गेले दिड दोन वर्षे अख्या जगात कोरोना या आजाराने धुमाकूळ घातलाय. पहिल्या लाटेत आजार कमी आणि भीती जास्त होती. दुसऱ्या लाटेत मात्र अनेक जवळची माणसे या आजारात दगावली. तेव्हा जरा गांभीर्य जाणवले.
आमच्या घरात सगळ्यांचे लसीकरण झाले आहे. मी मात्र अजून लस घेतली नाही. संपूर्ण काळजी घेऊन माझे दैनंदिन कार्यक्रम चालूच होते. साधारण नोव्हेंबर २०२० ला अमेरिका मध्ये कोरोना जोरात होता तेव्हा मी काही कामाच्या निमित्ताने ४-५ दिवस अमेरिकेत जाऊन आलो. त्याशिवाय कामानिमित्ताने म्हणा , कधी कोणाला बघायला हॉस्पिटलमध्ये , कधीतरी स्मशानात पण जाऊन आलो. भीती अशी कधी वाटलीच नाही. दुसऱ्या लाटेत अनेकांना महानगरपालिकेच्या मार्फत विविध हॉस्पिटल मध्ये भरती करणे हे चालूच होते. मला हा आजार होईल असे कधी वाटलेच नाही आणि झाला तरीपण चांगल्या हॉस्पिटलमध्ये भरती होऊन उपचार करायचे एवढेच आपल्या हातात होते आणि ते आपण करायचे हे ठरवले होते.
२३ ऑक्टोबर २०२१ , शनिवार , इतर दिवसांसारखा दिवस. खार ला आईकडे राहायला होतो. नेहमीप्रमाणे सकाळी ५ वाजता उठून व्यायाम , मेडिटेशन केले. सकाळी एक सांताक्रूझ ला एक मिटिंग होती. तासाभरात ती आटोपून परत आलो. घरी आलो जेवलो आणि अनेक दिवसांनी MET कॉलेज ला गेलो तिथे एका मित्राबरोबर २ तास गप्पा मारल्या आणि साधारणपणे दुपारी ३ वाजता खार ला परत आलो. थोडा थकवा जाणवत होता म्हणून जरा झोपलो. दुपारी ४ वाजता अंग गरम व्हायला लागले. मग तापाची गोळी घेतली आणि झोपलो. संध्याकाळी ५. ३० ला उठलो तर अंग तापाने फणफणत होते. मागील बरीच वर्षे मी कधीच आजारी पडलो नव्हतो. अंगात ताकदच नाही असे वाटले.
बायकोला फोन केला तिने गोळ्या सांगितल्या आणि सांगितले कि उद्या संध्याकाळपर्यंत ताप जर उताराला नाही तर मग आपण कोविड टेस्ट करूया. ऑक्सिजन लेवल ९७ होती. पण ताप १०३ होता. मग रविवारी संध्याकाळी रॅपिड अँटीजेन टेस्ट घरी येऊन केली. ती पॉसिटीव्ह आली , म्हणजे मी कोविड पॉसिटीव्ह होतो. पण जो पर्यंत RTPCR ची टेस्ट होऊन तिचा result येत नाही तोपर्यंत काहीच कन्फर्म नव्हते. मग सौ. ने अंधेरी ईस्ट ला pulse डायग्नोस्टिक मध्ये HRCTC ची अपॉइंटमेंट घेतली आणि आम्ही दोघे वेगवेगळ्या रिक्षा ने तिथे गेलो आणि ती पण एक टेस्ट केली. परत खार ला आलो , वेगळ्या खोलीत आयसोलेट कालच झालो होतो.
२५ ऑक्टोबर २०२१, सोमवारी सकाळी ९ वाजता घरी माणूस आला आणि त्याने RTPCR टेस्ट केली, तिचा निकाल २४ तासाने म्हणजे उद्या सकाळी मिळणार आणि ती पॉसिटीव्ह असणार यात काहीच शंका नव्हती. मग मी गुपचूप ८ दिवसांचे कपडे , चादरी एका बॅग मध्ये भरल्या. खासगी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट व्हायचे कि महानगरपालिकेच्या हॉस्पिटल मध्ये व्हायचे हा काही प्रश्नच नव्हता कारण BKC कोविड सेन्टर किव्हा सेव्हन हिल्स हॉस्पिटल ला ऍडमिट व्हायचे हे आधीच म्हणजे कोरोनाच्या पहिल्या लाटेमधेच ठरले होते. तरीपण जोपर्यंत RTPCR रिपोर्ट येत नाही तोपर्यंत आसोलेशन मध्ये शांतपणे बसणे हा एकाच पर्याय होता. जेवण काही जास्त खाता येत नव्हते. ताप मात्र १०३ ते १०३. ५ पर्यंत होता , तो काही कमी झालाच नाही. थकवा प्रचंड होता. रात्रीच माझा मित्र संजय पाटील ला फोन केला. त्याला बँक, फोन चे पासवर्ड दिले. Will आणि नॉमिनेशन करून झाले होते त्यामुळे तो काही विषय नव्हता.
मंगळवारी म्हणजे २६ ऑक्टोबर २०२१ ला मला सकाळी ९ वाजताच RTPCR रिपोर्ट व्हाट्सएप्प वर आला आणि तो अपेक्षेप्रमाणे कोविड पॉसिटीव्ह होता. मी लगेचच महानगरपालिकेच्या HWEST वॉर्ड च्या कोविड वॉर रूम ला फोन केला. (०२२ -२६४४०१२१). मुंबई महानगरपालिकेने प्रत्येक वॉर्ड मध्ये असे वॉर रूम बनवले आहेत ज्यात आपण चोवीस तास कधीही फोन करून कोविड आजाराशी निगडित सल्ला घेऊ शकतो. आणि तिथे फोन करून सांगितले कि मग ते उपलब्धतेप्रमाणे हॉस्पिटल मध्ये बेड बुक करतात. फक्त त्यांना सांगायचे कि खासगी मध्ये हवाय कि महानगरपालिकेचा हवाय. हि एक उत्तम सोय आहे. मी अनेकांना असेच ऍडमिट केल्यामुळे मला ती पद्धत माहित होती.
त्यांना फोन केला तर त्यांनी सांगितले कि तुमचा रिपोर्ट अजून आमच्याकडे आला नाही. पण तुम्ही तुमचा रिपोर्ट आणि आधार कार्ड ७३०४७५८११७ ला व्हाट्सएप करा. मला हे पण माहिती होते. मी त्यांना विनंती केली कि मला होम आयसोलेशन मध्ये राहता येणार नाही. तेव्हा मला महानगरपालिकेच्या अंधेरी मरोळ येथील ७ हिल हॉस्पिटलमध्ये बेड दिलात तर बरे होईल. त्यांनी सांगितले कि तिथे विचारून उपलब्धता आहे का सांगतो.
७ हिल हॉस्पिटलच का ? तर इथे महानगरपालिकेचे डॉक्टर ज्यांना कोविड झाला आहे ते इथेच उपचार घेतात. आणि रुग्णाला उत्तम उपचार आणि चांगली सोयी महानगरपालिकेने मोफत दिल्या आहेत. उगाचच मेडिक्लेम आहे म्हणून लीलावती / नानावटी वगैरे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होऊन स्टेटस मला दाखवायचे नव्हते.
आणि १० मिनिटात मला H west मधून फोन आला कि तुमचे ऍडमिशन ७ हिल हॉस्पिटल ला झाले आहे आणि आम्ही तासाभरात तुमच्यासाठी ऍम्ब्युलन्स पाठवतो. त्याप्रमाणे एक छान वातानुकूलित ऍम्ब्युलन्स घराखाली आली. आणि त्यात माझ्या एकट्याचा प्रवास सुरु झाला. ऍम्ब्युलन्स मध्ये चढताना त्रास झाला याचे मला आश्चर्य वाटले. एवढा अशक्तपणा मला कधीच आला नव्हता. आणि हो घरी ऑक्सिजन कायम ९७ ते ९९ असायचे त्यामुळे व्हाट्सएप च्या माहितीप्रमाणे घाबरायची काहीच गरज नव्हती. ताप मात्र १०३ च्या आसपास कायम होता.
![]() |
| घरातून निघताना |
साधारणपणे पाऊण तासाचा प्रवास करून मी ७ हिल हॉस्पिटलला या महानगर पालिकेच्या भव्य हॉस्पिटलमध्ये अंधेरी मरोळ ला पोहोचलो.
इथे फक्त कोविड चे रुग्ण भरती होतात. आणि उपचार एवढे चांगले कि डॉक्टर देखील इथेच उपचारासाठी भरती होतात. ऍम्ब्युलन्स मधून खाली उतरायला जमलेच नाही , मग शेवटी बसून उतरलो. आश्चर्य वाटले. एक वॉर्ड बॉय ज्यांना इथे PC म्हणजे patient care तो मला घ्यायला आला. त्याने बॅग घेतली , व्हील चेअर पाहिजे का विचारले मी नकार दिला. तिथल्या reception ला नेले. डॉक्टरांनी काही प्रश्न विचारले. मला BP चा त्रास नाही , शुगर नॉर्मल , काहीच आजार नाही असे सांगितले. तिथे असताना सौ. KEM हॉस्पिटल मध्ये असल्यामुळे तिने इकडच्या डीन सर ना सांगून मला VIP वॉर्ड मध्ये नेण्याची व्यवस्था केली. एक security ची बाई आली. तिने बोटातली अंगठी , पैसे , क्रेडिट / डेबिट कार्ड काढून घेतले आणि त्याची यादी बनवून माझी सही घेतली. dischrage घेताना सर्व काही परत मिळेल , काळजी करू नका असे सांगितले. माझ्याकडच्या दोन बॅग बघून सांगितले कि याची काहीच गरज नाही. इथे आम्ही सर्व काही देतो. पण बॅग परत कुठे पाठवू ? म्हणून त्यासोबतच ठेवल्या.
ऑक्टोबर २००२ नंतर मी प्रथमच हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झालो.
एक PC मला सहाव्या मजल्यावर घेऊन गेला. अतिशय पॉश आणि भव्य हॉस्पिटल होते. मला ६०७०४ च्या रूम मध्ये ऍडमिट केले. रूम मोठा होता , बाथरूम आतमध्येच होते. या वॉर्डमध्ये साधारण २० रूम होते. त्यापैकी १२ मध्ये patient होते. प्रत्येक खोलीत ऑक्सिजन ची सोय होती. गेल्या गेल्या मला हॉस्पिटल चे कपडे दिले आणि ते अपेक्षेप्रमाणे छोटे होते . डॉक्टर आले त्यांनी हिस्टरी विचारली, ताप मोजला तो १०३. ५ होता. एक्सरे काढला. बीपी नॉर्मल होते. ऑक्सिजन ९७ होते. डाव्या हाताला IV लाईन लावली. आत्ता त्यातूनच IV आणि इंजेकशन देणार. रक्त तपासायला दिले.
थोड्या वेळाने डॉक्टर परत आले. त्यांनी एक कन्सेंट फॉर्म आणला आणि सांगितले कि आम्ही तुम्हाला कॉकटेल अँटी बॉडी देणार आहोत. त्या फॉर्म वर सही घेतली. नंतर कळाले कि यासाठी लिलावती किंवा इतर खाजगी रुग्णालयात १ ते दीड लाख रुपये घेतात. एका IV मधून ती बाटली शरीरात चढवली. ताप काही उतारालाच नाही. माझी उंची आणि हॉस्पिटल किंवा हॉटेल मधील बेड याचे प्रमाण कधी जमलेच नाही त्यामुळे मी वाकडा , तिकडा कसाबसा त्या बेड मध्ये स्वतःला ऍडजस्ट केले. थोड्या वेळाने जेवण आले. ठीकठाक होते , म्हणजे इतर हॉस्पिटल पेक्षा नक्कीच उत्तम जेवण. भूक नव्हती पण जेवलो.
इथे खोलीमध्ये मोबाईल नेटवर्क नव्हते त्यामुळे विशेष कोणाचा फोन लागायचा नाही. थंडी खूप वाजतेय असे सांगितले तर एका PC ने अंगावर ब्लॅंकेट दिले , बरे वाटले. पहिला दिवस असाच गेला. सतत डॉक्टर , सिस्टर यायच्या चौकशी करायच्या. खाजगी हॉस्पिटलपेक्षा उत्तम काळजी आणि एक रुपयाचा देखील खर्च नाही. कोणीतरी ६ सफरचंद , ६ संत्री आणि ६ मोसंबी मला पाठवल्या , कोणी पाठवल्या ते अजून कळले नाही. मी देखील त्या सिस्टर ला दिल्या.
थकवा आणि ताप कमी होताच नव्हता . मंगळवार असाच गेला. त्यांनी मला टॉवेल, toothpaste, टूथब्रश दिला होता. खोलीत मच्छर मात्र होते. बुधवारी सकाळी सहा वाजता रूम साफ करायला आले. मला कपडे बदलायला दिले , चादरी बदलल्या. खोली पुसून घेतली. सकाळी ७ वाजता बीपी , ऑक्सिजन तपासले , ताप कमी होताच नव्हता. डॉक्टरांनी सांगितले कि प्रोटोकॉल प्रमाणे सर्व उपचार व्यवस्थित आहेत आणि तुमचे शरीर कधी उपचाराला साथ देते ते आपण बघूया. उगाचच खूप काही औषध देणे योग्य होणार नाही. बुधवार पण असाच गेला. फोन लागत नव्हते मग मी थोडा वेळ रूमच्या दरवाजाबाहेर खुर्ची टाकून बसायचो आणि मग बोलायचो. अनेक जण असेच करायचे.
गुरुवारी देखील ताप उतरलाच नाही. मी थोडा घाबरलो. कारण काहीही म्हटले तरी ताप कमी व्हायला हवा होता. ब्लड चेकिंग मध्ये त्यांनी फिव्हर प्रोफाइल केला होता. डेंगू , टायफॉईड वगैरे कोणतेच तापाचे विषाणू सापडले नाहीत. आणि वैशिष्ट्य म्हणजे १०३ ते १०३. ५ च्या मधेच ताप असायचा. डॉक्टर पण चिंतेमध्ये होतेच. माझा मित्र संजेश जैन याच्या ओळखीचे कोणीतरी हॉस्पिटलमध्ये कामाला होते , त्याच्या मार्फत रोज ताजी फळे , सँडविच वगैरे मला मिळू लागले. डासांसाठी गुड नाईट आणून दिले त्यामुळे तो त्रास झाला नाही. गुरुवारी खूपच अशक्तपणा जाणवत होता. एवढा कि मला बेड वरून उठवायला पण PC ची मदत लागायची. एका मोमेन्ट ला वाटले कि आत्ता काही खरे नाही. पण नंतर म्हटले कि मानसिकदृष्ट्या जर मी हरलो तर सर्व काही संपेल. अशक्तपणामुळे जेवण जास्त जात नव्हते , पण फळ खाऊन तरतरी यायची. संत्री खाऊन तर खूप बरे वाटायचे. रात्री दूध मिळायचे , त्याने पण बरे वाटायचे.
शुक्रवारी सकाळी डॉक्टर येऊन गेले. सकाळी परत रक्त तपासणीसाठी पाठवले. xray काढला. आत्ता मी खूपच हताश होतो. शनिवारी ४ वाजता आलेला ताप आज शुक्रवार पर्यंत तसाच होता. आणि अशक्तपणा तर वाढतच होता. बोलतानापण दम लागायचा. ड्रीप लावल्यामुळे झोप येत नव्हती, बेड वर मावत नव्हतो आणि ताप काही उतरत नव्हता. दुपारी थोडे जेवलो आणि थोडा वेळ झोप लागली. ४ वाजता उठलो तर अंग घामाने भिजले होते. चादर पण घामाने पूर्ण ओली झाली होती. लगेच PC ला बोलावले सर्व कपडे बदलले. ताप पूर्णपणे गायब होता. डॉक्टर पण खूप खुश झाले. मला तर खूपच आनंद झाला. मग दरवाजाबाहेर खुर्ची टाकून बसलो. अनेकांचे व्हाट्सएप्प वर मेसेज होते त्याला रिप्लाय केले. घरी आणि मित्रांबरोबर बोललो. खूप बरे वाटले. ४. ३० ला नास्ता मध्ये ढोकळा आणि चहा मिळाला तो खाल्ला. औषधांमुळे आणि सतत तापामुळे जिभेला चवच नव्हती पण ठीक आहे.
रात्री छान झोप लागली. शनिवार पूर्ण बिन तापाचा गेला. थकवा मात्र कायम होताच. संजेश जैन ला सांगून २ चिस सँडविच मागवले ते खाल्ले , बरे वाटले. शनिवारी मला माझे दिवसाचे दिनक्रम कळले.
सकाळी ६ वाजता चादरी , कपडे बदलले जायचे नंतर खोली पुसली जायची.
सकाळी ७ वाजता ऑक्सिजन , रक्तदाब , ताप मोजला जायचा.
सकाळी ८.३० वाजता नास्ता आणि चहा यायचा, त्यात इडली / डोसा / पोहा / उपमा इत्यादी असायचे.
सकाळी ९ वाजता रेसिडेंट डॉक्टर तपासून जायचे.
दुपारी १२. ३० ला जेवण यायचे (above average ).
दुपारी १. ३० ला वरिष्ठ डॉक्टर तपासणीसाठी यायचे.
दुपारी ४ वाजता चहा , ढोकळा , बिस्कीट , खाकरा वगैरे मिळायचे.
संध्याकाळी ६ वाजता रेसिडेंट डॉक्टर तपासून जायचे.
संध्याकाळी ७ वाजता गरम गरम सूप मिळायचे.
रात्री साडेआठ ला जेवण व दूध यायचे.
रात्री ९. ३० ला सिस्टर आणि रेसिडेंट डॉक्टर तपासून जायचे.
ताप नाही म्हणजे मी आत्ता बरा होतोय असे मी समजलो. शनिवार बिन तापाचा गेला. पण रविवारी मात्र अचानक थंडी वाजून १०१ ताप आला. लगेचच इंजेकशन लावले आणि तासाभरात ताप उतरला. मी परत टेन्शन मध्ये आलो.
सोमवारी सकाळी माझी कोविड टेस्ट केली. मंगळवारी सकाळी तिचा रिपोर्ट पॉसिटीव्ह आला. डॉक्टरांनी सांगितले कि तुम्ही घरी जाऊन isolate वेगळ्या खोलीत मध्ये राहू शकता किव्हा इथे राहू शकता. मी म्हटले कि नेगेटिव्ह रिपोर्ट येईपर्यंत मी इथेच राहणार. माझी पुढची covid टेस्ट गुरुवारी होती. आत्त्ता मी पूर्ण वॉर्ड मध्ये एक राऊंड मारला. बरेचसे डॉक्टर ऍडमिट होते. KEM हॉस्पिटल चे फार्माकॉलॉजि चे सर्व १४ डॉक्टर इथे होते. त्यापॆकी २ डॉक्टरांचा रिपोर्ट सतत पॉसिटीव्ह असल्यामुळे ते ४ आठवडे इथेच होते. ओळख झाल्यामुळे बोलणे व्हायचे. एक patient चा लग्नाचा वाढदिवस होता मग तिच्या नवऱ्याने केक पाठवला तो आम्ही खाल्ला , मज्जा आली. काही general पब्लिक पण इथे ऍडमिट होते. सर्वांचे दोनीही लसीकरण झाले होते. मीच एकटा बिन लसीकरणाचा होतो. एकदा फिरत फिरत वॉर्ड बाहेर गेलो. तेव्हा सुरक्षा रक्षक ओरडला आणि मी लगेच परत फिरलो.
आमच्या वॉर्ड मध्ये सूर्य प्रकाश येत नव्हता / नैसर्गिक हवा नव्हती. फक्त tubelight चा प्रकाश असायचा. त्यामुळे सूर्यप्रकाश आणि नैसर्गिक हवेचे महत्व कळले. एका खोलीतून बाहेरचे दृश्य दिसायचे मग मी तिथे काचेतून सूर्यप्रकाश बघायचो. बरे वाटायचे. मंगळवारी परत १०० ताप आला पण लगेचच उतरला. मी नियमित वॉर्ड मध्ये चालायचे . खूप दमायला व्हायचे. नुसते फोन वर बोलूनसुद्धा दमायला व्हायचे. दिवाळी गुरुवारी सुरु होणार आणि माझी कोविड टेस्ट पण गुरुवारी जिचा निकाल शुक्रवारी येणार . दिवाळीचे काय कशाचेही कौतुक नव्हते. इथे आल्यापासून अंघोळ / दाढी केली नव्हती. discharge घेताना दाढी करू असे ठरवले. हाताला IV असल्यामुळे अंघोळ केली नाही.
इथे वातावरण रिलॅक्स होते. दुसऱ्या लाटेतील भयानक अनुभव इथले स्टाफ सांगायचा. इथे ऍडमिट व्हायला आणि मृत माणसांना न्यायला ऍम्ब्युलन्स ची मोठी रांग असायची. सर्वजण तणावात असायचे. आत्त्ता असे काही नाही.
दिवसभर काहीच काम नसायचे मग झोप काढायच्या , म्हणजे शरीर त्या बेड मध्ये कसेतरी सामावून घ्यायचे आणि डोळे बंद करायचे हे एकाच काम. संजेश जैन चा मित्र रोज काहीतरी खायला आणून द्यायचा. त्यामुळे बरे वाटायचे.
गुरुवारी १२ वाजता कोविड टेस्ट केली आणि तिचा रिपोर्ट शुक्रवारी सकाळीच माझ्या फोन वर आला आणि तो नेगेटिव्ह होता. म्हणजे आज इथून घरी जाणार. सकाळी डॉक्टर आले त्यांनी सांगितले की दुपारी १. ३० ला वरिष्ठ डॉक्टर आले कि तुम्हाला सोडतो.. तो पर्यंत पेपर बनवून ठेवतो. मग हॉस्पिटल मधील न्हाव्याला बोलावले आणि दाढी केली. फ्रेश वाटले. घराचे कपडे घातले त्यामुळे तर मज्जाच आली.
डॉक्टर येऊन गेले . दोन वाजता एक PC आली आणि मला सहाव्या मजल्यावरून खाली नेले. त्याआधी सर्व स्टाफ ला भेटून आभार मानले. त्यांना एक आभाराचे पत्र लिहून दिले. लिहिताना पण बोट वळत नव्हती. त्यामुळे अक्षर खूपच घाण आले. त्या PC ने खालून मला माझ्या सर्व वस्तू परत दिल्या. उबेर टॅक्सी बोलावली आणि परत खार ला घरी आलो. २६ ऑक्टोबर २०२१ ते ६ नोव्हेंबर २०२१ पर्यंत माझा मुक्काम हॉस्पिटलमध्ये होता.
आई वडील वाट बघतच होते. अंघोळ केली त्यात पण दम लागला पण फ्रेश वाटले. जेवलो तर जेवण खारट / तुरट लागले . तोंडाची चव गेली होती. वजन ७ किलो कमी झाले होते. पण घरी जेवायचं आनंद काही औरच. मस्त झोपलो. आत्ता इंजेकशन वगैरे काही नाही. कोणी उठवणार नाही.
जेव्हा कोरोनाची लाट होती तेव्हा मी बचावलो. आत्ता गर्दी नसताना मला कोरोना झाला. हॉस्पिटल रिकामी होती. त्यामुळे मला पटकन बेड मिळाला. महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल झाल्यामुळे एकही रुपया खर्च ना करता उत्तम उपचार झाले. असे म्हणतात कि कधीतरी सर्वानाच हा आजार होणार आहे. त्यामानाने मी ऑफ सिझन मध्ये आजारी पडलो.
दुसऱ्या लाटेत लोकांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करायला बराच त्रास झाला आणि तो मी अनुभवला होता. त्यामानाने मी नशीबवान ठरलो. मला ब्लड प्रेशर , शुगर, कोणताच आजार नाही. आणि इथल्या तपासण्यांनंतरही काहीच मिळाले नाही. कुटुंब आणि मित्रांनी साथ दिली. त्यामुळे मी यातून बाहेर पडलो.
रात्री जेवलो आणि झोपलो . उद्या सावकाश उठायचे ठरवले. घराचा बेड माझ्या मापाचा आणि ऐसपैस होता त्यामुळे एकदम पसरून झोपलो. रात्री दोन वाजता अचानक पोटात उजव्या बाजूला दुखायला लागले मला वाटले कि गॅस असेल किंवा ऍसिडिटी असे. म्हणून मी इनो प्यायलो. काहीच फरक पडला नाही. शेवट रात्री ३. ३० ला बायकोला फोन केला आणि सांगितले कि असह्य वेदना होत आहेत. तिने जवळच्या हॉस्पिटल ला फोन केला आणि म्हटले कि कदाचित ऍसिडिटी मुळे असेल . तिथे तुला इंजेक्शन देतील मग बरे वाटेल. ३. ४५ ला माझा चुलत भाऊ जो तळ मजल्यावर राहतो त्याला फोन केला आणि सांगितले कि लगेच वर घरी ये. त्याला काही कळलेच नाही कारण मला discharge मिळाला हे त्याला माहिती नव्हते. मग आई वडिलांना उठवले. ते पण घाबरले. मग मी आणि सुजित पहाटे ४ वाजता त्या हॉस्पिटल ला पोहोचलो. असह्य वेदना होत होत्या. त्यांनी ताबडतोब ३ इंजेक्शन दिले. पण दुखणे कमी व्हायच्या ऐवजी अजून वाढले. खूप घाम येत होता , मग ECG काढला , तो नॉर्मल होता. BP तपासले तर १५० होते. आयुष्यात पहिल्यांदाच बीपी वर गेले होते. दहा मिनिटात बरे वाटेल असे म्हणता म्हणता सकाळचे सहा वाजले. वेदना वाढतच होत्या. मग ६ वाजता IV मधून एक स्ट्रॉंग पेन किलर दिले . याने नक्की आराम पडायला पाहिजे असे डॉक्टर म्हणाले. मग ते म्हणाले कि अँपेंडिक्स असेल , तुम्ही आत्ताच्या आत्ता स्कॅन करा मग आपण निर्णय घेऊ. मी म्हटले कि मी घरी जातो आणि मग स्कॅन करतो आणि परत येतो.
हॉस्पिटलमधून निघून रिक्षा मध्ये बसेपर्यंत पोटदुखी आश्चर्यकारकरित्या ५०% कमी झाली. आणि घरी पोहोचेपर्यंत ७५ % कमी झाली. सौ. ने मॅग्नम , सायन इथे सिटी स्कॅन ची अपॉइंटमेंट घेतली होती.पण मी घरी येऊन झोपलो आणि सकाळी ९ वाजता उठलो. नास्ता केला. पोटदुखी गायब झाली होती. मॅग्नम ला फोन केला . ते म्हटले कि यायच्या ४ तास आधी काहीच खाऊ नका. मग सुजित बरोबर दुपारी १ वाजता तिथे गेलो. त्यांनी एक लिटर औषध प्यायला दिले आणि म्हटले कि हे दोन तासात प्या आणि खूप चाला. एक तर भूक लागली होती आणि अशक्तपणा होता पण त्यांनी सांगितले तसे केले. दुपारी ३. ३० ला ते औषध संपवून स्कॅनिंग ला गेलो. त्यांनी स्कॅनिंग चालू केले आणि म्हटले कि अजून थोडे औषध प्या आणि अर्ध्या तासाने या. असे करता करता शेवट दुपारी ४ वाजता माझा सिटी स्कॅन चालू झाला. जवळपास साडेचार ला पूर्ण झाला. लगेचच उबेर करून घरी आलो आणि जेवलो. खूप थकलो होतो. पोटदुखीतर सकाळीच गायब झाली होती. थकवा मात्र आजपर्यंत आहेच. अंगात ताकदच नाही असे वाटते.
दुसऱ्या दिवशी रिपोर्ट नॉर्मल आला काय झाले होते ते कळलेच नाही. नंतर मात्र मी त्याच्यावर अधिक विचार केला नाही.
मुंबई महानगर पालिकेने कोरोना काळात अप्रतिम काम केले आहे यात शंकाच नाही.याचा मी स्वतः अनुभव घेतला. ७ हिल हॉस्पिटल च्या स्टाफ चे तर जेवढे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत. त्यांनी माझी खूपच काळजी घेतली. शेवट गोड झाला यामुळे अधिकच आनंद. सर्व उपचार महानगर पालिकेने मोफत केले हे विशेष. आपण शासन , महानगरपालिका , पोलीस याना कायमच नावे ठेवतो पण अडचणीच्या वेळेत हेच मदतीला धावून येतात. त्यामुळे या सर्व यंत्रणेला सॅल्यूट .
विशाल फुलपगार
१८ नोव्हेंबर २०२१







Very well Penned Saheb!!!
ReplyDeleteNatraj Phir Champion 🏆😂
Atta punha tya Rastyala jaychey Nahee.. Plz 🙏
Ok sir,
Deleteधन्यवाद
धन्यवाद, विशाल तुला झालेला आजार आणि त्यातून आलेला अनुभव तू आम्हाला शेअर केलास.
ReplyDeleteपरिस्थितीशी कसा सामना केलास ते आम्हाला त्यामुळे समजले. योग्य उपचार पद्धत मिळाली धन्यवाद ईश्वराचे.
धन्यवाद महेश पाटील
Deleteखुप छान विशाल.. तुझ्या या लेखाची मी वाट बघत होतो.. तु ह्यातून जाऊ नयेस अशीच इच्छा होती पण तुझा देखील हलगर्जी पणा झाला लस न घेण्याचा.. सर्व संकटातून तु सुखरूप बाहेर पडलास ही त्या देवाची कृपा आणी गुरूंचे आशीर्वाद.. तुला ह्यापुढे उदंड निरोगी आयुष्य लाभो ही सदिच्छा
ReplyDeleteधन्यवाद वैभव गोरे
DeleteExcellent
ReplyDeleteWel done
धन्यवाद
DeleteHello vishal, take care of yourself. If any help please call me 7263079994.
ReplyDeleteधन्यवाद
DeleteVishal take care now … well penned .. superfluous
ReplyDeleteधन्यवाद
Delete