Wednesday, August 18, 2021

बुद्धम शरणं गच्छामि - १९८३ श्रीलंका मधील थरारक अनुभव

तालिबान्यानी अफगाणिस्तान देशाचा पूर्ण ताबा घेतला अश्या बातम्या टीव्हीवर पाहिल्या. विमानतळावर तसेच रनवे वर लोकांची गर्दी होती. देशात अराजकता माजली असताना काय होते याचा एक अनुभव मी १९८३ ला श्रीलंका कोलंबो येथे घेतला होता. तो जसाच्या तसा सांगतो. तेव्हा मी १० वर्षाचा होतो.  

पप्पा इंडियन एअरलाईन्स मध्ये नोकरीला होते. त्या पुण्याईवर मी अनेक ठिकाणी लहानपणापासूनच विमानाने फिरलो. साधारणपणे जुलै १९८३ ला मी , आई , पप्पा, बहीण सोनाली साधारणपणे ४-५ दिवस फिरण्यासाठी श्रीलंका कोलंबो येथे गेलो , तेव्हा कोलंबोला सिलोन म्हणायचे. सिलोनला वेलवत्ता या ठिकाणी आम्ही कोणाच्या तरी घरी पेयिंग गेस्ट म्हणून एका खोलीत राहिलो. तिथे इंडियन एअरलाईन्स चे स्टाफ राहायचे. स्वस्त होते. तो एक छानसा बंगला होता. समुद्रकिनाऱ्यापासून चालत २ मिनिटावर. स्वच्छ समुद्रकिनारा, स्वच्छ वाळू पहिल्यांदा पाहिली . समुद्राचे पाणी पारदर्शक असते हे पाहून धक्काच बसला. कारण तो पर्यंत आम्हाला दर रविवारी जुहूला समुद्रात काळ्या पाण्यात अंघोळ करायची सवय होती. 

लहान असल्यामुळे जात ,धर्म वगैरेचा काही संबंध नव्हता , तसेच टुरिस्ट असल्यामुळे फिरायचे , शॉपिंग करायचे हे एकच काम. तिथे लोक हिंदी मध्ये बोलायचे, त्यामुळे भाषेची अडचण नव्हती. मला नक्की आठवतंय त्या दिवशी वातावरणामध्ये तणाव होता. काहीतरी वाईट होणार आहे याची कुजबुज होती. आम्ही राहत असलेल्या ठिकाणापासून जवळच एक मोठे शॉपिंग सेन्टर होते. त्याचे नाव ड्युटी फ्री शॉपिंग सेन्टर. तिथे आम्ही काहीतरी घेण्यासाठी गेलो होतो. अचानक काहीतरी झाले , सगळे दुकानदार दुकाने उघडी टाकून तिथून पळून गेले. आम्ही पण घाई घाई ने उतरलो. आणि त्वरेने आमच्या रूम वर पोहोचलो. इतर दोन खोल्यांमधील  इंडियन एअरलाईन्स चा स्टाफ फॅमिली सकट तिथे होताच. 

त्या घराचे मालक एक सिंहली म्हणजे बुद्धिस्ट बाई होती. श्रीलंकेमध्ये सिंहली आणि तामिळ लोक होते. तिने सांगितले कि सिंहली / तामिळ दंगल सुरु झाली आहे. कोणीतरी जेल मध्ये जाऊन ३०-३५ कैद्यांना मारून टाकले आहे. त्यात कोणीतरी लीडर पण होता. खरे म्हणजे हे फक्त एक निमित्त होते. तणाव खूप दिवसांपासूनच होता. घर मालकांनी सांगितले कि आम्ही तुमची जबाबदारी घेऊ शकत नाही. आणि आम्ही पण घर खाली करून इथून जात आहोत. तुम्हीपण ताबडतोब निघा. 

पप्पा 

आत्ता या परिस्थितीमध्ये दुसऱ्या देशात कुठे जायचे , कुठे राहायचे काही कळेना. आम्ही ३ कुटुंब सामान घेऊन बाहेर आलो. रस्त्यावर लाठ्या काठ्या, तलवार घेतलेले आणि लोक दिसत होते. तुरळक जाळपोळ चालू होती. पोलिसाचा पत्ताच नव्हता. सध्या कोणत्यातरी हॉटेलमध्ये राहायचे आणि चौकशी करून उद्या भारतात जाण्यासाठी  विमानतळावर जायचे असे पप्पांनी ठरवले. त्यातच समोर असलेले रिकामे शॉपिंग कॉम्प्लेक्स बघून आमच्या सोंबत असलेल्या एका नवरा बायकोंने त्यांचा ८ वर्षाचा मुलगा आम्हाला दिला आणि म्हटले कि आम्ही काहीतरी घेऊन येतो. पप्पानी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांनी ऐकले नाही. मग आम्ही दोन कुटुंब आणि एक मुलगा हॉटेल शोधायला लागलो. कोणीही हॉटेलवाला आम्हाला खोली द्यायला तयार नव्हता कारण आमच्या बरोबरचे कुटुंब तामिळ होते आणि तसेच दिसायचे आणि वडील पण साधारण तामिळच दिसायचे. 

मी , बहीण ,आई आणि पप्पा 

आई आणि पप्पा 
मोठीच पंचाईत झाली . संध्याकाळ होऊ लागली होती. सर्व हॉटेल सिंहली / बुद्धिस्ट लोकांची होती. त्यांच्या मनात तामिळांबद्दल द्वेष होता कि नाही ते माहित नाही पण त्यांना तामिळना रूम द्यायची नव्हती. 

मग शेवटी एक हॉटेलवाला आमच्याशी बोलायला तरी तयार झाला. त्याला आमचा पासपोर्ट दाखवला आणि सांगितले कि आम्ही मुंबईमध्ये राहतो , आम्ही तामिळ नाही. पप्पानी सांगितले कि आम्ही बुद्धिस्ट आहोत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत आम्ही हिंदू धर्मातून बुद्ध धर्मात प्रवेश केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे नाव ऐकल्यावर तो जरा विचारात पडला. पण बोलला कि तुमच्यावर विश्वास कसा ठेवू. पप्पा बोलले कि आम्ही त्रिशरण पंचशील नियमित म्हणतो. आत्ता तुम्हाला म्हणून दाखवतो. पप्पानी आम्हाला इशाऱ्याने हात जोडायला सांगितले. आणि त्रिशरण पंचशील म्हटले. वास्तविक आमच्या घरी हे नियमित म्हटले जायचे त्यामुळे काहीच चुकले नाही. 

त्यांना पटले व त्यांनी आम्हला दोन खोल्या दिल्या. आम्ही सांगितले कि एकाची चुकामुक झालीय आणि या मुलाचे आई वडील पण येतील. त्यांना विनंती केली कि या मुलाचे आई वडील जर पोलीस स्टेशन ला गेले तर त्यांना इथला पत्ता कळेल असा निरोप पोलिसाना द्या. रात्री जेवणाची व्यवस्था केली होती. जगात काहीही झाले तरी पोटभर जेवायचे हा फुलपगार लोकांचा नियम आहे त्याप्रमाणे निदान मी तरी पोटभर जेवलो. रात्री त्या मुलाचे आई वडील कसेतरी आमच्या हॉटेलला पोहोचले. तो पर्यंत त्या मुलाचा जीव कासावीस झाला होता. अर्थात ते आले नसते तरीही आम्ही त्याला घेऊन मुंबईला परतणार होतोच. 

हॉटेलमध्ये पण दंगलीचा प्रतिकार करायची पूर्ण तयारी होती.  कोणी हल्ला केला तर ते पण पूर्णपणे तयार होतेच. याविषयी अधिक लिहीत नाही. हॉटेलमधल्या बऱ्याचश्या लाईट बंद केल्या होत्या जेणेकरून अंधार झाला होता. 

आम्ही त्यांना म्हटले कि इथे दंगेखोर आले तर ? ते म्हटले कि या भागात आमची मेजॉरिटी आहे त्यामुळे इथे तसा काही प्रॉब्लेम नाही. पण जर आलेच तर मात्र त्यांना आम्हाला पार करावे लागेल मगच ते तुमच्या पर्यंत पोहोचतील. तुम्ही आमचे गेस्ट आहात. तुमचे संरक्षण करणे आमचे कर्तव्य आहे. काळजी करू नका. तूर्तास शहरात कर्फ्यू आहे आणि हि दंगल इतक्यात काही थांबणार नाही. 

आत्ता कर्फ्यू मध्ये विमानतळावर जायचे म्हणजे पोलीस परवानगी पाहिजे , मग पप्पाना घेऊन हॉटेल मालक त्याच्या गाडीने पोलीस स्टेशनला रात्री गेले. तिथे पासपोर्ट दाखवले आणि त्यांना सांगितले कि उद्या विमानतळावर जाऊन भारतात परतायचे आहे तेव्हा तुम्ही परवानगी द्या. त्यांनी एक पत्र दिले आणि सांगितले कि हे शहर मिलिटरी च्या ताब्यात आहे. सर्वत्र दंगे चालू आहेत. आम्ही तुम्हाला पोलीस गाडी देतो. जागोजागी चेकिंग होईल तिथे तुम्ही हे पत्र दाखवा. पण आम्ही तुमची जबाबदारी घेत नाही.  बेस्ट ऑफ लक. ते पत्र घेऊन रात्री २-३ वाजता पप्पा हॉटेल ला परत आले. तो पर्यंत आम्ही खूप तणावात होते. तथागत गौतम बुद्धांच्या कृपेने आम्हाला राहायला जागा भेटली आणि आमच्याबरोबर इतर दोन कुटुंबातही भेटली. नाहीतर आम्ही काय केले असते काय माहित. 

सकाळी ८ वाजता पोलीस ची गाडी आली . थोडे खाऊन आम्ही निघालो. त्या हॉटेलवाल्याचे खूप आभार मानले. त्याने आम्हाला खूप मदत केली. नंतर आम्ही कधीच भेटणार नव्हतो. त्याने देखील आम्हाला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. 

पुढे पोलिस गाडी आणि मागे आमची मॅटॅडोर सारखी गाडी , त्यात आम्ही तीन कुटुंब निघालो. रस्त्यावर भयानक परिस्थिती होती. जागोजागी गाड्या जाळल्या होत्या, अनेक घरेदेखील जळत होती. रस्त्यावर खूप प्रेतं पडलेली होती. सर्वत्र मिलिटरी चे जवान बंदूक घेऊन उभे होते. प्रत्येक १००-२०० मीटर वर आमची चेकिंग व्हायची. सर्वांचे पासपोर्ट , चेहरे चेक व्हायचे. अनेकदा ते बंदूक आमच्याकडे ताणायचे. खूप घाबरलो होतो. आम्हाला लवकर विमानतळावर पोहोचायचे होते. 

पप्पा चांगले कपडे घालून ड्रायव्हरच्या बाजूला बसले होते.  विमानतळापर्यंतचा अर्ध्या तासाचा प्रवास आम्ही अडीच तीन तासात कसाबसा पार करून विमानतळावर अंदाजे ११ वाजता पोहोचलो. तिथे तर काहीच सुरक्षा नव्हती. बस डेपोमध्ये आपण कसे सहजच शिरतो तसे आम्ही त्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आत गेलो. आत मात्र खूप गर्दी होती. बरीचशी विमाने होती. अनेक देशांचे नागरिक परतत होते. 

पप्पा  इंडियन एअरलाईन्सच्या ऑफिसमध्ये गेले. तिथे त्यांना सांगितले कि तुमचे तिकीट कोलंबो- मद्रास- मुंबई आहे (चेन्नई ला तेव्हा मद्रास म्हणत असत). सध्या कोलंबो मद्रास अतिरिक्त विमाने चालू आहेत पण सगळी फुल आहेत. संध्याकाळी ६ वाजताच्या विमानात तुम्हाला पाठवतो. तोपर्यंत इथेच थांबा. इतक्यात इंडियन एअरलाईन्सचा ड्युटी मॅनेजर आला , तो म्हणाला कि कोलंबो - बंगलोर - चेन्नई विमान आहे ते आत्ता सुटेल त्याने मी तुम्हाला पाठवू शकतो. तुमचे तिकीट तसे नाही पण अपवादात्मक स्थितीत तुम्हाला मी परवानगी देऊ शकतो. कारण आत्ता वेळापत्रकाप्रमाणे काहीच चालत नाही. तसेच जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर भारतीयांना भारत आणण्याचे आम्हाला आदेश आहेत. त्यामुळे विमानसेवा या स्टेट ट्रान्सपोर्ट च्या बस सारख्या ये जा करत आहेत. आमच्या बरोबरचे लोक म्हटले कि आम्ही डायरेक्ट विमानाने मद्रास ला संध्याकाळी जाणार. 

पांढरे शूज घालून माझे पप्पा त्या दिवशी कोलंबो एअरपोर्ट ला , सोबत इंडियन एअरलाईन्स चा स्थानिक स्टाफ 

पप्पानी मात्र सांगितले कि पहिल्यांदा भारतात पोहोचूया मग काही प्रॉब्लेम नाही. आणि आम्ही विमानात प्रवेश केला. विमान पूर्ण भरलेले होते. विमान निघाले आणि लगेच थांबले. सगळे प्रवासी घाबरले. आम्हाला वाटले कि इथे पण दंगेखोर आले असावेत. पायलटने सांगितले कि अजून काही लोक येत आहेत त्यांच्यासाठी आपण थांबलोय. आम्हाला काहीच कळेना कारण विमानात बसायला जागाच नव्हती. ५-१० मिनिटामध्ये ४-५ माणसे आणि बायका गाठोड्यात काहीतरी बांधून ते पाठीवर ठेवून आले. परत दरवाजे खुलले आणि त्यांना आत घेतले. ते उभेच राहिले.  मग विमान कर्मचाऱ्यांनी त्यांना मार्गिकेमध्ये बसवले आणि त्यांना दोन्ही बाजूच्या सीट पकडून ठेवायला सांगितले. अंदाजे दिड दोन तासांचा प्रवास सुरु झाला.  सर्वाना विमानात खायला मिळाले. मी पण बाकीच्या चिंता बाजूला ठेवून ते खाल्ले. आणि हो जे खाली बसले होते ते सोन्याने लादलेले होते (बप्पी लाहिरी सारखे ) म्हणजे नक्कीच ते श्रीलंकेतील श्रीमंत लोक असतील पण परिस्थितीने त्यांना विमानात जमिनीवर बसून प्रवास करायला लावला. 

ठरल्या वेळेला आम्ही बंगलोर एअरपोर्ट ला पोहोचलो. अर्धे लोक बंगलोरला उतरली काही नवीन प्रवासी आले. आम्ही मात्र विमानातच बसून होते कारण आम्हाला पुढे त्याच विमानाने मद्रासला जायचे होते.  जमिनीवर बसलेल्याना सीट वर बसायला मिळाले. बंगलोरवरून त्या विमानाने मद्रास साठी उड्डाण केले. मद्रास एअरपोर्ट ला विमानातून उतरल्यावर सुखरूप पोहोचल्याचा आनंद काही औरच होता. 

मद्रास विमानतळावर देखील खूप घाई गडबड होती. विमान आले कि ते लगेचच कोलंबोला जायचे. इंडियन एरलाईन्स ने अप्रतिम काम केले. सरकारी मालकी असल्यामुळे ते शक्य झाले. खाजगीकरणानंतर आपण हे सर्व विसरायचे. आम्हाला ताबडतोब मद्रासवरून पुढच्या विमानाने मुंबई ला पाठवले. आणि आम्ही घरी व्यवस्थित पोहोचलो.  त्यावेळेला एवढे कळले नाही मात्र थोडे मोठे झाल्यावर मात्र याचे गांभीर्य कळले. नशिबाने दिलेली साथ पप्पांचे धाडस , त्यांचे योग्य वेळी योग्य निर्णय या मुळे आम्ही सुखरूप घरी परतलो. 

आज तालिबान्यांनी अफगाणिस्थानवर कब्जा केल्याने लोकांची देश सोडायची धावपळ आणि विमानतळावरची काही दृश्य पहिली. मला हा प्रसंग आठवला आणि तो तुम्हाला सांगितला. 
काबुल विमानतळ १५ ऑगस्ट २०२१

लोक एकमेकांना का मारतात ? दंगली का होतात ? त्यातून काय मिळते ? याचा मी बरीच वर्षे विचार करतोय पण उत्तर मात्र सापडले नाही... 

भारत सरकारने केलेली उत्तम व्यवस्था , इंडियन एरलाईन्सचे अथक परिश्रम ,त्यावेळेला मीडिया , व्हाट्सएप्प नसणे आणि महत्वाचे म्हणजे बुद्धम शरणं गच्छामि ने आम्हाला सुखरूप ठेवले हे खरेच. 



विशाल फुलपगार 
१८  ऑगस्ट २०२१