Thursday, June 18, 2020

श्रीपाद श्रीवल्लभ मूर्तीचे जयपूर वरून गाणगापूर आश्रम मध्ये आगमन 7 एप्रिल 2010


प्रत्येक फोटोमागे एक कहाणी असते, खुपश्या आठवणी असतात. एकदा कॉम्पुटरमध्ये काहीतरी शोधत असताना श्रीपाद श्रीवल्लभ यांची मार्बलची मूर्ती गाणगापूर आश्रम मध्ये आली त्याचे फोटो मिळाले आणि जुन्या सर्व आठवणी जागृत झाल्या. कदाचित नुसतेच फोटो दाखवले असते तर त्यामागची कहाणी कळणार नाही , म्हणून अत्यंत रोमहर्षक प्रवासाची हि घटना शब्दांकित करावी असे मनात आले. 

असो , ऑफिसच्या कामाने माझे भारतभर भ्रमण होत असे. राजस्थानमध्ये २०१० साली काही प्रोजेक्ट चे टेंडर भरले होते व त्या दृष्टीने जयपूर ला RUIDP (Rajasthan Urban Infrastructure Development Corporation) या राज्य सरकारी ऑफिस मध्ये २ वेळा जाऊन आलो. ऑफिसचे दौरे असल्यावर गाढवासारखे काम करावे लागते. सकाळी लवकर दिवस सुरु होतो. मग प्रोजेक्ट साईट व्हिजिट करणे , इंजिनिअरसोबत चर्चा करणे, प्रोजेक्ट समजावून घेणे, मुंबईमध्ये माझ्या ऑफिस बरोबर कोऑर्डिनेट करणे, रिपोर्ट पाठवणे, स्ट्रॅटेजी बनवणे, या कामात दम आहे का? स्थानिक काय issue आहेत? आपल्याला इथे काम करता येईल का? अश्या बऱ्याच प्रश्नाची उत्तर शोधणे चालू असते. माझ्या फीडबॅक वर कंपनी टेंडर भरायचे कि नाही हा निर्णय घ्यायची किंवा बऱ्याच वेळा मीच याबाबत ठरवायचो. खरे म्हणजे यात विशेष काहीच नाही. It was my job. सर्वच कंपनीमध्ये अशीच पद्धत असते ,पण मी स्वतःचे थोडे कौतुक करून घेतले. 
 
राजस्थानमधील बारमेर, सीकर, नागौर या ठिकाणी Sewage Treatment Plant चे तीन टेंडर होते व तिघांची मिळून किंमत अंदाजे १२५ करोड होती. कंपनीच्या दृष्टीने हि ऑर्डर खूप मोठी व महत्वाची होती. त्यामुळे काम मिळवण्याची जबाबदारी माझ्याकडे होती व जर काम मिळाले तर ते करायला आमची प्रोजेक्टची टीम येणार होती. एकदा रात्री जयपूरला मुक्काम करण्याचा प्रसंग आला, मग काम आटोपल्यावर तिथून कारने अजमेर शरीफ दर्गा व ब्रह्मदेवाचे मंदिर बघून आलो. जयपूरपासून अंदाजे १४० कि मी अंतर पण रस्ता छान असल्यामुळे काही प्रवास सुखद आणि on duty  झाला. बरोबर स्थानिक liasoning चा माणूस होताच, त्यामुळे काहीही अडचण नव्हती. जयपूरमध्ये मी लक्ष्मी मिष्ठान्न भांडार (LMB) या जुन्या व प्रसिद्ध हॉटेलमध्ये राहायचो. याचे महत्वाचे कारण म्हणजे जेवण शुद्ध शाकाहारी आणि खूप चविष्ट. या शिवाय हे हॉटेल जुन्या जयपूरमध्ये मुख्य बाजारपेठेत होते. 

असो , गुरुजींशी बोलताना ते एकदा म्हणाले कि जयपूरला संगमरवरी मूर्ती खूप छान व स्वस्त मिळतात तू कधी वेळ मिळाला तर बघून ये. पुढच्या जयपूर दौऱ्यात मी त्या मार्बल मार्केटमधील एका मूर्तिकाराकडे ओळखीने गेलो. व त्याला म्हटले कि मला १ फूट उंचीची श्रीपाद श्रीवल्लभांची मूर्ती मार्बलमध्ये बनवून दे. त्याने अनेक मूर्ती बनवल्या होत्या पण श्रीपादांची मूर्ती कधीच बनवली नव्हती. त्याने माझ्याकडे फोटो मागितला. मी त्याला म्हटले कि तुला २-३ फोटो ई-मेल ने पाठवतॊ (त्यावेळी व्हाट्सएप नव्हते ) व माझ्याजवळील छोटा फोटो दाखवला. त्याने मागितलेले सर्व पैसे ऍडव्हान्स मध्ये दिले व महिन्याभरात मूर्ती बनवतो असे तो म्हणाला. त्याप्रमाणे मुंबईला जाऊन २-३ फोटो ई-मेल केले. अंदाजे फेब्रुवारी २०१० ची हि गोष्ट असावी. 

तीनही टेंडरचे काम चालू होते व ते तिन्ही टेंडर आम्ही भरले. ६ एप्रिल २०१० ला सकाळी ११ वाजता याचे price bid  ओपनिंग होते. या साठी मी जाणार होतो. खरे म्हणजे मी ठरवले होते की मूर्ती घेऊन मुंबईला गुरुजींना दयायची मग ते गाणगापूरला घेऊन जातील. परंतु त्या दरम्यान गुरुजी गाणगापूरला होते म्हणजे मूर्ती आणली तर ती मुंबईला ठेवावी लागणार व गाणगापूरला कोण व कधी नेणार हा प्रश्नच होता. मग मी असा निर्णय घेतला की  मीच मूर्ती घेऊन गाणगापूरला जाईन. जयपुरवरून गाणगापूरला जाण्याचे विविध पर्याय बघता जयपूर ते मुंबई विमान, मग मुंबई ते गाणगापूर हुसेनसागर ट्रेन व येताना मात्र ट्रेनने परत मुंबईला यायचे हाच पर्याय होता. माझा मुलगा तेव्हा दीड वर्षाचा होता व आम्ही तिघे तेव्हा भाभा हॉस्पिटल, बांद्रा, मुंबई येथील कर्मचारी निवास स्थानात राहत होतो व आई वडील जवळच खारला राहत होते. 

सोलापूर ते  मुंबई हि विमानसेवा तेव्हा नुकतीच सुरु झाली होती. म्हणजे त्याने एक तासात मुंबई ला सोलापुरवरून पोहोचणार. पण ती सोलापूरहून दुपारी २ वाजता सुटायची म्हणजे १ वाजता सोलापूर विमानतळावर पोहोचायचे, म्हणजे सकाळी १० वाजता गाणगापुरवरून निघायचे असे ठरवले. एकंदरीत हा प्रवास किती रोमहर्षक व मिनिट ते मिनिट तणावाचा होणार हे नक्कीच. पण जेव्हा युनिव्हर्स तुम्हाला सपोर्ट करते तेव्हा गोष्टी कित्ती सहजपणे घडून येतात हे मला नंतर कळले व तुम्हालाही कळेल. 

६ एप्रिल २०१० ला सकाळी ७च्या विमानाने जयपूर ला जायचे व ११ वाजताची RUIDP ,जयपूर ला pricebid ओपनिंगला हजर राहायचे . जर टेंडर मिळाले तर अधिकाऱ्यांशी चर्चा , कोणी subcontractor मिळाले तर त्याला  भेटणे, मूर्तीवाल्याकडून मूर्ती घ्यायची, मग ५ वाजताच्या विमानाने जयपूर वरून निघायचे, संध्याकाळी ७ वाजता मुंबई, तिथून डायरेक्ट CST स्टेशनला जाऊन हुसेनसागर हि रात्री ९. ५० ची ट्रेन पकडायची व दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता गाणगापूर स्टेशनला पोहोचायचे, गाणगापूर स्टेशन वरून गाडीने आश्रमात जायचे, तिथे गुरुजींना ती मूर्ती दयायची व सकाळी १० वाजता गाणगापूरवरून निघून दुपारी १ वाजेपर्यंत सोलापूर एअरपोर्ट , तिथून २ च्या विमानाने ३ वाजता मुंबईमध्ये यायचे व दुपारी ४ वाजता घरी पोहोचायचे असा कागदोपत्री व्यवस्थित वाटणारा व अजिबात प्रॅक्टिकल नसणारा प्रोग्राम मी बनवला व सर्व बुकिंग केल्या. सोलापूर मुंबई विमानाची तिकीट काढली हुसेनसागर ट्रेन ची तिकीट काढली. ऑफिसला सांगितले कि मी जयपूरमध्ये एक रात्र मुक्काम करून दुसऱ्या दिवशी येणार आहे. म्हणजे सुट्टी घ्यायची आवश्यकता नाही. खरी गम्मत तर पुढे होती. कश्या अडचणी निर्माण होतात व कसा मार्ग निघतो हि मी अनुभव घेतला. 

जयपूरला जाण्याआधी २/३ दिवस बायकोला खूप ताप होता त्यामुळे ती कामाला गेली नाही. व मला म्हटली की कदाचित तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला लागेल तेव्हा तू जाऊ नकोस. मी सांगितले कि हे टेंडर खूप महत्वाचे असून मला जावेच लागेल. तुला जर जास्तच झाले तर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन जा मी ६ एप्रिलला सकाळी जाऊन ७ एप्रिल ला संध्याकाळी ४ वाजेपर्यंत येतोच. 

ठरल्याप्रमाणे ६ एप्रिल २०१० ला सकाळी ७च्या विमानाने मी जयपूरला निघालो व ८. ३० ला जयपूर ला पोहोचलो. सर्वप्रथम मूर्तीकाराला फोन केला तो म्हणाला कि थोडा पेंटिंग बाकी है वो दोपहर १ बजेतक हो जायेगा, आप चिंता मत करो. एयरपोर्ट  घ्यायला आमचा लोकल माणूस आलाच होता. नाश्ता करून आम्ही सकाळी १०ला RUIDP च्या ऑफिसला पोहोचलो. माझ्याप्रमाणे अजून ३ कंपन्यांचे प्रतिनिधी आले होते. बरोबर ११ वाजता सर्वासमक्ष सर्वांचे pricebid ओपन केले. त्यात माझी कंपनी lowest ठरल्यामुळे आम्हाला ते टेंडर मिळाले. खूप आनंद झाला. संबंधित अधिकारी आणि इंजिनिअरला भेटलो. असे करता करता दुपारचे १. ३० वाजले. मग आम्ही डायरेक्ट मूर्तीकाराकडे गेलो. रंग अजून सुकला नव्हता त्यामुळे त्याने अजून थांबायला सांगितले. त्याने त्याच्या स्किल प्रमाणे मूर्ती बनवली होती. जेवून परत आलो व मग मूर्तीचे पॅकिंग केले. आणि जयपूर एअरपोर्टला मी आलो. खरी गम्मत पुढेच होती. कारण विमान वेळेत सुटले पाहिजे . मुंबईमध्ये वेळेत पोहोचले पाहिजे, कारण संध्याकाळी ६ ते ८ मध्ये मुंबई ला उतरणारी विमाने खूप.  ट्रॅफिक मुळे हमखास लेट असतात. मग विलेपार्ले विमानतळावरून टॅक्सीने CST स्टेशनला जायचे म्हटले तर ट्रॅफिकमध्ये अडकल्याची भीती मग त्यापेक्षा विले पार्ले स्टेशनवरून हार्बर ट्रेन ने CST स्टेशनला जाणे योग्य. पण सर्व काही अनिश्चित. 

मूर्तीचे वजन जास्त होते पण एअरपोर्टच्या काउंटरला सांगितले की आतमध्ये मूर्ती आहे मग त्यांनी केबिन बॅग म्हणून नेण्याची परवानगी दिली. विमान संध्याकाळी ५. ३० ला म्हणजे अर्धा तास उशिरा सुटले. घरी फोनवर संपर्क होताच.  बायकोचा ताप उतरत नव्हता आणि आज रात्री जर ताप उतरला नाही तर मात्र उदया सकाळी तिला बांद्रा येथील होली फॅमिली हॉस्पिटलला ऍडमिट करायचे ठरले.

अंदाजे संध्याकाळी ७:०५ ला मी मुंबई विमानतळावर उतरलो व रिक्षा पकडून विलेपार्ले स्टेशनला आलो. फर्स्ट क्लासचे तिकीट काढले आणि ८. २० च्या हार्बर ट्रेन ने अंदाजे रात्री ९ वाजून १० मिनिटांनी CST स्टेशन ला उतरलो व चालत चालत अंदाजे रात्री ९. ३० ला हुसेनसागर ट्रेनच्या माझ्या डब्यात सेकंड AC मध्ये बसलो. ट्रेन नुकतीच आली होती. 

CST रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणारे अधिकारी श्री. संजय पाटील हे आमचे जवळचे मित्र आणि पाठक गुरुजींवर यांचे खूप प्रेम (संजय पाटील या नावाचे माझे दोन जवळचे मित्र आहेत). मग गुरुजी जेव्हा केव्हा गाणगापूरला CST वरून जायचे तेव्हा CST रेल्वे पोलीस स्टेशनचे बरेचसे पोलीस गुरुजींना भेटायला संजय पाटीलबरोबर ट्रेन मध्ये यायचे. एवढे पोलीस आल्यामुळे सहप्रवाशांना पण कळायचे की पाठक गुरुजी कोणीतरी VIP आहेत. गुरुजींना बिस्लेरीच्या बाटल्या ते प्रवासासाठी ते द्यायचे. हि पाठक गुरुजींची सेवा CST रेल्वे पोलीस स्टेशन ने शेवटपर्यंत न सांगता केली. 





तर मी रात्री ९. ३० ला ट्रेन मध्ये बसलो आणि रात्री ९. ५० ला ट्रेन सुटणार होती. हातात सामान असल्यामुळे आणि tight schedule असल्यामुळे काही खायला घेऊ शकलो नाही. ट्रेनमध्ये काही मिळाले तर खाऊ असा विचार केला. गुरुजींना फोन करून सांगितले की ट्रेनमध्ये बसलो आहे, उदया येतो. अचानक दोन पोलीस माझ्या जागेवर आले आणि त्यांनी मला वेज बिर्याणी, फ्रुटी, पाण्याच्या बाटल्या दिल्या व पाटीलसाहेबानी पाठवले आहे असे ते म्हणाले व नमस्कार करून गेले. मी लगेचच संजय पाटील याना फोन लावला. ते हसले आणि म्हणाले की मित्रा थोडी सेवा आमचीपण होऊ द्या. मी म्हणालो अरे तुला कसे कळले की मी काही खाल्ले नाही. ते म्हणाले अरे आम्ही पोलीस आहोत आमचा अंदाज सहसा चुकत नाही , मला तुझा प्रोग्रॅम आधीच माहित होता. २/३ दिवसापूर्वी त्याने माझा बोगी नंबर आणि सीट नंबर का विचारला ते मला आत्ता कळले. त्याला थँक यु म्हणून त्याच्या तोंडून भ ची बाराखडी मला ऐकायची नव्हती. त्यामुळे त्याला मी काही बोललो नाही.  गुरुजींना सांगितले कि मला गाणगापूर स्टेशनला घ्यायला येणाऱ्या गाडीच्या ड्रायव्हरचा नंबर पाठवा व त्याच गाडीने मी सोलापूर एअरपोर्टला जाईन. आणि सकाळी १० वाजता आश्रमातून मला निघायलाच लागेल. गुरुजी म्हटले की चिंता करून नकोस. त्यांनी काय व्यवस्था केली होती ते मला नंतर कळले. 

आत्ता पुढची कसरत म्हणजे हि ट्रेन गाणगापूर स्टेशनला सकाळी ७ वाजता पोहोचते पण अनेकदा अर्धा तास तरी उशिरा असते. माझ्या दृष्टीने हा अर्धा तास पण महत्त्वाचाच होता. म्हणजे ट्रेन वेळेतच पोहोचली पाहिजे. भूक खूप लागल्यामुळे मी मस्त जेवलो व झोपलो , म्हणजे पाठ टेकली. विमानांप्रमाणे ट्रेनमध्ये सुद्धा माझे पाय मावत नाहीत, त्यामुळे वेगवेगळ्या अँगल मध्ये झोपण्याचा प्रयत्न करत रात्र काढली. 

सोलापूर आल्यावर मी उठलोच व गाणगापूर यायची वाट बघू लागलो. पाठक गुरुजींना फोन केला व त्यांना सांगितले, ट्रेन वेळेत आहे तुम्ही गाडीच्या ड्रायव्हरचा नंबर पाठवा, गुरुजी म्हणाले तू चिंता करू नकोस. ड्रायव्हर तुझ्या डब्याजवळ बरोबर येईल. आयला म्हटले हे नंबर का देत नाहीत. आधीच वेळ कमी आणि आमची चुकामुक झाली तर अजून वेळ जायचा. तिथे घरी बायकोचा ताप कमी होत नव्हता म्हणजे आज नक्कीच ऍडमिट करावे लागणार ते एक वेगळेच टेन्शन. बरोबर ७ वाजून ५ मिनिटांनी म्हणजे वेळेतच ट्रेन गाणगापूर स्टेशनला आली. मी दारातच होतो. कोण घ्यायला येत आहे ते गुरुजींनी सांगितले नाही. ड्रायव्हरचा नंबर दिला नाही. त्यामुळे त्याला ओळखायचे कसे ते कळेना. ट्रेन थांबली आणि समोरच गुरुजी दिसले. मला जोरदार धक्का बसला. खूप आनंदपण झाला.  गुरुजींच्या कपाळावर गंध होते म्हणजे ते सकाळीच स्नान करून आले होते. 
गुरुजीं गाणगापूर स्टेशनला मला घ्यायला आले मी ट्रेनमधून फोटो काढला 

ट्रेन मधून उतरून गुरुजींच्या पाया पडलो. उन्मेशची गळाभेट घेतली. गुरुजींच्या चेहेऱ्यावर आनंद ओसंडून जात होता. वास्तविक ते महाराजांच्या मूर्तीला recieve करायला आले होते. तरीपण येवढ्या सकाळी त्यांनी एवढा त्रास करून यायची आवश्यकता नव्हती. गुरुजींच्या प्रत्येक कृतीत त्यांच्या बद्दलचा आदरभाव वाढत असे , हि त्यापैकी एक घटना. गुरुजी म्हणाले की तुम्ही एवढ्या लांबून श्रीपाद महाराजांना घेऊन आलात मग मी स्टेशनला आलो तर बिघडले कुठे? रस्त्यात आम्ही खूप गप्पा मारल्या. त्यांना सगळा प्रवास सांगितला. मुंबईला बायकोची परिस्थिती सांगितली. गुरुजी म्हटले, काळजी करू नकोस. आत्ता मला टाइम मॅनॅजमेण्ट करायचे नव्हते ती सूत्रे पाठकगुरुजींकडे होती. सकाळी दहा वाजता गाणगापुरवरून सोलापूर विमानतळाकडे निघायचे मी ठरवले होते गुरुजींनी सांगितले सकाळी ९. ४५ ला निघायचे. 

४० मिनिटात, म्हणजे अंदाजे सकाळी ८ वाजता आम्ही आश्रमात पोहोचलो. मूर्ती माझ्या हातातच होती. 
 मूर्ती  आश्रमात आणतानाचा फोटो 

मूर्तीचा मान सन्मान झाला. औदुंबराजवळ मूर्ती ठेवून तिची पूजा केली. अत्यंत सन्मानाने व विधिपूर्वक हि मूर्ती म्हणजे श्रीपाद महाराज आश्रमात आले. एवढा मोठा कार्यक्रम होईल असे मला वाटले नव्हते मला वाटले की मला फक्त डिलिव्हरी करायची आहे. 
पाठक गुरुजीसोबत आश्रमाच्या दरवाज्यात 

आश्रमाच्या दरवाज्यात 

मला उगीचच मान मिळाला 


गुरुजींनी मूर्ती हातात घेतली 

औदुंबराजवळ मूर्तीची पूजा केली. तेव्हा आश्रमाची कंपाऊंड वॉल नव्हती. 

महाराज स्थानापन्न झाले 


आश्रमात महाराजांच्या स्वागतासाठी रांगोळी 

महाराज त्यांच्या पूर्ण टीम सोबत 
आश्रमात ताबडतोब मी अंघोळीला गेलो आणि नंतर गुरुजींनी मला मंदिरात पाठवले. आज गर्दी कमी असल्यामुळे लगेचच दर्शन झाले. पुन्हा आश्रमात आलो नाश्ता केला. मुंबई ला घरी फोन करून सांगितले कि दुपारी ४ पर्यंत येतो. बायकोचा ताप उतरत नव्हता पण ती म्हणाली, तू जयपूरहून संध्याकाळी आल्यावर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊया. तिच्या दृष्टीने मी जयपूरलाच होतो. जर तिला कळले असते की मी गाणगापूरला गेलोय तर तिचा विश्वासच बसला नसता किंवा तिने मला मुंबईला आल्यावर एका क्षणात सर्व देव दाखवले असते. 

नाश्ता करेपर्यंत मला सोलापूरला न्यायला सुमो गाडी आली होती. आत्ता पटपट सोलापूरला पोहोचणे व तिथून विमान पकडणे महत्वाचे. ठरल्या वेळेप्रमाणे सकाळी ९. ४५ ला मी गाडीत पुढे बसलो. तर मागे गुरुजी, उन्मेष आणि गुरुजींचे भाऊ प्रभुकाका पण बसले व म्हणाले की आम्ही तुला सोडायला सोलापूर विमानतळावर  येतो. त्यावर मी म्हणालो कि, असे करून नकॊ मला सवय आहे. का तुम्ही एवढा प्रवास करताय. ३ तास oneway म्हणजे ६ तास प्रवास कशाला करताय ? पण गुरुजींनी काही ऐकले नाही. मग आम्ही आधी कल्लेश्वर मंदिरात गेलो. तिथून गाणगापूर संगमावर गेलो व तिथून सोलापूर दिशेने प्रवास सुरु (गाणगापूर निर्गुण पादुका मंदिर , कल्लेश्वर आणि संगम या तीन ठिकाणी दर्शन घेतले म्हणजे गाणगापूर यात्रा पूर्ण झाली असे म्हणतात.) ऑफिसचे फोन चालूच होते, ऑफिस च्या दृष्टीने मी जयपूर ला होतो. रस्ता खराब असल्यामुळे विशेष वेग नव्हता, पण आम्ही वेळेत होतो. अक्कलकोट रस्त्यातच असल्यामुळे तिथे थांबून दर्शन घेतले. खाण्यासाठी जेवणाचा डबा मला गुरुजींनी आश्रमातूनच दिला होता, त्यामुळे दुपारच्या जेवणाची सोय झाली होती. गाडीतच आम्ही जेवण केले.  बरोबर १ वाजता आम्ही सोलापूर एअरपोर्टला पोहोचलो. हे एक अत्यंत  छोटे एअरपोर्ट होते. विमान अजून आले नव्हते त्यामुळे आम्ही बाहेर गप्पा मारत उभे राहिलो. गुरुजींबरोबर कितीही बोललो तरी विषय काही संपायचे नाहीत आणि  गप्पा जास्तच रंगायच्या. दुपारी १. २० ला विमान आले मग मी विमानतळाच्या आतमध्ये गेलो.  
सोलापूर एअर पोर्ट वर मी , उन्मेष पाटील, पाठकगुरुजी , प्रभुकाका 
एवढा लांबचा आणि वेडा वाकडा प्रवास tight schedule मध्ये केल्यामुळे गुरुजी खूपच खुश होते. आणि म्हणूनच ते गाणगापूर स्टेशनपासून सोलापूर एअरपोर्ट पर्यंत माझ्याबरोबर होते. वास्तविक पाहता त्यांनी असे करण्याची गरज आणि अपेक्षा नव्हती व कदाचित मी त्यांच्या जागी असतो तरी मी असे केले नसते पण पाठक गुरुजींची गोष्टच वेगळी. त्यांच्याबद्दलचा आदर अधिकच वाढला. मोठी माणसे खरोखरच खूप मोठीं असतात. श्रीपाद महाराजांची मार्बलची मूर्ती , माझा विचित्र प्रवास हा इतका महत्वाचा नाही पण यातून शेवटी जो आनंद मिळाला तो अवर्णनीय आहे. खूप मज्जा आली. 

असो, विमान बरोबर दुपारी २ वाजता उडाले व दुपारी ३ वाजता मुंबईला उतरलो . घरी फोन केला. ऑफिसला फोन करून सांगितले कि आत्ताच जयपुरवरून मुंबईला पोहोचलो. उद्या ऑफिसला येईन. गुरुजींना फोन केला , त्यांना आश्रमात पोहोचायला अजून वेळ होता. म्हणजे ते सोलापुरवरून गाणगापूरला पोहोचायच्या आधी मी मुंबई ला पोहोचलो. त्यांना सांगितले कि महाराजांचे स्वतःचे काम होते म्हणून ट्रेन, विमान कुठेच लेट झाले नाही. आमचे काम असते तेव्हा काहीच वेळेत होत नाही. ते हसले.   संध्याकाळी ४. १५ मिनिटांनी मी घरी आलो. बायको,  आई, सासू आणि बायकोच्या काही डॉक्टर स्टुडन्ट घरी होत्या. मी सामान ठेवले आणि ताबडतोब बायकोला होली फॅमिली हॉस्पिटल, बांद्रा मध्ये ऍडमिट केले.

सर्व प्रवास माझ्याकडून यंत्रवत झाला. माझ्याने एवढे शक्य नव्हते पण युनिव्हर्सने ठरवले आणि मला प्रत्येक ठिकाणी मदत झाली. कुठेही उशीर झाला नाही. एवढे करूनही माझ्यावरच्या सर्व जबाबदाऱ्या म्हणजे व्यावहारिक - ऑफिसच्या , अध्यात्मिक - गाणगापूर व सांसारिक - बायकोला ऍडमिट करणे हे सर्व माझ्याकडून पूर्ण झाल्या. मुंबई - जयपूर - मुंबई - गाणगापूर - अक्कलकोट - सोलापूर - मुंबई  हा ३४ तासाचा प्रवास मी विमान, रिक्षा, ट्रेन, कारने अविश्वासनीयरित्या पूर्ण करू शकलो आणि महत्त्वाचे म्हणजे कमी वेळ असूनही खुपसा वेळ मी पाठक गुरुजींबरोबर होतो. आयुष्यात लक्षात राहिलेल्या काही ठळक घटनांपैकी हि घटना. 


विशाल फुलपगार 
१८ जुन २०२०

दत्तलीन श्री. पाठक गुरुजी यांच्या जीवनावरील "जगन्मित्र" या पुस्तकाचे विमोचन स्वातंत्रवीर सावरकर स्मारक , दादर , मुंबई येथे २५ डिसेंबर २०१२ ला मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तो कार्यक्रम पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा. 

https://www.youtube.com/watch?v=V32T5DWEor8&list=PLsAsEAuSOBwdOoqO44f_ZFkqLrO7aPsva&index=2&t=7904s






  












16 comments:

  1. भाऊ वाचताना एवढा गुंग झालो कि मला वाटलं मीच तुझ्याबरोबर प्रवास करत आहे... गुरुजींचा स्वभाव आणि त्यांची आपुलकी मला वाटतं तुझ्याएवढी कदाचित कोणीही बघितली नसेल. प्रवास वर्णन वाचताना सारखा वाटत होत कि च्यायला आता काही गणित चुकलं तर खूप फटके पडतील परंतु तुझी श्रद्धा, निर्णय घ्यायांचे धाडस आणि कार्य पूर्ण करण्याचा ध्यास पहिल्यानंतर महाराजांनी कृपा नसती केली तर नवलच . सद्गुरू कृपा आहेच आणि म्हणून तर एवढे अशक्य आणि कटोकटी वेळच गणित पूर्णत्वास आले ... खूप भाग्यतर लागतच हे सर्व आपल्या हातून घडण्यासाठी परंतु त्या पेक्षा ही ती जबादारी पूर्ण करण्याची श्रद्धा आणि जिद्द हवीच. शेवटी भक्ती मार्ग हा शूरांचा प्रवास आहे लेच्यापेच्या च काम नाही आणि गुरुजींना आणि त्यांचा जीवन प्रवास पाहिल्यानंतर त्याचा प्रत्यय येतोच.
    संजय पाटील

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद भाऊ. त्या त्या वेळेस त्या त्या घटना आपल्याकडून घडून जातात. आपण त्यां प्रवासात असल्यामुळे काही विशेष वाटत नाही. पन आज मगे वळून बघताना वाटते कि खरच खूपच धाडसीपना होता. अनेक आठवणी आहेत.
      स्टेशनवर मला घ्यायला गुरुजींच्या आनंदित चेहेरा सर्व कहि सांगतो.

      Delete
  2. विशाल, सद्यपरिस्थितीत आजुबाजूला असंख्य प्रश्न, कोलाहल सुरू असताना इतकं connected होऊन...साल-२०१० त्या आधी-नंतरचे इत्यंभूत संदर्भ लक्षात ठेऊन शब्दबद्ध करणं हे एक प्रकारे meditationच आहे. गुरुजींचा आशीर्वाद आहे तुला कायम.. तुझी लेखणी अशीच विस्तारत विशाल होवो ही सदिच्छा!

    -हीना सराफ

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद हिना. चांगल्या गोष्टी नेहमी लक्षात राहतात यात विशेष काही नाही. पन ब्लोग वाचल्याबद्दल आभारी aahe

      Delete
  3. खूप सुंदर आठवण..

    ReplyDelete
  4. खूप छान वाचताना डोळ्यासमोर सगळे उभे राहिले

    ReplyDelete
    Replies
    1. वा. मला अजूनही तो प्रवास पूर्णपणे लक्षात आहे. Golden memories. धन्यवाद

      Delete
  5. जय गुरुदेव...
    विशाल तुझा श्रींच्या प्रवासाचा ब्लॉग वाचताना क्षणोक्षणी उत्सुकता आणि उत्कंठा वाढवणारा होता. आपल्या आयुष्यात काही क्षण, काही वस्तू काळाच्या ओघात आणि दैनंदिन जीवनातील धकाधकीत विस्मरणात गेलेल्या काही आठवणी ध्यानीमनी नसताना अचानक नजरेस पडतात आणि त्यामागील सर्व प्रसंग घटना आपल्या डोळ्यासमोर रुंजी घालायला लागतात. अशा स्मरणात राहणार्‍या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी रोमहर्षक आणि अविश्वसनीय पण सत्यात उतरलेली कहाणी असतेच त्यातीलच ही एक तुझी आठवण म्हणावी लागेल. अनावधानाने तुला एक छोटासा फोटो कॉम्प्युटरच्या खोक्यात अचानक सापडला खरा, पण त्यामागचा अख्खा प्रवास कॉम्प्युटर पेक्षा तुझ्या मेंदूच्या कप्प्यात जसाच्या तसा साठवून ठेवला आहेस. तुझा ब्लॉग वाचताना मी तर इतका त्यात रमून गेलो इतका भावला की मलाही मुंबई जयपुर गांगापुर फिरून आल्यासारखं वाटलं. त्यामागचा तुझा आत्मविश्वास आणि वेळेचे नियोजन अगदी भन्नाट होतं. मला वाटतं, जर एखादी गोष्ट घडणे अपरिहार्य असेल तर ती घडणारच! अस म्हणतात की, काही गोष्टी या एखादी अदृष्य शक्ती घडवून आणत असते आणि आपण मात्र निमित्तमात्र असतो. श्री चा प्रवास जयपुर ते गाणगापूर त्यांच्या विधिलिखित ठरलेल्या वेळेत होणारच होता तू फक्त निमित्तमात्र वाहक होतास. भूतकाळातल्या अशा काही अविस्मरणीय आठवणी आठवल्या की, त्या आपल्याकडून कशा पार पडल्या असतील याचा विचार केला तरी खूप अप्रूप वाटतं आणि आपल्यालाच आपली पाठ थोपटून घ्यावीशी वाटते.

    ही श्रींची मूर्ती परराज्यातून श्रीक्षेत्र गाणगापूरात तुझ्या हस्ते येणे ही मोठी भाग्याची गोष्ट म्हणायला हवी आणि ती तुझ्या माध्यमाने गाणगापुरात यावी यासाठी प. पू. पाठक गुरुजींनी या पुण्यकार्याला सुयोग्य व्यक्ती म्हणून तुझी केलेली निवड सार्थ ठरवलीस. एखादं चांगलं काम करताना अनेक अडथळे, प्रतिकूल परिस्थिती 'आ' वासून उभी असतेच, हा नियतीचा वा निसर्गनियम म्हण किंवा कसोटीची वेळ असं म्हण हवं तर पण एखाद्याची त्या कामाच्या प्रती एकरूपता हे कार्य पूर्णत्वास नेण्यास घेतलेला ध्यास किंवा तुझी भक्ती पाण्यासाठी आखलेला डावही असू शकतो परंतु त्यावर तू तुझ्या सद्सद्विवेकबुद्धीने घेतलेला योग्य निर्णय आणि आणि अथक मेहनतीने पार पाडून तुझ्यावर सोपवलेल्या कार्यात तू अगदी खरा उतरलास.

    तुझ्या बिझी शेड्युलमधून तू ते शक्य केलंस पण हे सर्व अगदी ठरल्या वेळेप्रमाणे आणि साचेबद्ध रीतीने करण्यामागे काहीतरी अदृश्य शक्तीचा वास असावा असं जाणवलं. पाठक गुरुजींचा आदेश शिरसावंद्य मानून तू श्रींची मूर्ती जयपुर मुंबई गाणगापूरला इच्छित स्थळी पाठक गुरुजी पर्यंत पोहचवली आणि विशेष म्हणजे ती मूर्ती घेण्यासाठी अनपेक्षितपणे आलेले दस्तुरखुद्द पाठक गुरुजी रेल्वे स्टेशन वरती आले होते यावरूनच तुमच्या कार्याला किती महत्त्व आहे हे ध्यानात येतं.

    तुझे मित्र आणि सीएसटी रेल्वे स्टेशनवर कार्यरत असणारे संजीव पाटील साहेब यांना मी ऑफिसला जाताना अनेक वेळा सीएससी स्टेशनला येता-जाता पाहिले आहेत तुझ्या ब्लॉगमध्ये त्यांचा फोटो पाहताच मला खूप आश्चर्य वाटलं पण तुझा त्यांच्याशी असा काही संबंध असेल अशी कल्पनाही नव्हती. पण एक आहे चांगल्या कार्याला अनपेक्षीतपणे कोणीतरी कुठल्याही रूपांत मदतीला धावून येतच असतो त्यातलेच एक संजीव पाटील साहेब, तुला धीर देणारे डॉ, हिदायत खान, उन्मेष पाटील साहेब आणि खुद्द पाठक गुरुजी हे सर्व तुझे कार्य सिद्धीस नेण्यास त्यांचा ही अनपेक्षितपणे सहभाग आहेच.

    विशाल तुझी उंची हा आमच्यासाठी नेहमीच चर्चेचा विषय असतो तुझ्या उंचीमुळे तू नेहमी आम्हा मित्रांच्या घोळक्यात उठून दिसतोस बरेच वेळा आम्ही तुझ्या नकळत सेल्फी काढण्यासाठी तुझा उपयोग करून घ्यायचं कारण तू काढलेल्या सेल्फीत आम्ही सर्व छोटी मंडळी मावत असू आणि फोटो पण छान यायचा हा.. हा.. असो. विनोदाचा भाग सोडला तर मनापासून सांगावसं वाटतं की, तुझ्या उंचीपेक्षा तुझी गुरूभक्ती अध्यात्म आणि माणूसपण जपलेल्या उच्च विचारांची उंची खूप मोठी आहे मित्रा! याचा आम्हा सर्व मित्रांना नेहमीच अभिमान वाटत आलाय. Cont'd....

    ReplyDelete
  6. .... Cont'd.. मलाही थोडीफार अध्यात्माची गोडी असल्याने मी ही चांगल्या प्रकारे समजू शकतो. श्रीपाद श्रीवल्लभांच्या मूर्तीच्या प्रवासाची कहाणी खरोखर थक्क करणारी आहे कलियुगातील श्री दत्तगुरूंचे पहिले अवतार म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील पिठापूर मधून सन 1320 -1350 जन्मापासून त्यानंतरचा श्री नृसिंहसरस्वती अवतारातील कर्दळीवनातील 300 वर्षांची कठोर तपश्चर्या नंतर अक्कलकोट श्री स्वामी समर्थ यांच्या रुपाने त्यांचं वास्तव्य या सर्व गोष्टी आपल्या सारख्या सामान्य बुद्धिमत्तेच्या पलीकडे असून अनाकलनीय आणि नतमस्तक व्हायला लावणार्‍या आहेत. साधारण वाचकाला किंवा त्या जयपूरच्या त्या मूर्तिकाराला श्रीवल्लभ स्वामींची मूर्ती फक्त साधारण वाटत असली तरी त्या मागे गूढ, अनाकलनीय, दैवी आणि मानवजातीच्या उद्धारासाठी केलेलं अमूल्य कार्य हे सर्व आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे आहे,. ईश्वरी अंश आणि दिव्य शक्ती लाभलेल्या श्री वल्लभ स्वामींना आपल्या दिव्य दृष्टीने आपले भविष्यात येणाऱ्या पुढील तीनशे ते चारशे वर्षांच अस्तित्व पाहण्याची जाणून घेणे ही दैवी शक्ती होती. श्री दत्तप्रभूचा अवतार इतिहास सांगण्याचा मी इथे मूर्खपणा करणार नाही कारण दत्तलीन प. पू. पाठक गुरुजीचे शिष्यत्व लाभलेला आणि दत्तसंप्रदायातील भक्तांच्या मांदियाळीत राहून तुला हे सर्व ज्ञात असेलच असे गृहीत धरून चालतो.

    विशेष म्हणजे जयपूरात दोन स्पर्धक कंपनी असूनही तुझ्याच कंपनीला टेंडर मिळणे. अशक्‍य वाटणारा श्रींच्या मूर्तीसह तुझा दौरा कार्यक्रम अगदी निर्विघ्नपणे ठरल्या वेळेत पार पडणे. श्रीक्षेत्र गाणगापुरातील नियोजित वेळेत श्रींची मूर्ती पोहोचणे. त्यानंतर उर्वरित प्रवासही विनाविलंब व्यवस्थित पार पडणे म्हणजे तुझी झालेली धावपळ लक्षात येते. तुझ्या ऑफिसने विश्वासाने तुझ्यावर सोपविलेली कामगिरी पार पाडून पुन्हा जयपूर ते मुंबई ते गाणगापूर ते मुंबई हा प्रवासात तुला मिळाली ऊर्जा कुठून मिळाली असेल? घरी पत्नीची बिघडलेली तब्येत, टेंडर कंपनीला मिळेल की नाही? श्रींची मूर्ती जयपुरातून गाणगापुरात सुरक्षित कशी पोहोचेल? मूर्ती पाठक गुरूंच्या मनासारखी असेल का? पुन्हा मुंबईला वेळात पोहोचेल का? या विचारांच्या वादळात आणि द्विधा मनस्थितीत घड्याळ्याच्या काट्यावर केलेला तुझा प्रवास थक्क करणारा आहे.

    विशाल मी तुला यापूर्वीही बर्‍याच वेळा म्हटलंय की, तू तुझ्या आठवणीतला प्रत्येक प्रसंग घटना कागदावर उतरवताना त्या क्षणांचे फोटो, त्यांचा वार, वेळ ह्या सर्व गोष्टी त्या प्रसंगाला जिवंत स्वरुप देते. तू त्या घटनेत स्वतःला घेऊन जातोस आणि वाचकालाही तुझ्या सोबत वाहत नेतोस, म्हणून तुझे लेख खूप जवळचे वाटतात, तुला अनपेक्षितपणे सापडलेल्या श्रींच्या फोटोने अजून एका आठवणीला उजाळा दिलास.

    तुझ्या माध्यमाने आणि दत्तलीन पाठक गुरुजी यांच्या आदेशाने गाणगापूर येथे विराजमान झालेले श्री वल्लभ स्वामींची मूर्ती या घटनेची स्मृती सतत मनात तेवत ठेवील. तुझ्या हातून घडलेले हे पुण्यकार्य सदोदित सहकाऱ्यांच्या आणि भावी पिढीच्या आठवणीत राहिल. तू नेहमी पाठक गुरुजी बद्दल भरभरून लिहित असतोस. पण मला त्यांचा भेटण्याचा कधी योग आला नाही हे माझं दुर्दैव समजतो पण तरीही त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावेसे वाटते. असो... गुरुमाऊली आणि दत्तलीन परमपूज्य पाठक गुरुजींचे कृपा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहो ही सदिच्छा आणि मनःपूर्वक धन्यवाद........ संतोष देसाई.

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त

    ReplyDelete
  7. प्रिय संतोष,
    माझा प्रत्येक ब्लॉग तू काळजीपूर्वक वाचन करून मगच त्यावर तुझी विस्तृत प्रतिक्रिया देतोस हे कौतुकास्पद आहे. एवढी मोठी प्रतिक्रिया मी पण काळजीपूर्वक वाचून काढली. एखादा लेख वाचायचा आणि त्याचे आकलन करून त्यावर योग्य ती प्रतिक्रिया देणे हि तुझी हातोटी मला अचंबित करते.
    तू स्वतःसुद्धा लेखक आहेस तेव्हा तुझा एखादा ब्लॉग मला वाचायला आवडेल. त्यावर तुझ्याइतकी अप्रतिम नाही पण थोडीफार प्रतिक्रिया मी पण देण्याचा प्रयत्न करेन.
    तू ज्या प्रकारे माझी स्तुती करतोस तेव्हा क्षणभरासाठी का होईना मला मी मोठा लेखक आहे असे वाटते.
    कोणत्याही गोष्टीवर , घटनेवर लिहिण्याची संधी तू सोडू नकोस हा तुला माझा प्रेमाचा सल्ला.
    वाचून धमाल आली.
    धन्यवाद
    विशाल फुलपगार

    ReplyDelete
  8. धन्यवाद विशाल तुझ्या सकारात्मक प्रतिक्रियेबद्दल. भविष्यात नक्कीच ब्लॉग लिहिण्याचा प्रयत्न करीन परंतु सध्या दुसर्‍या लिखाणात व्यस्त आहे. तुलाही पुढील लेखा साठी मनःपूर्वक शुभेच्छा... संतोष देसाई

    ReplyDelete
  9. श्रीपाद वल्लभ स्वामींच्या मूर्तीचे जयपूर ते गाणगापूर प्रवास वर्णन खूप छान अप्रतिम रीतीने मांडले आहेस.मला ही वाचताना सगळे प्रत्यक्ष अनुभवल्यासारखे वाटत होते. असेच श्री दत्तगुरु आणि पाठक गुरुजी यांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदैव राहोत हीच सदिच्छा... डॉ. स्वाती जाधव.

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या व्यस्त जीवन शैली मधून वेळ काढून वाचन करून अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद डॉ. स्वाती जाधव

      Delete