Sunday, May 24, 2020

मी पहिल्यांदा गाणगापूर ला गेलो



साधारणपणे १९९६ साली दत्त जयंतीला मी, पंकज, सुभाष, संजय पहिल्यांदा पाठक गुरुजींकडे माहिमच्या घरी गेलो. खरे म्हणजे कोणत्या वर्षी गेलो हे आठवतच नाही. १९९६ च्या आधी असेल, पण दत्तजयंती होती हे मात्र नक्की. त्यानंतर गुरुजींकडून गाणगापूरबद्दल खूपच माहिती/ उल्लेख, त्याचे महत्व ऐकावयास मिळायचे. गुरुजींनी गाणगापूरमध्ये आश्रमासाठी जागा घेतली आहे व तिथे आश्रम बांधणार आहेत वगैरे वगैरे.  याशिवाय गाणगापूर हे एक जागृत दत्तस्थान आहे , कोणाला भूत लागले तर गाणगापूरला नेतात, तेथील मंदिरात आरती चालू झाली की  अंगातील भूत नाचायला लागते, अश्या अनेक कथा मी ऐकल्या होत्या. त्यामुळे गाणगापूर हे माझ्यासाठी तरी एक गूढ स्थान होते. 

गाणगापूरला पहाटे २. ३०/ २.४० ला मंदिरात आरती होते व त्यावेळेला गुरुजी कुठेही असले तरी उठून बसतात हे आम्हाला माहित होतेच. गुरुजी गाणगापूरचे इतके कौतुक करायचे कि गाणगापूर हे एक रम्य स्थळ असावे असा माझातरी समज होता. आम्ही गुरुजींना सांगितले कि पुढच्या वेळेला आम्ही तुमच्याबरोबर येऊ. त्याप्रमाणे साधारणपणे एप्रिल महिन्यात गुरुजी गाणगापूरला जाणार होते व महिनाभर राहणार होते. त्यामुळे त्यांच्या बरोबर जायचे, एक रात्र राहायचे, सकाळी काकड आरती करून मग अक्कलकोटला जाऊन सोलापूरहुन सिद्धेश्वर ट्रेन पकडून मुंबईला यायचे असा कार्यक्रम आम्ही आखला आणि त्याप्रमाणे तिकीटे काढली.   

गुरुजींना सांगितले की मी, संजय, सुभाष, पंकज व तुम्ही असे ५ जण आहोत. आम्हाला दोन आणि तुम्हाला एक असे ३ रूम हॉटेलमध्ये बुक करा. गुरुजी म्हणाले तिथे हॉटेल वगैरे काही नाही, मी नेहमी गुळवणी महाराज आश्रमात/ धर्मशाळेत राहतो तिथे आपण एक मोठी खोली घेऊ, काहीच प्रॉब्लेम नाही. म्हटले ठीक आहे. त्यांना सांगितले की गाणगापूर स्टेशनवरून धर्मशाळेत जाण्यासाठी एक गाडी तरी बुक करा म्हणजे आपण आरामात जाऊ. अरे तिथे स्टेशनवर खूप रिक्षा असतात व त्या ट्रेनच्या वेळेप्रमाणे असतात आपण शेअर ने जाऊ. आपल्याला मोठा आश्रम बांधायचा आहे, पैसे जपून वापरायला शिका. गाणगापूर स्टेशनवरून साधारण तासाभरात आपण गुळवणी महाराज आश्रमात पोहोचू. मी फोन करून खोली बुक करतो. 

ठरल्या वेळेला आम्ही सगळे जण गुरुजींकडे माहीमला जमलो. घरूनच जेवून आलो होतो. स्व. माईने आम्हा सर्वाना सांगितले कि सुखाने या. रात्री गुरुजींच्या बाजूला झोपू नका, नंतर मला सांगू नका कि मी सांगितले नाही. याची गंमत तुम्हाला मी नंतर सांगतो. 

माहिमवरून पंकजभाऊच्या गाडीने दादर स्टेशनला आम्ही आलो. साधारणपणे रात्री ११/ ११.३० च्या दरम्यान ती मद्रास मेल का चेन्नई मेल सुटली. दुसऱ्या दिवशी सकाळी साधारणपणे १०.३० ला गाणगापूर स्टेशन येईल असे गुरुजींनी सांगितले होते. या ट्रेन नेहमीच उशिराने धावतात असे पण सांगितले. रात्री ट्रेन मध्ये गप्पा मारल्या, नामस्मरण केले आणि झोपी गेलो. सकाळी साधारण ५ वाजता उठलो. तसेपण स्लीपर कोच असल्यामुळे प्रत्येक स्थानकावर जाग यायचीच.गुरुजी जागेच होते. मग पुन्हा गप्पा सोबत आणलेला सुका नाश्ता  खात खात प्रवास चालू होता. मधेच कुठेतरी चहा घेतला. ट्रेनमध्ये चहा एवढा बेचव का विकतात आणि आपण तो का विकत घेतो या प्रश्नाचे उत्तर मला अजूनही सापडले नाही.    

ट्रेनचा प्रवास मला खूप आवडतो. अनेकांशी गप्पा मारता येतात, ओळखी होतात. प्रत्येक स्टेशन ला चढणारी, उतरणारी माणसे, त्यांना निरोप दयायला किंवा घ्यायला आलेली माणसे, प्रत्येक स्टेशनवर फेरीवाले, खाऊवाले, पाण्याच्या बाटल्या, कोल्ड ड्रिंक विकणारी आणि कर्कश आवाजात ओरडणारे विक्रेते. जाणारे स्टेशन आणि आपले स्टेशन यामधील अंतराचे आपण मनातल्या मनात हिशोब करणे.  आजूबाजूला धावणारी व  मागे जाणारी झाडे, निसर्ग, शेतात काम करणारी माणसे, नदी, त्यावरील ब्रिज, लहान मुले ट्रेनला टाटा करतात. काही माणसे उगीचच जाणाऱ्या ट्रेन कडे बघत बसतात,असे असंख्य अनुभव देणारा हा प्रवास असतो. 

सकाळी सकाळी पाठक गुरुजींनी नामस्मरण घेतले. नंतर गप्पा चालू . एकंदरीत गुरुजींबरोबर गप्पा मारणे हा एक विलक्षण अनुभव. त्यांच्याशी बोलतच राहावे असे वाटत असे. वेळ कुठे जायचा ते कळायचेच नाही. त्यात सुभाष आणि संजय म्हणजे नॉन स्टॉप विनोद चालू असायचे, त्यात प्रत्येक विनोदाला हसण्याची जबाबदारी घेतलेले पंकजभाऊ व आमच्या वयाशी ऍडजस्ट होऊन गप्पा मारणारे आणि दिलखुलास हसणारे पाठक गुरुजी असा आमचा प्रवास छान चालला होता. गुरुजींच्या बोलण्या वागण्यातून त्यांची दत्त महाराजांविषयी अपार श्रद्धा क्षणोक्षणी जाणवत असे. तसेच ते दत्तचरणी किती लीन झाले आहेत ते कळत असे. स्वतःच्या उपासनेबद्दल ते कधीच काही सांगत नसत. वाल्याचा वाल्मिकी बनलेला त्यांचा पट्टशिष्य स्व. बागुलकाका आणि त्यांचा ऑफिसमधील पट्टेवाला आणि श्रेष्ठ भक्त मनोहरमामा याविषयी ते नेहमीच बोलत.
मनोहरमामा                पाठकगुरुजी               बागुलकाका 

जसे जसे गाणगापूर जवळ येऊ लागले तसे तसे गुरुजी खिडकीत बघत बोलले कि एक मोबाईल टॉवर आपल्याला गाडीच्या डाव्या बाजूला दिसेल, तो गेला कि ५ मिनिटामध्ये गाणगापूर स्टेशन येईल. गाडी दोनच मिनिटे थांबते त्यामुळे लवकर उतरून घ्या. त्याप्रमाणे आम्ही तयार होतोच. मोबाइल टॉवर गेला आणि गुरुजी म्हणाले चला आता स्टेशन येईल. आपण महाराजांना प्रार्थना करू कि ट्रेन प्लॅटफॉर्म वर लागू दे. आम्ही गोंधळलो, गुरुजींना विचारले  कि ट्रेन प्लॅटफॉर्मवरच येणार ना? ते म्हणाले कि हे एक खेडेगावातील एक छोटे स्टेशन आहे, कधी कधी दुसरी गाडी आधी आली तर ती प्लॅटफॉर्म वर लावतात. आम्ही म्हणालो मग काय करायचे ? काही नाही. आपण रेल्वे ट्रक वर उड्या टाकायच्या आणि समोरच्या प्लॅटफॉर्मवर चढायचे आणि मग चालत रिक्षा स्टॅण्डवर जायचे. अरे म्हटले हे काय? निदान त्या दिवशीतरी ट्रेन प्लॅटफॉर्म वरच आली व आम्ही रेल्वे ट्रक वर उतरायचा अनुभव तेव्हा घेऊ शकलो नाही.  (अर्थात नंतर कधीतरी २-३ वेळा मी हा आनंद उपभोगला हि गोष्ट वेगळी.)

पहिल्यांदा देवल गाणगापूर स्टेशनला सकाळी ११. ३० ला उतरलो . अत्यंत छोटे खेडेगाव टाइप स्टेशन, रखरखीत उन्हाने आमचे स्वागत केले.





आम्ही आपले चालत चालत रिक्षा स्टॅन्ड ला पोहोचलो. ५ का १० रुपये प्रति सीट याप्रमाणे ते रिक्षा मध्ये दुप्पट तिप्पट लोक कोंबत होते. बराच आरडाओरडा चालू होता. बाजूला एक ST बस लागली होती पण आम्ही पोहोचायच्या आधीच ती तुडुंब भरलेली होती , त्यामुळे ते धाडस आम्ही केले नाही. संजय पाटील ने जास्त पैसे देऊन रिक्षा च्या मागच्या ४ सीट घेतल्या व त्यात आम्ही ५ जण comparatively  ऐसपैस बसलो. मधल्या सीटवर खूप माणसे होती. ड्रायव्हरच्या बाजूला पण खूप लोक होती. वाटेत गर्दीमुळे रिक्षा पालटू नये म्हणून सतत देवाचा धावा चालू होता.

मी खरे सांगतो , गाणगापूर स्टेशन ते गाणगापूर मंदिर रस्त्यावर वर इतके खड्डे होते कि विचारू नका. त्यामुळे अंगाची सगळी हाडे खिळखिळी झाली. महाराजांचे नाव घेत/ ठेवत आम्ही जेव्हा चौडापूर पार केले तेव्हा रस्ता जरा बरा झाला.

चौडापूर कमान 
                                             
तोपर्यंत शरीरातील सर्व हाडांनी आपले अस्तित्व दाखवले होते, पाठ मोडकळीस आली होती. शेवटचे पाच मिनिटे प्रवास चांगला झाला. सांकेतिक भाषेत सांगायचे म्हटले तर महाराजांची सुरुवातीची सेवा कठीण आहे. परंतु नंतर मात्र त्रास होत नाही असे मला उगाचच वाटले. गुरुजींच्या चेहेऱ्यावर आनंद आणि आमच्या चेहेऱ्यावर खूप घाम आणि प्रवासाचा त्रास स्पष्टपणे दिसत होता.

ठरल्याप्रमाणे आम्ही गुळवणी महाराज आश्रम/ धर्मशाळेच्या बाहेर उतरलो. (आपल्या आश्रमाजवळ आहे.) येथे गुरुजींचे नियमित येणे जाणे असल्यामुळे त्यांनी लगेचच चावी दिली. खाली आणि वरती रूम होत्या व तळघरात ध्यानघर होते.  आमची खोली पहिल्या मजल्यावर होती व पूर्णपणे स्वच्छ आणि रिकामी होती. आम्हा ५ जणांसाठी चटई , गादी व अंघोळीला बादल्या दिल्या होत्या. फॅन होता, पण बटन चालू केल्यावर देखील चालू झाला नाही. गुरुजी म्हणाले लाइट गेली आहे, कधी येईल माहित नाही. तो पर्यंत तुम्ही अंघोळ करून घ्या, मग आम्ही धर्मशाळेतल्या सामुदायिक बाथरूममध्ये खांदयावर टॉवेल आणि एका हातात बादली अशी लाइन लावून अंघोळी उरकल्या. त्यावेळी कोणाकडे कॅमेरा नव्हता नाहीतर हा खूपच संस्मरणीय फोटो झाला असता. सामुदायिक असूनदेखील बाथरूम स्वच्छ होते. माझा धर्मशाळेत राहण्याचा हा पहिलाच अनुभव असल्यामुळे मला असे वाटले असेल ,पण इथे चांगली स्वच्छता होती. आणि इतक्या स्वस्तात ते भाविकांची राहण्याची सोय करतात हे कौतुकास्पद.

गुळवणी महाराज धर्मशाळेबाहेर चहा पिताना एका निवांत क्षणी पाठक गुरुजी 

असो, अंघोळ करून आम्ही एका ब्राह्मणाकडे जेवायला गेलो, जेवण स्थानिक पद्धतीचे तिखट होते. मला काही आवडले नाही,पण काही पर्याय नव्हता आणि फायदापण नव्हता,कारण रात्री परत इथेच जेवायचे होते. गुरुजींना सांगायची हिम्मत नव्हती. नंतर आम्ही पुन्हा खोलीत आलो, भयानक उकाडा होता, त्यात लाइट नव्हती. संध्याकाळी निर्गुण पादुका मठात गेलो. मठात जाताना गुरुजींनी आपला प्लॉट दाखवला. त्यात विशेष काही आवडण्यासारखे नव्हते. प्लॉट मंदिराजवळ होता आणि रस्त्यालगत होता. मंदिरात दर्शन झाले, विशेष गर्दी नव्हती. इतर सर्व धर्मस्थळांप्रमाणे इथे देखील अस्वच्छता होती. गुरुजींना पुजारी ओळखत होते. व "जय गुरुदेव" म्हटले कि मंदिरातील पुजारी मागे लागत नाहीत, त्यांना कळते कि हि पाठक गुरुजींची माणसे आहेत. गुरुजींनी आम्हाला मंदिराला २१ प्रदक्षिणा करायला सांगितल्या, त्या आम्ही केल्या.



तिथून आम्ही रिक्षाने संगमावर गेलो. हा रस्ता देखील खूप खराब होता. तिथे गर्दी नव्हती. संगमावर अनेक जणांसाठी श्री गुरुचरित्र पारायणाची सोय होती. आम्ही तिथे दर्शन घेतले व तिथल्या औदुंबराला प्रदक्षिणा घातल्या. तिथले सर्व पुजारी गुरुजींना ओळखत होते. मला विचारल्याशिवाय कोणालाही दक्षिण दयायची नाही असे गुरुजींनी आधीच सांगितले होते. गाणगापूर हे कर्नाटकात असले तरी येथे सर्वजण उत्तम मराठी बोलतात त्यामुळे भाषेची काहीच अडचण नाही.


संगम 

तिथून आम्ही भस्माच्या डोंगरावर गेलो. डोंगर नव्हताच लोकांनी पोती पोती भरून तिथले भस्म नेले होते. तरीदेखील आम्ही तिथे गेलो. हजारो वर्षांपूर्वी या जागी खूप हवन, याग झाले होते असे म्हणतात व त्यावेळेपासूनचे भस्म इथे आहे.





तिथून आम्ही कल्लेश्वर मंदिरात गेलो व दर्शन घेतले. निर्गुण पादुका मठ, संगम आणि कल्लेश्वर येथील दर्शन झाले कि आपली गाणगापूर यात्रा पूर्ण होते असे म्हणतात.



तिथून आम्ही पुन्हा धर्मशाळेत आलो. त्यादरम्यान संजयने उदया आम्हाला सोलापूरला सोडायला एक कार ठरवली. म्हणजे उदयाचा प्रवास तरी नीट होईल.

रात्री पुन्हा शेज आरतीसाठी मठात गेलो. खूप गर्दी होती. महाराजांची पालखी निघाली व आमच्या अंगावरून ब्राम्हणांनी व्यवस्थित नेली. आम्ही मंदिराच्या आवारात त्यावेळेला झोपलो. खरे म्हणजे एवढ्या गर्दीत कोणीतरी आमच्या अंगावर पाय टाकेल असे वाटले होते त्यामुळे डोळे गच्च बंद केले होते, पण तसे काही झाले नाही. गुरुजी खूप आनंदले ते म्हणाले कि आता महाराजांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील


गाणगापूर निर्गुण पादुका मठात रात्री शेज  आरती 
रात्री पुन्हा आम्ही त्याच ब्राह्मणाकडे जेवायला गेलो. जेवण  प्रेमाने वाढले पण दुपारप्रमाणेच तिखट होते. नंतर गुळवणी महाराज आश्रमात आलो. आता लाईट आली होती, त्यामुळे फॅन चालू झाला आणि तो फॅन देखील आवाज करत करत आमच्या गप्पामध्ये सामील झाला. गुरुजींबरोबर बोलणे म्हणजे एक खूप आनंद होता. ते बऱ्याच गोष्टी सांगायचे, खूप जुन्या आठवणी सांगायचे, नोकरी करतानाचे अनुभव सांगायचे आणि कायम मित्राप्रमाणेच वागायचे. त्यामुळे कधीच कंटाळा यायचा नाही. गप्पा मारता मारता रात्रीचे १२ वाजून गेले.  गुरुजीच बोलले कि तुम्ही थोडा वेळ झोपा, आपल्याला पहाटे इथून २:२० ला निघायचे व २:३० ला मठात काकड आरतीला पोहोचायचे आहे  या आरतीला भूत नाचतात, ते तुम्हाला बघायला मिळेल तसेच या आरतीचे विशेष महत्व आहे.

त्याप्रमाणे आम्ही पाठ टेकली. माईंनी सांगितले होते की गुरुजी जवळ झोपू नका पण मी झोपलो. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर गुरुजींना भेटायला महाराज येतात आणि ते मला पण बघतील आणि आशीर्वाद देतील (चित्रपटाप्रमाणे) असे मला वाटले. प्रत्यक्षात असे काहीच झाले नाही. नुकतीच मला झोप लागली आणि अर्ध्या तासातच माझ्या पाठीवर लाथ पडली व मी बोंबलत उठलो. गुरुजी बाजूला शांत झोपले होते. माईंनी किती महत्वाचा आणि सावधानतेचा इशारा मला दिला होता ते मला तेव्हा कळाले.

पहाटे २: १५ ला गुरुजींनी आम्हाला उठवले व २:२० ला आम्ही तिथून अर्धवट झोपेतच चालत निघालो. तेव्हा एवढी स्ट्रीट लाइट नव्हती, म्हणजे गडद अंधार होता आणि त्यात गुरुजींकडे एक पेन्सिल टॉर्च, तिचा प्रकाश जमिनीपर्यंत पोहोचायचं कि नाही हे फक्त गुरुजींनाच माहित. अर्थात गुरुजींना रस्ता तोंडपाठ असल्यामुळे ते झपझप जलदगतीने चालत होते आणि आम्ही त्यांच्या मागे चालत होतो. मंदिराजवळ मात्र झगमगाट होता. मंदिरात गर्दी होती.

कोणी पुजारी वेळेत संगमावरून कवाडीतून पाणी घेऊन आला आणि मग महाराजांची आरती चालू झाली. काही जणांच्या अंगात आले. ते दत्त्यो दत्त्यो असे ओरडत होते. महिलांच्या अंगात जास्त येत होते. काहीजण बेभानपणे नाचत होते, काही बायका तर मंदिराच्या आवारातील खांबावर झपझप माकडासारख्या चढल्या व त्यावर उभ्या राहिल्या. हे बघितल्यावर डोळयात झोपेच्या ऐवजी भीती आली. डोळे आमचे सताड उघडे. भीती वाटत होती. आरती झाल्यावर आम्ही निघालो त्या अंधारात चालता चालता गुरुजींना म्हटले कि भीती वाटतेय, ते म्हणाले कि नामस्मरण करा काहीच होणार नाही. एरवी मी तर एकटाच इथे येतो.  इथे सर्वत्र महाराजांचा वावर आहे.

गाणगापूर निर्गुण पादुका मठात काकड आरती 

भूत आहे कि नाही हा वादाचा विषय असला तरी भुताची भीती मात्र नक्कीच आहे आणि रात्री अश्या वेळी ती खूप जाणवते. एक विचार माझ्या मनात आला, खरे म्हणजे आत्ता आपल्याला हसू येईल पण त्यावेळी जे वाटले ते सांगणे महत्वाचे आहे, त्यात काय लाजायचे.

मी म्हटले नामस्मरण, महाराज, सर्व काही ठीक आहे. पण भूत आले आणि आपण म्हटले की महाराज मला वाचवा आणि महाराजांना यायला थोडा उशीर झाला , ते बिझी असतील किंव्हा इतर कोणत्याही कारणाने, तर तो पर्यंत भूत आपला गेम करेल. च्यायला हा विचार एकदम भयानक होता आणि देवाची कोणाला तक्रार करायची की तो उशिरा आला. शिवाय घरी आईने विचारले कि एवढ्या रात्री तू बाहेर काय करत होतास? म्हणजे घरी पण ओरडा पडणार. असो कसेबसे आम्ही मठापासून ते खोलीपर्यंतचा १० मिनिटांचा दीर्घ प्रवास चालत करून खोलीवर आलो आणि दाराला आतून घट्ट कडी लावून घेतली, मग थोडे हायसे वाटले. सकाळी उठण्याबद्दल गुरुजी काही बोलले नव्हते . त्या रात्री निदान मी तरी जागाच होतो. मी मनोमन ठरवले कि गाणगापूरला पुन्हा येणे मला काही जमणार नाही. त्यामुळे हि माझी पहिली आणि शेवटचीच भेट. अर्थात नियतीच्या मनात काय होते हा भाग वेगळा.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच जाग आली गुरुजी स्नान करून मस्तपैकी गंध लावून माळेवर जप करीत बसले होते. आम्हीदेखील सकाळीच रांग लावून अंघोळी उरकल्या. मठात जाऊन निर्गुण पादुकांचे दर्शन घेतले ,नाश्ता  केला, परत गप्पा गोष्टी, त्या आश्रमातील तळघरात असलेले ध्यानघर पहिले, नामस्मरण, जप केला. उन्हाळा जाणवत होता. पुन्हा त्या ब्राह्मणाकडे दुपारी जेवलो. आमची गाडी वेळेत आम्हाला घ्यायला आली. आम्ही गाणगापूरला आलो याचा पाठक गुरुजींना खूप आनंद झाला होता. त्यांच्या पाया पडलो तेव्हा ते म्हणाले की  गाणगापूरला महाराजांची सेवा करणे खूप कठीण आहे आणि आपण घाबरून सेवा सोडायची नाही. मी मनात म्हटले की इथे विचार करायची पण चोरी आहे.

निघताना गुरुजी म्हणाले कि सोलापूरला प्रभाकर महाराजांचा मठ आहे तिथे जा व त्या मठाधिपतीना माझी खुशाली कळवा. पूर्वी ट्रेन गाणगापूरला थांबायची नाही तेव्हा मी सोलापूरला तिथे उतरत असे व तिथून ST ने गाणगापूरला येत असे. सध्या डायरेक्ट गाणगापूरला येतो त्यामुळे प्रभाकरमहाराज मठात जाणे होत नाही.

गाणगापूर ते अक्कलकोट रस्ता खूप वाईट होता पण कार असल्यामुळे जास्त त्रास झाला नाही. अक्कलकोटला दर्शन घेतले तिथे थोडा वेळ थांबलो व सोलापूरच्या दिशेने निघालो. अक्कलकोट ते सोलापूर रस्ता खूप छान होता.



अक्कलकोट स्वामी समर्थ मठ 

सोलापूरला प्रभाकर महाराज मठ शोधला व तिथे अंदाजे संध्याकाळी ५ वाजता पोहोचलो. सोलापूरमध्ये प्रभाकर महाराज म्हणून एक खूप मोठे संत होऊन गेलेत त्यांचा हा मठ. आमचे मुंबईच्या पद्धतीचे कपडे आणि तरुण वय, यात आम्ही तेथील एका सेवकाला सांगितले की  आम्हाला मठाधिपतीना भेटायचे आहे. त्याने आमच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघितले व म्हटले कि महाराज आराम करत आहेत, त्यांची तब्येत बरी नाही त्यामुळे ते कदाचित तुम्हाला भेटणार नाहीत. आम्ही म्हणालो कि त्यांना निरोप दया की पाठकगुरुजी कडून भेटायला आलो आहोत. आमच्यासमोर तो सेवेकरी पहिल्या मजल्यावर एका खोलीत गेला. ज्या गतीने गेला त्यापेक्षा दुप्पट गतीने खाली आला व म्हणाला कि तुम्हाला ताबडतोब भेटायला बोलावले आहे.

आम्ही देखील लगबगीने गेलो. एक वृद्ध संन्यासी एका कॉटवर पहुडला होते व नक्कीच ते आजारी असावेत. त्यांच्याबरोबर अजून ३/४ जण होते. आम्हाला बघून त्यांचा भ्रमनिरास झाला असावा, कारण आम्ही साधक दिसत नव्हतोच. त्यांनी आमची आस्थेने चौकशी केली व आम्ही पाठक गुरुजींना कसे ओळखतो ते विचारले. आम्ही पाठक गुरुजींबरोबर गाणगापूरला गेलो होतो व तिथूनच येत आहे हे ऐकल्यावर त्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी सांगितले कि पाठक गुरुजी माझ्यापेक्षा वयाने लहान, पण कर्तृत्वाने, उपासनेने ते खूपच उच्च आहेत. मग त्यांनी गुरुजींविषयी  माहिती सांगितली, भरभरून बोलले, म्हटले कि अजून त्यांनी पाठकगुरुजी सारखा कडक उपासना करणारा, साधी राहणीमान, स्वच्छ चारित्र्याचा व्यक्ती पाहिला नाही. गुरुजींबरोबर तुम्ही गाणगापूरला सहजपणे गेलात म्हणजे तुमचे भाग्य किती मोठे आहे याची तुम्हाला कल्पना नाही.  कारण गुरुजींना स्वतः गाणगापूरला जाण्यासाठी अनेक वर्षे थांबावे लागले होते. अर्थात गुरुजींची स्तुती झाल्यामुळे आम्ही आनंदी झालो.  चहापाणी घेऊन त्यांचा निरोप घेतला. त्यांनी जेव्हा आम्हाला निरोप दिला तेव्हा त्यांचे डोळे डबडबले होते व त्यात गुरुजींविषयी त्यांच्या मनातील प्रेम, आदरभाव आम्ही टिपला. पाठकगुरुजी म्हणजे एक वेगळेच व्यक्तिमत्व आहे हे प्रकर्षाने जाणवले. 


प्रभाकर महाराज मठ सोलापूर 

रात्री सोलापूर स्टेशनजवळ हॉटेलमध्ये जेवलो व सिद्धेश्वर ट्रेन पकडून मुंबईला आलो. रात्री ट्रेनमध्ये खूप गप्पा मारल्या ,खूप चर्चा केली. सर्वकाही नजरेसमोरून जात होते.  गाणगापूर मला वैयक्तिकरित्या आवडले नाही आणि मी पुन्हा इथे येणार नाही असे मी ठरवले होते. पण गुरुजींविषयाची श्रद्धा, जवळीक व मैत्री ज्या वेगाने वाढत होती ते बघता माझ्या मताला काहीच किंमत उरणार नव्हती याची मला तेव्हा जाणीव नव्हती. शिवाय ज्याचे जिथे अकाउंट आहे तिथे तो जातोच हा नियतीचा नियम आहेच.

जवळपास १ महिन्यांनी गुरुजींची नाशिकला भेट झाली तेव्हा माईने  विचारले की गुरुजी जवळ  कोण झोपले होते.  मी म्हटले कि मी झोपलो होतो. माईनी हसून विचारले कि मग प्रसाद मिळाला का? आणि आम्ही हसलो.

एकंदरीत पहिली गाणगापुर वारी खूप निराशाजनक, त्रास देणारी परंतु नवीन अनुभव देणारी होती. इथे पोहोचणे कठीण, सोयी सुविधांचा अभाव, रस्ते खराब, जेवण यतातथाच,खूप गरमी, त्यामुळे श्री गुरुचरित्रात महाराजांनी सांगितले आहे की गाणगापूरला आमची सेवा कठीण आहे हे मात्र पटले. तसेच हि तपोभूमी आहे. उपासनेसाठी उत्त्तम स्थान आहे हे मात्र खरे.

आज अनेक भाविक सुखात जय गुरुदेव आश्रमात गाणगापूरला, राहतात. त्यासाठी पाठकगुरुजींनी किती कष्ट केलेत हे सर्वाना कळणे गरजेचे आहे. 

विशाल फुलपगार - २४ मे २०२०

टीप : हि माझी वैयक्तिक मते आहेत व यात कोणाचा अपमान करण्याचा हेतू नाही. त्या त्या वेळेला जे मनात आले ते प्रामाणिकपणे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. आता गाणगापूर हे एक प्रगत ठिकाण झाले असून सर्वसुविधांनी युक्त आहे.


दत्तलीन श्री. पाठक गुरुजी यांच्या जीवनावरील "जगन्मित्र" या पुस्तकाचे विमोचन स्वातंत्रवीर सावरकर स्मारक , दादर , मुंबई येथे २५ डिसेंबर २०१२ ला मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तो कार्यक्रम पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा. 

https://www.youtube.com/watch?v=V32T5DWEor8&list=PLsAsEAuSOBwdOoqO44f_ZFkqLrO7aPsva&index=2&t=7904s