्हणजे आरोपी नंबर १ आहे. सुभाष हा पण आमचा शाळेतला घनिष्ट मित्र. पुढे कॉलेज मध्ये गेल्यावर हे एका कॉलेजला आणि मी दुसरीकडे गेलो. पण संपर्क मात्र कायम असायचा. पंकजभाऊ हे संजय आणि सुभाषच्याच्या बरोबर कॉलेजमध्ये आणि त्यांची घनिष्ट मैत्री. आम्ही चौघे नियमित भेटायचो.  संजयचे वडील पांडुरंग पाटील (नाना), हे पोलीस खात्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि खूप मोठे साधक व नवनाथ उपासक. नोकरी सांभाळून ते नियमित उपासना करायचे. रोजचा त्यांचा ३०,००० श्रीराम जप असायचा. आमचे पण ते खूप लाड करायचे, अजूनही करतात. बऱ्याच भेटीगाठी संजयच्या घरी व्हायच्या. 

नानांचे गुरु हे पेडर रोड, मुंबईला रहायचे व त्यांच्याबद्दल आम्ही ऐकून होतो, पण कधी भेटायचा योग आला नाही. ते २० मार्च १९८६ला पुढे गेले.  तिथेच पुष्पाताई सामंत (निवृत्त महानगरपालिका शाळा मुख्याध्यापिका ) या पण मुख्य साधक होत्या व त्या नानांच्यापण ओळखीच्या होत्या. एकदा आम्ही चौघे (या पुढे आम्ही म्हणजे मी, सुभाष, संजय आणि पंकजभाऊ) पुष्पाताईंकडे दादरला गेलो. गप्पा मारता मारता त्या म्हणाल्या की जाताना दादरला स्वामी समर्थ मठामध्ये जाऊन मग पुढे जा. मी म्हटले मी बाहेरच थांबतो. त्यांनी सांगितले कि तू एक नारळ घेऊन आत जा, स्वामीना नारळ अर्पण कर, थोडा वेळ बस. जर बरे वाटले तर ठीक अन्यथा कधीच जाऊ नकोस. मग आम्ही मठात गेलो. मला बरे वाटले. शांतता वाटली , तो अनुभव चांगला होता. हळूहळू आम्ही दर गुरुवारी पुष्पाताईंकडे जात असू, त्या स्वामींच्या उपासक होत्या आणि गप्पा पण छान रंगायच्या. काहीतरी खायला द्यायच्या, आणि गरम दुधात साखर घालून द्यायच्या. त्यांच्या व नानाच्या गप्पामधून त्यांच्या पेडर रोडच्या गुरुजींबद्दल खूप ऐकायला मिळायचे. ते मात्र २०/३/८६ला गेल्यामुळे भेट झाली नाही , म्हणजे तेव्हा आम्ही शाळेत ८वी ला असू.

पुष्पाताई सामंत यांच्याबरोबर पाठकगुरुजी 


संजयचे वडील नाना बरोबर पाठकगुरुजी 
आम्ही देखील पुष्पाताईना उत्सुकतेने विचारात असू कि आत्ताच्या वेळेला अशी कोणी अधिकारी व्यक्ती आहे का ? त्या काहीच उत्तर देत नसत. मला वाटते कि एक दिड वर्षांनी त्यांनी आम्हाला सांगितले कि पेडर रोडच्या गुरुजींकडे एक फाटक गुरुजी यायचे, ते खूप सात्विक आहेत, गायत्री उपासक आहेत, त्यांना तुम्ही भेटा. ते माहीमला रहेजा हॉस्पिटल समोरच्या कोणत्यातरी बिल्डिंगमध्ये टॉप फ्लोरला कोपऱ्याच्या खोलीत राहतात. एवढा पत्ता त्यांनी सांगितला. एवढी माहिती आणि चुकीचे आडनाव घेऊन गुरुजींकडे आम्हाला पाठवणाऱ्या पुष्पाताई सामंत या आरोपी नंबर २ आहेत.

मग आम्ही रहेजा हॉस्पिटलच्या समोर, आजूबाजूला असलेल्या सर्व बिल्डिंगच्या खाली जिन्यात असलेल्या नावाच्या पाट्या वाचल्या. तिथे कोणत्याही मजल्यावर फाटक अशी नावाची पाटी आढळली नाही. आम्हाला वाटले की कदाचित गुरुजी घर विकून दुसरीकडे राहायला गेले असतील. पण मुख्य आरोपीने असे फर्मान काढले कि आपण सर्व बिल्डिंगच्या टॉप मजल्यावर आणि त्याखालील मजल्यावर जाऊन चौकशी करायची. ते आम्ही सुरु केले. आणि माहीम मुक्तिधाम सोसायटी च्या ५व्या मजल्यावरील त्यांच्या शेजाऱ्याने सांगितले कि इथे पाठकगुरुजी राहतात फाटक नाही. आणि ते गायत्री उपासक आहेत का ते माहित नाही पण दत्तभक्त आहेत. सध्या ते नवरा बायको नाशिकला त्यांच्या मोठ्या मुलाकडे म्हणजे राजूदादा कडे असतात , त्याचा पत्ता आमच्याकडे नाही. पण कधीतरी एक दोन दिवसासाठी येतात आणि लगेच जातात. चला म्हणजे हेच ते असणार असा कयास आम्ही बांधला. आत्ता गुरुजी मुंबई ला येणार कधी व आम्हाला कळणार कसे हे काहीच कळायला मार्ग नाही.

मग पंकजभाऊ यांनी सांगितले कि आपण गुरुवारी संध्याकाळी दादर मठातून बांद्रा ला येताना या रस्त्याने येऊ आणि घरातली लाईट चालू असेल / खिडकी उघडी असेल म्हणजे ते आलेत असे समजू. हे आम्हाला पटले. पुढच्या गुरुवारी ताईना आम्ही सांगितले कि त्यांचे आडनाव फाटक गुरुजी नाही तर पाठकगुरुजी आहे.  तो पर्यंत इतकी वर्षे त्या फाटक गुरुजी असे बोलायच्या. मग असे अनेक गुरुवार संध्याकाळी रात्री आम्ही आशेने त्या घराची लाईट चालू आहे का बघायचो. तिथून फेरी मारायचो. तो पर्यंत आमच्या आणि गुरुजींच्या मैत्रीच्या रस्त्यावर अंधार होता.

एकदा १९९६ का ९७च्या दत्तजयंतीला आम्ही दादर मठातून संध्याकाळी उशिरा निघालो. नेहमीच्या रस्त्यावरून परतलो. आज गुरुवार नसल्यामुळे, किंवा गप्पांच्या ओघात आम्ही त्या इमारतीकडे लक्ष दिले नाही. उशीर झाल्यामुळे थोडे घाईतच होतो. घाईतच गुरुजींची माहीम मुक्तिधामची इमारत ओलांडून पुढे गेलो आणि सुभाष बोलला कि त्याने कदाचित गुरुजींच्या घराची लाइट चालू आहे असे बघितली. आम्ही लगेच गाडी बाजूला लावली. घरी जायला उशीर झाला होता , पण सुभाषने सांगितले कि त्याने नक्की पाहिले. इतके दिवस ती लाइट बंद बघायची आम्हाला सवय होती. आणि आम्ही गाडी फिरवली आणि विश्वासच बसेना,  माहिम मुक्तिधाम इमारतीतील पाचव्या मजल्यावरील पाठक गुरुजींच्या घराची लाईट चालू होती आणि खिडकी उघडी होती, म्हणजे नक्की गुरुजी घरात होते. 

विजय पाटील, पाठकगुरुजी , मी आणि संजय पाटील 
घरी जाऊन त्यांना भेटायचे ठरवले. हातात पेढे, फुले असे काहीच नव्हते व तसा विचारही मनात आला नाही. त्यावेळी २३-२४ वय असेल. त्यांना भेटून त्यांना काय सांगायचे हा पहिला प्रश्न आणि यांनी काही विचारले तर काय उत्तर द्यायचे हा दुसरा प्रश्न आमच्या समोर होता. 

संजयच्या वडिलांचे गुरुजी परिचयाचे होते त्यामुळे आमच्या टीमचे नेतृत्व त्यानेच करायचे आणि बाकीच्यांनी गप्प बसायचे अशी स्ट्रॅटेजि आम्ही ठरवली. गुरुजी पहिल्या भेटीत काही परीक्षा घेतील का ? कोणता मंत्र, रामरक्षा types म्हणायला सांगतील का ? का आलात असे विचारतील का ? माझी वेळ न घेता आलात असे बोलतील का ? असे असंख्य प्रश्न मनात येत असताना आम्ही ५ मजले चढून त्यांच्या घराच्या दारात पोहोचलो. दत्त जयंती असल्यामुळे अनेकजण येत जात होते. घराबाहेर आणि जिन्यात खूप चपला होत्या, सर्वांकडे पेढे, फुले,नारळ वगैरे होते. आम्ही मात्र "खाली हात आया है तू , खाली हात जायेगा" या कव्वालीप्रमाणे रिकाम्या हाताने दर्शनाच्या रांगेत उभे राहिलो.

आरोपी क्र १ पुढे आणि आम्ही त्याच्या मागे असा क्रम होता. घर खूपच छोटे होते. एका कोपऱ्यात एका देव्हाऱ्यासमोर एक अत्यंत साधे पण तेजस्वी गृहस्थ मस्तपैकी गंध लावून बसले होते. घरात फुलांच्या सुवासाचा घमघमाट होता. खरे म्हणजे मला असे वाटले कि गुरुजी म्हणजे गळ्यात खूप रुद्राक्ष माळा, हातात खूप अंगठ्या वगैरे अशा प्रकारचे व्यक्ती असतील पण हे तर आजोबांसारखे सामान्य व्यक्ती होते. सर्व जण त्यांच्या पाय पडत, त्यांच्याशी बोलत, मग गुरुजी त्याना प्लॅस्टीकच्या छोट्या पिशवीतून पेढ्यांचा, प्रसादाचा शिरा देत, अशा प्रकारे रांग पुढे सरकत होती. मी मात्र मनातल्या मनात गुरुजींच्या पाया कसे पडायचे याची उजळणी करत होतो. आमचा नंबर आल्यावर आम्ही पण पाया पडलो, प्रसाद घेतला. त्यांनी प्रेमाने विचारले कोणाकडून आलात. संजयने पुष्पाताई आणि नानाची ओळख सांगितली. ते खूप आनंदित झाले , पेडर रोडचे गुरुजी गेल्यानंतर त्यांची देखील कोणाशीही भेट नव्हती. ते म्हटले तुम्हाला महाराजांनीच पाठवले, आम्ही परत म्हटले कि आम्हाला पुष्पाताईंनी पाठवले, त्या दिवशी तरी महाराज म्हणजे दत्त महाराज आहेत हे आम्हाला माहित नव्हते. गुरुजी फक्त हसले आणि त्यांनी माईना आवाज दिला व आमची ओळख सांगितली.

माईच्या आम्ही पाया पडलो. त्यांनी खूप प्रेमाने पाठीवर हात फिरवला आणि म्हणाल्या, हि भूत इथे कुठे आलीत. आम्ही सगळे bandra boys म्हणजे कपडे एकदम टकाटक आणि बाकी सर्वजण एकदम साध्या कपड्यात, म्हणजे आम्ही तिथे एकदमच उठून दिसत होतो. म्हणून ती आम्हाला भूत म्हटली असावी असे वाटले.  पण ती अनेकांना प्रेमाने दत्ताची भूत म्हणायची असे कालांतराने कळाले. तिने आम्हाला चहा आणि खिचडीचा प्रसाद दिला. घरात जागा नसल्यामुळे आम्ही गॅलरीमध्ये बसलो होतो. एवढी बारीक आणि म्हातारी बाई एकटे एवढे काम जोशात कसे करू शकते याचे आम्हाला आश्चर्य वाटले. आम्ही मात्र खाण्यावर concentrate करत येणाऱ्या जाणाऱ्यांना observe करत होतो. या गर्दीत आम्हाला पाठक गुरुजींबरोबर निवांतपणे बोलायला मिळणार नव्हते, त्यामुळे काय करावे हा प्रश्न होताच. मग निघताना आम्ही परत गुरुजींच्या पाया पडलो व संजय म्हणाला कि तुम्हाला वेगळे आणि निवांत कधी भेटता येईल. त्यांनी त्यांच्यामागील कॅलेंडर वर बघून सांगितले कि उद्या रात्री १० वाजता या मग निवांत बोलू , नंतर मी नाशिक ला जाणार आहे. वेळेत या असा दम / सल्ला त्यांनी आम्हाला दिला. वेळेच्या बाबतीत गुरुजी कडक आहेत हे पुष्पाताईंनी आम्हाला आधीच सांगितले होते.

गुरुजींबद्दल आमचे पहिले ओपिनियन खूप चांगले झाले. काहीही मोठेपणा नाही, देखावा नाही. सर्व शांत आणि शिस्तीत. शिवाय त्यांच्या vibrations होत्या त्या जाणवल्या. माई तर गुरुजींपेक्षा खूप आवडल्या व शेवटपर्यंत त्यांच्याबद्दल आम्हाला गुरुजींपेक्षा जास्त प्रेम होते. निघताना माईना भेटलो, त्यांच्या पाया पडलो. त्या म्हणाल्या उद्या नक्की या, मी वाट बघते. कोणीतरी आपली वाट बघतय हा खूपच आनंदाचा आणि जबाबदारीचा अनुभव आहे. माई आणि गुरुजी एवढ्या प्रेमाने बोलले कि जणू काही गेली ५००-१००० वर्ष आमची  ओळख आहे. काहीच दुरावा नाही, कुठेही खोटेपणा नाही. एकंदरीत दोघांना भेटून एवढा आनंद झाला कि काही विचारूच नका. बिल्डिंगखाली उतरून आम्ही पुन्हा गाडीत गप्पा मारल्या. गुरुजी आणि माईंची पॉसिटीव्हिटी क्षणोक्षणी जाणवत होती. 
माहीम घरातील देव्हाऱ्यासमोर गुरुजी आणि माई 
उद्या गुरुजींबरोबर काय बोलायचे यावर चर्चा केली, पण काहीच सुचले नाही. मग आज रात्री विचार करून,  उद्या दुपारी ४ वाजता भेटून काय ते ठरवायचे असे ठरले.  मग आम्ही परत दुसऱ्या दिवशी दुपारी ४ वाजता भेटलो. कोणाकडे काहीच प्लॅन नव्हता. आम्ही असे ठरवले कि आपण काहीतरी बोलण्यापेक्षा पाठक गुरुजी काय बोलतात ते ऐकू. काय असते, बोलण्यापेक्षा ऐकणे चांगले , कारण आपण बोललो तर आपले ज्ञान expose होते, म्हणून श्रवणभक्ती करावी असे ठरले. गुरुजी वेळेचे पक्के असल्यामुळे व वेळ पाळा असा सल्ला/ दम दिल्यामुळे, आम्ही रात्री ९. ३० ला म्हणजे वेळेच्या अर्धा तास आधी त्यांच्या बिल्डिंग खाली पोहोचलो व बरोबर १० वाजता त्यांच्या घराची बेल वाजवली. गुरुजींनीच दार उघडले, तेव्हा ते धोतर आणि बनियान वर होते, माई पण होत्या. खूप आनंदाने आमचे स्वागत केले. गुरुजी त्यांच्या आसनावर बसले व आम्ही नमस्कार केला. या वेळी मात्र आम्ही चाफ्याची फुले, पेढे आणले होते. माईनी आम्हाला काहीतरी खायला दिले.

माई पण येऊन बसल्या. नाव ओळख झाली. आज एक्दम रिलॅक्स वातावरण होते. मग गुरुजींनीच बोलायला सुरुवात केली. अगदी सामान्यपणे ते बोलत होते व आम्ही ऐकत होतो. मध्ये मध्ये जोक्स पण व्हायचे. मित्राप्रमाणे आणि खूप जुनी ओळख असल्याप्रमाणे त्यांनी गप्पा मारल्या. एवढी तरुण मुले आल्याचे त्यांनापण कौतुक असावे. आम्ही त्यांचा नाशिकचा पत्ता विचारला. फोन नंबर घेतले. पंकजभाऊचे नासिकला फार्महाउस आहे तिथे आम्ही नियमित जात असतो. तुम्हाला भेटायला आले तर चालेल का? ते म्हणाले नासिकला मी निवांत असतो. कधीपण फोन करून या. गप्पा मारता मारता कधी रात्रीचे १२. ३० वाजले कळलेच नाही. आम्ही जेवून आलो होतो. त्यांनी सांगितले कि ते नंतर जेवणार. आम्हाला वाईट वाटले कारण आमच्यामुळे त्यांना जेवायला उशीर झाला. नाशिकला भेटू, असे म्हणून आम्ही निघालो व त्यांच्या बिल्डिंगच्या खाली उभे राहून परत १० मिनिटे गप्पा मारल्या. सहजच वरती बघितले तर गुरुजी आणि माई आम्हाला टाटा करायला खिडकीत उभे होते. आम्ही चपापलोच. त्यांच्या हातातला टॉवेल हलवून त्यांनी आम्हाला टाटा केले. लांबून त्यांचा टाटा दिसावा म्हणून हातात टॉवेल होता. आम्ही तडक निघालो. म्हणजे केवळ आम्हाला टाटा करण्यासाठी ते १० मिनिटे आम्ही वर बघण्याची वाट बघत शांतपणे उभे होते. हि गोष्ट आमच्या अजूनही लक्षात आहे आणि अजूनही त्याचे वाईट वाटते. 


नंतरच्या गुरुवारी पुष्पाताईंना सांगितले की आम्ही पाठक गुरुजींना भेटलो, त्यांनापण खूप आनंद झाला. आत्ता आमच्याकडे गुरुजींचा फोन व पत्ता होता. पुढच्या आठवड्यात आम्ही पंकजभाऊ कडे नाशिकला राहायला जाणार आहे आणि तेव्हा गुरुजींना भेटू असे त्यांना सांगितले.

नाशिकला गुरुजींना फोन करून सांगितले कि आम्ही या शुक्रवारी रात्री ८ -९ वाजता नाशिक ला पोहोचू, मग शनिवारी सकाळी तुम्ही सांगाल तेव्हा येतो. ते म्हणाले त्यांचा मुलगा, राजू पहिल्या मजल्यावर राहतो. तिथे तळ मजल्याला त्यांच्या परिचयाच्या व्यक्तीचा (श्री. कामत) फ्लॅट रिकामा आहे. तिथे मी कधी कधी राहतो. मी रात्री उशिराच झोपतो. मग तुम्ही रात्री या, आपण गप्पा मारू. आम्ही म्हटले हे छान आहे. आम्ही रात्रीच तुमच्याकडे येतो. त्या दिवशी रात्री ८ वाजता नाशिकला पोहोचलो. पंकजभाऊ कडे जेवलो आणि गुरुजींना फोन करून सांगितले, ते म्हटले मी इथेच आहे तुम्ही या. .

युनिव्हर्स तुमच्यासाठी सर्वकाही आधीच जुळवून ठेवते पण आपली वेळ आल्याशिवाय आपल्याला ते कळत नाही. पंकजभाऊचे  नाशिकचे घर हायवेच्या या बाजूला आणि गुरुजींचे घर पलीकडे , म्हणजे दोघांच्या घरामध्ये चालत जेमतेम १० मिनिटांचे अंतर होते. इतक्यांदा आम्ही नाशिकला आलो होतो, पाठक गुरुजींच्या शोधात होतो. ते नाशिकला रहातात हे पण माहित होते. आणि आम्ही फक्त त्यांच्या घरापासून १० मिनिटावर राहायचो. पण कोणालाच माहित नाही. 

रात्रीची वेळ असल्यामुळे गाडी आणि ड्राइवर घेऊन गेलो आणि जेमतेम ५ मिनिटात गुरुजींकडे पोहोचलो. थंडीचे दिवस आणि नाशिकची थंडी म्हणजे काही विचारू नका. गुरुजी मस्तपैकी फुल्ल हाताचे स्वेटर आणि कानटोपी घालूंन बसले होते. नंतर ज्या गप्पा चालू झाल्या ते काही विचारूच नका. रात्री १. ३० ला आम्ही तिथून निघालो. सकाळी १० वाजता पुन्हा राजूदादाकडे भेटायचे असे ठरले. त्याप्रमाणे सकाळीच नास्ता करून आम्ही राजूदादाकडे पोहोचलो. तिथे माई, गुरुजी, सुचेतावहिनी व त्यांची लहान मुले ओमकार, गायत्री भेटले. अगदी घरच्यासारखे फ्री वागलो. तिथेपण आम्हाला चहा आणि पोहे हा नास्ता मिळाला. अन्न हे पूर्णब्रह्म असते आणि त्याला कधीच नाही म्हणू नये या पवित्र भावनेने आम्ही भरपेट नास्ता केला. माईंनी सांगितले की जेवल्याशिवाय जायचे नाही. मग गप्पा मारत मारत जेवलोही. विशेष आठवण म्हणजे जेवताना माईने वरण भातावर खूप तूप वाढले. जेवढे वरण तेवढे तूप असा हिशोब असावा. निदान माझ्या घरी तरी मोजून मापून तूप वाढायची पद्धत होती. ते पण रोज नाहीच. इथे तर ताटात तुपाचा महापूर  आला  होता. एवढे मनापासून आणि भरपेट वाढणारी माईची आमची तिसरी, तर सुचेतावहिनीची पहिलीच भेट होती असे वाटतच नव्हते.

वेळ कुठे गेला कळालेच नाही. मग मात्र निघालो आणि रात्री परत गुरुजींना भेटायला आलो. दिवसा राजूदादाकडे भेटायचे आणि रात्री गुरुजींशी तळमजल्यावरील फ्लॅटवर उशिरापर्यंत गप्पा मारायच्या असा कार्यक्रम आमचा प्रत्येक नाशिक भेटीत असायचा. महिन्यातून किमान एकदा नाशिकला आम्ही जायचो. गुरुजींकडे कधीच बुवाबाजी, भंपकपणा, शोऑफ नव्हता. अत्यंत साधेपणा, विचारात आणि बोलण्यात स्वछता होती. मोठेपणा कुठेच नाही. अत्यंत मैत्रीपूर्ण ते आमच्याशी बोलायचे आणि मनापासून बोलायचे. त्यामुळे वेळ कुठे जायचा हे कळायचेच नाही. हेच पाठक पती पत्नी नंतर आमच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनतील हे तेव्हा माहित नव्हते.

काही काळाने दर वेळी नाशिकला जाऊन गुरुजींना भेटणे यापेक्षा गुरुजीच जर नाशिकवरून मुंबई ला शिफ्ट झाले तर मात्र नियमित भेटता येईल असा विचार आम्ही मित्रांनी केला. शिवाय गुरुजींशी संबंधित बहुतेक जण मुंबई , ठाणे ला होते. माहिमचे घर बंद असल्यामुळे गुरुजींचा जनसंपर्क बराचसा कमी झाला होता. तसे नाशिकला त्यांना उपासनेला खूप वेळ मिळायचा हे मात्र खरे. 

त्यावेळी त्यांनी नुकतीच गाणगापूरला आश्रम बांधण्यासाठी जमीन घेतली होती. परंतु त्यासाठी निधी नाशिकला राहून जमा करणे शक्य नव्हते. शिवाय गुरुजी म्हणजे one man show, त्यामुळे सर्वजण गुरुजींकडे बघूनच मदत करायचे.  मग आम्ही हळूहळू गुरुजींना पटवून दिले कि नाशिकला राहून तुमचा आश्रम काही बांधून होणार नाही, त्यासाठी तुम्हाला मुंबईलाच यावे लागेल. शिवाय नाशिकवरून गाणगापूरला जायला डायरेक्ट ट्रेन नव्हती. कालांतराने गुरुजींना ते पटले, मग पाठक पती पत्नी दोघेही मुंबई ला नाशिकवरून शिफ्ट झाले. आमची तर खूप मज्जा झाली. गुरुजींचा गुरुवारचा दरबार चालू झाला. विविध जाती धर्माचे लोक गुरुजींकडे मार्गदर्शनासाठी येऊ लागले. आमच्या भेटीगाठी तर खूपच वाढल्या. 

आणि हो आम्ही जेव्हा गुरुजींना भेटत तेव्हा पुष्पाताईना फोन लावून देत. तेव्हा त्या दोघांचा एकच डायलॉग गुरुजी जाईपर्यंत चालायचा. गुरुजी म्हणायचे "पुष्पा तुझी भूत माझ्याकडे पोहोचली बर का ?" आणि पुष्पाताई म्हणायच्या "ती भूत तुमचीच होती , म्हणून तुमच्याकडे आली ". 



अशी माझ्या गुरुजींबरोबरच्या पहिल्या भेटीची कहाणी. लिहायला बसलो तेव्हा असे वाटले नाही कि हि आठवण एवढी मोठी लिहून होईल. डोळ्यासमोर सर्व प्रसंग उभे राहिले 

विशाल फुलपगार 


दत्तलीन श्री. पाठक गुरुजी यांच्या जीवनावरील "जगन्मित्र" या पुस्तकाचे विमोचन स्वातंत्रवीर सावरकर स्मारक , दादर , मुंबई येथे २५ डिसेंबर २०१२ ला मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तो कार्यक्रम पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा. 




Sunday, July 5, 2020

आठवणीतले पाठकगुरुजी

५ जुलै २०२० 
आठवणीतले पाठकगुरुजी 


५ जुलै २०२० च्या गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने पाठकगुरुजींच्या काही आठवणी सांगाव्यात असे वाटले. अजुनपर्यंतच्या माझ्या विविध ब्लॉग्स मधून , मी गुरुजींची केलेली मस्करी किव्हा आमचे थट्टा विनोद यातून कदाचित तुम्हाला वाटेल कि हे खूपच टाइम पास रिलेशन आहे. पण असे काही नाही. हा आमच्यातील संबंधाचा ५% भाग आहे. बाकी सर्व गोष्टी आमच्या दोघातच आहेत आणि आमच्या दोघातच राहतील हे मात्र निश्चित. हा ब्लॉग थोडा विशेष आहे. कारण नेहमी मी सलग लिहितो. हा तीन टप्प्यात लिहिला आहे. काही विशेष फोटो मिळाले आणि हा ब्लॉग वाढत गेला. 

मागे एकदा मी तुम्हाला सांगितले होते कि गुरुजी प्रत्येक गोष्टीत involve असायचे पण आणि नसायचे पण , म्हणजेच ते अलिप्त असायचे. "कर्ता करवीता दत्त , आपण निमित्त मात्र" हि विचारसरणी त्यांनी जीवनातील प्रत्येक क्षणात उतरवली होती. कार्य महाराजांचे आहे , आपण फक्त त्यांचे शिपाई आहोत अशी त्यांची भावना होती. 

गुरुजींची ओळख म्हणजे ते कायम "जय गुरुदेव " बोलायचे, पायात चप्पल / बूट घालणे त्यांनी १९७८ साली गिरनार पर्वतावर गेले तेव्हाच सोडले होते व त्यानंतर त्यांच्या पत्नीनेही सोडले होते. त्यामुळे दोघेही शेवटपर्यंत अनवाणीच फिरायचे. कपाळावर U आकाराचे गंध लावायचे. व्यवस्थित भांग पाडलेला. गळ्यात एक रुद्राक्षाची माळ , ज्याच्यावर ते अनेकदा जप करायचे.  

वडील दशग्रंथी ब्राम्हण , त्यामुळे मुलाने भिक्षुकी करावी असे वडिलांचे मत, तर मुलाने शिकून नोकरी करावी असे आईचे मत. मग इंटर पर्यंत शिकून गुरुजींनी पोलीस खात्यात नोकरी चालू केली आणि सोबत भिक्षुकीही केली व आई आणि वडिलांची इच्छा पूर्ण केली.
गुरुजी , त्यांचे आई व वडील आणि माईच्या कडेवर राजूदादा , गुरुजींचा भाऊ मधुकाका आणि बहीण आशा , नंदुरबार येथील फोटो स्टुडिओमध्ये काढलेला  एक दुर्मिळ फोटो.  
गाणगापूर येथे आश्रम बांधायचा असे त्यांनी ठरवले व मंदिराजवळ ४ गुंठे जागाही मिळाली. ती कशी मिळाली याबद्दल नंतर कधीतरी लिहू. तेव्हा गुरुजी रिटायर्ड झाले होते. मग ते full time  सत्यनारायण , सत्यदत्त , वास्तुशांती , ग्रहशांती , नवनाथ वगैरे पूजा सांगायचे आणि त्यातून मिळालेली दक्षिणा ते ट्रस्ट च्या बँक अकाउंट मध्ये जमा करायचे.
गुरुजींच्या बाजूला लक्ष्मण गुरुजी , यांनी गाणगापूर मध्ये प्लॉट घेण्यासाठी गुरुजींचे नाव सुचवले


पूजा सांगताना तल्लीन झालेले गुरुजी 
पुजेआधी रांगोळी काढताना गुरुजी 

मनोहर मामाच्या घरी पूजा मांडताना गुरुजी 
सत्यनारायण पूजा सांगताना गुरुजी मनोहर मामांच्या घरी. सोबत महेश 

बालमित्रांसोबत गुरुजी आणि माई 

मनोहर मामा आणि गुरुजी कुटुंबासोबत 

हस्तलिखित गुरुचरित्र लिहिणारे श्री महेश पाटील यांच्यासोबत गुरुजी आणि माई . महेशना २०११ ला पारायण गौरव पुरस्कार मिळाला 

आश्रमात गुरुजी या जागेवर बसायचे 
तेव्हा पूजेचे २०० /५०० किंवा १००० रुपये मिळत. गुरुजी जी मिळेल ती दक्षिणा घ्यायचे , कधी काही मागायचे नाही. मी त्यांना म्हटले कि अहो असे ५०० / १००० रुपये जमा करून एवढा मोठा आश्रम कधी व केव्हा बांधणार ? तुमची पद्धत चुकीची आहे. आपल्याला मोठे डोनर शोधावे लागतील. त्यांनी सांगितले कि गाणगापूरला गुरुचरित्र पारायणे करण्यासाठी हा आश्रम बांधवा अशी दत्त महाराजांची योजना आहे. खिशात एक रुपया नसताना आपल्याला आश्रमासाठी ४ गुंठे चा प्लॉट महाराजांनीच दिलाय. आपण त्याचे पेमेंट पण नंतर केले. त्यामुळे आश्रम बांधण्याचे काम पण महाराजच योग्य वेळी पूर्ण करतील आणि पैश्याची व्यवस्था पण तेच करतील. आपण त्यात डोके घालायचे नाही. धु म्हटले कि धुवायचे.......  मला काही ते पटले नाही. मी मनातच म्हटले कि असे काही होणार नाही. गुरुजींना कसे समजावून सांगायचे ? पण गम्मत म्हणजे काही वर्षांनी गुरुजींना पूजा सांगण्यासाठी दोन तीन वेळा अमेरिका , दुबई येथून बोलावणे आले. तिथे अनेकांनी स्वतःच्या घरी अनेक पूजा गुरुजींकडून केल्या व डॉलर्स मध्ये दक्षिण दिल्या. ती सर्व रक्कम त्यांनी तशीच्या तशी बँकेत जमा केली. व असा बराच निधी जमा झाला. त्यांच्या इतर भक्तांनीही न मागता देणग्या दिल्या.  

गुरुजी व माई दुबई मध्ये

गुरुजी व माई दुबई मध्ये
गुरुजी व माई दुबई मध्ये
अमेरिकेत पूजा झाल्यावर प्रसाद देताना गुरुजी 

गुरुजी अमेरिकेत पूजा सांगताना 

न्यू जर्सी , अमेरिकेत जेसूभाइ गोसालियांच्या घरी आराम करताना गुरुजी 

अमेरिकेतील रिसीट , गुरुजींच्या आठवणीसाठी त्यांना दिली होती. 
आश्रमाचे बांधकाम सुरु झाले तसे ते पूर्ण होईपर्यंत अनेकांनी भारतातूनही डोनेशन दिले. आश्रम बांधून पूर्ण झाल्यावर मात्र गुरुजींचे परदेश दौरे थांबले पण तो पर्यंत काम पूर्ण झाले होते. नंतरमात्र पैश्याचा ओघ कमी झाला आणि त्याची आवश्यकता पण नव्हती. गुरुजींनी पण जिद्दीने भिक्षुकी करूनच हा आश्रम बांधला हे आश्चर्यच. ते म्हटले ते खरेच , दत्त महाराजांचे काम दत्त महाराजांनी गुरुजींकडून करवून घेतले. नाहीतर गुरुजींसारख्या आर्थिक परिस्थिती बेताचीच असणाऱ्या माणसाकडून पर राज्यात जिथे भाषा पण आपली नाही अशा ठिकाणी एवढे काम करायची डेरिंग / बुद्धीच झाली नसती. शिवाय रिटायर्ड झाल्यावर एवढे उपदव्याप करण्याची त्यांना काही गरजच नव्हती. एकंदरीत त्यांचा महाराजांवरील दृढ विश्वास आपल्याला यातून दिसून येतो. किव्हा त्या दोघांचे आधीच डिस्कशन झाले असेल. मी मात्र यातून गुरुजींनी धु म्हटले कि धुवायचे ..... त्यांना प्रश्न विचारायचे नाही हे शिकलो


आश्रमात गुरुजी 

गाणगापूर आश्रमात दत्तयाग 

आश्रमात गुरुजींची धान्य तुला 

आश्रमात गुरुजी 
आश्रमातील बेसिन धुताना गुरुजींचा गुपचूप काढलेला फोटो 

आश्रमात हवन / पूजा , सोबत रिसबुड काका 

आश्रमात पेपर वाचताना एका निवांत क्षणी 

विजय आणि अभिषेक सर देशपांडे या सोबत पूजा करताना गुरुजी 
आश्रमाच्या आवारात निवांत क्षणी गप्पा मारताना गुरुजी 
गुरुजींना कोणी सांगितले कि तुम्हाला भेटायला येतो तर ते लगेच म्हणायचे कि महाराजांना भेटायला या , मला नको. गुरुजी आशीर्वाद द्या तर म्हणायचे कि महाराजांचे आशीर्वाद देतो. 

मज आवडो न आवडो I  तू जे इच्छिसी ते ची घडो I हे मागण्या न अवघडो I जीभ माझी II  

असे ते नेहमीच प्रार्थना करायचे. आपले प्रारब्ध भोगुनच संपवायचे असतात व त्यातून कोणालाच सुटका नाही , अशी त्यांची ठाम विचारसरणी होती. पण दत्त महाराजांची सेवा / उपासना करून प्रारब्धभोग सुसह्य करता येतो हे ते नेहमी सांगायचे.  "महाराज प्रारब्ध भोगतो पण सुसह्य ठेवा " असे ते महाराजांना सांगायचे. कोणता उत्सव / कार्यक्रम असला आणि ते थोडेही आजारी पडले तर मात्र ते दत्त महाराजांना विनंती करायचे कि महाराज हा प्रारब्ध भोगतो पण हा कार्यक्रम होऊन जाऊदे आणि आश्चर्यकारक रित्या ते आजारपण postpone किंवा prepone करायचे हे आम्ही सर्वानीच अनेकदा पाहिले / अनुभवले आहे.

गुरुजींकडे मान अपमान काहीच नव्हता. जे काही होतेय ते दत्त महाराजांच्या इच्छेनेच होत आहे असे ते मानायचे. जो माणूस त्यांच्याकडे आला , जे काही बोलला. किंवा त्याच्या ज्या समस्येसाठी तो गुरुजींकडे आला , ते दत्त महाराजांनी पाठवले असे ते मानायचे. काहीही झाले तरी ते म्हणायचे प्रभू इच्छा. एकदा एका जवळच्या नातेवाईकांनी गुरुजींचा अपमान केला. गुरुजी शांतच होते. काहीही बोलले नाहीत. त्यांची सून रंजना मात्र खूप वैतागली. ती बोलली कि मी त्यांना विचारते कि असे का बोललात म्हणून. गुरुजी म्हटले काहीही बोलू नकोस. हि प्रभू इच्छा आहे असे समज. 

त्यांच्या जवळचा एक व्यक्ती देखील त्यांचा सतत अपमान करत असे. मी त्यांना म्हटले कि याला माझ्या पद्धतीने देव दर्शन देऊ का ? ते म्हटले कि अजिबात काही बोलायचे नाही. हि प्रभू इच्छा आहे असे समजायचे. माझ्या प्रारब्धात जे आहे ते मला भोगलेच पाहिजे. मी त्यांना त्यांचाच डायलॉग मारला. तुम्ही प्रारब्ध भोगा , मी फक्त सुसह्य करतो. त्यांनी हसून नकार दिला. म्हटले तुम्ही भोस....  सुधारणार कधी. त्याला त्याच्या कर्माचे फळ महाराज देतील , तू काळजी करू नकोस. एवढे छोटे छोटे मॅटर महाराजांकडे कशाला न्यायाचे असा मी विचार केला. पण नंतर आठवले कि धु म्हटले कि धुवायचे... 

१९५४ मध्ये त्यांचे मेहुणे अरुण दीक्षित आजारी पडले आणि डॉक्टरांनी २४ तासाची मुदत दिली. तेव्हा त्यांनी पहिल्यांदा श्री गुरुचरित्र ग्रंथाचे सलग पारायण केले. मला वाटते कि सलग १८ तास असावे. त्यातून मग अरुण दीक्षितांना आराम पडला. तेव्हापासून त्यांनी असंख्य पारायणे केली. त्यांना गुरुचरित्र पाठ होते असे म्हणायला हरकत नाही. गुरुजी म्हणजे चालते बोलते गुरुचरित्रच.  गाणगापूर आश्रमाचा पाण्याचा कायम स्वरूपी प्रश्न सुटावा म्हणून जमिनीत बोर मारण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी दत्त महाराजां काही पारायण सेवा देण्याचे काबुल केले. तेवढे पारायणे झाल्यावर बोर मारली. आणि आज त्या बोरवेल ला अखंड पाणी आहे. महाराजांकडे काही मागायचे असे तर सेवा करावीच लागते , फुकट काही मागायचे नाही अशी त्यांची विचारसरणी होती. 
बोर वेल ला पाणी मिळण्यासाठी गुरुजींनी 108 गुरुचरित्र पारायण सर्वांकडून करून घेतली


श्री गुरुचरित्र पारायण करताना गुरुजींचा एक दुर्मिळ फोटो 

  गुळवणी महाराज आश्रम, गाणगापूर बाहेर चहा पिताना एका निवांत क्षणी गुरुजी. आधी गुरुजी येथे राहायचे  

श्री. गुप्तेबाबा , डोंबिवली यांच्याबरोबर गुरुजी 
गुरुचरित्र पारायण , tembe  स्वामींच्या , दत्तावधूतांची पुस्तके / पोथ्या ते वाचायला सांगत. आणि हो गुरुजींना पुस्तकांची खूप आवड. कुठेही गेले तरी पुस्तके विकत घायचे आणि संग्रह करायचे. गाणगापूरला आश्रमात अशी अनेक पुस्तके ठेवली आहेत. त्यात अनेक साधू ,सत्पुरुषांची पुस्तके आहेत. एखादी ओळ , पॅराग्राफ आवडला कि ते त्याखाली पेन ने खूण करायाचे. शेवटपर्यंत ते चष्म्या शिवाय वाचन करायचे. लांबचे बघण्यासाठी मात्र त्यांना चष्मा लागत असे. त्यांना विचारले असते ते म्हणाले कि कि कायम गुरुचरित्र वाचनासाठी मी महाराजांकडे डोळे मागितले आहेत म्हणून मला चष्मा नाही. 

त्यांची आर्थिक परिस्थिती खूप चांगली नसली तरीपण त्यांना जेवढी गरज असायची ती पूर्ण व्हायची. माई अन्नपूर्णा आहे त्यामुळे माझ्याकडे काहीच कमी नाही असे ते सांगायचे. आणि हे खरेच होते. त्यांच्याकडे कितीही माणसे आली तरी प्रत्येकाला काही ना काही तरी खायला मिळायचेच. अगदी त्यांच्याकडे कचरा घ्यायला जी बाई यायची तिला पण माई काहीतरी खायला रोज द्यायची.  त्यांच्याकडे कोणीही उपाशीपोटी परतत नसे. 

स्वतःच्या उपासने बद्दल ते कधीच काहीच सांगत नसत. पण त्यांनी दोन गायत्री पुनश्चरण पूर्ण केले होते. एक पुनश्चरण म्हणजे सर्व बंधनात राहून २७ कोटी गायत्री मंत्राचा जप. त्यातील दुसरे पुनश्चरण त्यांनी उरण जवळच्या समुद्रात त्यांचे सदगुरु दंडवते बाबा बरोबर केले. त्याविषयी त्यांनी थोडी माहिती सांगितली ती नमूद करतो.  सतत ४० दिवस सूर्योदय ते सूर्यास्त पर्यंत ते समुद्रात छातीभर पाण्यात उभे राहून गायत्री मंत्राचा जप करायचे. मग सूर्यास्तानंतर ते समुद्राच्या बाहेर यायचे. भरती ओहोटी प्रमाणे ते पुढे मागे सरकून पाणी सतत छाती पर्यंत असेल याची काळजी घ्यायचे. पाण्यात स्वतःचा तोल सांभाळणे किती कठीण असेल , उन्हाचा किती त्रास झाला असेल याचा आपण विचारपण करू शकत नाही. त्या दरम्यान त्यांच्या पायाला माशांनी अनेकदा चावा घेतला होता मग पायांची काय अवस्था झाली असेल याचा आपण विचारदेखील करू शकत नाही. स्वतःच्या उपासनेबद्दल ते काहीच बोलत नसत. जगन्मित्र पुस्तकाच्या वेळी यातील काही गोष्टी बाहेर आल्या. आपली उपासना गुप्त असावी व त्याचा अहंकार नसावा या मताचे ते होते. शिवाय उपासना करताना बरेच अनुभव येतात , त्यात वाहून न जाता दुर्लक्ष  करावे व उपासनेवर लक्ष केंद्रित करावे असे ते सांगत.
गुरुजींनी दंडवते बाबांसोबत उरण समुद्रात 40 दिवस गायत्री मंत्र अनुष्ठान केले  त्या दरम्यानचा एक अत्यंत दुर्मिळ फोटो 


दंडवतेबाबा , गाणगापूर हे त्यांचे गुरु होते. बाबांबरोबर १९८४ साली ते गाणगापूर , बद्रीनाथ यात्रेला गेले. तिथे बद्रीनाथ ला त्यांना दंडवते बाबानी गुरुमंत्र दिला 
दंडवते बाबा बरोबर गुरुजी आणि माई 
आणि त्यानंतर बागुलकाकानी तिथेच गुरुजींकडून गुरुमंत्र घेतला , म्हणजे बागुलकाका हे गुरुजींचे पहिले शिष्य होते. 
बागुलकाका बरोबर 
पहिले गायत्री मंत्र पुनश्चरण सांगता समारंभ , समाज मंदिर हॉल , बांद्रा , गांधी नगर पट्ट शिष्य बागुलकाका बरोबर गुरुजी आणि माई .
१८८४ -१९८५ ला  २७ लक्ष गायत्री जप केला 

गुरुजींची एकसष्टी साजरी केली 

गुरुजींची एकसष्टी
गुरुजींची एकसष्टी

सून सौ. रंजना संजय पाठक  यांचा अठंगुळ संस्कार गुरुजींनी अहमदनगर ला केला होता. या संस्कारामुळे सोवळ्याचा स्वयंपाक करता येतो असे गुरुजी म्हणाले 

गुरुजी , माई व त्यांची तिन्ही मुले व सुना . एक खूप दुर्मिळ फोटो. राजूदादा व सुचेतावहिनी , संजय व रंजनावहिनी , अजय व पूजा वहिनी 
नाशिक राजू दादाच्या घरी गुरुजी व माई , ओमकार व गायत्री या लाडक्या नातवंडांबरोबर सोबत सून सुचेतावहिनी  
माई खूप आजारी पडली होती , तेव्हा त्यांनी माई साठी आयुष्य महाराजांकडे मागून घेतले होते आणि परत मागणार नाही असे कबुल केले होते. हि आठवण ते आम्हाला सांगत. शेवटी माई जेव्हा आजारी झाली आणि हॉस्पिटलमध्ये होती. तेव्हा त्यांना माहित होते कि आत्ता काही करता येणार नाही. आम्ही विचारले कि माई कधी बरी होईल तेव्हा ते म्हणाले कि " जितनी चाबी भरी राम ने , उताना चाले खिलोना ". कधीतरी हे होणारच हे त्यांनी सहजच स्वीकारले होते. 


गुरुजी आणि माई 
 माईच्या केसात गजरा मळताना एक दुर्मिळ फोटो 


अजून एक आठवण म्हणजे गुरुजी असेपर्यंत रोज संध्याकाळी ७ वाजता त्यांची एक प्रार्थना होती ते सर्वजण म्हणायचे. अगदी रस्त्यात असले तरी दोन मिनिटे मनातल्या मनात बाजूला उभे राहून म्हणायचो. हि सवयच होती. ज्यात स्वामींची प्रार्थना , आईची प्रार्थना वगैरे होते. हे त्यांनी व आम्ही कुठेही असले तरी चुकवले नाही. माई चे पार्थिव हॉस्पिटलमधून माहीमच्या घरी आणले आणि संध्याकाळचे ७ वाजले तेव्हापण गुरुजींनी सांगितले कि प्रार्थना चुकवायची नाही. आणि त्या दिवशीही संध्याकाळी ७ वाजता घरी माई चे पार्थिव असताना देखील सर्वानी प्रार्थना केली. 

संध्याकाळी ७ वाजता करायची आई ची प्रार्थना 

संध्याकाळी ७ वाजता करायची स्वामींची प्रार्थना  
गुरुजींचा काही खूप मोठा भक्तपरिवार नव्हता . परंतु जे होते ते प्रेमाने जोडलेले होते. काही बुवाबाजी , अंधश्रद्द्धा नाही, पैश्याचा व्यवहार नाही आणि पैश्याची मागणीही नाही. दर गुरुवारी संध्याकाळी त्यांच्याकडे भक्तमंडळी दर्शनाला यायची. रात्री ११ -१२ पर्यंत लोक येत असायची. एरवी पण गुरुजी सर्वाना भेटायचे. ते सर्वाना accesible आणि available असायचे. मी पण तुमच्यातलाच एक सामान्य माणूस आहे असे ते सर्वाना भासवयाचे. काही खाज़गी बोलायचे असेल तर गुरुजी वेळ द्यायचे त्यावेळेला लोक यायची. त्यांच्या बसण्याच्या जागे मागे महालक्ष्मी कॅलेंडर असायचे त्यात ते त्यांच्या appointment / जप संख्या लिहून ठेवायचे. 
माझा मुलगा आर्यन बरोबर गुरुजींचा फोटो . मागील कॅलेंडर वर ते appointment / जप संख्या लिहून ठेवायचे.  

या भेटीसाठी त्यांची काहीच फी नव्हती. कोणी काही दिले तर ठीक नाहीतरी ठीक. जो दे उसका भला जो ना दे उसका भी भला . कोणाचे काही प्रॉब्लेम असेल तर ते महाराजांकडे प्रार्थना करायचे कि तुमचा भक्त आला आहे त्याला निराश करू नका. जे काही होते आहे ते महाराजांच्याच इच्छेने होत आहे यावर ते ठाम असायचे. अनेक जण त्यांच्याकडे समस्या घेऊन येत. मग ते त्यांना उपासना सांगत आणि महाराजांना विनंती करत कि हा भक्त ८४ पायऱ्या( ८४ लक्ष योनी पार करून )  चढून तुमच्याकडे आलेला आहे त्याच्यावर कृपा करा (त्यांचे घर ५ मजल्यावर होते आणि त्यांच्याकडे जायला ८४ पायऱ्या चढून जायला लागायचे ). तुम्ही उपासना करा आणि फळ काय द्यायचे ते महाराजांवर सोडून द्या असे ते म्हणत. तसेच मी भगवंत द्यायला बसलोय आणि तो मागायला कोणीच येत नाही, अशी खंत ते व्यक्त करत.

गुरुजींनी माहीमच्या घरी ९ पायर्यांचा स्टील चा देव्हारा बनवून घेतला होता. त्यात श्री दत्त मूर्ती आणि इतरही देव होते व ते व्यवस्थित रचून ठेवले होते. 
गुरुजींच्या माहिमच्या घरातील स्टील चा ९ पायऱ्यांचा  देव्हारा 

फुल त्यांना खूप आवडत. केळकरांचे हिना अत्तर तर खूप प्रिय. गळ्यातील रुद्राक्ष माळेला ते नियमित अत्तर लावत. त्यांच्या बोटात  एक नवग्रहांची जुनी अंगठी होती बाकी stones वर त्यांचा विश्वास नव्हता. फुले आणण्यासाठी ते दादर ला माहिमवरून टॅक्सी ने जात. दादर फुलबाजारात फुले घेत आणि मग परत येत. विशेषतः गुरुवारी त्यांना खूप फुले लागायची. चाफा त्यांना अत्यंत प्रिय. नंतर आम्ही दोघे वेळ ठरवायचो आणि ते मला म्हणायचे कि तू तुझे घोडं (मोटरसायकल ) अमुक वाजता घेऊन ये. मग आम्ही दोघे बाईक वरून दादर फुलबाजारातून फुल घेऊन यायचो. त्यांचा वेळ पण वाचायचा आणि मला मज्जा यायची. घरी आलो कि मग ते खूप वेळ मनासारखा देव्हारा फुलांनी सजावट बसत. माई म्हणायची आत्ता माळीबुवा तासभर देवांना सजावतील. नामस्मरण , जप त्यांना खूप प्रिय, कधीही कुठेही नामस्मरण करावे असे ते सर्वाना सांगत. भजन ऐकायला त्यांना आवडत आणि शास्त्रीय संगीत पण आवडत असे.


                                    नामस्मरण करताना गुरुजींचा एक दुर्मिळ विडिओ

२३ फेब. २००३ माझ्या लग्नात गुरुजी (आमच्या दोघांच्या मध्ये उभे आहेत )
कन्या जया हिच्या लग्नात गुरुजी आणि माई ५ जुन १९८१
मुलगा अजय याच्या लग्नात गुरुजी , माई , सौ. सुचेता , राजूदादा , सौ. रंजना 
छाया व विजय सरदेशपांडे यांच्या लग्नात कन्यादान गुरुजींनी केले २९ नोव्हेंबर १९७९ 
श्री. विजय पाटील यांच्या कराड येथील लग्नात गुरुजींची हजेरी १४ मे २००२

  कृते जनार्दन देवे I  त्रेताया रघुनंदन II 
द्वापारे रामकृष्णस्य I कलौ श्रीपाद श्रीवल्लभ II 

कलयुगाची देवता दत्त आहे त्यामुळे दत्ताची उपासना करा असे ते सांगत. या व्यतिरिक्त देवीचा जप, नवनाथाचा जप ते करत आणि करायला सांगत. वर्षातून एकदा ते नवनाथाची पूजा सांगत. गुरुजी मेडिटेशन नाही करायचे पण एका बैठकीत खूप जप करायचे . जप करताना आणि श्री गुरुचरित्र वाचन करताना ते ट्रान्स मध्ये जायचे . आध्यात्मात भगवंत प्राप्तीसाठी अनेक मार्ग आहेत , त्यापैकी खडतर कष्टप्रद जीवन व कडक उपासना या मार्गावर ते चालले. दत्त हे दैवत सर्वाना available आणि accessible करण्याचा त्यांनी जीवनभर प्रयत्न केला. आणि आजच्या बाजारू अध्यात्मिक दुनियेत सहज उपासना कशी करता येते हा मार्ग त्यांनी दाखवला. दत्तमहाराज भक्ताभिमानी आणि भक्तवत्सल आहेत व त्यांच्या भक्तांचे ते संरक्षण करतात आसा ठाम विश्वास त्यांनी आपण सर्वाना दिला किंवा आपल्याला त्यांनाही अशा आशेवर ठेवले कि तुम्ही टेन्शन घेऊ नका महाराज येतील. 

गुरुजींच्या डोळ्यातून आपण दत्तमहाराज पहिले , दत्तमहाराजांकडे आपली गाऱ्हाणी आपण गुरुजी मार्फत पोहोचवली व दत्त महाराज आपल्याशी गुरुजींच्या मुखातून बोलले हे मात्र खरे. कारण देव हा आपल्यातच असतो. तुम्ही सर्व जण जे हे वाचतायत ते खरंच भाग्यवान कि अश्या एका सत्पुरुषाबरोबर आपण सहजच वावरलो, किव्हा त्यांची माहिती आपल्याला मिळाली. आज गुरुपौर्णिमा आहे, त्यानिमित्त पाठकगुरुजींची हि छोटीशी आठवण.

विशाल फुलपगार
५ जुलै २०२० , रविवार ,गुरु पौर्णिमा


आभार : महेश पाटील , स्वप्नाली फडणीस , रंजना पाठक , राजूदादा पाठक , अमेय भट , ओंकार पाठक यांनी खूप शोधाशोध करून फोटो दिलेत.


दत्तलीन श्री. पाठक गुरुजी यांच्या जीवनावरील "जगन्मित्र" या पुस्तकाचे विमोचन स्वातंत्रवीर सावरकर स्मारक , दादर , मुंबई येथे २५ डिसेंबर २०१२ ला मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तो कार्यक्रम पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा. 

https://www.youtube.com/watch?v=V32T5DWEor8&list=PLsAsEAuSOBwdOoqO44f_ZFkqLrO7aPsva&index=2&t=7904s