Sunday, July 5, 2020

आठवणीतले पाठकगुरुजी

५ जुलै २०२० 
आठवणीतले पाठकगुरुजी 


५ जुलै २०२० च्या गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने पाठकगुरुजींच्या काही आठवणी सांगाव्यात असे वाटले. अजुनपर्यंतच्या माझ्या विविध ब्लॉग्स मधून , मी गुरुजींची केलेली मस्करी किव्हा आमचे थट्टा विनोद यातून कदाचित तुम्हाला वाटेल कि हे खूपच टाइम पास रिलेशन आहे. पण असे काही नाही. हा आमच्यातील संबंधाचा ५% भाग आहे. बाकी सर्व गोष्टी आमच्या दोघातच आहेत आणि आमच्या दोघातच राहतील हे मात्र निश्चित. हा ब्लॉग थोडा विशेष आहे. कारण नेहमी मी सलग लिहितो. हा तीन टप्प्यात लिहिला आहे. काही विशेष फोटो मिळाले आणि हा ब्लॉग वाढत गेला. 

मागे एकदा मी तुम्हाला सांगितले होते कि गुरुजी प्रत्येक गोष्टीत involve असायचे पण आणि नसायचे पण , म्हणजेच ते अलिप्त असायचे. "कर्ता करवीता दत्त , आपण निमित्त मात्र" हि विचारसरणी त्यांनी जीवनातील प्रत्येक क्षणात उतरवली होती. कार्य महाराजांचे आहे , आपण फक्त त्यांचे शिपाई आहोत अशी त्यांची भावना होती. 

गुरुजींची ओळख म्हणजे ते कायम "जय गुरुदेव " बोलायचे, पायात चप्पल / बूट घालणे त्यांनी १९७८ साली गिरनार पर्वतावर गेले तेव्हाच सोडले होते व त्यानंतर त्यांच्या पत्नीनेही सोडले होते. त्यामुळे दोघेही शेवटपर्यंत अनवाणीच फिरायचे. कपाळावर U आकाराचे गंध लावायचे. व्यवस्थित भांग पाडलेला. गळ्यात एक रुद्राक्षाची माळ , ज्याच्यावर ते अनेकदा जप करायचे.  

वडील दशग्रंथी ब्राम्हण , त्यामुळे मुलाने भिक्षुकी करावी असे वडिलांचे मत, तर मुलाने शिकून नोकरी करावी असे आईचे मत. मग इंटर पर्यंत शिकून गुरुजींनी पोलीस खात्यात नोकरी चालू केली आणि सोबत भिक्षुकीही केली व आई आणि वडिलांची इच्छा पूर्ण केली.
गुरुजी , त्यांचे आई व वडील आणि माईच्या कडेवर राजूदादा , गुरुजींचा भाऊ मधुकाका आणि बहीण आशा , नंदुरबार येथील फोटो स्टुडिओमध्ये काढलेला  एक दुर्मिळ फोटो.  
गाणगापूर येथे आश्रम बांधायचा असे त्यांनी ठरवले व मंदिराजवळ ४ गुंठे जागाही मिळाली. ती कशी मिळाली याबद्दल नंतर कधीतरी लिहू. तेव्हा गुरुजी रिटायर्ड झाले होते. मग ते full time  सत्यनारायण , सत्यदत्त , वास्तुशांती , ग्रहशांती , नवनाथ वगैरे पूजा सांगायचे आणि त्यातून मिळालेली दक्षिणा ते ट्रस्ट च्या बँक अकाउंट मध्ये जमा करायचे.
गुरुजींच्या बाजूला लक्ष्मण गुरुजी , यांनी गाणगापूर मध्ये प्लॉट घेण्यासाठी गुरुजींचे नाव सुचवले


पूजा सांगताना तल्लीन झालेले गुरुजी 
पुजेआधी रांगोळी काढताना गुरुजी 

मनोहर मामाच्या घरी पूजा मांडताना गुरुजी 
सत्यनारायण पूजा सांगताना गुरुजी मनोहर मामांच्या घरी. सोबत महेश 

बालमित्रांसोबत गुरुजी आणि माई 

मनोहर मामा आणि गुरुजी कुटुंबासोबत 

हस्तलिखित गुरुचरित्र लिहिणारे श्री महेश पाटील यांच्यासोबत गुरुजी आणि माई . महेशना २०११ ला पारायण गौरव पुरस्कार मिळाला 

आश्रमात गुरुजी या जागेवर बसायचे 
तेव्हा पूजेचे २०० /५०० किंवा १००० रुपये मिळत. गुरुजी जी मिळेल ती दक्षिणा घ्यायचे , कधी काही मागायचे नाही. मी त्यांना म्हटले कि अहो असे ५०० / १००० रुपये जमा करून एवढा मोठा आश्रम कधी व केव्हा बांधणार ? तुमची पद्धत चुकीची आहे. आपल्याला मोठे डोनर शोधावे लागतील. त्यांनी सांगितले कि गाणगापूरला गुरुचरित्र पारायणे करण्यासाठी हा आश्रम बांधवा अशी दत्त महाराजांची योजना आहे. खिशात एक रुपया नसताना आपल्याला आश्रमासाठी ४ गुंठे चा प्लॉट महाराजांनीच दिलाय. आपण त्याचे पेमेंट पण नंतर केले. त्यामुळे आश्रम बांधण्याचे काम पण महाराजच योग्य वेळी पूर्ण करतील आणि पैश्याची व्यवस्था पण तेच करतील. आपण त्यात डोके घालायचे नाही. धु म्हटले कि धुवायचे.......  मला काही ते पटले नाही. मी मनातच म्हटले कि असे काही होणार नाही. गुरुजींना कसे समजावून सांगायचे ? पण गम्मत म्हणजे काही वर्षांनी गुरुजींना पूजा सांगण्यासाठी दोन तीन वेळा अमेरिका , दुबई येथून बोलावणे आले. तिथे अनेकांनी स्वतःच्या घरी अनेक पूजा गुरुजींकडून केल्या व डॉलर्स मध्ये दक्षिण दिल्या. ती सर्व रक्कम त्यांनी तशीच्या तशी बँकेत जमा केली. व असा बराच निधी जमा झाला. त्यांच्या इतर भक्तांनीही न मागता देणग्या दिल्या.  

गुरुजी व माई दुबई मध्ये

गुरुजी व माई दुबई मध्ये
गुरुजी व माई दुबई मध्ये
अमेरिकेत पूजा झाल्यावर प्रसाद देताना गुरुजी 

गुरुजी अमेरिकेत पूजा सांगताना 

न्यू जर्सी , अमेरिकेत जेसूभाइ गोसालियांच्या घरी आराम करताना गुरुजी 

अमेरिकेतील रिसीट , गुरुजींच्या आठवणीसाठी त्यांना दिली होती. 
आश्रमाचे बांधकाम सुरु झाले तसे ते पूर्ण होईपर्यंत अनेकांनी भारतातूनही डोनेशन दिले. आश्रम बांधून पूर्ण झाल्यावर मात्र गुरुजींचे परदेश दौरे थांबले पण तो पर्यंत काम पूर्ण झाले होते. नंतरमात्र पैश्याचा ओघ कमी झाला आणि त्याची आवश्यकता पण नव्हती. गुरुजींनी पण जिद्दीने भिक्षुकी करूनच हा आश्रम बांधला हे आश्चर्यच. ते म्हटले ते खरेच , दत्त महाराजांचे काम दत्त महाराजांनी गुरुजींकडून करवून घेतले. नाहीतर गुरुजींसारख्या आर्थिक परिस्थिती बेताचीच असणाऱ्या माणसाकडून पर राज्यात जिथे भाषा पण आपली नाही अशा ठिकाणी एवढे काम करायची डेरिंग / बुद्धीच झाली नसती. शिवाय रिटायर्ड झाल्यावर एवढे उपदव्याप करण्याची त्यांना काही गरजच नव्हती. एकंदरीत त्यांचा महाराजांवरील दृढ विश्वास आपल्याला यातून दिसून येतो. किव्हा त्या दोघांचे आधीच डिस्कशन झाले असेल. मी मात्र यातून गुरुजींनी धु म्हटले कि धुवायचे ..... त्यांना प्रश्न विचारायचे नाही हे शिकलो


आश्रमात गुरुजी 

गाणगापूर आश्रमात दत्तयाग 

आश्रमात गुरुजींची धान्य तुला 

आश्रमात गुरुजी 
आश्रमातील बेसिन धुताना गुरुजींचा गुपचूप काढलेला फोटो 

आश्रमात हवन / पूजा , सोबत रिसबुड काका 

आश्रमात पेपर वाचताना एका निवांत क्षणी 

विजय आणि अभिषेक सर देशपांडे या सोबत पूजा करताना गुरुजी 
आश्रमाच्या आवारात निवांत क्षणी गप्पा मारताना गुरुजी 
गुरुजींना कोणी सांगितले कि तुम्हाला भेटायला येतो तर ते लगेच म्हणायचे कि महाराजांना भेटायला या , मला नको. गुरुजी आशीर्वाद द्या तर म्हणायचे कि महाराजांचे आशीर्वाद देतो. 

मज आवडो न आवडो I  तू जे इच्छिसी ते ची घडो I हे मागण्या न अवघडो I जीभ माझी II  

असे ते नेहमीच प्रार्थना करायचे. आपले प्रारब्ध भोगुनच संपवायचे असतात व त्यातून कोणालाच सुटका नाही , अशी त्यांची ठाम विचारसरणी होती. पण दत्त महाराजांची सेवा / उपासना करून प्रारब्धभोग सुसह्य करता येतो हे ते नेहमी सांगायचे.  "महाराज प्रारब्ध भोगतो पण सुसह्य ठेवा " असे ते महाराजांना सांगायचे. कोणता उत्सव / कार्यक्रम असला आणि ते थोडेही आजारी पडले तर मात्र ते दत्त महाराजांना विनंती करायचे कि महाराज हा प्रारब्ध भोगतो पण हा कार्यक्रम होऊन जाऊदे आणि आश्चर्यकारक रित्या ते आजारपण postpone किंवा prepone करायचे हे आम्ही सर्वानीच अनेकदा पाहिले / अनुभवले आहे.

गुरुजींकडे मान अपमान काहीच नव्हता. जे काही होतेय ते दत्त महाराजांच्या इच्छेनेच होत आहे असे ते मानायचे. जो माणूस त्यांच्याकडे आला , जे काही बोलला. किंवा त्याच्या ज्या समस्येसाठी तो गुरुजींकडे आला , ते दत्त महाराजांनी पाठवले असे ते मानायचे. काहीही झाले तरी ते म्हणायचे प्रभू इच्छा. एकदा एका जवळच्या नातेवाईकांनी गुरुजींचा अपमान केला. गुरुजी शांतच होते. काहीही बोलले नाहीत. त्यांची सून रंजना मात्र खूप वैतागली. ती बोलली कि मी त्यांना विचारते कि असे का बोललात म्हणून. गुरुजी म्हटले काहीही बोलू नकोस. हि प्रभू इच्छा आहे असे समज. 

त्यांच्या जवळचा एक व्यक्ती देखील त्यांचा सतत अपमान करत असे. मी त्यांना म्हटले कि याला माझ्या पद्धतीने देव दर्शन देऊ का ? ते म्हटले कि अजिबात काही बोलायचे नाही. हि प्रभू इच्छा आहे असे समजायचे. माझ्या प्रारब्धात जे आहे ते मला भोगलेच पाहिजे. मी त्यांना त्यांचाच डायलॉग मारला. तुम्ही प्रारब्ध भोगा , मी फक्त सुसह्य करतो. त्यांनी हसून नकार दिला. म्हटले तुम्ही भोस....  सुधारणार कधी. त्याला त्याच्या कर्माचे फळ महाराज देतील , तू काळजी करू नकोस. एवढे छोटे छोटे मॅटर महाराजांकडे कशाला न्यायाचे असा मी विचार केला. पण नंतर आठवले कि धु म्हटले कि धुवायचे... 

१९५४ मध्ये त्यांचे मेहुणे अरुण दीक्षित आजारी पडले आणि डॉक्टरांनी २४ तासाची मुदत दिली. तेव्हा त्यांनी पहिल्यांदा श्री गुरुचरित्र ग्रंथाचे सलग पारायण केले. मला वाटते कि सलग १८ तास असावे. त्यातून मग अरुण दीक्षितांना आराम पडला. तेव्हापासून त्यांनी असंख्य पारायणे केली. त्यांना गुरुचरित्र पाठ होते असे म्हणायला हरकत नाही. गुरुजी म्हणजे चालते बोलते गुरुचरित्रच.  गाणगापूर आश्रमाचा पाण्याचा कायम स्वरूपी प्रश्न सुटावा म्हणून जमिनीत बोर मारण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी दत्त महाराजां काही पारायण सेवा देण्याचे काबुल केले. तेवढे पारायणे झाल्यावर बोर मारली. आणि आज त्या बोरवेल ला अखंड पाणी आहे. महाराजांकडे काही मागायचे असे तर सेवा करावीच लागते , फुकट काही मागायचे नाही अशी त्यांची विचारसरणी होती. 
बोर वेल ला पाणी मिळण्यासाठी गुरुजींनी 108 गुरुचरित्र पारायण सर्वांकडून करून घेतली


श्री गुरुचरित्र पारायण करताना गुरुजींचा एक दुर्मिळ फोटो 

  गुळवणी महाराज आश्रम, गाणगापूर बाहेर चहा पिताना एका निवांत क्षणी गुरुजी. आधी गुरुजी येथे राहायचे  

श्री. गुप्तेबाबा , डोंबिवली यांच्याबरोबर गुरुजी 
गुरुचरित्र पारायण , tembe  स्वामींच्या , दत्तावधूतांची पुस्तके / पोथ्या ते वाचायला सांगत. आणि हो गुरुजींना पुस्तकांची खूप आवड. कुठेही गेले तरी पुस्तके विकत घायचे आणि संग्रह करायचे. गाणगापूरला आश्रमात अशी अनेक पुस्तके ठेवली आहेत. त्यात अनेक साधू ,सत्पुरुषांची पुस्तके आहेत. एखादी ओळ , पॅराग्राफ आवडला कि ते त्याखाली पेन ने खूण करायाचे. शेवटपर्यंत ते चष्म्या शिवाय वाचन करायचे. लांबचे बघण्यासाठी मात्र त्यांना चष्मा लागत असे. त्यांना विचारले असते ते म्हणाले कि कि कायम गुरुचरित्र वाचनासाठी मी महाराजांकडे डोळे मागितले आहेत म्हणून मला चष्मा नाही. 

त्यांची आर्थिक परिस्थिती खूप चांगली नसली तरीपण त्यांना जेवढी गरज असायची ती पूर्ण व्हायची. माई अन्नपूर्णा आहे त्यामुळे माझ्याकडे काहीच कमी नाही असे ते सांगायचे. आणि हे खरेच होते. त्यांच्याकडे कितीही माणसे आली तरी प्रत्येकाला काही ना काही तरी खायला मिळायचेच. अगदी त्यांच्याकडे कचरा घ्यायला जी बाई यायची तिला पण माई काहीतरी खायला रोज द्यायची.  त्यांच्याकडे कोणीही उपाशीपोटी परतत नसे. 

स्वतःच्या उपासने बद्दल ते कधीच काहीच सांगत नसत. पण त्यांनी दोन गायत्री पुनश्चरण पूर्ण केले होते. एक पुनश्चरण म्हणजे सर्व बंधनात राहून २७ कोटी गायत्री मंत्राचा जप. त्यातील दुसरे पुनश्चरण त्यांनी उरण जवळच्या समुद्रात त्यांचे सदगुरु दंडवते बाबा बरोबर केले. त्याविषयी त्यांनी थोडी माहिती सांगितली ती नमूद करतो.  सतत ४० दिवस सूर्योदय ते सूर्यास्त पर्यंत ते समुद्रात छातीभर पाण्यात उभे राहून गायत्री मंत्राचा जप करायचे. मग सूर्यास्तानंतर ते समुद्राच्या बाहेर यायचे. भरती ओहोटी प्रमाणे ते पुढे मागे सरकून पाणी सतत छाती पर्यंत असेल याची काळजी घ्यायचे. पाण्यात स्वतःचा तोल सांभाळणे किती कठीण असेल , उन्हाचा किती त्रास झाला असेल याचा आपण विचारपण करू शकत नाही. त्या दरम्यान त्यांच्या पायाला माशांनी अनेकदा चावा घेतला होता मग पायांची काय अवस्था झाली असेल याचा आपण विचारदेखील करू शकत नाही. स्वतःच्या उपासनेबद्दल ते काहीच बोलत नसत. जगन्मित्र पुस्तकाच्या वेळी यातील काही गोष्टी बाहेर आल्या. आपली उपासना गुप्त असावी व त्याचा अहंकार नसावा या मताचे ते होते. शिवाय उपासना करताना बरेच अनुभव येतात , त्यात वाहून न जाता दुर्लक्ष  करावे व उपासनेवर लक्ष केंद्रित करावे असे ते सांगत.
गुरुजींनी दंडवते बाबांसोबत उरण समुद्रात 40 दिवस गायत्री मंत्र अनुष्ठान केले  त्या दरम्यानचा एक अत्यंत दुर्मिळ फोटो 


दंडवतेबाबा , गाणगापूर हे त्यांचे गुरु होते. बाबांबरोबर १९८४ साली ते गाणगापूर , बद्रीनाथ यात्रेला गेले. तिथे बद्रीनाथ ला त्यांना दंडवते बाबानी गुरुमंत्र दिला 
दंडवते बाबा बरोबर गुरुजी आणि माई 
आणि त्यानंतर बागुलकाकानी तिथेच गुरुजींकडून गुरुमंत्र घेतला , म्हणजे बागुलकाका हे गुरुजींचे पहिले शिष्य होते. 
बागुलकाका बरोबर 
पहिले गायत्री मंत्र पुनश्चरण सांगता समारंभ , समाज मंदिर हॉल , बांद्रा , गांधी नगर पट्ट शिष्य बागुलकाका बरोबर गुरुजी आणि माई .
१८८४ -१९८५ ला  २७ लक्ष गायत्री जप केला 

गुरुजींची एकसष्टी साजरी केली 

गुरुजींची एकसष्टी
गुरुजींची एकसष्टी

सून सौ. रंजना संजय पाठक  यांचा अठंगुळ संस्कार गुरुजींनी अहमदनगर ला केला होता. या संस्कारामुळे सोवळ्याचा स्वयंपाक करता येतो असे गुरुजी म्हणाले 

गुरुजी , माई व त्यांची तिन्ही मुले व सुना . एक खूप दुर्मिळ फोटो. राजूदादा व सुचेतावहिनी , संजय व रंजनावहिनी , अजय व पूजा वहिनी 
नाशिक राजू दादाच्या घरी गुरुजी व माई , ओमकार व गायत्री या लाडक्या नातवंडांबरोबर सोबत सून सुचेतावहिनी  
माई खूप आजारी पडली होती , तेव्हा त्यांनी माई साठी आयुष्य महाराजांकडे मागून घेतले होते आणि परत मागणार नाही असे कबुल केले होते. हि आठवण ते आम्हाला सांगत. शेवटी माई जेव्हा आजारी झाली आणि हॉस्पिटलमध्ये होती. तेव्हा त्यांना माहित होते कि आत्ता काही करता येणार नाही. आम्ही विचारले कि माई कधी बरी होईल तेव्हा ते म्हणाले कि " जितनी चाबी भरी राम ने , उताना चाले खिलोना ". कधीतरी हे होणारच हे त्यांनी सहजच स्वीकारले होते. 


गुरुजी आणि माई 
 माईच्या केसात गजरा मळताना एक दुर्मिळ फोटो 


अजून एक आठवण म्हणजे गुरुजी असेपर्यंत रोज संध्याकाळी ७ वाजता त्यांची एक प्रार्थना होती ते सर्वजण म्हणायचे. अगदी रस्त्यात असले तरी दोन मिनिटे मनातल्या मनात बाजूला उभे राहून म्हणायचो. हि सवयच होती. ज्यात स्वामींची प्रार्थना , आईची प्रार्थना वगैरे होते. हे त्यांनी व आम्ही कुठेही असले तरी चुकवले नाही. माई चे पार्थिव हॉस्पिटलमधून माहीमच्या घरी आणले आणि संध्याकाळचे ७ वाजले तेव्हापण गुरुजींनी सांगितले कि प्रार्थना चुकवायची नाही. आणि त्या दिवशीही संध्याकाळी ७ वाजता घरी माई चे पार्थिव असताना देखील सर्वानी प्रार्थना केली. 

संध्याकाळी ७ वाजता करायची आई ची प्रार्थना 

संध्याकाळी ७ वाजता करायची स्वामींची प्रार्थना  
गुरुजींचा काही खूप मोठा भक्तपरिवार नव्हता . परंतु जे होते ते प्रेमाने जोडलेले होते. काही बुवाबाजी , अंधश्रद्द्धा नाही, पैश्याचा व्यवहार नाही आणि पैश्याची मागणीही नाही. दर गुरुवारी संध्याकाळी त्यांच्याकडे भक्तमंडळी दर्शनाला यायची. रात्री ११ -१२ पर्यंत लोक येत असायची. एरवी पण गुरुजी सर्वाना भेटायचे. ते सर्वाना accesible आणि available असायचे. मी पण तुमच्यातलाच एक सामान्य माणूस आहे असे ते सर्वाना भासवयाचे. काही खाज़गी बोलायचे असेल तर गुरुजी वेळ द्यायचे त्यावेळेला लोक यायची. त्यांच्या बसण्याच्या जागे मागे महालक्ष्मी कॅलेंडर असायचे त्यात ते त्यांच्या appointment / जप संख्या लिहून ठेवायचे. 
माझा मुलगा आर्यन बरोबर गुरुजींचा फोटो . मागील कॅलेंडर वर ते appointment / जप संख्या लिहून ठेवायचे.  

या भेटीसाठी त्यांची काहीच फी नव्हती. कोणी काही दिले तर ठीक नाहीतरी ठीक. जो दे उसका भला जो ना दे उसका भी भला . कोणाचे काही प्रॉब्लेम असेल तर ते महाराजांकडे प्रार्थना करायचे कि तुमचा भक्त आला आहे त्याला निराश करू नका. जे काही होते आहे ते महाराजांच्याच इच्छेने होत आहे यावर ते ठाम असायचे. अनेक जण त्यांच्याकडे समस्या घेऊन येत. मग ते त्यांना उपासना सांगत आणि महाराजांना विनंती करत कि हा भक्त ८४ पायऱ्या( ८४ लक्ष योनी पार करून )  चढून तुमच्याकडे आलेला आहे त्याच्यावर कृपा करा (त्यांचे घर ५ मजल्यावर होते आणि त्यांच्याकडे जायला ८४ पायऱ्या चढून जायला लागायचे ). तुम्ही उपासना करा आणि फळ काय द्यायचे ते महाराजांवर सोडून द्या असे ते म्हणत. तसेच मी भगवंत द्यायला बसलोय आणि तो मागायला कोणीच येत नाही, अशी खंत ते व्यक्त करत.

गुरुजींनी माहीमच्या घरी ९ पायर्यांचा स्टील चा देव्हारा बनवून घेतला होता. त्यात श्री दत्त मूर्ती आणि इतरही देव होते व ते व्यवस्थित रचून ठेवले होते. 
गुरुजींच्या माहिमच्या घरातील स्टील चा ९ पायऱ्यांचा  देव्हारा 

फुल त्यांना खूप आवडत. केळकरांचे हिना अत्तर तर खूप प्रिय. गळ्यातील रुद्राक्ष माळेला ते नियमित अत्तर लावत. त्यांच्या बोटात  एक नवग्रहांची जुनी अंगठी होती बाकी stones वर त्यांचा विश्वास नव्हता. फुले आणण्यासाठी ते दादर ला माहिमवरून टॅक्सी ने जात. दादर फुलबाजारात फुले घेत आणि मग परत येत. विशेषतः गुरुवारी त्यांना खूप फुले लागायची. चाफा त्यांना अत्यंत प्रिय. नंतर आम्ही दोघे वेळ ठरवायचो आणि ते मला म्हणायचे कि तू तुझे घोडं (मोटरसायकल ) अमुक वाजता घेऊन ये. मग आम्ही दोघे बाईक वरून दादर फुलबाजारातून फुल घेऊन यायचो. त्यांचा वेळ पण वाचायचा आणि मला मज्जा यायची. घरी आलो कि मग ते खूप वेळ मनासारखा देव्हारा फुलांनी सजावट बसत. माई म्हणायची आत्ता माळीबुवा तासभर देवांना सजावतील. नामस्मरण , जप त्यांना खूप प्रिय, कधीही कुठेही नामस्मरण करावे असे ते सर्वाना सांगत. भजन ऐकायला त्यांना आवडत आणि शास्त्रीय संगीत पण आवडत असे.


                                    नामस्मरण करताना गुरुजींचा एक दुर्मिळ विडिओ

२३ फेब. २००३ माझ्या लग्नात गुरुजी (आमच्या दोघांच्या मध्ये उभे आहेत )
कन्या जया हिच्या लग्नात गुरुजी आणि माई ५ जुन १९८१
मुलगा अजय याच्या लग्नात गुरुजी , माई , सौ. सुचेता , राजूदादा , सौ. रंजना 
छाया व विजय सरदेशपांडे यांच्या लग्नात कन्यादान गुरुजींनी केले २९ नोव्हेंबर १९७९ 
श्री. विजय पाटील यांच्या कराड येथील लग्नात गुरुजींची हजेरी १४ मे २००२

  कृते जनार्दन देवे I  त्रेताया रघुनंदन II 
द्वापारे रामकृष्णस्य I कलौ श्रीपाद श्रीवल्लभ II 

कलयुगाची देवता दत्त आहे त्यामुळे दत्ताची उपासना करा असे ते सांगत. या व्यतिरिक्त देवीचा जप, नवनाथाचा जप ते करत आणि करायला सांगत. वर्षातून एकदा ते नवनाथाची पूजा सांगत. गुरुजी मेडिटेशन नाही करायचे पण एका बैठकीत खूप जप करायचे . जप करताना आणि श्री गुरुचरित्र वाचन करताना ते ट्रान्स मध्ये जायचे . आध्यात्मात भगवंत प्राप्तीसाठी अनेक मार्ग आहेत , त्यापैकी खडतर कष्टप्रद जीवन व कडक उपासना या मार्गावर ते चालले. दत्त हे दैवत सर्वाना available आणि accessible करण्याचा त्यांनी जीवनभर प्रयत्न केला. आणि आजच्या बाजारू अध्यात्मिक दुनियेत सहज उपासना कशी करता येते हा मार्ग त्यांनी दाखवला. दत्तमहाराज भक्ताभिमानी आणि भक्तवत्सल आहेत व त्यांच्या भक्तांचे ते संरक्षण करतात आसा ठाम विश्वास त्यांनी आपण सर्वाना दिला किंवा आपल्याला त्यांनाही अशा आशेवर ठेवले कि तुम्ही टेन्शन घेऊ नका महाराज येतील. 

गुरुजींच्या डोळ्यातून आपण दत्तमहाराज पहिले , दत्तमहाराजांकडे आपली गाऱ्हाणी आपण गुरुजी मार्फत पोहोचवली व दत्त महाराज आपल्याशी गुरुजींच्या मुखातून बोलले हे मात्र खरे. कारण देव हा आपल्यातच असतो. तुम्ही सर्व जण जे हे वाचतायत ते खरंच भाग्यवान कि अश्या एका सत्पुरुषाबरोबर आपण सहजच वावरलो, किव्हा त्यांची माहिती आपल्याला मिळाली. आज गुरुपौर्णिमा आहे, त्यानिमित्त पाठकगुरुजींची हि छोटीशी आठवण.

विशाल फुलपगार
५ जुलै २०२० , रविवार ,गुरु पौर्णिमा


आभार : महेश पाटील , स्वप्नाली फडणीस , रंजना पाठक , राजूदादा पाठक , अमेय भट , ओंकार पाठक यांनी खूप शोधाशोध करून फोटो दिलेत.


दत्तलीन श्री. पाठक गुरुजी यांच्या जीवनावरील "जगन्मित्र" या पुस्तकाचे विमोचन स्वातंत्रवीर सावरकर स्मारक , दादर , मुंबई येथे २५ डिसेंबर २०१२ ला मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तो कार्यक्रम पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा. 

https://www.youtube.com/watch?v=V32T5DWEor8&list=PLsAsEAuSOBwdOoqO44f_ZFkqLrO7aPsva&index=2&t=7904s



Friday, July 3, 2020

पाठकगुरुजींची स्कुटर

पाठकगुरुजींची स्कुटर 
पाठकगुरुजींची एक स्कुटर होती, त्याच्या काही आठवणी आज सांगतो. विशेष मोठा लेख होणार नाही. पण ती एक आठवण आहे आणि सांगणे गरजेचे वाटते. काही गोष्टी मला गुरुजींनी सांगितल्या होत्या व काही गोष्टींची मी अधिकची माहिती घेतली. 





त्यावेळी गुरुजी व त्यांची मुले म्हणजे राजूदादा, संजय, अजय व मुलगी जया हे वांद्रे गव्हर्नमेंट कॉलनी, बांद्रा (पू), मुंबई येथे B-43/8 या ठिकाणी राहायचे.  गुरुजींचा भाऊ, ज्याला सर्वजण प्रभुकाका म्हणतात, हा नवी मुंबई मध्ये नोकरीस असल्यामुळे सोबतच राहायचा. गुरुजी सकाळी दूध केंद्र चालवायचे मग तिथून घरी येऊन व्यंकटेश देशपांडे, मकरंद सोसायटी दादर या हायकोर्ट वकिलांकडे १ तास टायपिंग करायचे. मग तिथून ऑफिसला जायचे. दुधकेंद्र चालवून त्यांना जे पैसे मिळायचे त्यात ते दूध विकत घ्यायचे. कारण त्यांचे कुटुंब मोठे आणि येणारे जाणारे खूप, त्यामुळे चहा सतत बनत असे. दूध केंद्र, वकिलांकडे टायपिंग आणि नोकरी, अशा तीन मार्गाने त्यांना (अल्प)उत्पन्न मिळत होते. कष्ट करून त्यांनी विनातक्रार संसार चालवला हे विशेष. अर्थात याचे ९९% श्रेय त्यांची पत्नी म्हणजे माई याना आहे आणि बरेचसे श्रेय त्यांच्या अपत्यांना आहे. पहाटे लवकर उठून ही उशिरा झोपणे हे त्यांच्यासाठी नित्यनेमाने होते. याशिवाय त्यांची वैयक्तिक उपासना चालायची, त्यासाठी पण वेळ लागायचा. एकंदरीत त्यांच्या दत्ताने त्यांना काही कमी पडू दिले नाही आणि जास्ती तर अजिबातच दिले नाही. 

सर्व मुले देखील गरिबीतच वाढली व वेळोवेळी नातेवाईकांपासून किंवा बरोबरच्यापासून त्यांचा अपमान झाला असेलच. शिवाय मुलांच्या इच्छा आकांक्षांची पूर्तता झाली नसेलच. आणि हे सर्व गुरुजींना ठाऊक होतेच. आता मात्र त्यांची सर्व मुले, स्वकष्टाने, मेहनत करून आणि आई वडिलांच्या पुण्याईने चांगली settle आणि समाधानी आहेत. सर्वांची स्वतःची घरे आहेत. घरात सुबत्ता आहे. 

Ok, तर आपण स्कुटरकडे वळूयात. गुरुजींना ऑफिस, वकीलाकडे टायपिंग आणि घर या ठिकाणी जाण्यासाठी वेळ वाचावा म्हणून स्कुटर घ्यावी असे कोणीतरी सुचवले, कारण त्यामुळे वेळ व पैसे वाचणार होते. स्कुटरची किंमत त्यावेळी रु. ५२००/- होती व स्कुटर घेण्यासाठी २/३ वर्षाचे वेटिंग असायचे. त्यात पोलिसांचा स्पेशल कोटा असायचा. त्यांत २-३ महिन्यात स्कुटर मिळत असे. पाठक गुरुजी पोलीस खात्यात असल्यामुळे त्यांना लगेचच स्कुटर मिळणार होती. अर्थात नेहेमीप्रमाणे गुरुजींनी पैशाची जमवाजमव करुनही ५२०० रुपये काही जमेनात. मग त्यांचे भाऊ मधुकाकानी त्यांना पैसे दिले. अश्या रीतीने १९७७-७८ ला पिस्ता रंगाची बजाज वेस्पा १५० CC स्कुटर गुरुजींच्या घरी आली. व माईने तिची विधिवत पूजा केली. काही काळाने मधुकाकाने पैसे परत मागण्यासाठी तगादा लावला व मग एकदा तो स्कुटर घेऊन गेला.(खरे म्हणजे या दोन भावांमध्ये काय बोलणे झाले ते मला माहित नाही ,त्यामुळे हे का झाले हे मी नक्की सांगू शकत नाही) मुले खूप नाराज झाली. मग माईची बहीण प्रभा मावशी हिला कळले मग तिने पैसे दिले आणि स्कुटर परत गुरुजींकडे आली. मग थोड्या महिन्यांनी गुरुजींनी तिच्या पैशाची परतफेड केली. 

त्याकाळी दारात स्कुटर असणे म्हणजे मोठी गोष्ट होती. त्यांच्या बिल्डिंग खाली मुलांनी स्कुटर ठेवण्यासाठी एक छोटेसे गॅरेज बनवून घेतले. सर्व मुले गुरुजींबरोबर स्कुटरवर बसायची. माई मात्र जास्त जायची नाही. क्वचित प्रसंगी गुरुजी, माई आणि सर्व मुले स्कुटरवर एकत्र गेली असतील. सर्वात जास्त गुरुजींचा धाकटा मुलगा अजय हा स्कुटरवरून गुरुजी बरोबर फिरायचा. गुरुजी पेडर रोडला एका गुरुजींकडे जायचे, तिथे मात्र ते किंवा ते आणि माई स्कुटरवरून जायच्या हे मला त्यांनी सांगितल्याचे आठवते.

आता गुरुजी स्कुटर चालवणार म्हणजे सर्व नियम पाळूनच चालवणार हे काही सांगायला नको. शिवाय ते स्वतः  पोलीस खात्यामध्ये म्हणजे काही विचारूच नका. कडक शिस्त हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग. स्कुटरचा स्पीड कधी ४० च्या वर जायचा नाही. त्यावेळी रस्त्यावर ट्राफिक कमी होते. स्कुटर पुसायला चावी संजयच्या हातात मिळाली की मग तो कलानगर पर्यंत खूप वेगाने जाऊन जायचा. पाठक कुटुंबियांच्या वतीने सर्व नियम गुरुजी पाळत असल्यामुळे संजय व अजय हे धाडसी आणि उपद्व्यापी होते. मोठा राजू मात्र नियमात राहून असायचा. यावर अधिक काही लिहित नाही. नाहीतर सर्व पाठक भावंडं एक होतील आणि माझ्यावर आक्रमण होईल.

गुरुजींचे जीवन हे धावपळीचे होते आणि त्यांचे काम हे टाइम टेबल प्रमाणे चालायचे. सकाळी दूध सेन्टर , नंतर वकिलांकडे टायपिंग नंतर ऑफिस व मग घरी. त्यांचा येण्या जाण्याची वेळ फिक्स असायची. एकदा ऑफिसमधून स्कुटरवरून परत येत असताना संध्याकाळी किंग्स सर्कलला अरोरा सिनेमा जवळ त्यांच्या स्कुटर ला एका ट्रकने मागून ठोकले. अंदाजे रात्रीचे ८ वाजले असावेत. गुरुजी पडले आणि स्कुटरचे चाक त्यांच्या पायावर. त्यात त्यांच्या पायाचे हाड मोडले व बराच रक्तस्त्राव झाला. बाकी ठिकाणीही लागलेच. माणूस कितीही मोठा किंवा छोटा असो एकदा रस्त्यावर पडला की मग तो सामान्य होतो. आणि कोणीतरी मदत केली तरच काही खरे. म्हणूनच बहुधा "रस्त्यावर आलो" म्हण प्रचलित असावी. लोक लगेच धावली, एक ट्राफिक पोलीस आला. गुरुजींनी त्याला आपली ओळख सांगितली आणि ते बेशुद्ध झाले. पोलीस खात्याचा माणूस आहे हे समजल्यावर त्या पोलीसाने स्वतः त्यांना ताबडतोब सायन हॉस्पिटलला हलवले. त्यांची स्कुटर पोलीस स्टेशनला नेली.  ट्रक ड्राइवरला पकडले.

इकडे मात्र गुरुजी अजून आले नाहीत म्हणून घरातले सर्वजण चिंतेत होते. प्रभुकाकाने त्याच गव्हर्नमेंट कॉलोनी मध्ये राहणाऱ्या गुरुजींच्या सहकाऱ्यांकडे चौकशी केली तेव्हा कळाले की ते ऑफिस मधून वेळेवर निघाले होते. मग ते गेले कुठे ? काहीच कळेना. रात्री अंदाजे ११ वाजता स्थानिक पोलीस स्टेशनचा एक पोलीस घरी आला त्याला वायरलेस वरून निरोप मिळाला व त्याने सांगितले कि पाठक साहेबाना सायन हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं आहे आणि त्यांचा अपघात झाला आहे. सगळे जण जवळपास रडायलाच लागले. प्रभुकाकाने धीर दिला. मग मुलांना घरीच ठेवून माई आणि प्रभुकाका टॅक्सीने सायन हॉस्पिटलला गेले. तिथे गुरुजींच्या पायाला प्लास्टर , शरीरावर जखमा आणि त्यांना रक्त चढवत होते. तेव्हा ते शुद्धीवर होते. इथे घरी मात्र सर्व मुले खूपच घाबरली होती. त्यांना कळायला काहीच मार्ग नाही. पहाटे माई आणि प्रभुकाका परत घरी आले कारण दूध सेन्टर तर चालू करायला पाहिजे , तेव्हा मात्र मुलांचा जीव भांड्यात पडला. जवळ जवळ ३ आठवडे ते सायन हॉस्पिटल मध्ये होते. घरी आल्यावर ते परत जोमाने कामाला लागले.

ट्रक ड्राइवर स्वतःची चूक मानायला तयार नव्हता , मग त्याच्यावर कोर्टात केस झाली आणि ७/८ वर्षांनी त्याचा निकाल लागून गुरुजींना नुकसान भरपाई मिळाली.

गुरुजींचा मोठा मुलगा राजू नाशिकला नोकरीनिमित्त शिफ्ट झाला व तो कामाला सायकलने जायचा. ते ठिकाण लांब होते. मग गुरुजींनी राजूला स्कुटर दिली. व स्कुटर नाशिक ला शिफ्ट झाली. राजू पण गुरुजी प्रमाणे नियमात राहून चालवायचा. पण गुरुजी एकदाच पडले आणि राजू मात्र दरवर्षी स्कुटरवरून घसरायचा, पडायचा किंवा काहीतरी होऊन त्याचा अपघात व्हायचा. हा वार्षिक कार्यक्रम राजूदादाने बरीच वर्ष चालवला. नेहमी बोलायचा, अरे माझी काहीच चूक नाही. मग राजू पडला की मग माई आणि गुरुजी नाशिकला राजूदादाकडे राहायला जायचे. राजूला दोन मुले ओंकार आणि गायत्री. आणि हो दोन्ही नातवंड गुरुजी माई ची खूप लाडाची होती. मध्यंतरी २/३ वर्षे सलग ते नाशिकलाच राहायला होते. राजूदादाची बायको सुचेतावहिनी या ग्लॅक्सो कंपनी मध्ये कामाला होत्या. सकाळी जाताना त्या स्वयंपाक करून जायच्या.  माई आणि गुरुजींची चांगली काळजी घ्यायच्या. आम्ही देखील त्यांना भेटायला नाशिकला जात असू. आमचे मनापासून स्वागत करायच्या. कालांतराने ती स्कुटर  विकली. 

पाठक गुरुजी , तीनही मुले आणि सुनांबरोबर त्रंबकेश्वर येथे नारायण नागबलीसाठी गेले असताना एक दुर्मिळ फोटो 
नाशिक राजू दादाच्या घरी गुरुजी व माई , ओमकार व गायत्री या लाडक्या नातवंडांबरोबर सोबत सून सुचेतावहिनी 

अजयने स्कुटर खूप चालवली, संजयने पण चालवली पण कधीच अपघात केले नाहीत. आज खूप शोधाशोध करुनपण त्या स्कुटरचे फोटो मिळाले नाहीत. पण एक छान आठवण लिहून काढली. मलाच मज्जा आली. तुम्हाला पण नक्कीच हि आठवण आवडली असेल.

विशाल फुलपगार


दत्तलीन श्री. पाठक गुरुजी यांच्या जीवनावरील "जगन्मित्र" या पुस्तकाचे विमोचन स्वातंत्रवीर सावरकर स्मारक , दादर , मुंबई येथे २५ डिसेंबर २०१२ ला मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तो कार्यक्रम पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा. 

https://www.youtube.com/watch?v=V32T5DWEor8&list=PLsAsEAuSOBwdOoqO44f_ZFkqLrO7aPsva&index=2&t=7904s

Sunday, June 28, 2020

पाठकगुरुजी - काही गंमतीशीर आठवणी


पाठकगुरुजी - काही गंमतीशीर आठवणी 

पाठक गुरुजी विषयी प्रचंड आदर बाळगून त्यांच्यासोबत झालेल्या काही आठवणी येथे उल्लेखित करतो. "जगन्मित्र" या त्यांच्यावरील पुस्तकात काही आठवणी आल्या आहेत, पण सगळ्यांनीच ते पुस्तक वाचले असेल असे नाही. या त्या त्या वेळी झालेल्या घटना/ संवाद असून, त्यातून कोणाचा अपमान करण्याचा/ होण्याचा किंवा माझ्या उध्दटपणाचा हेतू नाही.


गुरुजींचा जन्म नवसाने झाला. लहानपणी ते राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराजांच्या सान्निध्यात वाढले. महाराज त्यावेळी खूपच प्रसिद्ध संत होते. पाचलेगावकर महाराज याना सर्प सिद्धी होती.


त्यांच्याकडे अनेक प्रकारचे विषारी/ बिन विषारी सर्प होते. आणि विशेष म्हणजे ते सर्प महाराजांच्या आज्ञेत असायचे.  गुरुजींना लहानपणी "बटु" या टोपण नावाने बोलावत असत. आणि निश्चितच गुरुजी लहानपणी खूपच मस्तीखोर होते. "वासुकी" नावाचा एक विषारी साप महाराजांकडे नवीनच दिला होता व अजून तो महाराजांना वश नव्हता , म्हणून त्याला एका टोपलीत ठेवले होते. आणि पाचलेगावकर महाराजांनी स्पष्ट ताकीद दिली होती की वासुकी ला कोणीही स्पर्श करू नये. हात लावायचा नाही, असे म्हटल्यावर गुरुजींची उत्सुकता वाढली. महाराज असताना भीती कसली आणि मला काय होणार? असा विचार करून बटुने वासुकी असलेल्या टोपलीत हात घालून त्याला काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा वासुकीने naturally गुरुजींना दंश केला. विष चढायला लागल्यावर बटुच्या अंगाची आग आग व्हायला लागली त्यामुळे गुरुजी तडफडू लागले. मग सगळे जण घाबरले. सर्वानी पाचलेगावकर महाराजांकडे धाव घेतली व त्यांना घडलेला प्रकार सांगितला.  महाराजही भडकले , मी नाही म्हटलो होतो मग बटु ने का हुशारी केली? आत्ता त्याला थोडा वेळ तडफडू दे. मग थोड्या वेळाने महाराजांनी ते विष उतरवले. 

त्यावेळी महाराजांकडे खूप साप असायचे आणि त्याची सर्वानाच सवय होती त्यामुळे कदाचित गुरुजींनी न घाबरता ते धाडस केले असावे. शिवाय गुरुजी हे महाराजांचे लाडके होते हे निश्चितच. देशाच्या प्रधानमंत्री स्व. इंदिरा गांधी या एकदा पाचलेगावकर महाराजांना भेटायला आल्या होत्या त्यावेळी महाराजांनी त्यांच्याही हातात सर्प दिला होता व गुरुजी त्यावेळी तिथे हजर होते. हि गोष्ट मला गुरुजींनीच सांगितली आहे. 

काही जण गुरुजींकडून उपासना घेत, पण ती करत नसत. गुरुजींनी विचारले असता, मग शाळेतल्या मुलांसारखे कारण सांगत. Busy असतो, कामावरून उशिरा घरी येतो, वेळ मिळत नाही, घर छोटे आहे वगैरे. मग गुरुजी वैतागत आणि म्हणत वेळ नसताना आणि छोटे घर असताना पण मुले झालीच ना? त्याला कसा वेळ मिळाला? मग सांगितलेली उपासना का नाही करत?  सर्व जण निरुत्तर व्हायचे. 

एकदा माझ्या स्वप्नात गुरुजी ४-५ वेळा सलग आले. मग मी त्यांना भेटायला माहीम मुक्तिधामच्या घरी गेलो. म्हणालो अहो, माझ्यासारख्या तरुणाच्या स्वप्नात तुम्ही यायला पाहिजे का कोणीतरी सुंदर मुलगी यायला पाहिजे? तुम्ही मला स्वप्नात येऊन कशाला  त्रास देता? आपण रोज सकाळी १० वाजता बोलतो , अनेकदा भेटतो ना?  मग ते खूप हसले, आम्ही दोघेही हसलो. विशेष म्हणजे नंतर ते कधी विशेष माझ्या स्वप्नात आले नाही. बहुधा मी केलेली गम्मत त्यांनी खूप गंभीरपणे घेतली असावी.

एकदा काय झाले, त्यांचा एक जुहूचा भक्त होता, खूप श्रीमंत. तो त्यांना प्लाझा, दादर येथे हिंदी चित्रपट बघायला घेऊन गेला. का ते कारण माहित नाही. चित्रपटाचे नाव "सत्या". आम्हाला कळल्यावर आम्ही हैराण झालो की  "सत्या" हा मारधाड असलेला चित्रपट बघायला गुरुजी का  गेले? म्हणजे नेणाऱ्याची पण कमालच आहे. दुसऱ्या दिवशी भेटलो आणि त्याना विचारले, चित्रपट कसा वाटला? ते बोलले की मला काही कळले नाही. छान एअर कंडिशन चालू झाला आणि मी गाढ झोपून गेलो. 

धुळे येथे नोकरीत असताना कोणीतरी त्यांना गम्मत म्हणून बिअरची बाटली दिली आणि ह्याने सर्दी जाते असे सांगितले. ते तीन चार दिवस सकाळ संध्याकाळ एक बूच भर बिअर औषधासारखे प्यायचे.  नंतर खूपच वास येऊ लागला म्हणून त्यांनी ती बाटली फेकली. 

गुरुजींनी स्थापित केलेल्या जय गुरुदेव आश्रम ट्रस्ट , गाणगापूर मध्ये त्यांनी माझी आधी विश्वस्त आणि मग विश्वस्त -खजिनदार पदावर नेमणूक केली. मी त्यांना गमतीने म्हणालो कि बघा, अजूनपर्यंत तुम्ही तुमच्या पद्धतीने ट्रस्ट चा कारभार केलात, आत्ता मात्र मी त्याची चौकशी करणार आणि काही गडबड आढळली तर शोधून काढणार. खरे म्हणजे गुरुजींचा कारभार अत्यंत स्वच्छ, त्यामुळे असा काही विषय नव्हता , पण मी गम्मत केली. त्यांनी लगेचच उत्तर दिले कि बघ, आश्रमाची इमारत बांधून झाली, ट्रस्ट च्या नावाने पुरेश्या फिक्स डिपॉजिट बँकमध्ये आहेत, त्या व्याजावर आश्रमाचा सर्व खर्च निघेल, सर्व कामकाज चालेल अशी व्यवस्था मी करून ठेवलीय. तुम्हाला नवीन काही करायचे नाही.  तुम्हाला फक्त आश्रम मेंटेन करायचा आहे. पैशाची चिंता आपल्याला नाही. तुम्हाला कारभार सोपवून मी जाईन. आगे तुम आश्रम सम्भालो और दत्त महाराज सम्भालेंगे.

त्यांच्या सर्व अपत्यांची लग्न झाल्यावर सर्वानी आपआपला संसार थाटला. मग माहीमला फक्त गुरुजी आणि त्यांच्या पत्नी माई असायच्या. दोघांचा संसार आणि संवाद उत्तम. अगदी made for each इतर. कधीतरी गुरुजी माईला डिवचयाचे असेल तर मला डोळा मारायचे, आणि म्हणायचे  आता बघ. मग काहीतरी कारण काढून ते माईची खोड काढायचे आणि थोडासा वाद झाला कि बोलायचे कि सखाराम पंतांनी (माईच्या वडिलांचे नाव सखाराम दीक्षित होते) हे काय माझ्या गळ्यात बांधले. मग माई खूप भडकायची आणि aggressive व्हायची. व बोलायची, माझ्या वडिलांना काहीच बोलायचे नाही. मग मात्र गुरुजी बॅकफूट वर जायचे आणि compromise करायचे.  मी त्यांना म्हणायचो की, का हो तुम्ही उगाच खोड्या काढता. ते म्हणायचे,  बघ आम्ही दोघे इथे एकटेच असतो . दुपारी काय टाइम पास म्हणून तिला थोडे भडकावतो. त्यात आमचा अर्धा तास जातो. मग पुन्हा शांत झाल्यावर नेहमीच रुटीन चालू.  गुरुजी कधीच TV बघत नसत.

गुरुजी दर गुरुवारी सकाळी १० नंतर माटुंगा येथील पणशीकर मध्ये पेढे आणायला जायचे आणि  संध्याकाळी येणाऱ्या लोकांना वाटायचे. मग तिथून काशी विश्वेश्वराच्या मंदिरात जायचे आणि भाजी वगैरे काही किरकोळ खरेदी करून परत यायचे. मला ती वेळ नक्की माहित असायची. ते बाजारात गेले कि मी सकाळी ११ वाजता माईला फोन करायचो आणि विचारायचो, गुरुजी आहेत का? ती म्हणायची कि अरे ते आत्ताच बाहेर गेलेत. मग मी म्हणायचो, हो मी त्याना आत्ताच माटुंग्याला गजरा खरेदी करताना पाहिले, बहुधा तुमच्यासाठीच घेतले असतील. गुरुजी परत आल्यावर माई त्यांना विचारायची, अहो गजरा कुठे आहे. ते म्हणायचे,  मी कुठे गजरा घेतला आणि तुला कोण बोलले. मग माझे नाव सांगितल्यावर ते मला फोन करायचे आणि खोटे खोटे ओरडायचे, अरे का माझ्या म्हातारीला छळतोस. आत्ता तिला सांग खरे काय ते आणि मला फोन द्यायचे. मी माईला परत सांगायचो, बघा जे मी पहिले ते मी तुम्हाला सांगितले. नंतर तुम्ही बोलू नका की मुलांनी तुम्हाला सावध केले नाही म्हणून. मग गुरुजी म्हणायचे की काशीसाठी गजरा घेतला  (काशी विश्वेश्वरासाठी ). अश्या अनेक गमती व्हायच्या.

बैल पोळा हा सण गुरुजी आणि माई घरी साजरा करायचे. झाले असे की  एकदा माईनी आम्हाला विचारले कि उदया बैल पोळा आहे. जर तुम्ही उदया आलात तर तुमची मी बैल समजून पूजा करिन आणि मग तुम्हाला जेवायला देईन.  त्यातला "जेवायला देईन" हा अतिशय महत्वाचा catchword आम्ही ऐकला आणि माईच्या हाताचे जेवण खायची संधी कोण सोडणार असा विचार करत दुसऱ्या दिवशी आम्ही (म्हणजे मी , पंकजभाऊ, संजय, सुभाष) आम्ही  माहीम मुक्तिधामच्या घरी संध्याकाळी पोहोचलो. अंदाजे ७.३० ला आमच्या चौघांचे माईने खरचं औक्षण केले. आमच्या कपाळावर गंध लावला आणि खरेच बैलाची पूजा करून मान सन्मान देतात त्याप्रकारे आमचा मान सन्मान झाला. नंतर पोटभर जेवलो. खूप मज्जा आली. हा बैल पोळा नंतर आमचा वार्षिक कार्यक्रम ठरलेलाच असायचा. माई पुढच्या प्रवासाला जाई पर्यंत हा बैल पोळा आम्ही दरवर्षी साजरा करायचो. मला माहित नाही की इतर ठिकाणीपण असाच बैलपोळा साजरा करतात का पण हि एक ठळक गमतीशीर आठवण आयुष्यभर पुरेल. आणि हो कोणत्याही बैलांपेक्षा आम्ही नक्कीच देखणे होतो.      

गुरुजींना काही भक्त मंडळींनी अमेरिकेला बोलावले. तिथे त्यांनी अनेकांच्या घरी पूजा सांगितल्या आणि मिळालेली सर्व दक्षिणा त्यांनी आश्रमाच्या ट्रस्ट ला दिली आणि त्याने गाणगापूर आश्रमाच्या बांधकामाला खूप गती आली हे मात्र खरे. गुरुजी जवळपास दोन तीन महिने अमेरिकेला होते.



अमेरिकेत पूजा सांगताना गुरुजी 
मग त्यादरम्यान आम्ही माईला भेटायला जायचो. गप्पा मारायचो. मग आम्ही एक आयडिया केली. आम्ही माई ला फोन करून सांगायचो की गुरुजी आमच्या स्वप्नात आले आणि सांगितले की माई तुम्हाला उदया मसालेभात , डाळ बाटी वगैरे खायला देईल. तुम्ही तिच्याकडे घरी जाऊन जेवून या. मग आम्ही चौघे मित्र दर आठवड्याला माईला फोन करायचो आणि माहीमला तिच्याकडे जेवायला जायचो. गुरुजींनी सांगितले म्हटल्यावर माई खूप जेवण करायची.  माई नेहमी बोलायची की हे माझ्या स्वप्नात येऊन मला का नाही सांगत ? 

एरवी पण ती आम्हाला खूप खायला दयायची , लाड करायची. ती गुरुजी परत आल्यावर तिने गुरुजींना हा प्रकार सांगितला. गुरुजींनी आम्हाला सगळ्यांना बोलावले आणि माईला सांगितले, मी कोणाच्याच स्वप्नात गेलो नव्हतो. पोरांनी तुला फसविले. काय रे पोरांनो... मग माई त्यांनाच ओरडली आहो, ती माझी मुले आहेत तुम्ही  त्यांना काही बोलू नका.

त्याच दरम्यान गुरुजी ज्या दिवशी अमेरिकेतून येणार होते त्या रात्री आम्ही माईना घेऊन विमानतळावर गेलो. कोणाच्यातरी ओळखीने आम्ही डायरेक्ट आतमध्ये गेलो होतो. तसेच श्री. कोकणे, गुरुजींचे भक्त, तेव्हा एअरपोर्ट मॅनेजर होते त्यामुळे ते सोबत होते. मी माईना म्हटले कि मला असे कळले आहे की  गुरुजीनी अमेरिकेत दुसरे लग्न केले आणि ते आत्ता त्या बाईना सोबत घेऊन येत आहेत. ती बोलली मला माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे, तुम्ही मला काही सांगू नका. आम्ही म्हटले, आमचाही गुरुजींवर पूर्ण विश्वास आहे पण त्या गोऱ्या बायकांवर नाही. जो पर्यंत गुरुजींना तिने एकटे येताना बघितले नाही,  तो पर्यंत ती खूप टेन्शन मध्ये होती. नंतर घरी आल्यावर आम्ही गुरुजींना सांगितले तेव्हा आम्ही खूप हसलो होतो. गुरुजी बोलले, तुम्ही माझ्या म्हातारीला खूप गुंडाळून ठेवले आहे.

पाठकगुरुजी आणि माई 
गुरुजींबरोबर आम्ही मित्र कुठे बाहेर जाणार असेल तर माई गुरुजींना दम दयायची. म्हणायची अहो, तुम्ही माझ्या पोरांना घेऊन जाताय. त्याना वेळेवर खायला द्या. नाहीतर तुम्ही पण उपाशी आणि माझी पोरे पण उपाशी राहतील. आम्हाला पण माई सांगायची, तुम्हाला भूक लागली की तुम्ही लगेच जेवून घ्या. गुरुजींना जास्त भूक लागत नाही. तुम्हाला पण उपाशी ठेवतील. एकंदरीत तिला आमची कायम काळजी असायची हे खरे.

गुरुजींचे लग्न त्यांच्याच गावातील आणि त्यांच्या घराजवळ ५ मिनिटावर राहणाऱ्या प्रतिभा दीक्षित (आता प्रतिभा पाठक / माई ) यांच्याशी झाले. त्यावेळी दीक्षित हे सरकारी नोकरीत होते व त्यांच्या घरची परिस्थिती चांगली होती. पाठक कुटुंब मात्र गरिबीत होते. दीक्षितांकडे नोकर चाकर, गाई वगैरे खूप काही होते. लग्न व्हायच्या आधीपर्यंत माई फक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खायच्या. लग्नाआधी चहा तर कधीच घेतला नव्हता. लग्न झाल्यावर मात्र त्यांच्याकडे फक्त दोन साड्या आणि त्यापण आलटून पालटून घालायच्या आणि पैशाची कमतरता अश्या वाईट परिस्थितीत त्यांनी संसार सुरु केला. मग एवढ्या श्रीमंत घराच्या मुलीने एका गरीब मुलाशी का लग्न केले असावे हा प्रश्न मी दोघांनाही वेगवेगळा आणि एकत्र विचारला. कारण दोघांमधील synergy आणि प्रेम बघून दोघेही destined to be married होते हे मात्र निश्चित. झाले असे की गुरुजींचे वडील आणि माईचे वडील हे एकाच गुरूंचे शिष्य (निजामपूरचे नित्यानंद सरस्वती महाराज). त्या गुरूंनीच सांगितले, या दोघांचे लग्न लावा. माई खूप श्रीमंत घरच्या होत्या, त्यामुळे गुरुजींनी ३ वेळा माई ना नकार दिला. पण त्यांच्या वडिलांनी खूपच हट्ट धरला मग गुरुजींनी माईना स्वतःची आर्थिक परिस्थिती सांगितली आणि मगच त्यांनी लग्न केले.
पण तरी पण " कुछ तो गडबड है ". मला वाटते कि हा प्रेम विवाहचं असावा. पण आत्ता आणि तेव्हाही मला काही पुरावा सापडला नाही.  




गुरुजींना भेटायला येणारी माणसे रात्री उशिरापर्यंत चालू असायची त्यामुळे आम्हाला बोलायला privacy मिळायची नाही. मग आम्ही रात्री  पंकजभाऊच्या गाडीने बांद्रा , बॅण्डस्टॅण्डला समुद्र किनारी जायचो आणि juice प्यायचो, समुद्रकिनारे फिरायचो. रात्री उशिरा शांततेत समुद्राचा आवाज, आमच्या गप्पा आणि समुद्र किनारी walk हे खूपच आनंदि वातावरण असायचे. 

त्याचे असे झाले कि आम्ही गुरुजींना म्हटले कि आज रात्री आम्ही १०. ३० ला तुमच्याकडे येतो मग आपण बॅण्डस्टॅण्ड ला जाऊया, तिथे चालूया, juice पिऊ आणि मग आम्ही तुम्हाला १२ वाजेपर्यंत पुन्हा घरी सोडतो.  त्यावेळी पंकजभाऊ कडे land-cruiser गाडी होती. ठरल्या वेळेला आम्ही चौघे मित्र त्यांना घ्यायला पोहोचलो. बघतो तर काय, गुरुजी शर्ट-पॅन्ट घालून तय्यार होते. एरवी ते कायम धोतर आणि सदरा घालायचे. आम्हाला आश्चर्य वाटले. ते म्हणाले अरे वा तुमच्या तरुण पोरांबरोबर रात्री आणि ते पण बॅण्डस्टॅण्डला मी म्हातारा वाटू नये म्हणून असे कपडे घातले. आम्ही सगळेच खूप हसलो. अनेकदा असे आम्ही रात्री गेलोय. खूप मज्जा यायची. गोल्डन दिवस होते ते. 

मला तर ते "Tallest are the foolest and you are not exeption to that" असे ते नेहमी म्हणायचे. हा त्यांचा माझ्या बाबतीत आवडता जोक/ dialogue होता.  तसे त्यांच्याकडे काही मागितले आणि त्यांनी दिले नाही असे कधीच झाले नाही , पण देताना ते म्हणायचे कि "तुमच्या पोरांच्या बापाचे आम्ही देणे लागतो त्यामुळे तुमचा हट्ट पुरवणे मला भागच आहे."

आयुष्याच्या शेवटी मात्र ते आयकॉन या डोंबिवली मधील हॉस्पिटलच्या ICU मध्ये २/३ वेळा ऍडमिट झाले. खरे म्हणजे गुरुजींना आजारी बघायची आम्हाला सवयच नव्हती. त्यामुळे exactly काय चाललेय काय कळायचेच नाही. तेव्हा माहित नव्हते की ते त्यांचा इथला प्रवास आत्ता संपवत आहेत.  शिवाय गुरुजी कधीतरी आपल्यातून जातील असे आम्हाला कधीच वाटायचे नाही आणि असा विचारपण यायचा नाही. मी त्यांना गमतीने म्हणायचो, काय हो तुम्ही सारखे सारखे इथे ऍडमिट होताय? काय भानगड आहे. तुम्हाला इथली कोणी नर्स आवडली आहे का? तर सांगा मला. ते खूप हसायचे,म्हणायचे, अरे तरुणपणात चुकलो नाही आत्ता काय करणार? यात काही अपमान किंवा उद्धटपणा नसायचा. आमचे रिलेशन उत्तम असल्यामुळे असे बोलायला काही वावगे नव्हते आणि दोन मित्रांमध्ये थट्टा मस्करी चालतेच.

गुरुजींना मी नेहमी म्हणायचो की तुम्ही म्हणता कि दत्त महाराज वाचवतील/ सांभाळतील. अहो पण ते वेळेवर येतील ना ? उशीर झाला तर काय फायदा ? ते खूप हसायचे आणि म्हणायचे,  जो विश्वाचा संसार चालवतो तो वेळ कसा चुकवेल. कधीतरी ते कोणाला तरी सांगायचे अरे वर्षाला एक तरी श्री गुरुचरित्र पारायण करून महाराजांवर मेहेरबानी करा.

आठवणी असंख्य आहेत , त्यातल्या थोड्या आज लिहिलेल्या . बाकीच्या नंतर कधीतरी सांगतो.

विशाल फुलपगार


दत्तलीन श्री. पाठक गुरुजी यांच्या जीवनावरील "जगन्मित्र" या पुस्तकाचे विमोचन स्वातंत्रवीर सावरकर स्मारक , दादर , मुंबई येथे २५ डिसेंबर २०१२ ला मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तो कार्यक्रम पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा. 

https://www.youtube.com/watch?v=V32T5DWEor8&list=PLsAsEAuSOBwdOoqO44f_ZFkqLrO7aPsva&index=2&t=7904s



Friday, June 26, 2020

कोरोना आणि आमचे कुटुंब



माझी पत्नी एका मुंबई महानगरपालिका (मनपा) रुग्णालयात स्त्रीरोग शास्त्र व प्रसूती विभागात डॉक्टर आहे. हा विभाग म्हणजे १२ महिने कायम गर्दीचा विभाग त्यामुळे कामाचा प्रचंड लोड. 

साधारण फेब्रुवारी २०२० मध्ये कोरोना आजाराविषयी थोडीफार माहिती मिळायला लागली आणि मार्चमध्ये त्याचे गंभीर परिणाम जगभर दिसायलाच लागले. मार्च २०२० अखेरीस महाराष्ट्र सरकारने व नंतर भारत सरकारने संपूर्ण लॉक डाउन घोषित केला. सर्वत्र भीतीचे / अनिश्चिततेचे वातावरण होते. सर्वजण आपापल्या घरी कैद झाले. तुम्ही , मी आपण सर्व घरी थांबलो. एक अदृश्य अनामिक भीती आपल्या सर्वांच्या मनावर दडपण आणत होती. फेस मास्क, सोशल डिस्टंसिन्ग ,सानिटीझर हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालले होते. 

अख्खा देश थांबला . रस्ते भरदिवसा सुनसान झाले. परंतु याच वेळी शासन , महापालिका , रुग्णालय , राशन इत्यादी यंत्रणा जीवाची पर्वा ना करता दिवस रात्र काम करू लागल्या. पोलिसाची गस्त , नाकाबंदी वाढली. शासनाने दैनंदिन दूधपुरवठा , भाजीपाला , अन्नधान्य मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिले. सर्व धार्मिक स्थळे , बंद झाली. आणि मंदिरातील देव आत्ता पोलीस , डॉक्टर, रुग्णालय /महापालिका कर्मचारी , राशन कर्मचारी , नर्स , वॉर्डबॉय , ऍम्ब्युलन्स कर्मचारी यांच्या रूपात सर्वत्र दिसू लागले. आज आपण हॉस्पिटल विषयी बोलूया. 

युरोप , अमेरिकेत कोरोना मुळे होणारे मृत्यू विविध न्यूज चॅनेलने अगदी आपल्या हॉल मध्ये आकडेवारीनिशी आणून ठेवले. असे वाटले कि आत्ता जग संपलेच. पण लक्षात ठेवा कोणी कितीही घाबरवले तरी Nature has his own way to balance and counterbalance Universe.  

शेवट कोणीही आजारी पडले तरी आपल्याला हॉस्पिटलमध्ये आणि डॉक्टरकडे तर जावे लागतेच. आणि वैद्यकीय सेवा / पोलीस सेवा / डिफेन्स सेवा तर २४ तास चालू असतेच , मग काहीही संकट येवोत.माझी पत्नी एका मनपा रुग्णालयात डॉक्टर असल्याने मी माझ्या नजरेतून लिहितो. 

कोरोना हा आजार असा कि त्याला अजूनपर्यंत काही औषध / ट्रीटमेन्ट नाही, श्वासातून पसरतो आणि त्याची लागण झाल्याचे जवळपास १४ दिवसांनी कळते. खोकला , ताप आणि श्वास घ्यायला त्रास हि प्रमुख लक्षण. श्वास घेण्यास त्रास होऊ लागला कि मग ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटर लावावा लागतो. व बहुतेक वेळा मृत्यू हा फुफ्फुस निकामी झाल्यामुळेच होतो. 

अर्थात ताप येणे हे काय भारतीयांना नवीन नाही. वर्षातून अनेकदा आपल्या सगळ्यांना ताप येत असतोच आणि बहुतेक वेळा आपण तो अंगावरच काढतो. खूप जास्त झाले तर मग हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो. ताप येणे आणि कसेतरीच होणे हा आपला राष्ट्रीय आजार आहे असे म्हणायला हरकत नाही. पण श्वास घेण्यास त्रास होणे , ICU मध्ये बेड उपलब्ध होणे म्हणजे गंभीर. आपल्याकडे शासकीय रुग्णालयात ICU मध्ये बेड उपलब्ध होणे आणि व्हेंटिलेटर मिळणे म्हणजे मे महिन्यात कोकण रेल्वे चे टिकीट मिळण्यासारखेच आहे. (कधीच मिळत नाही.)

भारत देश म्हणजे खरंच luck च्या भरवश्यावर चालणारा देश. जे काही प्लांनिंग झाले आहे त्यातले बरेचसे  ब्रिटिश शासनाने केले आहे आणि अर्थात आपण त्यात थोडीफार भर टाकली. शेतीप्रधान देश आहे , आपण अन्न धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहोत असे आपण अभिमानाने सांगतो, पण शेतकरी कधीच सुखी , संपन्न नव्हता. विज्ञानाने प्रचंड प्रगती केली तरीपण त्याचा फायदा सामान्य जनतेपर्यंत फारच कमी पोहोचला. वैद्यकीय क्षेत्राकडे तर आपण खूपच दुर्लक्ष केले तरीदेखील आपल्या हुशारीने जगातील सर्वोत्तम डॉक्टर भारतीयच आहेत. आपण उत्कृष्ट डॉक्टर , इंजिनीअर निर्माण केले पण वर्ल्ड क्लास हॉस्पिटल / कंपनी निर्माण करू शकलो नाही. 

असो , मनपा रुग्णालयात काम करत असल्यामुळे पत्नीला कामावर जाणे भागच होते आणि तिने पण टाळले नाही. अजूनपर्यंत एकही सुट्टी घेतली नाही.  या अनिश्चिततेच्या वातावरणामध्ये जे काही सर्वांचे होईल ते आपलेपण होणार हे आम्ही जाणले. रुग्णालयात देखील सुरुवातीला तणावाचे वातावरण होते. कारण कुठल्याही प्रकारचे इन्फेकशन व्हायला/ पसरायला हि सर्वोत्कृष्ट जागा. आणि एकदा रुग्णालय कर्मचाऱ्याला झाला कि मग त्यांच्या कुटुंबियांना लागण व मग इतरत्र पसरायला लागतो. आणि अनेकांच्या बाबतीत असे घडलेही. 

सुरुवातीच्या काळात facemask , PPE  kit चा तुटवडा होता. मग आम्ही मित्र मैत्रिणींना आवाहन केले. २-३ डिस्ट्रिब्युटर शी बोलून त्यांचे बँक अकाउंट  डिटेल्स सर्वाना दिले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. कोणी २ , कोणी १० असे करत करत एका महिन्यात जवळपास २०० PPE  kit  रुग्णालयाला डोनेट केले. डिस्ट्रिब्युटर ते PPE Kit रुग्णालयात आणून द्यायचे. अर्थात मागणी आणि पुरवठा यात तफावत असल्यामुळे सुरुवातीला १६८० रुपयाला मिळणारा PPE Kit  शेवटी शेवटी ९५० रुपयांपर्यंत मिळाला आणि आत्ता तर अजूनच स्वस्त मिळवितो. याबाबत प्रत्येक डोनारला रिसीट दिली व रुग्णालयाकडून acknowledgement लेटर मिळवून दिले. त्यावेळी क्लेरिकल  स्टाफ कमी येत असल्यामुळे थोडे मागे पुढे झाले, पण पर्याय नव्हता. थोड्या उशिराने का होईना पण सर्वाना acknowledgement लेटर  मिळवून दिले. दुकाने बंद असल्यामुळे Facemask चा तुटवडा होता , मग आमच्या कॉलोनी मधील एका टेलर कडून कापडाचे ट्रिपल लेअर मास्क शिवून घेतले व ते रुग्णालयात वाटले. असे दोन महिन्यात जवळपास १२-१५ डझन facemask दिले. कालांतराने शासनाने PPE चा पुरवठा सुरळीत केले मग मात्र donation थांबवले. 

याव्यतिरिक्त घरातून बाहेर जाणारी एकमेव व्यक्ती म्हणजे माझी पत्नी , मग ती येताना , किराणा माल , भाजी वगैरे घेऊन यायची. येण्याजाण्यासाठी ती स्वतःची गाडी वापरायची. मग तिच्या गाडीत आम्ही फ्रुटी/ अमूल लस्सी / appi / facemask  ठेवायचो. मग रस्त्यावर उन्हातान्हात अविरत सेवा देणाऱ्या पोलीस बांधवाना द्यायचो. हे आपण सहजच करू शकत होतो,  म्हणून केले त्या काही विशेष नाही आणि कौतुक तर अजिबातच नाही. 

हळूहळू हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली होती. शिवाय प्रसूतिगृहामध्ये नियमित गर्दी तर होतीच म्हणजे PPE Kit घालणे आलेच. आत्ता हे PPE Kit म्हणजे प्लास्टीक चे कपडे घालणे म्हणजे विचार करा काय भयानक अवस्था होत असेल. 

PPE Kit घातलेले डॉक्टर 
एकदा PPE Kit घातले कि ६ तास नो टॉयलेट आणि गरमीने हैराण व्हायला होते. असे असतानाही सर्व डॉक्टर्स , नर्स , वॉर्डबॉय , सफाई कर्मचारी, आपले काम चोख करत होते. प्रत्येकाच्या घरी लहान मुले किंवा म्हातारे आई वडील होतेच , पण काय करणार. 

कोरोनाने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये प्रवेश केला. आत्ता स्टाफ , डॉक्टरांनाही कोरोना होऊ लागला होता. मग त्यांच्या संपर्कातील व्यक्तीही quarantine होऊ लागल्या. बायकोच्या सोबत काम करणाऱ्या काही डॉक्टरांना , बघितलेल्या रुग्णांना याची लागण झाली. मग बायकोही स्वतःहून १४ दिवस वेगळी राहिली. त्यादरम्यान तिचे जेवणाचे हाल झाले. त्या दिवसात ती गाडीने मुलाला भेटायला २-३ दिवसांनी यायची व रस्त्याच्या पलीकडे गाडी उभी करून मग मोबाईलवर आमच्याशी बोलायची. इतरवेळी विडिओ कॉल वर संपर्क असायचा. मग १४ दिवसांनी कोरोना टेस्ट केली आणि ती नेगेटिव्ह आल्यावर घरी आली. अनेक कोरोना रुग्ण , डॉक्टरच्या संपर्कात असूनही तिला कोरोना झाला नाही. किंवा कदाचित होऊनही गेला असेल माहित नाही. घरी येताना दारातच ती sanitize होऊन आत यायची आणि डायरेक्ट बाथरूम मध्ये अंघोळीला जायची. 

तिच्या ज्या सहकारी डॉक्टरांना कोरोना झाला त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले , कोणाही नातेवाईकांना भेटण्याची परवानगी नव्हती. खरे म्हणजे मानसिक दृष्ट्या हा काळ कसोटीचा असतो. आणि मला वाटते कि खंबीर मन (विलपॉवर ) आणि सक्षम रोग प्रतिकारक शक्ती यावर तुमची रिकव्हरी अवलंबून आहे. कारण या आजाराला काही उपचारच नाही. 

असो , डॉक्टरांचा परिवार म्हणून आम्हाला काही सामाजिक त्रास झाला नाही हे मुद्दामून नमूद करावेसे वाटते. अनेकांना वाईट अनुभव आला पण आम्हाला नाही. सुरुवातीला आम्हाला पण कोरोनाची भीती वाटायची. पण नंतर आम्ही नवराबायकोने व्यायाम करून शरीर सुदृढ बनवण्याकडे जास्त लक्ष दिले. कामवाली नसल्यामुळे सर्व घराची कामे स्वतःच करायला लागलो. कौटुंबिक संवाद सुधारला. एकमेकांबरोबर वेळ मिळाला. खरे म्हणजे घरातील कामे माझ्या आईने न तक्रार करता केली. कारण तिच्यावर घराचा बराचसा भार होता. त्यामुळेच पत्नी हॉस्पिटलमध्ये निर्धास्तपणे काम करू शकली.

आणि महत्वाचे म्हणजे टीव्ही वरील बातम्या बघणे बंद केले. त्यामुळे मानसिक दृष्ट्या पण सुदृढ झालो. खरे म्हणजे भारतीय न्यूज चॅनेल बघणे सर्वानीच बंद करायला हवे. हे लोक माहिती कमी देतात आणि जास्त घाबरवतात. न्यूज बघितल्यावर असे वाटायचे आत्त्ता कोरोना माझ्या घशात शिरतोय कि काय. 

पत्नीच्या काही सहकारी डॉक्टर / त्यांच्या कुटुंबियांना कोरोना झाला पण सर्वजण सुखरूप बरे झाले. काही ओळखीच्या खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांचा मृत्यू झाला ते खूपच धक्कादायक आणि वाईट होते. कोणीही काहीही म्हटले तरी सर्वच डॉक्टरांनी / रुग्णालय कर्मचाऱ्यांनी ना घाबरता , धीराने या आजाराची तमा ना बाळगता सेवा दिली. यात काही त्रुटी राहिल्या असतील पण आपल्याकडे लोकसंख्या व डॉक्टर यांचे प्रमाण एवढे विषम आहे कि काही खरे नाही. शिवाय आरोग्य /शिक्षण क्षेत्राकडे देशाचे खूप दुर्लक्षच आहे. आपल्या दृष्टीने अचिव्हमेंट्स म्हणजे आकाशात उपग्रह सोडणे , गरीब शेतकऱ्यांच्या जमीनी संपादित करून MIDC / एक्सप्रेस वे बांधणे यासाठीची झाडांची बेसुमार कत्तल करणे , मोठी मोठी स्मारके , मंदिरे बांधणे. या गोष्टी आवश्यक आहेत पण किती प्रायॉरीटी द्यायची ?

शिवाय हॉस्पिटलची सेवा हा प्रशासकीय व धोरणात्मक नियोजनाचा भाग आहे. एखादे शासकीय रुग्णालय जर चांगली सेवा देऊ शकत नसेल किंवा डॉक्टर overburdened असेल तर मग त्या हजर असलेल्या व विपरीत परिस्थितीत काम करणाऱ्या डॉक्टरला शिवीगाळ करणे , मारहाण करणे याला काही अर्थ नाही.         

अनेक न्यूज चॅनेल्स / राजकारणी / आमदार / खासदार / नगरसेवक  यांनी हॉस्पिटल्सवर खूप टीका केली. विडिओ शूटिंग करून एखादी त्रुटी असेल तर तिचे जाहीर प्रदर्शन केले. जनतेला थाळ्या वाजवायला , टाळ्या पिटायला , रात्री लाईट बंद करून दिवे लावायला सांगितले. टीव्ही वर सांगितले कि उन्हाळा सुरु झाला कि उन्हात कोरोना टिकणार नाही. त्यामुळे भारताला धोका नाही. काही ज्योतिषी बोलले कि अमक्या दिवशी , हि ग्रहांची युती होतेय मग कोरोना जाणार. कोणी बोलले कि सर्वानी एकत्र टाळ्या वाजवल्या तर साऊंड एनर्जी ने कोरोना पळून जाईल किंवा एकत्र दिवे लावले तर लाइट एनर्जी ने  कोरोना पळून जाईल. कोरोनाने सर्वाना खोटे ठरवले. देवस्थान बंद केले. देवाच्या नावावर चालणार बाजार बंद केला. मृत्यूनंतरचे बारावे तेरावे बंद केले. कोणाचाही आत्मा अतृप्तपणे भटकला नाही.

आपले डॉक्टर , नर्सिंग स्टाफ, पोलीस , राशन कर्मचारी , गाड्यांचे चालक , महापालिका , शासकीय कर्मचारी यांनी मात्र अहोरात्र काम केले व अजूनही करत आहेत. खरे म्हणजे अनेक लोक प्रतिनिधींनीही अहोरात्र काम केले. अनेक आमदार , मंत्री यांनाही कोरोना झाला. न्यूज चॅनेल व इतर पत्रकार धोका असूनही सर्वत्र फिरले , बातम्या कव्हर केल्या. आता त्या बातम्या दाखवायची पद्धतच चुकीची आहे त्याला ते काय करणार. कोणीही मागे हटले नाही. छोटे मोठे सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था, वैयक्तिक कार्यकर्ते अनेक अनामिक जणांनी बिनधास्त मदत केली.

अमेरिका , युरोप सारख्या प्रगत देशात उत्कृष्ट आरोग्य व्यवस्था असतानाही तिथे लाखो लोक मृत्युमुखी पडले , हे दुर्दैवी आहे. पण भारतासारख्या देशाने मात्र कमी सुविधा असताना या महासंकटाचा चांगला सामना केला. यात नागरिकांनीही खूप संयम बाळगला. कारण आपण मुळातच लढवय्ये आहोत , सहज सहजी आपण हरत नाही. आपण हरतो ते फक्त आपल्यातील दुफाळीमुळे.

मागे एकदा दिवे घाटामध्ये माऊलीच्या पालखी बरोबर चालल्याचा योग आला होता. तेव्हा देव देवळात नाही पण या वारकऱ्यांमध्ये आहे हे जाणवले. कोरोना आजाराच्या वेळी देव हा परत डॉक्टर , नर्सिंग स्टाफ, पोलीस , राशन कर्मचारी , गाड्यांचे चालक , महापालिका , शासकीय कर्मचारी यांच्या व अनेक अनामिकांच्या रूपात आपल्या संरक्षणार्थ उभा राहिला.

आज माझी पत्नी , तिच्या हॉस्पिटलमधील तिचे सर्व वरिष्ठ , कनिष्ठ डॉक्टर , सर्व स्टाफ , वॉर्डबॉय वगैरे या सर्वांचे खूप खूप आभार. आज यांच्यासारख्या देशभर , जगभर काम करणाऱ्या असंख्य अनामिक देवांचे खूप खूप आभार. आणि हो , सर्व चिल्ली-पिल्ली , लहान मुले गेले तीन महिने तक्रार ना करता घरातच बसली आहेत , त्यांचे तर खरेच कौतुक आहे. त्यांनी देखील जोरदार साथ दिली. अर्थात संकट अजून टाळले नाही. अजून काय होईल हे सांगता येत नाही , पण तूर्तास तरी आपण कोरोनाला बऱ्यापैकी थांबवले आहे हे निश्चित.

यातून बोध घेऊन आपण आरोग्यसेवेकडे अधिक लक्ष देऊ अशी अपेक्षा आहे. मुंबई महानगर पालिका जगातील एकमेव पालिका आहे जिचे स्वतःचे मेडिकल कॉलेज आहे आणि त्यातून जागतिक दर्जाचे डॉक्टर तयार होतात. त्यामुळे मुंबई मनपा ला सॅल्यूट. कोणत्याही वैद्यकीय / शासकीय यंत्रणेमध्ये त्रुटी दाखवून प्रदर्शन करणाऱ्या सर्व न्यूज चॅनेल / राजकीय नेते याना सुबुद्धी प्राप्त होवो अशी अशा बाळगूया. आणि यात सुधारणा करण्यासाठी त्यांच्याकडेच असलेल्या अधिकाराचा ते वापर करतील हि अपेक्षा.

सर्व डॉक्टरांना आणि वैद्यकीय व्यवस्थेला आणि आपण सर्वानाच मानाचा मुजरा.

विशाल फुलपगार
२६ जून २०२०

Thursday, June 18, 2020

श्रीपाद श्रीवल्लभ मूर्तीचे जयपूर वरून गाणगापूर आश्रम मध्ये आगमन 7 एप्रिल 2010


प्रत्येक फोटोमागे एक कहाणी असते, खुपश्या आठवणी असतात. एकदा कॉम्पुटरमध्ये काहीतरी शोधत असताना श्रीपाद श्रीवल्लभ यांची मार्बलची मूर्ती गाणगापूर आश्रम मध्ये आली त्याचे फोटो मिळाले आणि जुन्या सर्व आठवणी जागृत झाल्या. कदाचित नुसतेच फोटो दाखवले असते तर त्यामागची कहाणी कळणार नाही , म्हणून अत्यंत रोमहर्षक प्रवासाची हि घटना शब्दांकित करावी असे मनात आले. 

असो , ऑफिसच्या कामाने माझे भारतभर भ्रमण होत असे. राजस्थानमध्ये २०१० साली काही प्रोजेक्ट चे टेंडर भरले होते व त्या दृष्टीने जयपूर ला RUIDP (Rajasthan Urban Infrastructure Development Corporation) या राज्य सरकारी ऑफिस मध्ये २ वेळा जाऊन आलो. ऑफिसचे दौरे असल्यावर गाढवासारखे काम करावे लागते. सकाळी लवकर दिवस सुरु होतो. मग प्रोजेक्ट साईट व्हिजिट करणे , इंजिनिअरसोबत चर्चा करणे, प्रोजेक्ट समजावून घेणे, मुंबईमध्ये माझ्या ऑफिस बरोबर कोऑर्डिनेट करणे, रिपोर्ट पाठवणे, स्ट्रॅटेजी बनवणे, या कामात दम आहे का? स्थानिक काय issue आहेत? आपल्याला इथे काम करता येईल का? अश्या बऱ्याच प्रश्नाची उत्तर शोधणे चालू असते. माझ्या फीडबॅक वर कंपनी टेंडर भरायचे कि नाही हा निर्णय घ्यायची किंवा बऱ्याच वेळा मीच याबाबत ठरवायचो. खरे म्हणजे यात विशेष काहीच नाही. It was my job. सर्वच कंपनीमध्ये अशीच पद्धत असते ,पण मी स्वतःचे थोडे कौतुक करून घेतले. 
 
राजस्थानमधील बारमेर, सीकर, नागौर या ठिकाणी Sewage Treatment Plant चे तीन टेंडर होते व तिघांची मिळून किंमत अंदाजे १२५ करोड होती. कंपनीच्या दृष्टीने हि ऑर्डर खूप मोठी व महत्वाची होती. त्यामुळे काम मिळवण्याची जबाबदारी माझ्याकडे होती व जर काम मिळाले तर ते करायला आमची प्रोजेक्टची टीम येणार होती. एकदा रात्री जयपूरला मुक्काम करण्याचा प्रसंग आला, मग काम आटोपल्यावर तिथून कारने अजमेर शरीफ दर्गा व ब्रह्मदेवाचे मंदिर बघून आलो. जयपूरपासून अंदाजे १४० कि मी अंतर पण रस्ता छान असल्यामुळे काही प्रवास सुखद आणि on duty  झाला. बरोबर स्थानिक liasoning चा माणूस होताच, त्यामुळे काहीही अडचण नव्हती. जयपूरमध्ये मी लक्ष्मी मिष्ठान्न भांडार (LMB) या जुन्या व प्रसिद्ध हॉटेलमध्ये राहायचो. याचे महत्वाचे कारण म्हणजे जेवण शुद्ध शाकाहारी आणि खूप चविष्ट. या शिवाय हे हॉटेल जुन्या जयपूरमध्ये मुख्य बाजारपेठेत होते. 

असो , गुरुजींशी बोलताना ते एकदा म्हणाले कि जयपूरला संगमरवरी मूर्ती खूप छान व स्वस्त मिळतात तू कधी वेळ मिळाला तर बघून ये. पुढच्या जयपूर दौऱ्यात मी त्या मार्बल मार्केटमधील एका मूर्तिकाराकडे ओळखीने गेलो. व त्याला म्हटले कि मला १ फूट उंचीची श्रीपाद श्रीवल्लभांची मूर्ती मार्बलमध्ये बनवून दे. त्याने अनेक मूर्ती बनवल्या होत्या पण श्रीपादांची मूर्ती कधीच बनवली नव्हती. त्याने माझ्याकडे फोटो मागितला. मी त्याला म्हटले कि तुला २-३ फोटो ई-मेल ने पाठवतॊ (त्यावेळी व्हाट्सएप नव्हते ) व माझ्याजवळील छोटा फोटो दाखवला. त्याने मागितलेले सर्व पैसे ऍडव्हान्स मध्ये दिले व महिन्याभरात मूर्ती बनवतो असे तो म्हणाला. त्याप्रमाणे मुंबईला जाऊन २-३ फोटो ई-मेल केले. अंदाजे फेब्रुवारी २०१० ची हि गोष्ट असावी. 

तीनही टेंडरचे काम चालू होते व ते तिन्ही टेंडर आम्ही भरले. ६ एप्रिल २०१० ला सकाळी ११ वाजता याचे price bid  ओपनिंग होते. या साठी मी जाणार होतो. खरे म्हणजे मी ठरवले होते की मूर्ती घेऊन मुंबईला गुरुजींना दयायची मग ते गाणगापूरला घेऊन जातील. परंतु त्या दरम्यान गुरुजी गाणगापूरला होते म्हणजे मूर्ती आणली तर ती मुंबईला ठेवावी लागणार व गाणगापूरला कोण व कधी नेणार हा प्रश्नच होता. मग मी असा निर्णय घेतला की  मीच मूर्ती घेऊन गाणगापूरला जाईन. जयपुरवरून गाणगापूरला जाण्याचे विविध पर्याय बघता जयपूर ते मुंबई विमान, मग मुंबई ते गाणगापूर हुसेनसागर ट्रेन व येताना मात्र ट्रेनने परत मुंबईला यायचे हाच पर्याय होता. माझा मुलगा तेव्हा दीड वर्षाचा होता व आम्ही तिघे तेव्हा भाभा हॉस्पिटल, बांद्रा, मुंबई येथील कर्मचारी निवास स्थानात राहत होतो व आई वडील जवळच खारला राहत होते. 

सोलापूर ते  मुंबई हि विमानसेवा तेव्हा नुकतीच सुरु झाली होती. म्हणजे त्याने एक तासात मुंबई ला सोलापुरवरून पोहोचणार. पण ती सोलापूरहून दुपारी २ वाजता सुटायची म्हणजे १ वाजता सोलापूर विमानतळावर पोहोचायचे, म्हणजे सकाळी १० वाजता गाणगापुरवरून निघायचे असे ठरवले. एकंदरीत हा प्रवास किती रोमहर्षक व मिनिट ते मिनिट तणावाचा होणार हे नक्कीच. पण जेव्हा युनिव्हर्स तुम्हाला सपोर्ट करते तेव्हा गोष्टी कित्ती सहजपणे घडून येतात हे मला नंतर कळले व तुम्हालाही कळेल. 

६ एप्रिल २०१० ला सकाळी ७च्या विमानाने जयपूर ला जायचे व ११ वाजताची RUIDP ,जयपूर ला pricebid ओपनिंगला हजर राहायचे . जर टेंडर मिळाले तर अधिकाऱ्यांशी चर्चा , कोणी subcontractor मिळाले तर त्याला  भेटणे, मूर्तीवाल्याकडून मूर्ती घ्यायची, मग ५ वाजताच्या विमानाने जयपूर वरून निघायचे, संध्याकाळी ७ वाजता मुंबई, तिथून डायरेक्ट CST स्टेशनला जाऊन हुसेनसागर हि रात्री ९. ५० ची ट्रेन पकडायची व दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता गाणगापूर स्टेशनला पोहोचायचे, गाणगापूर स्टेशन वरून गाडीने आश्रमात जायचे, तिथे गुरुजींना ती मूर्ती दयायची व सकाळी १० वाजता गाणगापूरवरून निघून दुपारी १ वाजेपर्यंत सोलापूर एअरपोर्ट , तिथून २ च्या विमानाने ३ वाजता मुंबईमध्ये यायचे व दुपारी ४ वाजता घरी पोहोचायचे असा कागदोपत्री व्यवस्थित वाटणारा व अजिबात प्रॅक्टिकल नसणारा प्रोग्राम मी बनवला व सर्व बुकिंग केल्या. सोलापूर मुंबई विमानाची तिकीट काढली हुसेनसागर ट्रेन ची तिकीट काढली. ऑफिसला सांगितले कि मी जयपूरमध्ये एक रात्र मुक्काम करून दुसऱ्या दिवशी येणार आहे. म्हणजे सुट्टी घ्यायची आवश्यकता नाही. खरी गम्मत तर पुढे होती. कश्या अडचणी निर्माण होतात व कसा मार्ग निघतो हि मी अनुभव घेतला. 

जयपूरला जाण्याआधी २/३ दिवस बायकोला खूप ताप होता त्यामुळे ती कामाला गेली नाही. व मला म्हटली की कदाचित तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला लागेल तेव्हा तू जाऊ नकोस. मी सांगितले कि हे टेंडर खूप महत्वाचे असून मला जावेच लागेल. तुला जर जास्तच झाले तर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन जा मी ६ एप्रिलला सकाळी जाऊन ७ एप्रिल ला संध्याकाळी ४ वाजेपर्यंत येतोच. 

ठरल्याप्रमाणे ६ एप्रिल २०१० ला सकाळी ७च्या विमानाने मी जयपूरला निघालो व ८. ३० ला जयपूर ला पोहोचलो. सर्वप्रथम मूर्तीकाराला फोन केला तो म्हणाला कि थोडा पेंटिंग बाकी है वो दोपहर १ बजेतक हो जायेगा, आप चिंता मत करो. एयरपोर्ट  घ्यायला आमचा लोकल माणूस आलाच होता. नाश्ता करून आम्ही सकाळी १०ला RUIDP च्या ऑफिसला पोहोचलो. माझ्याप्रमाणे अजून ३ कंपन्यांचे प्रतिनिधी आले होते. बरोबर ११ वाजता सर्वासमक्ष सर्वांचे pricebid ओपन केले. त्यात माझी कंपनी lowest ठरल्यामुळे आम्हाला ते टेंडर मिळाले. खूप आनंद झाला. संबंधित अधिकारी आणि इंजिनिअरला भेटलो. असे करता करता दुपारचे १. ३० वाजले. मग आम्ही डायरेक्ट मूर्तीकाराकडे गेलो. रंग अजून सुकला नव्हता त्यामुळे त्याने अजून थांबायला सांगितले. त्याने त्याच्या स्किल प्रमाणे मूर्ती बनवली होती. जेवून परत आलो व मग मूर्तीचे पॅकिंग केले. आणि जयपूर एअरपोर्टला मी आलो. खरी गम्मत पुढेच होती. कारण विमान वेळेत सुटले पाहिजे . मुंबईमध्ये वेळेत पोहोचले पाहिजे, कारण संध्याकाळी ६ ते ८ मध्ये मुंबई ला उतरणारी विमाने खूप.  ट्रॅफिक मुळे हमखास लेट असतात. मग विलेपार्ले विमानतळावरून टॅक्सीने CST स्टेशनला जायचे म्हटले तर ट्रॅफिकमध्ये अडकल्याची भीती मग त्यापेक्षा विले पार्ले स्टेशनवरून हार्बर ट्रेन ने CST स्टेशनला जाणे योग्य. पण सर्व काही अनिश्चित. 

मूर्तीचे वजन जास्त होते पण एअरपोर्टच्या काउंटरला सांगितले की आतमध्ये मूर्ती आहे मग त्यांनी केबिन बॅग म्हणून नेण्याची परवानगी दिली. विमान संध्याकाळी ५. ३० ला म्हणजे अर्धा तास उशिरा सुटले. घरी फोनवर संपर्क होताच.  बायकोचा ताप उतरत नव्हता आणि आज रात्री जर ताप उतरला नाही तर मात्र उदया सकाळी तिला बांद्रा येथील होली फॅमिली हॉस्पिटलला ऍडमिट करायचे ठरले.

अंदाजे संध्याकाळी ७:०५ ला मी मुंबई विमानतळावर उतरलो व रिक्षा पकडून विलेपार्ले स्टेशनला आलो. फर्स्ट क्लासचे तिकीट काढले आणि ८. २० च्या हार्बर ट्रेन ने अंदाजे रात्री ९ वाजून १० मिनिटांनी CST स्टेशन ला उतरलो व चालत चालत अंदाजे रात्री ९. ३० ला हुसेनसागर ट्रेनच्या माझ्या डब्यात सेकंड AC मध्ये बसलो. ट्रेन नुकतीच आली होती. 

CST रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणारे अधिकारी श्री. संजय पाटील हे आमचे जवळचे मित्र आणि पाठक गुरुजींवर यांचे खूप प्रेम (संजय पाटील या नावाचे माझे दोन जवळचे मित्र आहेत). मग गुरुजी जेव्हा केव्हा गाणगापूरला CST वरून जायचे तेव्हा CST रेल्वे पोलीस स्टेशनचे बरेचसे पोलीस गुरुजींना भेटायला संजय पाटीलबरोबर ट्रेन मध्ये यायचे. एवढे पोलीस आल्यामुळे सहप्रवाशांना पण कळायचे की पाठक गुरुजी कोणीतरी VIP आहेत. गुरुजींना बिस्लेरीच्या बाटल्या ते प्रवासासाठी ते द्यायचे. हि पाठक गुरुजींची सेवा CST रेल्वे पोलीस स्टेशन ने शेवटपर्यंत न सांगता केली. 





तर मी रात्री ९. ३० ला ट्रेन मध्ये बसलो आणि रात्री ९. ५० ला ट्रेन सुटणार होती. हातात सामान असल्यामुळे आणि tight schedule असल्यामुळे काही खायला घेऊ शकलो नाही. ट्रेनमध्ये काही मिळाले तर खाऊ असा विचार केला. गुरुजींना फोन करून सांगितले की ट्रेनमध्ये बसलो आहे, उदया येतो. अचानक दोन पोलीस माझ्या जागेवर आले आणि त्यांनी मला वेज बिर्याणी, फ्रुटी, पाण्याच्या बाटल्या दिल्या व पाटीलसाहेबानी पाठवले आहे असे ते म्हणाले व नमस्कार करून गेले. मी लगेचच संजय पाटील याना फोन लावला. ते हसले आणि म्हणाले की मित्रा थोडी सेवा आमचीपण होऊ द्या. मी म्हणालो अरे तुला कसे कळले की मी काही खाल्ले नाही. ते म्हणाले अरे आम्ही पोलीस आहोत आमचा अंदाज सहसा चुकत नाही , मला तुझा प्रोग्रॅम आधीच माहित होता. २/३ दिवसापूर्वी त्याने माझा बोगी नंबर आणि सीट नंबर का विचारला ते मला आत्ता कळले. त्याला थँक यु म्हणून त्याच्या तोंडून भ ची बाराखडी मला ऐकायची नव्हती. त्यामुळे त्याला मी काही बोललो नाही.  गुरुजींना सांगितले कि मला गाणगापूर स्टेशनला घ्यायला येणाऱ्या गाडीच्या ड्रायव्हरचा नंबर पाठवा व त्याच गाडीने मी सोलापूर एअरपोर्टला जाईन. आणि सकाळी १० वाजता आश्रमातून मला निघायलाच लागेल. गुरुजी म्हटले की चिंता करून नकोस. त्यांनी काय व्यवस्था केली होती ते मला नंतर कळले. 

आत्ता पुढची कसरत म्हणजे हि ट्रेन गाणगापूर स्टेशनला सकाळी ७ वाजता पोहोचते पण अनेकदा अर्धा तास तरी उशिरा असते. माझ्या दृष्टीने हा अर्धा तास पण महत्त्वाचाच होता. म्हणजे ट्रेन वेळेतच पोहोचली पाहिजे. भूक खूप लागल्यामुळे मी मस्त जेवलो व झोपलो , म्हणजे पाठ टेकली. विमानांप्रमाणे ट्रेनमध्ये सुद्धा माझे पाय मावत नाहीत, त्यामुळे वेगवेगळ्या अँगल मध्ये झोपण्याचा प्रयत्न करत रात्र काढली. 

सोलापूर आल्यावर मी उठलोच व गाणगापूर यायची वाट बघू लागलो. पाठक गुरुजींना फोन केला व त्यांना सांगितले, ट्रेन वेळेत आहे तुम्ही गाडीच्या ड्रायव्हरचा नंबर पाठवा, गुरुजी म्हणाले तू चिंता करू नकोस. ड्रायव्हर तुझ्या डब्याजवळ बरोबर येईल. आयला म्हटले हे नंबर का देत नाहीत. आधीच वेळ कमी आणि आमची चुकामुक झाली तर अजून वेळ जायचा. तिथे घरी बायकोचा ताप कमी होत नव्हता म्हणजे आज नक्कीच ऍडमिट करावे लागणार ते एक वेगळेच टेन्शन. बरोबर ७ वाजून ५ मिनिटांनी म्हणजे वेळेतच ट्रेन गाणगापूर स्टेशनला आली. मी दारातच होतो. कोण घ्यायला येत आहे ते गुरुजींनी सांगितले नाही. ड्रायव्हरचा नंबर दिला नाही. त्यामुळे त्याला ओळखायचे कसे ते कळेना. ट्रेन थांबली आणि समोरच गुरुजी दिसले. मला जोरदार धक्का बसला. खूप आनंदपण झाला.  गुरुजींच्या कपाळावर गंध होते म्हणजे ते सकाळीच स्नान करून आले होते. 
गुरुजीं गाणगापूर स्टेशनला मला घ्यायला आले मी ट्रेनमधून फोटो काढला 

ट्रेन मधून उतरून गुरुजींच्या पाया पडलो. उन्मेशची गळाभेट घेतली. गुरुजींच्या चेहेऱ्यावर आनंद ओसंडून जात होता. वास्तविक ते महाराजांच्या मूर्तीला recieve करायला आले होते. तरीपण येवढ्या सकाळी त्यांनी एवढा त्रास करून यायची आवश्यकता नव्हती. गुरुजींच्या प्रत्येक कृतीत त्यांच्या बद्दलचा आदरभाव वाढत असे , हि त्यापैकी एक घटना. गुरुजी म्हणाले की तुम्ही एवढ्या लांबून श्रीपाद महाराजांना घेऊन आलात मग मी स्टेशनला आलो तर बिघडले कुठे? रस्त्यात आम्ही खूप गप्पा मारल्या. त्यांना सगळा प्रवास सांगितला. मुंबईला बायकोची परिस्थिती सांगितली. गुरुजी म्हटले, काळजी करू नकोस. आत्ता मला टाइम मॅनॅजमेण्ट करायचे नव्हते ती सूत्रे पाठकगुरुजींकडे होती. सकाळी दहा वाजता गाणगापुरवरून सोलापूर विमानतळाकडे निघायचे मी ठरवले होते गुरुजींनी सांगितले सकाळी ९. ४५ ला निघायचे. 

४० मिनिटात, म्हणजे अंदाजे सकाळी ८ वाजता आम्ही आश्रमात पोहोचलो. मूर्ती माझ्या हातातच होती. 
 मूर्ती  आश्रमात आणतानाचा फोटो 

मूर्तीचा मान सन्मान झाला. औदुंबराजवळ मूर्ती ठेवून तिची पूजा केली. अत्यंत सन्मानाने व विधिपूर्वक हि मूर्ती म्हणजे श्रीपाद महाराज आश्रमात आले. एवढा मोठा कार्यक्रम होईल असे मला वाटले नव्हते मला वाटले की मला फक्त डिलिव्हरी करायची आहे. 
पाठक गुरुजीसोबत आश्रमाच्या दरवाज्यात 

आश्रमाच्या दरवाज्यात 

मला उगीचच मान मिळाला 


गुरुजींनी मूर्ती हातात घेतली 

औदुंबराजवळ मूर्तीची पूजा केली. तेव्हा आश्रमाची कंपाऊंड वॉल नव्हती. 

महाराज स्थानापन्न झाले 


आश्रमात महाराजांच्या स्वागतासाठी रांगोळी 

महाराज त्यांच्या पूर्ण टीम सोबत 
आश्रमात ताबडतोब मी अंघोळीला गेलो आणि नंतर गुरुजींनी मला मंदिरात पाठवले. आज गर्दी कमी असल्यामुळे लगेचच दर्शन झाले. पुन्हा आश्रमात आलो नाश्ता केला. मुंबई ला घरी फोन करून सांगितले कि दुपारी ४ पर्यंत येतो. बायकोचा ताप उतरत नव्हता पण ती म्हणाली, तू जयपूरहून संध्याकाळी आल्यावर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊया. तिच्या दृष्टीने मी जयपूरलाच होतो. जर तिला कळले असते की मी गाणगापूरला गेलोय तर तिचा विश्वासच बसला नसता किंवा तिने मला मुंबईला आल्यावर एका क्षणात सर्व देव दाखवले असते. 

नाश्ता करेपर्यंत मला सोलापूरला न्यायला सुमो गाडी आली होती. आत्ता पटपट सोलापूरला पोहोचणे व तिथून विमान पकडणे महत्वाचे. ठरल्या वेळेप्रमाणे सकाळी ९. ४५ ला मी गाडीत पुढे बसलो. तर मागे गुरुजी, उन्मेष आणि गुरुजींचे भाऊ प्रभुकाका पण बसले व म्हणाले की आम्ही तुला सोडायला सोलापूर विमानतळावर  येतो. त्यावर मी म्हणालो कि, असे करून नकॊ मला सवय आहे. का तुम्ही एवढा प्रवास करताय. ३ तास oneway म्हणजे ६ तास प्रवास कशाला करताय ? पण गुरुजींनी काही ऐकले नाही. मग आम्ही आधी कल्लेश्वर मंदिरात गेलो. तिथून गाणगापूर संगमावर गेलो व तिथून सोलापूर दिशेने प्रवास सुरु (गाणगापूर निर्गुण पादुका मंदिर , कल्लेश्वर आणि संगम या तीन ठिकाणी दर्शन घेतले म्हणजे गाणगापूर यात्रा पूर्ण झाली असे म्हणतात.) ऑफिसचे फोन चालूच होते, ऑफिस च्या दृष्टीने मी जयपूर ला होतो. रस्ता खराब असल्यामुळे विशेष वेग नव्हता, पण आम्ही वेळेत होतो. अक्कलकोट रस्त्यातच असल्यामुळे तिथे थांबून दर्शन घेतले. खाण्यासाठी जेवणाचा डबा मला गुरुजींनी आश्रमातूनच दिला होता, त्यामुळे दुपारच्या जेवणाची सोय झाली होती. गाडीतच आम्ही जेवण केले.  बरोबर १ वाजता आम्ही सोलापूर एअरपोर्टला पोहोचलो. हे एक अत्यंत  छोटे एअरपोर्ट होते. विमान अजून आले नव्हते त्यामुळे आम्ही बाहेर गप्पा मारत उभे राहिलो. गुरुजींबरोबर कितीही बोललो तरी विषय काही संपायचे नाहीत आणि  गप्पा जास्तच रंगायच्या. दुपारी १. २० ला विमान आले मग मी विमानतळाच्या आतमध्ये गेलो.  
सोलापूर एअर पोर्ट वर मी , उन्मेष पाटील, पाठकगुरुजी , प्रभुकाका 
एवढा लांबचा आणि वेडा वाकडा प्रवास tight schedule मध्ये केल्यामुळे गुरुजी खूपच खुश होते. आणि म्हणूनच ते गाणगापूर स्टेशनपासून सोलापूर एअरपोर्ट पर्यंत माझ्याबरोबर होते. वास्तविक पाहता त्यांनी असे करण्याची गरज आणि अपेक्षा नव्हती व कदाचित मी त्यांच्या जागी असतो तरी मी असे केले नसते पण पाठक गुरुजींची गोष्टच वेगळी. त्यांच्याबद्दलचा आदर अधिकच वाढला. मोठी माणसे खरोखरच खूप मोठीं असतात. श्रीपाद महाराजांची मार्बलची मूर्ती , माझा विचित्र प्रवास हा इतका महत्वाचा नाही पण यातून शेवटी जो आनंद मिळाला तो अवर्णनीय आहे. खूप मज्जा आली. 

असो, विमान बरोबर दुपारी २ वाजता उडाले व दुपारी ३ वाजता मुंबईला उतरलो . घरी फोन केला. ऑफिसला फोन करून सांगितले कि आत्ताच जयपुरवरून मुंबईला पोहोचलो. उद्या ऑफिसला येईन. गुरुजींना फोन केला , त्यांना आश्रमात पोहोचायला अजून वेळ होता. म्हणजे ते सोलापुरवरून गाणगापूरला पोहोचायच्या आधी मी मुंबई ला पोहोचलो. त्यांना सांगितले कि महाराजांचे स्वतःचे काम होते म्हणून ट्रेन, विमान कुठेच लेट झाले नाही. आमचे काम असते तेव्हा काहीच वेळेत होत नाही. ते हसले.   संध्याकाळी ४. १५ मिनिटांनी मी घरी आलो. बायको,  आई, सासू आणि बायकोच्या काही डॉक्टर स्टुडन्ट घरी होत्या. मी सामान ठेवले आणि ताबडतोब बायकोला होली फॅमिली हॉस्पिटल, बांद्रा मध्ये ऍडमिट केले.

सर्व प्रवास माझ्याकडून यंत्रवत झाला. माझ्याने एवढे शक्य नव्हते पण युनिव्हर्सने ठरवले आणि मला प्रत्येक ठिकाणी मदत झाली. कुठेही उशीर झाला नाही. एवढे करूनही माझ्यावरच्या सर्व जबाबदाऱ्या म्हणजे व्यावहारिक - ऑफिसच्या , अध्यात्मिक - गाणगापूर व सांसारिक - बायकोला ऍडमिट करणे हे सर्व माझ्याकडून पूर्ण झाल्या. मुंबई - जयपूर - मुंबई - गाणगापूर - अक्कलकोट - सोलापूर - मुंबई  हा ३४ तासाचा प्रवास मी विमान, रिक्षा, ट्रेन, कारने अविश्वासनीयरित्या पूर्ण करू शकलो आणि महत्त्वाचे म्हणजे कमी वेळ असूनही खुपसा वेळ मी पाठक गुरुजींबरोबर होतो. आयुष्यात लक्षात राहिलेल्या काही ठळक घटनांपैकी हि घटना. 


विशाल फुलपगार 
१८ जुन २०२०

दत्तलीन श्री. पाठक गुरुजी यांच्या जीवनावरील "जगन्मित्र" या पुस्तकाचे विमोचन स्वातंत्रवीर सावरकर स्मारक , दादर , मुंबई येथे २५ डिसेंबर २०१२ ला मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तो कार्यक्रम पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा. 

https://www.youtube.com/watch?v=V32T5DWEor8&list=PLsAsEAuSOBwdOoqO44f_ZFkqLrO7aPsva&index=2&t=7904s