Friday, June 26, 2020

कोरोना आणि आमचे कुटुंब



माझी पत्नी एका मुंबई महानगरपालिका (मनपा) रुग्णालयात स्त्रीरोग शास्त्र व प्रसूती विभागात डॉक्टर आहे. हा विभाग म्हणजे १२ महिने कायम गर्दीचा विभाग त्यामुळे कामाचा प्रचंड लोड. 

साधारण फेब्रुवारी २०२० मध्ये कोरोना आजाराविषयी थोडीफार माहिती मिळायला लागली आणि मार्चमध्ये त्याचे गंभीर परिणाम जगभर दिसायलाच लागले. मार्च २०२० अखेरीस महाराष्ट्र सरकारने व नंतर भारत सरकारने संपूर्ण लॉक डाउन घोषित केला. सर्वत्र भीतीचे / अनिश्चिततेचे वातावरण होते. सर्वजण आपापल्या घरी कैद झाले. तुम्ही , मी आपण सर्व घरी थांबलो. एक अदृश्य अनामिक भीती आपल्या सर्वांच्या मनावर दडपण आणत होती. फेस मास्क, सोशल डिस्टंसिन्ग ,सानिटीझर हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालले होते. 

अख्खा देश थांबला . रस्ते भरदिवसा सुनसान झाले. परंतु याच वेळी शासन , महापालिका , रुग्णालय , राशन इत्यादी यंत्रणा जीवाची पर्वा ना करता दिवस रात्र काम करू लागल्या. पोलिसाची गस्त , नाकाबंदी वाढली. शासनाने दैनंदिन दूधपुरवठा , भाजीपाला , अन्नधान्य मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिले. सर्व धार्मिक स्थळे , बंद झाली. आणि मंदिरातील देव आत्ता पोलीस , डॉक्टर, रुग्णालय /महापालिका कर्मचारी , राशन कर्मचारी , नर्स , वॉर्डबॉय , ऍम्ब्युलन्स कर्मचारी यांच्या रूपात सर्वत्र दिसू लागले. आज आपण हॉस्पिटल विषयी बोलूया. 

युरोप , अमेरिकेत कोरोना मुळे होणारे मृत्यू विविध न्यूज चॅनेलने अगदी आपल्या हॉल मध्ये आकडेवारीनिशी आणून ठेवले. असे वाटले कि आत्ता जग संपलेच. पण लक्षात ठेवा कोणी कितीही घाबरवले तरी Nature has his own way to balance and counterbalance Universe.  

शेवट कोणीही आजारी पडले तरी आपल्याला हॉस्पिटलमध्ये आणि डॉक्टरकडे तर जावे लागतेच. आणि वैद्यकीय सेवा / पोलीस सेवा / डिफेन्स सेवा तर २४ तास चालू असतेच , मग काहीही संकट येवोत.माझी पत्नी एका मनपा रुग्णालयात डॉक्टर असल्याने मी माझ्या नजरेतून लिहितो. 

कोरोना हा आजार असा कि त्याला अजूनपर्यंत काही औषध / ट्रीटमेन्ट नाही, श्वासातून पसरतो आणि त्याची लागण झाल्याचे जवळपास १४ दिवसांनी कळते. खोकला , ताप आणि श्वास घ्यायला त्रास हि प्रमुख लक्षण. श्वास घेण्यास त्रास होऊ लागला कि मग ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटर लावावा लागतो. व बहुतेक वेळा मृत्यू हा फुफ्फुस निकामी झाल्यामुळेच होतो. 

अर्थात ताप येणे हे काय भारतीयांना नवीन नाही. वर्षातून अनेकदा आपल्या सगळ्यांना ताप येत असतोच आणि बहुतेक वेळा आपण तो अंगावरच काढतो. खूप जास्त झाले तर मग हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो. ताप येणे आणि कसेतरीच होणे हा आपला राष्ट्रीय आजार आहे असे म्हणायला हरकत नाही. पण श्वास घेण्यास त्रास होणे , ICU मध्ये बेड उपलब्ध होणे म्हणजे गंभीर. आपल्याकडे शासकीय रुग्णालयात ICU मध्ये बेड उपलब्ध होणे आणि व्हेंटिलेटर मिळणे म्हणजे मे महिन्यात कोकण रेल्वे चे टिकीट मिळण्यासारखेच आहे. (कधीच मिळत नाही.)

भारत देश म्हणजे खरंच luck च्या भरवश्यावर चालणारा देश. जे काही प्लांनिंग झाले आहे त्यातले बरेचसे  ब्रिटिश शासनाने केले आहे आणि अर्थात आपण त्यात थोडीफार भर टाकली. शेतीप्रधान देश आहे , आपण अन्न धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहोत असे आपण अभिमानाने सांगतो, पण शेतकरी कधीच सुखी , संपन्न नव्हता. विज्ञानाने प्रचंड प्रगती केली तरीपण त्याचा फायदा सामान्य जनतेपर्यंत फारच कमी पोहोचला. वैद्यकीय क्षेत्राकडे तर आपण खूपच दुर्लक्ष केले तरीदेखील आपल्या हुशारीने जगातील सर्वोत्तम डॉक्टर भारतीयच आहेत. आपण उत्कृष्ट डॉक्टर , इंजिनीअर निर्माण केले पण वर्ल्ड क्लास हॉस्पिटल / कंपनी निर्माण करू शकलो नाही. 

असो , मनपा रुग्णालयात काम करत असल्यामुळे पत्नीला कामावर जाणे भागच होते आणि तिने पण टाळले नाही. अजूनपर्यंत एकही सुट्टी घेतली नाही.  या अनिश्चिततेच्या वातावरणामध्ये जे काही सर्वांचे होईल ते आपलेपण होणार हे आम्ही जाणले. रुग्णालयात देखील सुरुवातीला तणावाचे वातावरण होते. कारण कुठल्याही प्रकारचे इन्फेकशन व्हायला/ पसरायला हि सर्वोत्कृष्ट जागा. आणि एकदा रुग्णालय कर्मचाऱ्याला झाला कि मग त्यांच्या कुटुंबियांना लागण व मग इतरत्र पसरायला लागतो. आणि अनेकांच्या बाबतीत असे घडलेही. 

सुरुवातीच्या काळात facemask , PPE  kit चा तुटवडा होता. मग आम्ही मित्र मैत्रिणींना आवाहन केले. २-३ डिस्ट्रिब्युटर शी बोलून त्यांचे बँक अकाउंट  डिटेल्स सर्वाना दिले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. कोणी २ , कोणी १० असे करत करत एका महिन्यात जवळपास २०० PPE  kit  रुग्णालयाला डोनेट केले. डिस्ट्रिब्युटर ते PPE Kit रुग्णालयात आणून द्यायचे. अर्थात मागणी आणि पुरवठा यात तफावत असल्यामुळे सुरुवातीला १६८० रुपयाला मिळणारा PPE Kit  शेवटी शेवटी ९५० रुपयांपर्यंत मिळाला आणि आत्ता तर अजूनच स्वस्त मिळवितो. याबाबत प्रत्येक डोनारला रिसीट दिली व रुग्णालयाकडून acknowledgement लेटर मिळवून दिले. त्यावेळी क्लेरिकल  स्टाफ कमी येत असल्यामुळे थोडे मागे पुढे झाले, पण पर्याय नव्हता. थोड्या उशिराने का होईना पण सर्वाना acknowledgement लेटर  मिळवून दिले. दुकाने बंद असल्यामुळे Facemask चा तुटवडा होता , मग आमच्या कॉलोनी मधील एका टेलर कडून कापडाचे ट्रिपल लेअर मास्क शिवून घेतले व ते रुग्णालयात वाटले. असे दोन महिन्यात जवळपास १२-१५ डझन facemask दिले. कालांतराने शासनाने PPE चा पुरवठा सुरळीत केले मग मात्र donation थांबवले. 

याव्यतिरिक्त घरातून बाहेर जाणारी एकमेव व्यक्ती म्हणजे माझी पत्नी , मग ती येताना , किराणा माल , भाजी वगैरे घेऊन यायची. येण्याजाण्यासाठी ती स्वतःची गाडी वापरायची. मग तिच्या गाडीत आम्ही फ्रुटी/ अमूल लस्सी / appi / facemask  ठेवायचो. मग रस्त्यावर उन्हातान्हात अविरत सेवा देणाऱ्या पोलीस बांधवाना द्यायचो. हे आपण सहजच करू शकत होतो,  म्हणून केले त्या काही विशेष नाही आणि कौतुक तर अजिबातच नाही. 

हळूहळू हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली होती. शिवाय प्रसूतिगृहामध्ये नियमित गर्दी तर होतीच म्हणजे PPE Kit घालणे आलेच. आत्ता हे PPE Kit म्हणजे प्लास्टीक चे कपडे घालणे म्हणजे विचार करा काय भयानक अवस्था होत असेल. 

PPE Kit घातलेले डॉक्टर 
एकदा PPE Kit घातले कि ६ तास नो टॉयलेट आणि गरमीने हैराण व्हायला होते. असे असतानाही सर्व डॉक्टर्स , नर्स , वॉर्डबॉय , सफाई कर्मचारी, आपले काम चोख करत होते. प्रत्येकाच्या घरी लहान मुले किंवा म्हातारे आई वडील होतेच , पण काय करणार. 

कोरोनाने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये प्रवेश केला. आत्ता स्टाफ , डॉक्टरांनाही कोरोना होऊ लागला होता. मग त्यांच्या संपर्कातील व्यक्तीही quarantine होऊ लागल्या. बायकोच्या सोबत काम करणाऱ्या काही डॉक्टरांना , बघितलेल्या रुग्णांना याची लागण झाली. मग बायकोही स्वतःहून १४ दिवस वेगळी राहिली. त्यादरम्यान तिचे जेवणाचे हाल झाले. त्या दिवसात ती गाडीने मुलाला भेटायला २-३ दिवसांनी यायची व रस्त्याच्या पलीकडे गाडी उभी करून मग मोबाईलवर आमच्याशी बोलायची. इतरवेळी विडिओ कॉल वर संपर्क असायचा. मग १४ दिवसांनी कोरोना टेस्ट केली आणि ती नेगेटिव्ह आल्यावर घरी आली. अनेक कोरोना रुग्ण , डॉक्टरच्या संपर्कात असूनही तिला कोरोना झाला नाही. किंवा कदाचित होऊनही गेला असेल माहित नाही. घरी येताना दारातच ती sanitize होऊन आत यायची आणि डायरेक्ट बाथरूम मध्ये अंघोळीला जायची. 

तिच्या ज्या सहकारी डॉक्टरांना कोरोना झाला त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले , कोणाही नातेवाईकांना भेटण्याची परवानगी नव्हती. खरे म्हणजे मानसिक दृष्ट्या हा काळ कसोटीचा असतो. आणि मला वाटते कि खंबीर मन (विलपॉवर ) आणि सक्षम रोग प्रतिकारक शक्ती यावर तुमची रिकव्हरी अवलंबून आहे. कारण या आजाराला काही उपचारच नाही. 

असो , डॉक्टरांचा परिवार म्हणून आम्हाला काही सामाजिक त्रास झाला नाही हे मुद्दामून नमूद करावेसे वाटते. अनेकांना वाईट अनुभव आला पण आम्हाला नाही. सुरुवातीला आम्हाला पण कोरोनाची भीती वाटायची. पण नंतर आम्ही नवराबायकोने व्यायाम करून शरीर सुदृढ बनवण्याकडे जास्त लक्ष दिले. कामवाली नसल्यामुळे सर्व घराची कामे स्वतःच करायला लागलो. कौटुंबिक संवाद सुधारला. एकमेकांबरोबर वेळ मिळाला. खरे म्हणजे घरातील कामे माझ्या आईने न तक्रार करता केली. कारण तिच्यावर घराचा बराचसा भार होता. त्यामुळेच पत्नी हॉस्पिटलमध्ये निर्धास्तपणे काम करू शकली.

आणि महत्वाचे म्हणजे टीव्ही वरील बातम्या बघणे बंद केले. त्यामुळे मानसिक दृष्ट्या पण सुदृढ झालो. खरे म्हणजे भारतीय न्यूज चॅनेल बघणे सर्वानीच बंद करायला हवे. हे लोक माहिती कमी देतात आणि जास्त घाबरवतात. न्यूज बघितल्यावर असे वाटायचे आत्त्ता कोरोना माझ्या घशात शिरतोय कि काय. 

पत्नीच्या काही सहकारी डॉक्टर / त्यांच्या कुटुंबियांना कोरोना झाला पण सर्वजण सुखरूप बरे झाले. काही ओळखीच्या खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांचा मृत्यू झाला ते खूपच धक्कादायक आणि वाईट होते. कोणीही काहीही म्हटले तरी सर्वच डॉक्टरांनी / रुग्णालय कर्मचाऱ्यांनी ना घाबरता , धीराने या आजाराची तमा ना बाळगता सेवा दिली. यात काही त्रुटी राहिल्या असतील पण आपल्याकडे लोकसंख्या व डॉक्टर यांचे प्रमाण एवढे विषम आहे कि काही खरे नाही. शिवाय आरोग्य /शिक्षण क्षेत्राकडे देशाचे खूप दुर्लक्षच आहे. आपल्या दृष्टीने अचिव्हमेंट्स म्हणजे आकाशात उपग्रह सोडणे , गरीब शेतकऱ्यांच्या जमीनी संपादित करून MIDC / एक्सप्रेस वे बांधणे यासाठीची झाडांची बेसुमार कत्तल करणे , मोठी मोठी स्मारके , मंदिरे बांधणे. या गोष्टी आवश्यक आहेत पण किती प्रायॉरीटी द्यायची ?

शिवाय हॉस्पिटलची सेवा हा प्रशासकीय व धोरणात्मक नियोजनाचा भाग आहे. एखादे शासकीय रुग्णालय जर चांगली सेवा देऊ शकत नसेल किंवा डॉक्टर overburdened असेल तर मग त्या हजर असलेल्या व विपरीत परिस्थितीत काम करणाऱ्या डॉक्टरला शिवीगाळ करणे , मारहाण करणे याला काही अर्थ नाही.         

अनेक न्यूज चॅनेल्स / राजकारणी / आमदार / खासदार / नगरसेवक  यांनी हॉस्पिटल्सवर खूप टीका केली. विडिओ शूटिंग करून एखादी त्रुटी असेल तर तिचे जाहीर प्रदर्शन केले. जनतेला थाळ्या वाजवायला , टाळ्या पिटायला , रात्री लाईट बंद करून दिवे लावायला सांगितले. टीव्ही वर सांगितले कि उन्हाळा सुरु झाला कि उन्हात कोरोना टिकणार नाही. त्यामुळे भारताला धोका नाही. काही ज्योतिषी बोलले कि अमक्या दिवशी , हि ग्रहांची युती होतेय मग कोरोना जाणार. कोणी बोलले कि सर्वानी एकत्र टाळ्या वाजवल्या तर साऊंड एनर्जी ने कोरोना पळून जाईल किंवा एकत्र दिवे लावले तर लाइट एनर्जी ने  कोरोना पळून जाईल. कोरोनाने सर्वाना खोटे ठरवले. देवस्थान बंद केले. देवाच्या नावावर चालणार बाजार बंद केला. मृत्यूनंतरचे बारावे तेरावे बंद केले. कोणाचाही आत्मा अतृप्तपणे भटकला नाही.

आपले डॉक्टर , नर्सिंग स्टाफ, पोलीस , राशन कर्मचारी , गाड्यांचे चालक , महापालिका , शासकीय कर्मचारी यांनी मात्र अहोरात्र काम केले व अजूनही करत आहेत. खरे म्हणजे अनेक लोक प्रतिनिधींनीही अहोरात्र काम केले. अनेक आमदार , मंत्री यांनाही कोरोना झाला. न्यूज चॅनेल व इतर पत्रकार धोका असूनही सर्वत्र फिरले , बातम्या कव्हर केल्या. आता त्या बातम्या दाखवायची पद्धतच चुकीची आहे त्याला ते काय करणार. कोणीही मागे हटले नाही. छोटे मोठे सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था, वैयक्तिक कार्यकर्ते अनेक अनामिक जणांनी बिनधास्त मदत केली.

अमेरिका , युरोप सारख्या प्रगत देशात उत्कृष्ट आरोग्य व्यवस्था असतानाही तिथे लाखो लोक मृत्युमुखी पडले , हे दुर्दैवी आहे. पण भारतासारख्या देशाने मात्र कमी सुविधा असताना या महासंकटाचा चांगला सामना केला. यात नागरिकांनीही खूप संयम बाळगला. कारण आपण मुळातच लढवय्ये आहोत , सहज सहजी आपण हरत नाही. आपण हरतो ते फक्त आपल्यातील दुफाळीमुळे.

मागे एकदा दिवे घाटामध्ये माऊलीच्या पालखी बरोबर चालल्याचा योग आला होता. तेव्हा देव देवळात नाही पण या वारकऱ्यांमध्ये आहे हे जाणवले. कोरोना आजाराच्या वेळी देव हा परत डॉक्टर , नर्सिंग स्टाफ, पोलीस , राशन कर्मचारी , गाड्यांचे चालक , महापालिका , शासकीय कर्मचारी यांच्या व अनेक अनामिकांच्या रूपात आपल्या संरक्षणार्थ उभा राहिला.

आज माझी पत्नी , तिच्या हॉस्पिटलमधील तिचे सर्व वरिष्ठ , कनिष्ठ डॉक्टर , सर्व स्टाफ , वॉर्डबॉय वगैरे या सर्वांचे खूप खूप आभार. आज यांच्यासारख्या देशभर , जगभर काम करणाऱ्या असंख्य अनामिक देवांचे खूप खूप आभार. आणि हो , सर्व चिल्ली-पिल्ली , लहान मुले गेले तीन महिने तक्रार ना करता घरातच बसली आहेत , त्यांचे तर खरेच कौतुक आहे. त्यांनी देखील जोरदार साथ दिली. अर्थात संकट अजून टाळले नाही. अजून काय होईल हे सांगता येत नाही , पण तूर्तास तरी आपण कोरोनाला बऱ्यापैकी थांबवले आहे हे निश्चित.

यातून बोध घेऊन आपण आरोग्यसेवेकडे अधिक लक्ष देऊ अशी अपेक्षा आहे. मुंबई महानगर पालिका जगातील एकमेव पालिका आहे जिचे स्वतःचे मेडिकल कॉलेज आहे आणि त्यातून जागतिक दर्जाचे डॉक्टर तयार होतात. त्यामुळे मुंबई मनपा ला सॅल्यूट. कोणत्याही वैद्यकीय / शासकीय यंत्रणेमध्ये त्रुटी दाखवून प्रदर्शन करणाऱ्या सर्व न्यूज चॅनेल / राजकीय नेते याना सुबुद्धी प्राप्त होवो अशी अशा बाळगूया. आणि यात सुधारणा करण्यासाठी त्यांच्याकडेच असलेल्या अधिकाराचा ते वापर करतील हि अपेक्षा.

सर्व डॉक्टरांना आणि वैद्यकीय व्यवस्थेला आणि आपण सर्वानाच मानाचा मुजरा.

विशाल फुलपगार
२६ जून २०२०

7 comments:

  1. Incredible writing style and such an in-depth review of coping with Corona. I agree; the people who are fighting this virus battle are the true heroes. Kudos to your wife and her commitment.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks. This is in general to all people fighting corona

      Delete
  2. Absolutely commendable work.. Imagine the pressures in which all these warriors are working to save others lives in this difficult circumstances.It takes a lot of strength and commitment. Great work Dr.Aditi and team n frontline staff. Stay blessed!

    - Heena Saraf

    ReplyDelete
    Replies
    1. This is generally for all corona warriers. Salute to them

      Delete
  3. खूपच छान लिखाण..,तुमच्या पत्नीला माझा सलाम..आणि त्यांच्या सारख्या अनेक सुपर हिरोंनाही..

    ReplyDelete