Monday, July 26, 2021

२६ जुलै २००५ चा पाऊस

अजूनही मला २६ जुलै २००५ चा दिवस लक्षात आहे. मुंबई / महाराष्ट्रामध्ये धो धो पाऊस पडत होता म्हणजे ढगफुटी झाली होती. माझी २७ जुलै ला इचलकरंजी इथे मीटिंग होती. २६ जुलै ला रात्री महालक्ष्मी ट्रेन ने दादर वरून  निघायचे , दुसऱ्या दिवशी सकाळी हातकणंगले स्टेशन ला ऑफिस ची गाडी घ्यायला येणार मग दिवस भर मीटिंग , प्लांट व्हिसिट आणि रात्री पुन्हा ट्रेन ने परतीचा प्रवास असा दौरा होता व त्याप्रमाणे ट्रेन बुकिंग वगैरे झाले होते. 

पाऊस जोरदार होताच.  मी खार वरून बेलापूर ऑफिसला वेळेत पोहोचलो म्हणजे ट्रेन व्यवस्थित चालू होत्या म्हणजे काही विशेष उशीर झाला नाही. आजचा पाऊस जरा वेगळाच आहे हे जाणवत होते. त्या दिवशी मी लवकर बेलापूर ऑफिस मधून निघालो. कारण खार ला घरी जाऊन बॅग घेऊन आणि जेवून मग मी निघणार होतो.  दुपारी ४ वाजताची बेलापूर वरून हार्बर ट्रेन पकडली. पावसाचा जोर असला तरीही ट्रेन बेलापूर पासून वेळेत निघाली आणि मानखुर्दपर्यंत व्यवस्थित पोहोचली. ट्रेन मध्ये तुरळक गर्दी होती. मी फर्स्ट क्लास मध्ये होतो. तिथे तर मोजून ५-६ माणसे होती. 

पाऊस अक्षरशः धबधब्यासारखा पडू लागला आणि मानखुर्दपासून ट्रेन खूपच हळू झाली आणि गोवंडी स्टेशन यायच्या आधी थांबली. काहीच कळेना काय करायचे ते. आजूबाजूला झोपडपट्टी होती त्यातील लोक बाहेर येऊन आमच्या ट्रेन कडे बघत होती. मी बाहेर डोकावून पहिले तर पुढे रांगेत बऱ्याच ट्रेन होत्या. सुरक्षेच्या दृष्टीने ट्रेन मध्ये थांबणे योग्य होते. मोबाइलला नेटवर्क होते पण फोन लागत नव्हता. अचानक अजून जोरात पाऊस आला आणि डोळ्यादेखत रूळांवरील पाणी नदीसारखे वाढले. संध्याकाळचे ५. ३० वाजले असतील. काळ्याकुट्ट ढगांनी सूर्य किरणांना अडवले होते त्यामुळे जवळपास अंधारच झाला होता. पुढच्या लेडीस डब्यामध्ये चलबिचल चालू झाली. अचानक आजूबाजूच्या झोपडपट्टीतील लोक आमच्या ट्रेन जवळ आले आणि म्हणाले कि सर्वकाही बंद आहे. तुम्ही उतारा आम्ही तुम्हाला हायवे पर्यंत सोडतो . इथे थांबून राहणे रिस्की आहे,  कारण पाणी खूप वाढत आहे. साहजिकच मलापण भीती वाटली. एवढ्या पावसात त्या बायका आणि पुरुष मंडळींनी स्वतः भिजत छोट्या छोट्या शिड्या आणून आम्हाला सर्वाना खाली उतरवले. ज्या झोपडपट्टीतल्या लोकांकडे आपण नेहमीच कमी दर्जाचे लोक म्हणून पाहतो , ज्यांना बघितल्यावर आपल्याला वाटते कि हे वाईट लोक असावेत कदाचित चोरच असतील , त्यांनीच आम्हाला मानवी साखळी करून त्याच झोपडपट्टीतून २ फूट पाण्यातून कसे तरी हायवे पर्यंत कसलीही अपेक्षा ना करता सुखरूप पोहोचवले. 

गम्मत म्हणजे हि मागच्याच आठवड्यात नवीन शूज घेतले होते. ते पाण्यात भिजतील म्हणून मी शूज हातात घेऊन ट्रेन मधून उतरलो आणि विचार केला कि पुढे कुठेतरी ते पायात घालू. मोबाइल प्लास्टिक च्या पिशवीत ठेवला. एका हातात छत्री , एका हातात शूज आणि पाठीमागे ऑफिस बॅग असा मी उतरलो आणि हो, पॅन्ट गुडघ्यापर्यंत फोल्ड केली होती. आजूबाजूच्या लोकांना उतरायला मी देखील मदत केली. त्याच्या मानवी साखळीतून जाताना जाणवले की यांच्या घरात देखील दोन फुटांपेक्षा जास्त पाणी आहे त्याची पर्वा न करता ते आपल्याला मदत करीत आहेत. बराच वेळ हळू हळू चालल्यावर त्यांनी आम्हाला हायवे पर्यंत नेले. रस्त्यावर किंवा कुठेही लाईट नव्हती. इतकी वर्षे मी मुंबई मध्ये राहतो पण या क्षणी मी कुठे आहे ते ओळखूच आले नाही. पूर्ण अंधार होता आणि पाणीच पाणी. 

सर्वात आधी छत्री बंद केली आणि बॅगेत ठेवली. पायात शूज घातले . आत्ता कुठे जरा मोकळे वाटले. पुढचा प्रश्न म्हणजे लोक दोनीही दिशेला चालत होती त्यामुळे सायन / खार कोणत्या दिशेला येणार ते कसे कळणार ? एका स्थानिकाला विचारले मग त्याने सांगितले. हायवे पूर्ण पाण्याने भरलेला होता. पण रस्त्याच्या मध्ये असलेल्या डिव्हायडर वरून सर्व जण हळू हळू अंधारात चालत होते. आपला पाय पुढच्याच्या पायाला लागणार नाही या हिशोबानी मी देखील चालायला सुरुवात केली. असंख्य लोक चालत होते त्यात गरीब / श्रीमंत / सूट बूट वाले / हाफ पॅन्ट वाले म्हणजे सर्व प्रकारची लोक चालत होती. खरे म्हणजे माणूस हा माणूसच असतो पण आपण त्याची पैशाने किंमत करतो. 

वास्तविक पाहता ज्या लोकांनी आम्हाला ट्रेन मधून उतरवले व सुरक्षित हायवे पर्यंत नेले ते कोण होते ? त्यांना मी धन्यवाद असे देखील बोललो नाही. तसे सुचलेच नाही. त्यांची स्वतःची घरे पाण्याखाली होती पण त्यांनी आम्हाला मदत केली. मग यात त्या क्षणी श्रेष्ठ कोण ? खूप मदत करणारा कि खूप पैसे असणारा ?

मोबाइलला ला नेटवर्क असले तरी काही चालत नव्हते मग मी बायकोला आणि आईला मेसेज केला कि मी गोवंडीला हायवे ला आहे आणि चालत येतोय. समजा काही विपरीत घडले तर त्यांना जेव्हा केव्हा हा मॅसेज मिळेल तेव्हा त्यांना माझे शेवटचे लोकेशन कळावे हि अपेक्षा. 

थोडा वेळ चालल्यावर कोणीतरी सांगितले कि चेंबूर आले. मग पुन्हा घरी मेसेज केला. विचार केला कि समजा गटारात वाहून गेलो तर चेंबूर ला माझे लास्ट लोकेशन होते हे घरातल्याना कळेल , मगाशी गोवंडीला होते. मुंग्यासारखी माणसे एकामागोमाग एक चालत होती. विशेष म्हणजे एवढी गर्दी असून कोणीच कोणाशी बोलत नव्हते. एक प्रकारची शांतता होती. सर्वांच्या माना खाली  होत्या आणि पुढच्याच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही चालत होतो. 

सर्व बालपण माझ्या डोळ्यासमोरून ओघळून गेले . असे वाटले कि रस्त्यातच बुडणार , अख्खी मुंबई बुडणार कारण पाऊस अक्षरशः धबधब्यासारखा कोसळत होता. खिशातील पैसे / क्रेडिट कार्ड/ इंजिनीरिंग ची डिग्री / मॅनेजमेंट ची डिग्री / एवढा मोठा जनसंपर्क याचा या क्षणी काहीच फायदा नव्हता. इथे बुडालो तर बॉडी घरच्याना मिळेल का हा विचार अनेकदा मनात आला. तुमचे कुटुंब तुमच्या आयुष्यातील शेवटच्या क्षणी जवळ असणे किती महत्वाचे असते याची मला क्षणक्षणाला जाणीव होत होती. चालत असताना पुरुष स्त्रिया सर्वे एकत्रच चालत होते. कोणतीही छेडछाड नाही,  कोणी कोणाकडे बघताच नव्हते. सगळ्यांचं लक्ष पुढच्याने कुठे पाऊल ठेवले याकडे होते. 

चालताना मला RCF ची एव्हरार्ड नगरची बिल्डिंग दिसली , खूप आनंद झाला.  आत्ता इथून सायन जवळ होते म्हणजे मी बऱ्यापैकी जवळ आलो होतो. घरी परत मेसेज केला. Crossed RCF building walking towards sion on highway. अर्थात हे मेसेज कधी मिळतील काहीच ठाऊक नव्हते. पण घरातल्याना शोधाशोध करताना जास्त  त्रास होऊ नये यासाठी हा खटाटोप. 

चालत चालत सायन वरून राइट ला वळलो आणि जीवात जीव आला. घरी परत मेसेज केले. सायन ला मात्र जरा जास्त पाणी होते. मग धारावीतून खूप हळू हळू आलो. तिथे काही सरदारजी वडापाव आणि पाणी वाटत होते. या सरदार लोकांना सलाम.  काहीही झाले तरी यांची जेवण वाटण्याची यंत्रणा लगेचच कामाला लागते. अर्थात एवढ्या लोकांना ते कसे पुरणार पण बऱ्याच लोकांना वडापाव मिळाले. मला मात्र एकाने पाणी दिले आणि तो मला सॉरी बोलला , बोलला कि सॉरी वडापाव खतम हो गया, पर आप पानी पिलो. त्याने मला का सॉरी बोलावे ??? अमेझिंग. 

चालत चालत टी junction पर्यंत आलो. इथे गर्दी तुरळक होती. तेवढ्या २-३ बेवडे रस्त्यावर उभे राहून बायकांना अश्लील कॉमेंट करू लागले. आणि जवळ जवळ २०-२५ लोक त्यांच्यावर धावून गेले. त्या लोकांनी अशी काही धूम ठोकली कि काही विचारू नका. मी पण थांबलो,  पण मला त्यांच्या मागे पाळणे शक्य झाले नाही कारण एक तर खूप चाललो होतो आणि सतत चालल्यामुळे skin रॅशेस झाल्या होत्या. अशी वाईट माणसे आपल्याला तुरळक का होईना भेटतात. आणि भारत हा असा देश आहे कि ज्याची पूजा होते त्याचे नुकसान बरबादी आपण जास्तच करतो उदा. स्त्रिया , नदी , पाणी , जंगल..... 

टी जंकशन वरून मात्र बांद्रा SV रोड पर्यंत व्यवस्थित चालायला मिळाले. रस्त्यावर खूप काही पाणी नव्हते. पण बांद्रा SV रोड पाण्याने भरलेला होता. बांद्रा बडा मस्जिद च्या बाहेर बरीचशी मुस्लिम मुले वडापाव वाटत होती. त्यांनी मला जबरदस्तीने २ वडापाव दिले. भाई ये खालो असे म्हणून ते पुढे निघून गेले. दोन मिनिट उभे राहून बघितले तर ते खुपशे वडापाव आणून लोकांना देत होते. त्यांच्या भावनेला सलाम. त्यांना मनातल्या मनात सॅल्यूट केला आणि मी तो भिजलेला पण चविष्ट वडापाव खाल्ला. खूप भूक लागल्यानंतर अनपेक्षितपणे जेव्हा काही खायला मिळते त्याची चव अवर्णनीय असते. . परत घरी मेसेज केला . Reached lucky hotel , coming to home by linkng road

इथून मात्र मी घरी व्यवस्थित पोहोचलो. आई , वडील काका वगैरे सर्वे जण बिल्डिंग खालीच होते. त्यांना माहीतच नाही की मी चालत येतोय. आख्या मुंबईची लाइट गेली होती त्यामुळे सर्व प्रथम कॅण्डल लाईट मध्ये अंघोळ केली. आणि जिवंत असल्याबद्दल देवाचे आभार मानले. 

बायको भाभा हॉस्पिटल बांद्रा ला ड्युटीवर होती. खरे म्हणजे ती पण KEM हॉस्पिटल ला गेली होती पण पावसाचा प्रकोप  वाढल्यावर ती लगेचच परतली. माझे वडील संध्याकाळीच जाऊन तिला भेटून खात्री करून ,परत आले होते. मग रेनकोट घालून तिला भेटायला गेलो. दुसऱ्या दिवशी कळले कि अनेक जण पाण्यात वाहून गेले. काही तर गाडीमध्ये काचा बंद असल्यामुळे गुदमरून गेले. असंख्य सापडलेच नाही.  मै बच गया.  

गम्मत म्हणजे मी केलेले मेसेज सर्वाना दोन दिवसांनी भेटले. ते मेसेज करण्यामागचे कारण ऐकून सर्वानी मला मुर्खात काढले. 

जर त्या दिवशी बेलापूरहून नेहमीच्या वेळेला म्हणजे ६. ३० ला निघालो असतो तर मात्र बेलापूरलाच राहावे लागले असते पण या रोमहर्षक अनुभवाला मुकलो असतो. 

आयुष्य क्षणभंगुर आहे. कधी काय होईल , कोण मदतीला येईल आपण सांगू शकत नाही. रोजच्या जीवनात अनेक जण आपल्याला मदत करत असतात. पण आपण त्याबद्दल कधीच आभारी नसतो. आहो,  ज्या नळातून आपण पाणी पितो ते पाणी आपल्या घरी येण्यासाठी लाखो लोकांनी मेहनत केली असते. अश्या असंख्य गोष्टी आहेत. 

आजकाल ट्रेन ने जास्त प्रवास होत नाही. पण झाला तर गोवंडीच्या त्या झोपडपट्टीला नकळत हात जोडले जातात. आयुष्यात काही प्रसंग मनावर कोरले जातात , रोमहर्षक असतात , बरेच काही शिकवून जातात त्यापैकी हा एक ठळक प्रवास. 

विशाल फुलपगार 
२६ जुलै २०२१

8 comments:

  1. Superb writing Vishal..
    As usual your simple explanation creates a live scene before you and I could literally imagine 26th July in front of my eyes

    Though lucky to be home on that day as I was wet in rain and come to change cloth..
    And then dint venture out!

    ReplyDelete
  2. Thanks Vishal for your 26 jul 2005 experience. Nicely worded. U hv all elements of good story writer.
    I had my share of horrible experience at kalina that day. Good luck.

    ReplyDelete
  3. Superb writing. तुझं लिखाण वाचताना असं वाटत की तुझ्याबरोबर मी पण त्या पावसात पाण्यातून चालत आहे. Keep on writing

    ReplyDelete
  4. धन्यवाद वैभव गोरे

    ReplyDelete
  5. मनाला चटका लावणारे. अति उत्तम, रोमांचक, निसर्ग मीठा मानव छोटा, जोपड़पट्टी उत्तम, सूटबूट वाले छोटे, देव एकच रुपे अनेक़, दूसर्यान्ना मदत करनारा मोठा, ज्याचे त्याचे कर्म आणि भवितव्य.

    ReplyDelete