मधुमामा
![]() |
| मी आणि मधुमामा |
७ डिसेंबर २०२० ला दुपारी अंदाजे १२. ३० ला माझा मामेभाऊ योगेश आहेर चा मला नाशिकहून फोन आला. माझे मामा मधुमामा यांचे आत्ता बांद्रा , मुंबई मध्ये हॉस्पिटलमध्ये निधन झाले अशी धक्कादायक बातमी त्याने मला दिली. पुढच्या दोन तीन मिनिटामध्ये माझ्या लहानपणापासूनच्या मामाबरोबरच्या आठवणी डोळ्यातून वाहत गेल्या. मामा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता ? त्याला काय झाले होते ? मला कोणीच काही का कळवले नाही ? या गोष्टी गौण होत्या. फोन करून माहिती घेतली. त्याच दिवशी संध्याकाळी अंदाजे ४-५ वाजता सायन स्मशानभूमीमध्ये त्यांच्या अंत्यसंस्काराला मी उपस्थित होतो.
माझ्या आईला 4 भाऊ आणि बहिणी. सर्वात मोठा भाऊ म्हणजे मुरलीधर आहेर (मोठे मामा ) भारतीय सैन्यदलामध्ये सिविल इंजिनीअर , खूप मोठ्या पदावरून निवृत्त. त्या काळात खूप शिकल्यामुळे , सैन्यदलात असल्यामुळे आणि त्यांच्या स्वतःच्या वागणुकीमुळे त्यांना सर्वत्र प्रचंड मान होता. त्यांच्याबद्दल कधीतरी लिहू.
दुसरा भाऊ म्हणजे प्रभाकर आहेर (नाना मामा ). सिंडिकेट बँकमधून मोठ्या पदावरून निवृत्त. स्वभावाने अत्यंत भोळा, जॉली आणि हैप्पी गो लकी.
तिसरा भाऊ म्हणजे मधुकर आहेर (मधुमामा ) , इंडियन एअरलाईन्स मधून मॅनेजर पदावरून निवृत्त. थोडा रिझर्व्ह, पण ज्यांच्याबरोबर मैत्री त्यांच्याशी खूप खुलून बोलायचा.
चौथा भास्कर मामा. पण माझी त्याची कधी भेट झाली नाही.
पहिले तिन्ही भाऊ अत्यंत हुशार म्हणजे ब्रिलिअंटच होते व सर्वचजण स्वकर्तृत्वावर त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात पुढे गेले.
बहिणी म्हणजे देवपूरची मावशी, भगूरची मावशी आणि नाशिकची बेबी मावशी. माझ्या आई ने मला लहानपणी सर्वच मामा आणि मावशीकडॆ नेहमीच नेले. या सर्व भावंडांमध्ये खूप प्रेम व एकोपा व सर्वांचेच माझ्यावर खूप प्रेम. पण आज आपण मधुमामा बद्दल बोलूया.
मधुमामा व आई हे खूप चांगले मित्रच होते. मामा अनेकदा माझ्या खारच्या घरी यायचा. माझे वडील व मधुमामा इंडियन एअर लाईन मध्ये एकत्रच कामाला होते. त्यामुळे सतत संपर्क असायचा. माझ्यावर त्याचे विशेष प्रेम त्यामुळे मी सुट्टीत त्याच्याकडे राहायला जायचो. हा एक विशेष अनुभव होता.
![]() |
| मधुमामा , अक्षता आणि माझी आई |
आई मला सांगायची कि मधुमामा तुला आज घ्यायला येणार आहे , मग ती माझे कपडे बॅग मध्ये भरायची. मी मामाची वाट बघायचो. तो घ्यायला यायचा आणि मग आम्ही जायचो. थोड्या दिवसांनी मला मामा परत सोडायला यायचा किव्हा आई / वडील घ्यायला यायचे.
मामा तसा कंजुसच. बाहेर काहीच खायला द्यायचा नाही. जे काय ते घरीच खायचे असा त्याचा दंडक. घरी मात्र जेवण व नास्ता दुप्पट मिळायचे आणि मामा मामी मला ते जबरदस्ती खायला द्यायचे. मामीचा मात्र कधीच कंजूषपणा नसायचा. पण मामा नेहमी बोलायचं कि बाहेरचे खाणे आरोग्याला घातक असते. तेव्हा पटायचे नाही आता मात्र पटते.
जेवणाची विशेष आठवण म्हणजे मी , मामा आणि मामी जेवायला बसलो आणि माझे अर्धे जेवण होईपर्यंत मामा गुपचूप अजून अर्धी किंवा एक चपाती माझ्या ताटात माझे लक्ष नसताना टाकायचा आणि मला पटवून द्यायचा कि हि माझीच चपाती आहे. त्याप्रमाणे आमचे जेवण होई. त्यावेळी ताटामध्ये उष्ट टाकायची पद्धत आणि हिम्मत पण नव्हती. मधू मामा आणि माधुरी मामी या गोष्टीवर खूप हसत. मला देखील या आठवणीची खूपच गम्मत वाटते.
मामा मामी ला लग्नानंतर १४ वर्षांनी मुलगा वैभव आणि त्यानंतर मुलगी अक्षता झाली. पण त्यानंतरही दोघांचेही माझ्यावरचे प्रेम कमी झाले नाही. माझ्या लहानपणापासून मी पाहिले कि सर्वच लहान मुलांचा गोतावळा कायम मामा मामी कडे असायचा. खिशातून पैसे खर्च न करता लहान मुलांना प्रेम देता येते हे मामाने सिद्ध केले होते. मामी पण त्याला अनेकदा बोलायची कि मुलांना काहीतरी खायला आणा , पण त्याने कधीच ऐकले नाही. अर्थात यामुळे आमच्या संबंधावर किंवा प्रेमावर कधीच फरक पडला नाही.
मामाची compatibility चांगली होती. तो सर्वांबरोबरच चांगलाच रमायचा. लहान मुलांबरोबर तर त्याचे खूपच जमायचे. कदाचित लहान मुलांमध्ये तो स्वतःचे बालपण शोधात असेल. मी आणि मामा तर खूपच गप्पा मारायचो. माझ्या घरातून मामा निघाला कि मी त्याला बस स्टॉपवर सोडायला जायचो. तिथे परत आम्ही गप्पा मारायचो. त्यासाठी तो ३-४ बस सोडायचा आणि मग जायचा.
![]() |
| मधुमामा आणि माझी आई |
![]() |
| मधुमामा, सुजित फुलपगार , सोनाली फुलपगार, योगिता फुलपगार बरोबर खार येथे |
आयुष्यात मोठे स्वप्न बघावे व त्यादृष्टीने वाटचाल करावी असे मामा मला नेहमी सांगायचा. मी पण त्याला नेहमी म्हणायचो कि तू इंडियन एअर लाईन मध्ये तुझे टॅलेंट फुकट घालवतोयस पण ऑफकोर्स त्याची परिस्थिती वेगळी होती. मी बिसनेस करावा असते त्याचे ठाम मत. त्यासाठी त्याने मला २-३ प्रोजेक्ट रिपोर्ट पण आणून दिले होते. काहीही करायचे नसेल तरी पण तू निदान हे वाचून काढ म्हणजे तुला आयडिया येईल असे तो म्हणाला.
तरुणपणी तो माटुंगा लेबर कॅम्प मध्ये राहायचा आणि दलित पँथर चळवळीत सक्रिय होता. आत्ताचे सर्व मोठे नेते त्याचे मित्र होते. परंतु कालांतराने दलित नेते आणि चळवळीचे बदललेले स्वरूप त्याला काही पटले नाही. मग शेवटपर्यंत त्यातील कोणालाही भेटला नाही.
१९८७-८८ च्या कालखंडामध्ये शेअर मार्केट हि फक्त गुजराती आणि श्रीमंत लोकांची मक्तेदारी होती. आपण मराठी माणसे मात्र शेअर मार्केट ला खूप घाबरायचो. आपली गुंतवणूक म्हणजे बँक मधील फिक्स डिपॉसिट आणि एल आय सी एवढेच. त्या कालखंडात त्याने शेअर मार्केट चा अभ्यास करून गुंतवणूक करायला सुरुवात केली. त्यावेळेला इंटरनेट नव्हते पण त्याने कष्ट घेऊन आणि स्वतः शिकून यात गुंतवणूक केली. आणि माझ्या आईला देखील करायला लावली. सर्व नातेवाईकांना त्यांना हा मार्ग दाखवला. याबद्दल त्याचे कौतुक तर आहेच पण आभार देखील आहेत.
मला इंजिनीरिंग मध्ये सहजच प्रवेश मिळाल्यावर तो खूपच आनंदित झाला होता. त्याच्या चेहेऱ्यावरून आनंद ओसंडून वाहताना मी पाहिलाय.
![]() |
| मी इंजिनीअर झाल्यावर माझे अभिनंदन करताना मधुमामा , माधुरीमामी , अक्षता आणि वैभव |
तो म्हणायचं कि तू इंजिनीअर होशील हे महत्वाचे आहेच पण तू एक चांगला बॉस बनणे जास्त महत्वाचे आहे. तसेच काम करताना स्वतःला बॉस समजायचे , हि गोष्ट मी कायम लक्षात ठेवली. तसेच लेटर drafting आणि communication हे चांगले असले पाहिजे असे तो नेहमी म्हणायचा. मी त्याला सांगायचो कि इंग्लिश माझे उत्तम आहे आणि लेटर writing मध्ये मला १० पैकी ८-९ मार्क मिळतात. मामा खूप हसायचा कि परीक्षेमध्ये मार्क मिळणे आणि कंपनी तर्फे काम करणे खूप वेगळ्या गोष्टी आहेत , हे तुला कामावर जायला लागल्यावर कळेल. परंतु यशस्वी होण्यासाठी communication हे फारच महत्वाचे आहे हे मला कालांतराने पटले आणि जाणवले.
मी तेव्हा सूर्यनमस्कार मारायचो. ते मामाने बघितले . मी गमतीने म्हणालो तू कधी व्यायाम केला आहेस काय ? त्याने ताबडतोब माझ्या बाजूला जोर बैठका मारून दाखवल्या . मी चकितच झालो. मधुमामा ला कोणतेही व्यसन नव्हतो. तसेच तो रागावलाय किंवा त्याने कोणाला शिवी दिलीय असे माझ्या पाहण्यात ऐकण्यात नाही. सर्वांशीच त्याचे सौहार्दाचे संबंध होते. मला तो "सोंड्या " म्हणत असे आणि आई ला "सोंडी" म्हणजे male ला "सोंड्या " female ला "सोंडी". यामागचे लॉजिक मला माहित नाही. आणि हे शब्द मी त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणाकडूनही ऐकले नाही.
२००३ मध्ये माझे लग्न झाले तसेच माझे ऑफिस बेलापूर , नवी मुंबई ला होते त्यामुळे खार ते बेलापूर प्रवास , संसार यात मी बिझी झालो. एकंदरीत सर्व नातेवाईकांबरोबर माझा संपर्क कमी झाला आणि प्रोफेशनल जनसंपर्क वाढला.
![]() |
| माझ्या साखरपुड्याला मधुमामा आणि डॉ. विश्वास ठेंगे |
मामाशी भेटी गाठी कमी होत गेल्या. कधीतरी फोन व्हायचा. मग त्याने नाशिकला घर घेतले व तिथे एकटाच शिफ्ट झाला असे कळले. एखादवेळी मला नाशिकला काही कार्यक्रमात तो भेटला पण जास्त बोलला नाही. मी पण जास्त गडबडीत असल्यामुळे जास्त बोलू शकलो नाही.
साधारणपणे १ वर्षांपूर्वी त्याची मोठी बहीण देवपूर नाशिक ला वारली, तिच्या कार्याला मी आई ला घेऊन गेलो. तिथे तो माझ्याशी काहीच बोलला नाही. मग मीच त्याच्या बाजूला बसलो संवाद चालू केला. एवढा गप्पा मारणारा मधुमामा बराच अबोल होता. तुटक तुटक बोलत होता. मग मीच त्याच्या खांद्यावर हात टाकला कि चल आपण गावात राऊंड मारून येऊया. तो परत मला नाही म्हणाला. मग मीच त्याला दम दिला कि चल गुपचूप. मग आम्ही माझ्या देवपूरच्या मावस भावाच्या दुकानात गेलो. तिथे २-३ तास मनसोक्त गप्पा मारल्या अगदी पूर्वीसारख्या. अर्थात तो आत्ता थकलाय हे मला जाणवत होते. पण गप्पा मारताना मला जाणवले कि त्याच्यातला लहानपण अजून जिवंत आहे. शेअर मार्केट मधली सर्व गुंतवणूक त्याने काढून घेतली आहे असे तो म्हणाला. मी त्याला म्हटले कि मी गाणगापूर मध्ये एका आश्रमात ट्रस्टी आहे , तुझा तसा देवावर विश्वास नाही पण माझ्याबरोबर चल तू. त्याला याचे खूप कौतुक वाटले , आपण जाऊया असे तो म्हणाला. ते राहिले ते राहिलेच.
![]() |
| २६ मे २०१९ , देवपूर , नाशिक . हि माझी आणि मधुमामाची शेवटची भेट |
![]() |
| मी , अक्षता आणि वैभव आहेर |
अनेक गोष्टी बोलायच्या , ऐकायच्या राहून गेल्या आणि यात माझी पूर्णपणे चूक आहे. आपण जगतो तेव्हा आपल्या संपर्कातील लोकांवर पॉसिटीव्ह इम्पॅक्ट होणे फार महत्वाचे आहे व आपल्या मृत्यूनंतर आपल्याबद्दल लोकांच्या मनात चांगल्या आठवणी येणे हेच यशस्वी जीवनाचे सर्टिफिकेट आहे आणि या दोनीही बाबतीत मधुमामा १०० % यशस्वी झाला. हे सर्व मला त्याला सांगायची इच्छा होती आणि खरे म्हणजे आत्ता हे लिहिण्याला काहीच अर्थ नाही पण मी माझ्यासाठी लिहिलेय. १३ डिसेंबर २०२० ला त्याचा कार्यविधी झाला त्याला मी एक भाषण करून श्रद्धांजली वाहिली आणि बरेच वर्ष मी संपर्कामधे नसल्याची माधुरीमामी , अक्षता आणि वैभव ची जाहीर माफी मागितली.
मधुमामा YOU ROCKED MAN ........
विशाल फुलपगार
10 जानेवारी 2021











