सुभाषची आई
आज अनेक वर्षांनी सुभाषच्या घरी गेलो. खरे म्हणजे त्याच्या आईला भेटायचे होते. सुभाष/ जाड्या तिथेच भेटला.
संजय पाटील ने ठरवले , म्हणजे आदेश दिला कि आज आपल्याला जाड्याच्या आई ला भेटायला जायचे आहे. मी , संजय पाटील , सुभाष दीक्षित , सुनील जगदाळे , निलेश गीते , सुनील साळवी आम्ही शालेय मित्र. पण आमची मैत्री २००-३०० वर्षे जुनी असेल एवढी घट्ट. सुभाष तसा लहानपणापासूनच गुटगुटीत होता त्यामुळे आम्ही त्याला जाड्या या नावाने बोलावायचो आणि त्याची इतकी सवय झाली कि त्याच्या आईसमोर देखील त्याला जाड्या असे म्हणायचो. कालांतराने काकी पण सुभाषला जाड्या म्हणायला लागली.
सर्वांचे सर्वांच्या घरी येणे जाणे. कोणाकडे कधीही जायचे आणि सांगायचे कि भूख लागली आहे कि मग आमच्या आया आम्हाला खायला द्यायच्या आत्ता झोमॅटो, घरी स्वयंपाक करणारी बाई वगैरे असून सुद्धा घरी निमंत्रणाशिवाय कोणी येत नाही. त्यावेळेच्या बायका मंडळी हसतमुखाने कसे काय manage करत असतील देव जाणे.
असो , सुभाष राहायला बांद्रा कार्टर रोड ला. वडील पोलीस इन्स्पेक्टर त्यामुळेतो तेव्हा पण मोठा माणूस होता आणि आत्ता पण आहेच. त्याचे बाबा म्हणजे साक्षात आचार्य अत्रे. कधी काय विनोद करतील आणि तो कोणावर असेल आणि कोणाला तो लागेल याचा काही नेम नाही. हजारजवाबी व्यक्तिमत्व. पोलीस खात्यात असूनदेखील त्यांनी तीक्ष्ण विनोदबुद्धी जपली होती. स्वतःच्या चेहेऱ्यावर काहीच हावभाव न उमटता ते विनोद करत.
निवृत्ती नंतर ते कांदिवली ला राहायला गेले. तो पर्यंत सुभाषची आई मला रोज सकाळी कार्टर रोड ला walk करताना भेटायची. मी सकाळी तिथे सायकल चालवायचो. आम्हा सर्व मित्रांवर स्वतःच्या मुलापेक्षा जास्त प्रेम करणारी सुभाष ची आई म्हणजे काकी. कालांतराने भेटी गाठी कमी होत गेल्या पण ती नेहमीच आठवण काढायची. आज अचानक तिला ना सांगता भेटायला गेलो. खूप आनंद झाला. खूप गप्पा मारल्या.
खरे म्हणजे आपण एवढे बिझी कधीच नसतो पण उगाचच कंटाळा करतो. मला वाटते कि आत्ता कोणाकडे कधीही जायचे म्हटले तर स्वतःलाच लाज वाटते किंवा odd वाटते.
साला.... मोठा झालो आणि चुकलो. लहानपणच चांगले होते.


You have an inborn talent of simple writing and make visualise the event in front of us
ReplyDeleteधन्यवाद
Delete